संप्रेरक संस्था / हारमोन्स

गलग्रंथी (थॉयरॉईड)

शरीरात थॉयरॉईड (गलग्रंथी) ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी गळ्यामध्ये  स्वरयंत्राच्या खालच्या बाजूस असते. गलग्रंथीतून थॉयरॉक्झिन संप्रेरके निर्माण होतात. यासाठी आयोडीन लागते. आयोडीन हे द्रव्य समुद्राच्या पाण्यात, समुद्री अन्नात (मासे, वनस्पती) व भूगर्भातल्या पाण्यात (थोडे प्रमाण) आढळते. डोंगरी भागात व समुद्रापासून जास्त आत असलेल्या भू भागात आयोडीनचे प्रमाण फारच कमी असते. आयोडीनची कमतरता असलेल्या अशा प्रदेशातील लोकांना गलगंड (गलग्रंथीची वाढ) होतात. याबद्दल नंतर आपण वाचणारच आहोत. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात आयोडीन कमतरता आढळते.

थॉयरॉक्झिन हे अत्यंत महत्त्वाचे संप्रेरक आहे. शरीरातील रासायनिक घडामोडींवर त्याचे नियंत्रण असते. शरीरातील रासायनिक क्रियांचा वेग यावर अवलंबून असतो. पेशीपेशींमध्ये होणारे श्वसन म्हणजे प्राणवायू, कार्बवायू यांची देवाणघेवाण यामुळेच होते. तसेच शरीराची वाढ व इतर अनेक रासायनिक घडामोडींवर या संप्रेरकांचे नियंत्रण असते.

याच्याच जवळ आणखीही एक ग्रंथी पॅरॅथॉयरॉईडअसते आणि ही ग्रंथी हाडांची वाढ, रक्तातले चुन्याचे प्रमाण नियंत्रित करते.

थॉयरॉईड जास्त प्रमाण झाले तर ?

या संप्रेरकाचे रक्तातील प्रमाण वाढले तर हातापायांना घाम सुटणे, थरथर, हृदयाची गती वाढणे (धडधड), शरीराचे तपमान वाढणे, डोळे ‘मोठे’ दिसणे, इत्यादी दुष्परिणाम जाणवतात. गलग्रंथीचा आकारही वाढू शकतो. वेळीच आजार ओळखून उपचार करणे महत्त्वाचे असते. मात्र हा आजार सौम्य प्रमाणात असेल तर ओळखणे अवघड असते. तज्ज्ञ डॉक्टरच याची शहानिशा करू शकेल. आयोडीनचे विशिष्ट औषध/ शस्त्रक्रिया, इत्यादी उपायांनी हा आजार आटोक्यात आणता येतो.

थॉयरॉईड संप्रेरकाचे प्रमाण कमी झाले तर ?

थॉयरॉक्झिन संप्रेरकाचे प्रमाण कमी झाल्यास शरीरातील रासायनिक घटकांचा वेग मंदावतो. बाळाच्या वाढीच्या काळात हा आजार झाला असेल तर वाढ कमी होते.

प्रौढपणी थायरॉईड हार्मोन कमी पडल्यास याची कारणे अनेकविध असतात. हा आजार चाळीशीच्या स्त्रियांना होतो. मात्र त्याचे कारण नीट कळलेले नाही. याचबरोबर इतर अनेक कारणे आहेत. उदा. आयोडीन कमतरतेमुळे थायरॉईड हार्मोन कमी पडणे.

हायपोथायरॉइडिझम (थायरॉईड ग्रंथीचे कमी कार्य)

हायपोथायरॉइडिझम म्हणजे गळ्यात स्वरयंत्राच्या पुढील थायरॉईड ग्रंथीचे कार्य कमी होणे. ही ग्रंथी शरीरातील चयापचय, उष्णता निर्मिती, हृदयाचे कार्य, वजन आणि ऊर्जा नियंत्रित करणारे हार्मोन्स तयार करते. जेव्हा हे हार्मोन्स कमी प्रमाणात तयार होतात, तेव्हा शरीरातील अनेक प्रक्रिया मंदावतात.

भारतात हायपोथायरॉइडिझम हा अत्यंत सामान्य अंतःस्रावी विकार मानला जातो. विविध भारतीय अभ्यासांनुसार सुमारे ८–११% प्रौढ भारतीयांमध्ये हायपोथायरॉइडिझम आढळतो. काही मोठ्या शहरांतील अभ्यासांमध्ये हा दर १०% पेक्षाही जास्त आढळला आहे. 

भारतीय अभ्यासानुसार:

  • स्पष्ट (Overt) हायपोथायरॉइडिझम सुमारे ३–५% लोकांत दिसतो. 
  • Subclinical hypothyroidism म्हणजे TSH वाढलेले पण T4 सामान्य असणे, हे सुमारे ८–१०% लोकांत आढळते. 

महिलांमध्ये हा आजार पुरुषांच्या तुलनेत अधिक प्रमाणात दिसतो. विशेषतः:

  • मध्यमवयीन महिला 
  • गर्भवती महिला 
  • रजोनिवृत्तीनंतरच्या महिला 
  • कुटुंबात थायरॉईड विकार असलेले लोक
    यांच्यात धोका जास्त असतो. 

भारतामध्ये आयोडीन कमतरता, ऑटोइम्यून थायरॉईड रोग (Hashimoto thyroiditis), वाढते वय, स्थूलता आणि वाढलेली तपासणी यांमुळे या आजाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. वेळेवर निदान आणि उपचारामुळे बहुतेक रुग्ण पूर्णपणे सामान्य जीवन जगू शकतात.

याची लक्षणे-चिन्हे प्रत्येक शरीरसंस्थेवर उमटतात आणि लक्षणे हळूहळू वाढतात.

  • काही रुग्णांमध्ये नैराश्य, स्मरणशक्ती कमी होणे आणि कामात उत्साह कमी होणेही दिसते. 
  • त्वचा-कोरडी, निस्तेज, केस गळणे.
  • पचनसंस्था – बध्दकोष्ठ
  • रक्ताभिसरण संस्था – रक्तदाब थोडा वाढणे, दम लागणे, थंडी वाजणे, नाडी थोडी सावकाश चालणे.
  • चेतासंस्था – मानसिक थकवा, विचारांचा वेग मंदावणे, झोपाळूपणा, शारीरिक हालचाली सावकाश होणे.
  • मूत्रसंस्था – लघवी कमी होणे.
  • स्त्री जननसंस्था – पाळी अनियमित होणे. स्त्रीबीज न सुटणे
  • वजन वाढणे – स्थूलता

एकूणच थायरॉईड कमतरतेमुळे शरीरात सर्वत्र दुर्बलता येते. हा आजार लवकर कळून येत नाही, त्याला काही महिने लागू शकतात.

निदानासाठी रक्तातील TSH, T3 आणि T4 तपासण्या महत्त्वाच्या असतात. बहुतेक रुग्णांत TSH वाढलेले आणि T4 कमी आढळते.

हायपोथायरॉइडिझमच्या निदानात TSH (Thyroid Stimulating Hormone) ही सर्वात महत्त्वाची रक्त तपासणी मानली जाते. सामान्यतः रक्तातील TSH पातळी वाढलेली असल्यास थायरॉईड ग्रंथी कमी कार्य करत असल्याची शक्यता असते. हायपोथायरॉइडिझमचे निदान साधारणपणे पुढीलप्रमाणे केले जाते:

  • सौम्य अवस्था /Subclinical hypothyroidism
    TSH वाढलेले (सामान्य ४.५–१० mIU/L) पण Free T4 सामान्य असते. 
  • स्पष्ट आजार /Overt hypothyroidism
    TSH > १० mIU/L आणि Free T4 कमी असते. 
  • Secondary hypothyroidism (पिट्यूटरी ग्रंथीचा विकार) मध्ये
    TSH कमी किंवा सामान्य दिसू शकते, पण T4 कमी असते. 

TSH चे मूल्य वय, गर्भधारणा, औषधे आणि प्रयोगशाळेनुसार थोडे बदलू शकते. त्यामुळे उपचार  नेहमी लक्षणे  (असल्यास ), रक्त तपासणी अहवाल & वय यानुसार ठरतो.

वैद्यकीय उपचार

हायपोथायरॉइडिझम हा दीर्घकालीन पण नियंत्रित करता येणारा आजार आहे. लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी आणि उपचार घेतल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते.

उपचारासाठी लेव्होथायरॉक्सिन (Thyroxine) हे औषध रोज सकाळी उपाशीपोटी, नाश्त्याच्या किमान ३० मिनिटे आधी दिले जाते. सामान्य प्रौढांमध्ये सुरुवातीचा डोस साधारण २५ ते ५० मायक्रोग्रॅम प्रतिदिन असतो. तरुण आणि निरोगी व्यक्तींमध्ये १.६ मायक्रोग्रॅम प्रति किलो वजनाप्रमाणे पूर्ण डोस दिला जाऊ शकतो. वृद्ध व्यक्ती किंवा हृदयरोग असलेल्या रुग्णांत १२.५ ते २५ मायक्रोग्रॅमपासून सुरुवात करून हळूहळू डोस वाढवला जातो. TSH तपासणीप्रमाणे दर ६–८ आठवड्यांनी डोस समायोजित केला जातो.

औषध नियमित घेणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध बंद करू नये किंवा डोस बदलू नये. योग्य उपचारांमुळे बहुतेक रुग्ण पूर्णपणे सामान्य जीवन जगू शकतात.

आहारात आयोडीनयुक्त मीठ वापरणे, नियमित व्यायाम करणे आणि वेळोवेळी थायरॉईड तपासणी करणे उपयुक्त ठरते. गर्भवती महिलांमध्ये थायरॉईड नियंत्रण विशेष महत्त्वाचे असते, कारण त्याचा बाळाच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होऊ शकतो.

थॉयरॉक्झिन संप्रेरकाचे प्रमाण कमी झाल्यास शरीरातील रासायनिक घटकांचा वेग मंदावतो. बाळाच्या वाढीच्या काळात हा आजार झाला असेल तर वाढ कमी होते.

नवजात बाळांना थॉयरॉईड कमतरता

नवजात बाळांना थॉयरॉईड कमतरता असल्यास पुढीलपैकी लक्षणे-चिन्हे दिसतात.

  • जन्मानंतर 2-3 दिवसात येणारी कावीळ जास्त टिकणे.
  • जीभ जाड व मोठी असणे.
  • बेंबीजवळ हर्नियाचा फुगवटा
  • बाळ दूध नीट ओढत नाही.
  • त्वचा कोरडी पांढरट वाटते.
  • बाळ जास्त झोपाळू असते.
  • बाळाचा विकास मंद होतो. सर्व टप्पे लांबतात.
  • मतिमंदत्व
  • वेळीच उपचार न झाल्यास उंची नीट वाढत नाही.

थॉयरॉईड कमतरतेचे निदान करण्यासाठी आपण सावध आणि सजग असले पाहिजे. अशी लक्षणे दिसणारी स्त्री किंवा बाळ दिसल्यास ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरकडून उपचार करून घेणे आवश्यक आहे. यासाठी वेळीच पाठवणे आवश्यक आहे.

रक्ततपासणीत थायरॉईड संप्रेरकांचे प्रमाण समजते. त्यावरून नक्की रोगनिदान करता येते.

याचे उपचार (संप्रेरक गोळी) अगदी कमी खर्चात होतात. मात्र दीर्घकाळ  उपचार घ्यावेच लागतात.

उपचार सुरु केल्यावर 2-3 महिन्यांत पुष्कळ लक्षणे कमी होतात.

होमिओपथी निवड

नायट्रिक ऍसिड, कल्केरिया कार्ब, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, सिलिशिया, सल्फर, थूजा