न्यायवैद्यक

The web page is being updating

न्यायवैद्यकाची ओळख

मारामारी, बलात्कार, आत्महत्या, खून, अपघात, विषारी पदार्थांचे सेवन, दारू पिऊन गाडी चालवणे अशा अनेक प्रसंगी कायद्याचा आणि डॉक्टरी प्रमाणपत्राचा संबंध येतो. त्यानंतर पोलीस, कोर्ट वगैरे प्रक्रिया चालू होतात. या प्रसंगी संबंधित व्यक्ती भांबावून जाते व फसवणूक होण्याचाही संभव असतो. या संबंधी थोडी माहिती आपण घेऊ या.

दखलपात्र गंभीर घटना

या सर्व घटनांची आधी पोलीस पाटील अथवा प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात नोंद केली जाते. पोलिसांनी नोंद घेतल्यानंतर प्रसंगाच्या गांभीर्याप्रमाणे ‘दखल’ घेतली जाते. बलात्कार, खून, आत्महत्या, विषारी पदार्थांचे सेवन, दारू पिऊन वाहन चालवणे, अनैसर्गिक लैंगिक संबंध, लग्नानंतर सात वर्षाच्या आत विवाहितेचा मृत्यू किंवा शारीरिक इजा या सर्व दखलपात्र गंभीर घटना आहेत (इंडियन पीनल कोड 304 व 174, (3), 498 (अ). पोलिसांना यासंबंधी सर्व तपासणीची जबाबदारी घ्यावी लागते. आपण फक्त पोलिसांपर्यंत ही बाब पोहोचवायची असते. असे प्रकार नुसते पोस्टकार्ड पाठवल्यानंतरदेखील न्यायसंस्थेने नोंदवल्याची उदाहरणे आहेत. खालील दुखापती ‘गंभीर’ समजल्या जातातः

  • पुरुषाच्या जननेंद्रियास पौरूष कमी होईल अशी कोठलीही इजा करणे.
  • दात पडणे, हाड मोडणे (लहान फ्रॅक्चर असले तरी); सांधे दुबळे होणे, इत्यादींना कारणीभूत होणा-या इजा.
  • डोळा किंवा कानास इजा होऊन दृष्टी किंवा श्रवणशक्ती कायमची कमी होणे.
  • ज्या जखमांमुळे प्राणास धोका पोहोचतो अशा जखमा (अंतर्गत नाजूक अवयवांना, मेंदूस मार लागणे, इ.)
  • ज्या जखमांमुळे रुग्णालयात वीसपेक्षा अधिक दिवस राहावे लागलेले आहे अशा जखमा.
  • तीक्ष्ण हत्यारांच्या जखमा.

डॉक्टरी प्रमाणपत्रानेच ही जखम ‘दखलपात्र’ आहे हे सिध्द करावे लागते. उरलेल्या किरकोळ जखमांच्या बाबतींत पोलीस फक्त सरकारी डॉक्टरला चिट्ठी (पोलीस यादी) देऊन प्रमाणपत्र द्यायला सांगतात. जखम गंभीर असल्यास पोलीस ठाणे टाळून सरळ (सरकारी) रुग्णालयात गेल्यास तिथल्या डॉक्टरवर पोलिसांना खबर देण्याची जबाबदारी असते.

व्यक्ति ओळख (Personal Identification in India)

वैयक्तिक ओळख म्हणजे एखाद्या व्यक्तीची इतरांपासून स्वतंत्र आणि अचूक ओळख पटविण्याची प्रक्रिया होय. भारतात कायदेशीर, वैद्यकीय, प्रशासकीय आणि गुन्हे तपासणीच्या कामात वैयक्तिक ओळख अत्यंत महत्त्वाची असते.

ओळख पटविण्यासाठी नाव, वय, लिंग, पत्ता, छायाचित्र आणि स्वाक्षरी यांसारखी सामान्य माहिती वापरली जाते. आधुनिक काळात आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स ही महत्त्वाची ओळखपत्रे मानली जातात.

फॉरेन्सिक शास्त्रात बोटांचे ठसे (Fingerprints), DNA परीक्षण, दंत ओळख (Dental identification), रेटिना व आयरिस स्कॅन आणि चेहेरयाचे( ओळख तंत्रज्ञान यांचा वापर केला जातो. बोटांचे ठसे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे आणि आयुष्यभर स्थिर राहतात, त्यामुळे त्यांना सर्वात विश्वासार्ह ओळख पद्धत मानले जाते.

मृतदेहाची ओळख पटविताना कपडे, जन्मखूणा, जखमांचे व्रण, हाडांची रचना, दात आणि DNA यांचा उपयोग होतो. गुन्हे तपास, आपत्ती व्यवस्थापन, वारसा, विमा आणि कायदेशीर प्रक्रियेत वैयक्तिक ओळखीचे विशेष महत्त्व आहे.

डीएनए प्रोफाइलिंग (DNA Profiling)

डीएनए प्रोफाइलिंग ही व्यक्तीची अचूक जैविक ओळख पटविण्याची आधुनिक वैज्ञानिक पद्धत आहे. डीएनए  हे प्रत्येक पेशीत आढळणारे आनुवंशिक पदार्थ असून प्रत्येक व्यक्तीचा डीएनए नमुना वेगळा असतो, जुळ्या भावंडांचा अपवाद वगळता(identical twins).

या पद्धतीमध्ये रक्त, केस, लाळ, तोंडातील गालाच्या आतील श्लेष्मल त्वचेचा नमूना, वीर्य, त्वचेच्या  पेशी किंवा हाडे यांसारख्या नमुन्यांमधून डीएनए वेगळा काढला जातो. त्यानंतर विशिष्ट आनुवंशिक भागांचे परीक्षण करून व्यक्तीची ओळख निश्चित केली जाते. ही प्रक्रिया अत्यंत अचूक आणि विश्वासार्ह मानली जाते. डीएनए प्रोफाइलिंगमुळे गुन्हे तपास अधिक अचूक, जलद आणि वैज्ञानिक पद्धतीने करणे शक्य झाले आहे.

फॉरेन्सिक शास्त्रात गुन्हेगारांची ओळख पटविणे, बलात्कार, खून,-मातृत्व/ पितृत्व चाचणी, हरवलेल्या व्यक्तींची ओळख आणि आपत्तीतील मृतदेहांची ओळख यासाठी डीएनए प्रोफाइलिंगचा उपयोग होतो. न्यायालयातही हा महत्त्वाचा वैज्ञानिक पुरावा मानला जातो. पुरातन अवशेषयातून देखील डीएनए मिळू शकतो. मानव-वंश उत्क्रांती संशोधनात यामुळे क्रांति झाली आहे.

तथापि, नमुने दूषित होणे, गोपनीयतेचे प्रश्न आणि खर्च या काही मर्यादा आहेत. भारतात डीएनए तंत्रज्ञानाच्या वापरासाठी कायदेशीर नियम आहेत आणि नैतिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन आवश्यक आहे.