टाइप २ मधुमेह हा एक दीर्घकालीन चयापचय (मेटबॉलीजम) विकार आहे. यात शरीरातील पेशी इन्सुलिन संप्रेरकाला योग्य प्रतिसाद देत नाहीत (म्हणजे इन्सुलिन प्रतिरोध किंवा निरुपाय होतो) आणि कालांतराने स्वादुपिंडातून इन्सुलिनचे उत्पादनही अपुरे होऊ लागते. परिणामी रक्तातील साखरेची (ग्लुकोजची) पातळी सतत वाढलेली राहते आणि त्याचे सर्व अवयवांवर दुष्परिणाम होतात.
सुरुवातीच्या काळात स्वादुपिंड जास्त इन्सुलिन तयार करून रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करते; परंतु कालांतराने बीटा पेशी थकतात,इन्सुलिन निर्मितीच कमी होते आणि मधुमेह स्पष्टपणे दिसू लागतो. हा रोग अनुवंशिकता, लठ्ठपणा, निष्क्रिय जीवनशैली,अयोग्य खानपानाच्या सवयी आणि वाढते वय यांच्याशी संबंधित आहे.
मधुमेह (Diabetes Mellitus) हा रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा विकार असून त्याचे अनेक प्रकार आहेत.

टाइप २ मधुमेह हा जगातील आणि भारतातील सर्वाधिक आढळणाऱ्या असंसर्गजन्य रोगांपैकी एक आहे. भारतात कोट्यवधी लोक या आजाराने प्रभावित आहेत आणि वाढते शहरीकरण, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार,वाढते ताणताणाव आणि वाढते आयुर्मान यांमुळे या आजाराचे प्रमाण वाढत आहे. अनेक रुग्णांमध्ये सुरुवातीला कोणतीही लक्षणे नसल्यामुळे निदान उशिरा होते. भारतात सुमारे 10% प्रौढ व्यक्तीना हा आजार झालेला असतो, आणि 10% मधुमेह-पूर्व स्थितीत (प्री-डायबेटीस) असतात.
मधुमेहाचे महत्त्व केवळ रक्तातील साखर वाढण्यात नसून त्याच्या दीर्घकालीन गुंतागुंतींमध्ये आहे. हा आजार हृदयविकार, पक्षाघात, मूत्रपिंड निकामी होणे, अंधत्व, मज्जातंतू विकार आणि पायाच्या जखमा व पाय किंवा बोटे इत्यादी सडणे (gangrene) यांचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे टाइप २ मधुमेह हा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोरील एक मोठे आव्हान आहे.
टाइप २ मधुमेहाच्या व्यवस्थापनातील त्रुटी समजावून सांगण्यासाठी “रूल ऑफ हाफ्स” म्हणजे ‘निम्मे-शिम्मे’ चा नियम बोधप्रद आहे. या नियमानुसार मधुमेह असलेल्या १०० व्यक्तींमध्ये फक्त सुमारे ५० जणांचे निदान होते. त्यापैकी केवळ २५ जण (५०% × ५०%) नियमित व योग्य उपचार घेतात. या उपचार घेणाऱ्यांपैकी सुमारे १२–१३ जणांची रक्तातील साखर चांगल्या प्रकारे नियंत्रणात असते. त्यांपैकी केवळ ६–७ जणांमध्ये दीर्घकालीन गुंतागुंत प्रभावीपणे टाळता येते. म्हणजेच मधुमेह असलेल्या १०० व्यक्तींपैकी फक्त सुमारे २५% लोकांना योग्य उपचार मिळतात, तर केवळ १२–१३% लोकांमध्ये रोगाचे समाधानकारक नियंत्रण साध्य होते. त्यामुळे लवकर निदान, नियमित तपासणी, योग्य औषधोपचार आणि जीवनशैलीतील सुधारणा अत्यंत आवश्यक आहेत.