लिंगसांसर्गिक आजार आणि एड्स

This webpage will be updated

प्रास्ताविक लैंगिक संपर्कातून पसरणारे आजार (Sexually Transmitted Infections – STIs) 

लैंगिक संपर्कातून पसरणारे आजार (Sexually Transmitted Infections – STI) हे एक महत्त्वाचे सार्वजनिक आरोग्य आव्हान आहे. सामाजिक गैरसमज,  अज्ञान, आणि आरोग्य सेवांची मर्यादित पोहोच यामुळे अनेक रुग्ण योग्यवेळी यावर उपचार घेत नाहीत. परिणामी संसर्ग पसरत राहतो आणि गंभीर दुष्परिणाम निर्माण होतात. आपण या आजारांना गुपतरोग, गरमी, सुजाक, परमा, उपदंश (सिफिलीस) आदि शब्द वापरत असतो. याऐवजी लिंगसांसर्गिक आजार असा शब्द वापरणे जास्त अचूक आहे. लक्षणगट पद्धतीत रोगाचे नाव न घेत लक्षणगट नाव वापरणे जास्त योग्य आहे.
प्राथमिक आरोग्य पातळीवर (Primary Care) STI चे लवकर निदान, त्वरित उपचार आणि समुपदेशन केल्यास या आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.

STI म्हणजे लैंगिक संबंधांद्वारे (योनीमार्ग, गुदमार्ग, तोंडी संपर्क) पसरतात असे संसर्ग. हे आजार जीवाणू (bacteria), विषाणू (virus) किंवा परजीवी (parasites) यांमुळे होतात. अनेक वेळा रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, तरीही संसर्ग इतरांना पसरतो, विशेषकरून हेपटायटिस बी, एड्स याबद्दल असे सामान्यपणे होतेच. आणि यापैकी  बहुतेक आजार जननेंद्रियाच्या ठिकाणी होतात तर एचआयव्ही सर्व शरीरात आणि हेपटायटिस बी-सी हे आजार यकृताला होतात.   

लिंगसांसर्गिक आजारांचे प्रकार

जीवाणूजन्य STI

  • गोनोरिया 
  • क्लॅमिडिया 
  • सिफिलिस 
  • शंकऱ्ऑईड
  • योनिदाह (बुरशी)   

विषाणूजन्य STI

  • HIV/AIDS एड्स
  • जननेंद्रिय हर्पिस 
  • HPV (जननेंद्रिय वॉर्ट्स) 
  • हिपॅटायटिस B व C

परजीवीजन्य STI

  • ट्रायकोमोनायसिस योनिदह  
  • स्कॅबीज (खरूज) 
  • उवा (Pubic lice)
लिंगसांसर्गिक आजार कसे संक्रमित होतात?

लैंगिक संपर्कातून पसरणाऱ्या आजारांना मराठीत लिंगसांसर्गिक आजार असे म्हणतात. या आजारांचा प्रसार मुख्यत: स्त्री-पुरुष लैंगिक संपर्कातून  होतो. हा प्रसार बहुतेक वेळा असुरक्षित लैंगिक संबंधांदरम्यान—योनीमार्ग, गुदमार्ग किंवा तोंडी संपर्क—यातून घडतो. एचआयव्ही आणि हेपटायटिस बी-सी हे आजार दूषित रक्तातून किंवा इंजेक्शनद्वारा देखील पसरतात.

लैंगिक संबंधाच्या वेळी जननेंद्रियांच्या श्लेष्मल त्वचेचा (mucosal surface) थेट संपर्क होतो. या भागांमध्ये अतिशय नाजूक /पेशीसमूह  असतात. संपर्कादरम्यान सूक्ष्म जखमा किंवा चिरा (micro-abrasions) निर्माण होऊ शकतात. या सूक्ष्म जखमांमधून सूक्ष्मजंतूंना शरीरात प्रवेश करणे सोपे होते. उदाहरणार्थ, गोनोरिया व क्लॅमिडिया हे जीवाणू मूत्रमार्ग किंवा गर्भाशयमुखातून प्रवेश करतात, तर HIV आणि हर्पिस हे विषाणू त्वचेतील सूक्ष्म जखमांमधून पसरतात.

संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील द्रव—वीर्य, योनीस्त्राव किंवा रक्त—यामध्ये हे जंतू मोठ्या प्रमाणात असतात. हे द्रव दुसऱ्या व्यक्तीच्या श्लेष्मल त्वचेशी संपर्कात आले की संसर्ग होतो. कंडोमचा/निरोध वापर न केल्यास हा धोका अधिक वाढतो.

काही लिंगसांसर्गिक आजार (उदा. सिफिलिस, हर्पिस) हे जननेंद्रियावरील जखमा, फोड किंवा गाठी यांच्याशी थेट त्वचा-त्वचा संपर्कातूनही पसरतात. तसेच HIV, हिपॅटायटिस B आणि C हे संक्रमित रक्त, सुई किंवा आईकडून बाळाला (गर्भावस्थेत, प्रसूतीवेळी किंवा स्तनपानाद्वारे) देखील पसरू शकतात.

महत्त्वाचे म्हणजे, अनेक वेळा संक्रमित व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, तरीही तो किंवा ती इतरांना संसर्ग देऊ शकतो/शकते. त्यामुळे सुरक्षित लैंगिक संबंध, नियमित तपासणी आणि योग्य उपचार यांना विशेष महत्त्व आहे.

सांसर्गिक धोका वाढवणारे घटक

असुरक्षित लैंगिक संबंध – जसे :

  • अनेक लैंगिक जोडीदार 
  • कंडोमचा/निरोधचा वापर न करणे 
  • लैंगिक व्यवसाय
  • लिंग-व्यायसायिक स्त्री पुरुषासोबत संबंध
  • समलिंगी संबंध

या खेरीज

  • संक्रमित रक्त/सुई, इंजेक्शन द्वारा अमली पदार्थ घेण्याची सवय    
  • आईकडून बाळाला (गर्भावस्था किंवा प्रसूतीवेळी) 

याही मार्गांनी संसर्गाचा धोका वाढतो.

सामान्य लक्षणे

  • जननेंद्रियातून स्त्राव (पांढरा/पिवळा/दुर्गंधीयुक्त) 
  • जननेंद्रियावर जखम, फोड
  • जननेंद्रियाजवळ म्हणजे जांघेत गाठी 
  • जननेंद्रियावर किंवा लंघवीच्या जागी खाज, जळजळ 
  • लघवी करताना वेदना, जळजळ  
  • ओटीपोटात तीव्र किंवा सौम्य वेदना 
  • पुरुष-अंडकोश सूज 

टीप: अनेक वेळा लक्षणे नसतात, त्यामुळे तपासणी महत्त्वाची आहे. म्हणूनच गरोदरपणी किंवा शास्त्रक्रियेच्या आधी काही रक्त-तपासण्या कराव्या लागतात.