बहुतांश रुग्णांमध्ये मधुमेहाची अशी कोणतीही निश्चित लक्षणे दीर्घकाळापर्यंत दिसून येत नाहीत.म्हणून याला छुपा मारेकरी (silent killer)म्हणतात.बहुतेक वेळा इतरच काही कारणाने केलेल्या तपासणीत रक्तातील साखर वाढलेली सापडते, आणि मधुमेहाचे निदान होते.
मधुमेहाची लक्षणे तीन प्रमुख गटांत विभागता येतात.
रक्तातील साखर जास्त झाल्यावर अतिरिक्त ग्लुकोज मूत्राद्वारे बाहेर पडतो. त्यासोबत पाणीही बाहेर गेल्याने खालील लक्षणे निर्माण होतात.
बहुमूत्रता (Polyuria)
वारंवार व जास्त प्रमाणात लघवी होणे. अनेक रुग्णांना रात्री वारंवार उठून लघवी करावी लागते.
अतितहान (Polydipsia)
शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी सतत तहान लागते आणि पाणी पिण्याची गरज वाढते.
अतिभूक (Polyphagia)
रक्तात साखर भरपूर असूनही इंसुलिन-निरुपाय असल्याने पेशींना ऊर्जा मिळत नाही, अशाने वारंवार भूक लागते.
ही लक्षणे इतर अनेक आजारांतही आढळतात, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.
थकवा आणि अशक्तपणा
शरीरात ऊर्जेचा योग्य निर्मिती व वापर न झाल्यामुळे रुग्णाला सतत दमल्यासारखे वाटते.
काम करण्याची क्षमता कमी होणे
शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमता हळूहळू कमी होते.
दृष्टी धूसर होणे
रक्तातील साखरेतील बदलांमुळे डोळ्याच्या भिंगात तात्पुरते बदल होतात आणि दृष्टी अस्पष्ट होते.
त्वचेची खाज
विशेषतः जननेंद्रियांच्या आसपास किंवा त्वचेच्या भागांत जीवाणू-संसर्गामुळे खाज जाणवू शकते.
वारंवार संसर्ग
मूत्रमार्ग, त्वचा, हिरड्या आणि जननेंद्रियांचे जंतू संसर्ग वारंवार होऊ शकतात.
जखमा उशिरा भरून येणे
रक्तपुरवठा व रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे जखम भरून येण्यास विलंब होतो.
हातपायात मुंग्या किंवा जळजळ
मज्जातंतूंवरील परिणामामुळे झिणझिण्या, मुंग्या किंवा जळजळ जाणवते.
वजन वाढणे, घटणे
सामान्यत: मधुमेह आजारात वजन वाढत जाते, कारण मेद म्हणजे चरबी वाढत जाते. काही रुग्णाना(विशेषत: अनियंत्रित वाढलेल्या मधुमेहात ) वजन कमी झाल्याचा अनुभव येतो, अशा रुग्णांचे हात-पायाचे स्नायू बारीक झालेले असतात.

काही रुग्णांमध्ये मधुमेहाचे निदान त्याच्या गुंतागुंती निर्माण झाल्यावरच होते.
मधुमेही रेटिनोपॅथी (Diabetic Retinopathy)
डोळ्याच्या पडद्यावरील सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊन दृष्टी कमी होऊ शकते.
मोतीबिंदू (Cataract)
मधुमेहामुळे डोळ्यात मोतीबिंदू लवकर तयार होण्याची शक्यता वाढते.
मधुमेही न्युरोपॅथी (Diabetic Neuropathy)
मज्जातंतूंच्या नुकसानीमुळे पायात जळजळ, वेदना किंवा संवेदना कमी होतात.
मधुमेही नेफ्रोपॅथी (Diabetic Nephropathy)
मूत्रपिंडातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊन लघवीत प्रथिने जाऊ लागतात.आणि मूत्रपिंडाचे कार्य कमकुवत होऊ शकते.
कोरोनरी हृदयरोग (Coronary Artery Disease)
मधुमेहामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
मेंदूचा झटका (Stroke)
मेंदूतील रक्तपुरवठा कमी किंवा बंद झाल्याने पक्षाघात होऊ शकतो.
हातापायातील रक्तवाहिन्यांचा विकार (Peripheral Arterial Disease)
पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन चालताना पाय दुखणे किंवा जखमा होऊ शकतात.
पावलावर जखमा-व्रण (Diabetic Foot)
संवेदना कमी होणे आणि रक्तपुरवठा घटणे यामुळे पायावर जखमा-व्रण तयार होतात, आणि नियंत्रण व उपचार न झाल्यास गंग्रीन झाल्यामुळे (सडण्याची क्रिया) पायाचा त्याखालील भाग कापावा लागू शकतो .
निर्जलीकरण, गोंधळलेपण
अतिशय वाढलेल्या रक्तशर्करेमुळे तीव्र निर्जलीकरण, गोंधळ आणि बेशुद्धावस्था निर्माण होऊ शकते.
Erectile dysfunction/ पुरुषांमध्ये लिंग उद्दीपित न होऊ शकणे
रक्तातीलली दीर्घकाळ वाढलेल्या साखरेमुळे लिंगाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो, तसेच नसांची संवेदन क्षमताही कमी झाल्यामुळे ही समस्या सुमारे 60 % मधुमेही पुरुषांमध्ये येऊ शकते.
अनियंत्रित मधुमेहामुळे स्त्रियांमध्येही योनीमार्गात जंतुसंसर्ग, कोरडेपणा & नसा कमकुवत होऊन कामेच्छा कमी होऊ शकते.

मधुमेहाचे निदान प्रमाणित रक्तशर्करा तपासण्यांवर आधारित असते.
उपाशी रक्तातील साखर (Fasting Plasma Glucose)
रात्री किमान ८ तास उपाशी राहिल्यानंतर तपासलेली रक्तशर्करा. ही तपासणी घरी ग्लुकोमेटेर असेल तर करता येते. बरेच रुग्ण ही तपासणी घरीच करतात. अन्यथा सकाळचा ‘उपाशीपोटी’ रक्तनमूना तपासणीसाठी द्यावा लागतो.
जेवणानंतर २ तासांची रक्त-शर्करा / OGTT म्हणजे ७५ ग्राम साखर देऊन केलेली तपासणी.
७५ ग्रॅम ग्लुकोज दिल्यानंतर २ तासांनी मोजलेली रक्तशर्करा.
रँडम रक्तशर्करा (Random Plasma Glucose)
दिवसातील कोणत्याही वेळी घेतलेली रक्तशर्करा.
200 mg/dL आणि जास्त रक्त-शर्करा असेल आणि मधुमेहाची ठळक लक्षणे असल्यास मधुमेहाचे निदान करता येते.
एचचबीए1सी (HbA1c)
मागील तीन महिन्यांतील सरासरी रक्तशर्करेचे निर्देशक. ही एक महत्वाची तपासणी आहे. रक्तातील साखर रकतद्रव्य म्हणजे हेमोग्लोबिन रेणुना काही प्रमाणात चिकटते. जास्त साखर असेल तर जास्त रेणुना चिकटते, या तत्वाचा उपयोग करून , या तपासणीत गेल्या तीन महिन्यात रक्तातील सरासरी साखरप्रमाण काढले जाते. शासकीय आरोग्यसेवेत ही मोफत केली जाते. ही तपासणी करण्याच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत परंतु HPLC ही पध्धत सर्वमान्य ठरवलेली आहे.
निदान निकषांचा सारांश
| तपासणी | सामान्य | पूर्वमधुमेह | मधुमेह |
| उपाशी रक्तशर्करा | <100 mg/dL | 100–125 mg/dL | ≥126 mg/dL |
| २ तास OGTT | <140 mg/dL | 140–199 mg/dL | ≥200 mg/dL |
| HbA1c | <5.7% | 5.7–6.4% | ≥6.5% |
| रँडम रक्तशर्करा | — | — | ≥200 mg/dL + लक्षणे |
टाईप २ मधुमेह (T2DM) मध्ये निदान, उपचाराचे नियोजन व गुंतागुंत टाळण्यासाठी विविध प्रयोगशाळा तपासण्या (Lab tests) आणि विशेष तपासण्या (Special tests) महत्त्वाच्या असतात. सर्वात मूलभूत तपासणीत उपाशी रक्तशर्करा (Fasting Blood Sugar), जेवणानंतरची रक्तशर्करा (PPBS) आणि HbA1c यांचा समावेश होतो. HbA1c मागील २–३ महिन्यांतील सरासरी साखरेचे नियंत्रण दर्शवते.
या सर्व तपासण्यांमुळे मधुमेहाचे नियंत्रण योग्य आहे का, औषधोपचार परिणामकारक आहेत का आणि हृदय, मूत्रपिंड, डोळे व नसांवरील गुंतागुंत टाळता येते का हे समजण्यास मदत होते. साधारणपणे या तपासण्या वार्षिक तपासण्या म्हणून करतात. काही दोष दिसल्यास ती तपासणी व अधिकच्या तपासण्या गरजेनुसार पुन्हा पाठपुरावा स्वरुपात केल्या जातात.

सतत ग्लुकोज निरीक्षण प्रणाली (Continuous Glucose Monitoring – CGM) ही मधुमेह नियंत्रणासाठी वापरली जाणारी आधुनिक व अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञानाधारित पद्धत आहे. या प्रणालीमध्ये त्वचेखाली एक छोटा सेन्सर बसवला जातो. हा सेन्सर शरीरातील ग्लुकोजची पातळी प्रत्येक काही मिनिटांनी मोजून ती माहिती मोबाईल अॅप किंवा विशेष उपकरणावर पाठवतो. त्यामुळे रुग्णाला साखरेतील चढ-उतार सतत समजतात आणि हायपोग्लायसेमिया किंवा अतिजास्त साखरेचा धोका लवकर ओळखता येतो.
CGM मुळे वारंवार बोट टोचून रक्त तपासणी करण्याची गरज कमी होते. इन्सुलिन घेणारे रुग्ण, टाइप 1 मधुमेह असलेले रुग्ण, गर्भावस्थेतील मधुमेह आणि नियंत्रण कठीण असलेल्या रुग्णांसाठी ही प्रणाली विशेष उपयुक्त ठरते. भारतात CGM सेन्सरची किंमत साधारण ₹२५०० ते ₹१२००० पर्यंत असू शकते, तर संपूर्ण महिन्याचा खर्च ₹५००० ते ₹१५००० पर्यंत जाऊ शकतो.(CGM च्या प्रणाली नुसार खर्च बदलतो. तुमचे डॉक्टर याविषयी योग्य सल्ला देतील.) पण खर्च जास्त असला तरी योग्य मधुमेह नियंत्रणासाठी CGM महत्त्वाचे साधन मानले जाते.
टाइप २ मधुमेह हा दीर्घकालीन चयापचय विकार असून त्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असते. या आजाराचे व्यवस्थापन म्हणजे एकत्रितपणे योग्य जीवनशैली, नियमित तपासण्या, योग्य औषधे, गुंतागुंतींचे लवकर निदान आणि धोकादायक घटकांचे नियंत्रण. मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन केल्यास रुग्ण अनेक वर्षे निरोगी व सक्रिय जीवन जगू शकतो. तसे न झाल्यास आयुर्मान कमी होऊ शकते.
टाइप २ मधुमेह (T2DM) व्यवस्थापनाचे मुख्य उद्दिष्ट रक्तातील साखर योग्य मर्यादेत ठेवणे व दीर्घकालीन गुंतागुंत टाळणे हे आहे. प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत: