मधुमेह

मधुमेहावरील औषधोपचार

मधुमेहावरील तोंडावाटे घेण्याची औषधे

मधुमेह (Type 2 Diabetes Mellitus) हा भारतातील अतिशय सामान्य आजार आहे. या आजारात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि औषधोपचार यांच्या साहाय्याने मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी मधुमेही रुग्णांना औषधे नियमित घेण्याचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक आहे.

तोंडावाटे घेण्याची मधुमेहावरील औषधे मुख्यतः स्वादुपिंडातून इन्सुलिन स्राव वाढवणे, शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारणे किंवा आतड्यातून ग्लुकोजचे शोषण कमी करणे या मार्गांनी काम करतात.

मेटफॉर्मिन (Metformin) हे सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे. हे यकृतातून होणारे अतिरिक्त ग्लुकोज उत्पादन कमी करते आणि शरीराची इन्सुलिनप्रती संवेदनशीलता वाढवते. वजन वाढवत नाही आणि हायपोग्लायसेमियाचा धोका कमी असतो.

सल्फोनिलयुरिया गटातील औषधे (उदा. ग्लायमिपिराइड,ग्लायकलाझाइड, ग्लिबेनक्लामाइड) स्वादुपिंडातून इन्सुलिन स्राव वाढवतात. ही प्रभावी असली तरी रक्तातील साखर खूप कमी होण्याचा (हायपोग्लायसेमिया) धोका असू शकतो.

सिटाग्लिप्टिन, व्हिल्डाग्लिप्टिन इत्यादि  DPP-4 inhibitors औषधे  शरीरातील इन्क्रेटिन हार्मोन्सचे कार्य वाढवून इन्सुलिन स्राव सुधारतात. ही औषधे साधारणपणे सुरक्षित मानली जातात.

SGLT-2 inhibitors (उदा. डॅपाग्लिफ्लोझिन, एम्पाग्लिफ्लोझिन) मूत्रावाटे अतिरिक्त साखर बाहेर टाकण्यास मदत करतात. काही रुग्णांमध्ये हृदय व मूत्रपिंड संरक्षणाचे अतिरिक्त फायदे दिसून येतात.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांना औषधे नियमित घेणे, रक्तातील साखरेची तपासणी करणे, संतुलित आहार घेणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद न करणे याबद्दल मार्गदर्शन करावे.

तोंडावाटे घेण्याच्या मधुमेहावरील औषधांचा माहिती तक्ता
औषध गटउदाहरणेकार्यपद्धतीप्रमुख दुष्परिणाम
बिग्वानाइडमेटफॉर्मिनइन्सुलिन संवेदनशीलता वाढवते, यकृतातील ग्लुकोज निर्मिती कमी करतेपोटफुगी, मळमळ, जुलाब
सल्फोनिलयुरियाग्लायमिपिराइड, ग्लिक्लाझाइडइन्सुलिन स्राव वाढवतेहायपोग्लायसेमिया, वजन वाढ
DPP-4 inhibitorsसिटाग्लिप्टिन, व्हिल्डाग्लिप्टिनइन्क्रेटिन हार्मोन्सची क्रिया वाढवतेडोकेदुखी, सौम्य पचनविकार
SGLT-2 inhibitorsडॅपाग्लिफ्लोझिन, एम्पाग्लिफ्लोझिनमूत्रावाटे साखर बाहेर टाकतेजननमार्ग/मूत्रमार्ग संसर्ग
अल्फा-ग्लुकोसिडेज इनहिबिटर्सअकार्बोज,वोग्लीबोसआतड्यात कार्बोहायड्रेटचे शोषण मंदावतेपोटात गॅस, पोटफुगी
थायाझोलिडिनेडायोन्सपायोग्लिटाझोनइन्सुलिन निरुपाय कमी करतेसूज, वजन वाढ

महत्त्वाचे: औषधांची निवड, मात्रा व बदल हे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावेत. प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी औषधांचे पालन (compliance), आहार आणि व्यायाम यांवर विशेष भर द्यावा.

आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये मधुमेहावरील औषधे मोफत मिळतात 

भारतामध्ये आरोग्य व आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (Health and Wellness Centres) टाइप २ मधुमेहासाठी प्राथमिक तपासणी, सल्ला व अनेक मूलभूत औषधे मोफत उपलब्ध करून दिली जातात. येथे रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब मोजणी, वजन तपासणी तसेच जीवनशैलीविषयक मार्गदर्शन दिले जाते. अनेक केंद्रांमध्ये मेटफॉर्मिन, ग्लायमिपिराइड यांसारखी आवश्यक मधुमेहावरील औषधे मोफत दिली जातात. नियमित फॉलो-अपद्वारे रुग्णांचे HbA1c, पायांची तपासणी आणि गुंतागुंत ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. योग्य आहार, व्यायाम, तंबाखू-मद्य त्याग आणि वजन नियंत्रण याबाबतही शिक्षण दिले जाते. गरज पडल्यास रुग्णांना पुढील उपचारांसाठी उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयात संदर्भित केले जाते.