मधुमेहातील “डायबेटिक किटोॲसिडोसिस” किंवा DKA ही एक गंभीर आणि जीवघेणी अवस्था आहे. शरीरात इन्सुलिनची तीव्र कमतरता झाल्यास पेशींना ग्लुकोज वापरता येत नाही. त्यामुळे शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी चरबी जाळू लागते व त्यातून “कीटोन्स” नावाचे आम्ल तयार होते. रक्तात कीटोन्स वाढल्याने शरीर आम्लयुक्त बनते, यालाच किटोॲसिडोसिस म्हणतात. ही अवस्था प्रामुख्याने टाईप १ मधुमेहात दिसते, पण टाईप २ मधुमेहातही होऊ शकते.
DKA होण्याची कारणे म्हणजे इन्सुलिन बंद करणे किंवा डोस चुकणे, संसर्ग, ताप, न्यूमोनिया, मूत्रमार्गातील संसर्ग, हृदयविकाराचा झटका, शस्त्रक्रिया, ताणतणाव किंवा नव्याने निदान न झालेला मधुमेह. काही वेळा स्टिरॉईड औषधे किंवा अतिखाणे यामुळेही धोका वाढतो.
सुरुवातीला खूप तहान लागणे, वारंवार लघवी होणे, तोंड कोरडे पडणे, अशक्तपणा व वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. पुढे मळमळ, उलट्या, पोटदुखी, वेगाने व खोल श्वास घेणे, तोंडाला फळासारखा वास येणे, गोंधळ किंवा बेशुद्धावस्था येऊ शकते. रक्तातील साखर खूप वाढलेली असते.
किटोॲसिडोसिसचे दुष्परिणाम गंभीर असतात. शरीरातील पाणी व क्षार कमी होतात, रक्तदाब घसरतो, मूत्रपिंड निकामी होऊ शकतात आणि उपचार न मिळाल्यास मृत्यूही होऊ शकतो.
प्रथमोपचार म्हणून रुग्णाला भरपूर पाणी द्यावे, रक्तातील साखर तपासावी आणि त्वरित रुग्णालयात दाखल करावे. घरच्या घरी फक्त साखर कमी करण्याचा प्रयत्न पुरेसा नसतो. रुग्णालयात इन्सुलिन, सलाईन व इलेक्ट्रोलाइट्स देऊन उपचार केले जातात.
प्रतिबंधासाठी इन्सुलिन नियमित घ्यावे, आजारपणात साखर वारंवार तपासावी, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद करू नयेत आणि उलट्या, ताप किंवा जास्त साखर असल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. योग्य काळजी घेतल्यास DKA टाळता येते.
टाईप २ मधुमेहामध्ये हातापायात न्यूरोपॅथी (Peripheral Neuropathy) ही एक सामान्य पण गंभीर गुंतागुंत आहे. रक्तातील साखर दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास हात-पायातील चेतांवर परिणाम होतो. विशेषतः पायातील संवेदना कमी होणे हे याचे प्रमुख लक्षण आहे. सुरुवातीला पायात मुंग्या येणे, झिणझिण्या, जळजळ, बधिरपणा किंवा रात्री वाढणारी वेदना जाणवू शकते. काही रुग्णांना चालताना तोल जाणे किंवा पायाखाली कापूस असल्यासारखे वाटते. संवेदना कमी झाल्यामुळे जखम किंवा भाजणे लक्षात येत नाही आणि त्यामुळे पावलावर व्रण होण्याचा धोका वाढतो.
परिधीय न्यूरोपॅथीचे निदान रुग्णाच्या लक्षणांवर, पायांची तपासणी, व्हायब्रेशन परसेप्शन टेस्ट (VPT) आणि नर्व कंडक्शन टेस्ट यांच्या मदतीने केले जाते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे हा उपचाराचा मुख्य आधार आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार, धूम्रपान टाळणे आणि पायांची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. ब १२ जीवनसत्व हा महत्वाचा पूरक उपाय आहे. वेदना कमी करण्यासाठी काही विशेष औषधे दिली जातात. दररोज पाय तपासणे, योग्य चप्पल वापरणे आणि कोणतीही जखम दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य उपचार व काळजीमुळे न्यूरोपॅथीची प्रगती कमी करता येते.

पावलावर जखम आणि व्रण होणे (Diabetic Foot) ही मधुमेहाची एक गंभीर गुंतागुंत व दुष्परिणाम आहे. रक्तातील साखर दीर्घकाळ जास्त राहिल्यामुळे पायातील चेतातंतूवर व रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. त्यामुळे पायाची संवेदना कमी होते, रक्तपुरवठा घटतो आणि जखमा उशिरा भरतात. सुरुवातीला पायात मुंग्या येणे, जळजळ, बधिरपणा किंवा वेदना जाणवू शकतात. काही वेळा चप्पल घासल्याने किंवा छोट्या दुखापतीमुळे जखम होते, पण संवेदना कमी असल्याने रुग्णाला ती लक्षात येत नाही. पुढे जखमेत संसर्ग होऊन पू, काळेपणा किंवा गँग्रीन होऊ शकते. गंभीर अवस्थेत पाय कापण्याची वेळही येऊ शकते.
हा दुष्परिणाम टाळण्यासाठी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मधुमेही व्यक्तीने आपले पाय दररोज स्वच्छ धुवून कोरडे ठेवावेत. पायात जखम, भेगा, सूज किंवा रंगबदल आहे का हे तपासावे. अनवाणी चालणे टाळावे आणि योग्य मापाचे मऊ चप्पल किंवा बूट वापरावेत. नखे काळजीपूर्वक कापावीत. धूम्रपान टाळल्यास रक्तपुरवठा सुधारतो. पायात कोणतीही जखम दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य काळजी घेतल्यास मधुमेही पायाच्या गंभीर समस्या टाळता येतात.
याविषयी डॉ दीक्षित यांची व्याख्याने यू ट्यूबवऱ उपलब्ध आहेत
महाराष्ट्रातील प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ यांनी लोकप्रिय केलेली दीक्षित जीवनशैली ही मुख्यतः दिवसातून दोन वेळा जेवण आणि नियमित शारीरिक हालचाल या तत्त्वांवर आधारित आहे. या पद्धतीमागील संकल्पना अशी आहे की वारंवार खाण्यामुळे इन्सुलिनचे स्रवण सतत चालू राहते, तर जेवणांच्या मधील पुरेसे अंतर इन्सुलिनची पातळी कमी ठेवण्यास मदत करू शकते.सतत इन्सुलिन स्त्रवत राहिल्यास हळूहळू पेशी insulinला विरोध निर्माण करतात.आणि मग insulin उपलब्ध असले तरी अकार्यक्षम असल्यामुळे insulin ची मात्रा आणि रक्तातील साखर दोन्ही वाढते. मधुमेह होतो. (इन्सुलिन प्रतिरोध,वाढणारे वजन/चरबी,prediabetes ,diabetes हे ओळीने येणारे आजार आहेत. त्या सोबतच अनेक रुग्णामध्ये रक्तदाबाची समस्याही येते.) इन्सुलिन प्रतिरोध हेच मधुमेहाचे मूळ कारण आहे.
संभाव्य फायदे
मर्यादा आणि आवश्यक काळजी
दीक्षित जीवनशैली ही अनेक लोकांमध्ये उपयुक्त ठरू शकते, गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता, गंभीर मूत्रपिंड किंवा यकृत विकार असलेले रुग्ण, अतिवृद्ध व्यक्ती किंवा कुपोषित व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही पद्धत अवलंबू नये. जीवनशैलीतील कोणताही मोठा बदल करताना रक्तशर्करेचे नियमित निरीक्षण आवश्यक आहे.