योगशास्त्र-प्राथमिक

योगासने

स्थिर व सुखकारक स्थिती म्हणजे ‘योगासन’ अशी व्याख्या आहे. आपल्याला माहीत असणारी अनेक योगासने ‘अवघड’ वाटतात. सुरुवातीस योगासने करणे जड जाते. हळूहळू सरावाने आणि शरीर लवचीक झाल्याने ही अवघड दिसणारी आसने ‘स्थिर’ व ‘तणावमुक्त’ (सुखाची) होऊ लागतात. असे आदर्श आसन करणे एकदम साधत नाही. काही जणांना काही आसने साधतात, तर इतरांना इतर आसने साधतात. वय व शरीरबांधणीनुसार यात फरक पडतो. लहानपणी शिकल्यास योगासने लवकर येतात. म्हणूनच शाळेपासून योगविद्या शिकवणे आवश्यक आहे.

योगासनांचे 6 गट पाडता येतील
  • उभी आसने
  • बैठी आसने
  • पाठीवर झोपून करायची आसने
  • पोटावर झोपून करायची आसने
  • खाली डोके वर पाय अशी अवस्था
  • पोटाची आसने/क्रिया

या 5-6  गटांत मिळून शेकडो आसने येतात. मात्र त्यातली निवडक आसने प्रचलित आहेत. सर्व आसने करणे एखाद्यालाच शक्य होते. ही सर्व आसने शरीर सर्वांगाने लवचीक व सुदृढ व्हावे म्हणून उपयोगी आहेत. प्राचीन काळात अनेक योगी (हठयोगी) स्त्री-पुरुषांनी अनेकविध आसने शोधली.

नाशिकच्या कुंभमेळयातले फोटो किंवा टी.व्ही दृश्ये आपण पाहिली असतील. देशातले शेकडो-हजारो साधू-बैरागी कुंभमेळयास जमतात. तासन् तास योगासने करण्याची त्यांची शक्ती व साधना अचंबित करते. एका पायावर उभे राहणे (एकपादासन), शीर्षासन (खाली डोके वर पाय), पद्मासन (बैठक) आदि आसने लीलया ते तासन् तास ठेवू शकतात. असा हठयोग सामान्य माणसाला साधणे अवघड आहे. सामान्य व्यक्तीकडून तशी अपेक्षाही नसते. आरोग्यासाठी योग एवढेच आपले इथे उद्दिष्ट आहे.

वरील पाच गटांतील विविध आसने आपल्याला योगशिक्षकाकडूनच शिकावी लागतील. आपल्या कुवतीनुसार योग्य ती आसने आणि क्रम शिकायचे असतात. तक्त्यात योगासनांची गटवारी दिली आहे. ही वर्गवारी केवळ माहीतीसाठी आहे.

प्राणायाम

इतर सर्व शरीर स्थिर ठेवून फक्त श्वसनाचा प्रमाणबध्द अभ्यास करणे, त्याबरोबरच मन स्थिर ठेवणे याला प्राणायाम असे नाव आहे. याचे अनेक प्रकार आहेत व ते योगविषयक पुस्तकात विस्ताराने दिलेले असतात. इथे फक्त त्यांतला एक प्रमुख प्रकार नमूद केला आहे. हा प्राणायाम पूरक-कुंभक-रेचक या नावाने ओळखला जातो. यात वेळेचे प्रमाण अनुक्रमे 1:4:2 असे असते. म्हणजे पूरक (श्वास आत घेणे) 4 सेकंदभर, तर कुंभक (आत ठेवणे) 16 सेकंद व रेचक (श्वास सोडणे) 8 सेकंद याप्रमाणे नियम आहे. यासाठी कोठल्याही स्थिर आसनाची सवय झाली की पुरते. (मांडी घालूनही चालते, पद्मासन, सिध्दासन इ. आसनेही वापरली जातात). श्वास आत घेताना नाकाच्या मोकळया बाजूने सुरुवात करून दुस-या बाजूने सोडावे. पुढच्या श्वसनाचे वेळी नाकाच्या उलट बाजूने सुरुवात करावी.

हा प्राणायाम करण्याआधी बंध शिकावे लागतात. सुरुवातीस दीर्घ श्वसन (संथश्वसन) शिकणे हे सर्वात सुरक्षित व सोपे असते. बसून, उताणे पडून किंवा उभ्या उभ्याही संथ श्वसन करता येईल. उताणे अवस्थेत ‘पोटाने’ संथ श्वसन केल्यास मन लवकर शांत होते.

योगाचा फिजिओथेरपी म्हणून उपयोग

गावपातळीवरील कार्यकर्त्यास रोग्यावर उपचार सुचवावे लागतात. काही ठिकाणी व्यायामाची गरज माहीत असूनही हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी विभागातील साधने नसल्याने काय करावे हा बिकट प्रश्न पडतो. पाय, हात अधू झालेल्या माणसास दुस-या व्यक्तीच्या मदतीनेच त्या केंद्रापर्यत पोचता येते. या पोचण्या – परतण्यामध्ये सोबतच्या व्यक्तीचा रोजगार बुडतो. म्हणून तज्ज्ञाने सुचवलेले असले तरी उपकरणांच्या व्यायामांचा प्रत्यक्ष वापर फारच कमी होतो.

अशा वेळी घरच्या घरी, घरातील सतरंजी, चटईवर प्रयत्न करता येतो. यासाठी घरातील कळत्या माणसाची मदत घ्यावी. केंद्रामधील उपकरणे स्प्रिंगा, चक्रे,रबरी पट्टे, घट्ट सायकली अशा प्रकारची असतात. त्यांतील तत्त्व म्हणजे शरीराला न जमणारे काम करावयास शिकवण्यासाठी थोडा अधिक दाब, ओढ लावण्याचे असते. आपल्या लोकांना जमिनीवर बसून अनेक गोष्टी करण्याची सवय असते. मात्र अनेक उपकरणे पाश्चात्त्य वळणाची असल्याने उभ्या स्थितीवर अधिक भर देतात.

योगासनाद्वारे उपकरणाऐवजी शरीराच्याच अवयवांनी दाब,ओढ,ताण देता येतात. यासाठी योगाचरणातील अनेक आसने फार चांगली उपयोगी पडतात. योगासने म्हटली की ती एकदम चित्रात दाखवल्याप्रमाणे तंतोतंत झालीच पाहिजेत असे नाही. ज्यांना योगासन प्रावीण्य मिळवायचे असेल त्यांना ते ठीक आहे. पण आजार, दुबळेपणा दुरुस्त करण्यासाठी चित्रासारखी हुबेहुब स्थिती जमावी लागतेच असे नाही.