योगशास्त्र-प्राथमिक

योगासने व इतर व्यायामातला फरक

योगासनांची इतर खेळ, मजुरीची कामे, व्यायाम यांच्याशी तुलना करून पहा. वरील सर्वांमध्ये आपण हातापायांचे जास्तीत जास्त आकुंचन-प्रसरण करतो. त्यामुळे हृदय व फुप्फुस संस्थांना अधिक काम करावे लागते. इतर व्यायामात हृदयाकड़ून हातापायाच्या मांसपेशींना अधिक रक्त पुरवावे लागते. या तुलनेत आसनांकडे पाहिल्यावर असे लक्षात येईल, की त्यात हातापायातील मांसपेशींना ठरावीक स्थितीत बसवले जाते. यातून पाठ, पोट, कण्यातील अनेक मणके यांना वळवून दाब, ताण ओढ दिली जाते. यावेळी इतर व्यायामप्रकारांप्रमाणे भराभर श्वासोच्छ्वास न चालवता सावकाश, दीर्घ, आवाज न करता चालणारा श्वासोच्छवास अपेक्षित असतो. स्थिर बसवलेले, दामटून ठेवलेले हातपाय या अवयवांकडून अधिक रस- रक्त हृदय, यकृत, फुप्फुस यांच्याकडे वळते. म्हणजे खेळ, श्रम, व्यायाम यांच्या तुलनेत योगासनामध्ये फुप्फुस-हृदयाला कमी काम देऊन पोकळ अवयवाकडे रस-रक्त वळवले जाते.

मनुष्याचे हातपाय घट्ट रचनेच्या मांस-चरबी-हाडांनी बनलेले आहेत तर धडामध्ये फुप्फुसाचे फुगे, आतडयाच्या नळया, पोटाची पिशवी अशा पोकळ रचनांचे बाहेरचे आवरण तयार करण्याइतपतच मांसाच्या भिंती आहेत. हातापायाचे काम बंद पडल्यानेसुध्दा शरीराची कामे तशी बिघडत नाहीत, पण फुप्फुसाचे, हृदयाचे, पोटाचे आतडयाच्या नळयांमधील कार्य बिघडल्याने आजारपण येते. म्हणून आरोग्य सांभाळायचे असेल तर धडामध्ये असणा-या कोशगत अवयवांचे (फुगे, नळया व पिशव्या) काम हातापायांपेक्षा अधिक नीट चालले पाहिजे. यामुळेच आरोग्य सांभाळण्यासाठी आसनांचे महत्त्व आहे. आसनस्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करीत असता शरीरातील पोकळ अवयवांना अधिक रस-रक्त पुरवले जाते. त्यातून टाकाऊ पदार्थ सहज सुटू शकतात. त्यामुळे घेतलेली हवा, घेतलेले अन्न-पाणी अधिक चांगले वापरले जाते. फुप्फुस, पोट, आतडी ही आतुन स्वच्छ होण्यामुळे शरीराला आवश्यक क्रिया चांगल्या होतात.खेळ, श्रम, व्यायाम यांमध्ये आपण मुख्यतः हातापायातील घटकांना राबवतो, तर आसनामध्ये बसण्याने आपण फुप्फुसे, पोट, आतडे, कणा यांना विशिष्ट काम देतो.

स्नायूंच्या इतर व्यायाम प्रकारात शरीरातली चेतासंस्थेची सावधान शाखा (सिंपथेटीक सिस्टिम) जादा काम करते. यामुळे हृदयक्रिया, रक्तदाब, श्वसन, तपमान, घाम इ. वाढतात. याउलट योगासने, प्राणायाम हा चेतासंस्थेच्या विश्राम शाखेशी (परासिंपथेटीक सिस्टिम) संबंधित आहे. ही शाखा हृदय, फुप्फुसे, आतडी, मूत्र, जननसंस्था यांच्याशी निगडित आहे. यामुळे शरीर शांत, स्थिर होते व संथ होते. शिथिलीकरणाचा उद्देश यातूनच साधतो.

शरीर आजारी पडते ते ब-याच वेळा पोकळयांतील काम बिघडून. म्हणून आजार असताना तो ठीक होण्यासाठी औषधांच्या जोडीला नियंत्रित श्वास घेणे, पोकळयांवर सोसवेल असा दाब, ताण, ओढ, टिकाऊ वळण आणणे हे उपयोगी पडते. पोकळी असणा-या अवयवांना सुधारून क्रियाशील करणे हे योगासन, प्राणायाम यांमुळे साधते.

पोट भरलेले असताना, मेजवानीसारखे जड जेवण झाले असताना, बरेच जागरण झाले असताना, अजीर्णासारखे वाटत असताना, पोकळयांवर काम करणारे हे विशेष आसन-प्रकार करू नयेत. अन्न पचून गेल्यानंतर अन्नपचन करणारे कोश-अवयव रिकामे असताना योगासने करणे योग्य असते.

ताप सुरू होताना, सांधे सुजलेले किंवा गरम असताना आरंभ करू नये; नाहीतर दुखणे वाढते. आसने करताना सोसवेल इतपतच प्रयत्न करावा. मात्र दुखेल या भीतीने प्रयत्न करण्याचे टाळू नये. रुग्णाला हे समजावून सांगणे फार महत्त्वाचे आहे.

काही आजार व यौगिक उपाय

इथे आजाराच्या अवस्था व त्यासाठी सर्वसाधारणपणे उपयोगी योगाचरण सूचित केले आहे. आसनांची नावे सांगितल्यानंतर कोणत्या क्रमाने कोणती कृती करावी हे आपण जाणकार व्यक्तीकडून समजून घ्यायला पाहिजे. आसने, प्राणायाम यांबद्दल माहीती असणारे ठिकठिकाणी असतात. मात्र आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी नेमके काय करायचे हे माहीत नसते. ते संक्षिप्तपणे पुढे मांडले आहे

  • भूक सुधारण्यासाठी : अग्निसार, उड्डियान, भस्त्रिका, दीर्घ श्वसन, मयूरासन.
  • जळजळ, आगसंवेदना असताना : सीत्कारी, शीतली प्राणायाम.
  • सांधे दुखणे : पश्चिमोत्तासन, पश्चिमोत्तानासनाचा प्रयत्न, गुदद्वार आकुंचित-विस्फारित करणे, हलासन, सर्वांगासन, भस्त्रिका.
  • योनिभ्रंश (प्रारंभी) गर्भाशय बाहेर पडणे (बाळंतपणानंतर) : वज्रासनामध्ये बसून अश्विनीमुद्रा, (गुदद्वार आकुंचित-प्रसारित करणे), उड्डियानबंध,गरुडासन, विपरीत करणी,सर्वांगासन, मूलबंध. बाळंतपणानंतर हेच व्यायाम सावकाश करून वाढवत न्यावेत.
  • जलोदर (प्रारंभिक अवस्था) : मयूरासन, कुक्कुटासन, उड्डियानबंध, अर्धमत्स्येंद्रासन.
  • बारीक पोटदुखी, चिकट फेसकट शौच : बेंबी आत ओढून ठेवणे, नौलिचालन, अग्निसार, मयूरासन, योगमुद्रा .
  • निद्रानाश : उताणे अवस्थेत ‘पोटाने’ संथ श्वसन केल्यास मन लवकर शांत होते. याने अनेक जणाण शांत झोप लागते
  • सतत सर्दी होणे, सायनसदुखी: यावर ‘आजारी नसताना’ मधल्या काळात जलनेती हा चांगले उपचार आहे. मात्र तज्ञ व्यक्तिकडून शिकून घ्यावे
  • मानसिक ताण तणाव : शवासन, योगनिद्रा