मथुरा ही आता २० वर्षांची आहे. मी जेव्हा त्याला भेटायला गेलो तेव्हा ती घरी नव्हती. तिच्या बाबाने तिला शेतातून बोलावून घेतले. आल्यावर चक्क तिने मला नमस्कार केला. मथुरा आता शेतात काम करते आणि जनावरे पण सांभाळते. मात्र चार वर्षांपूर्वी तिची मानसिक स्थिती इतकी बिघडली होती की तिच्या घरचे तिला घरात अक्षरश: बांधून ठेवायचे. कारण ती एकतर पळून जायची किंवा लोकांवर धावून जायची. कपडे किंवा खाणेपिणे याची तर तिला शुद्धच नसायची. तिला धड झोपही लागत नव्हती. हा सगळा त्रास ती १४ वर्षांची असताना सुरू झाला. त्यामुळे तिने शाळादेखील सोडली. सुरुवातीला तिची तक्रार नुसती डोकेदुखीची होती. नंतर इतर त्रास सुरू झाला. घरच्यांनी तिला जवळपासच्या सर्व भगतांकडे, जव्हारच्या डॉक्टरांकडे नेले. पण कशाचाच उपयोग झाला नाही. पैशापरी पैसे गेले आणि दोन वर्षेही निघून गेली. योगायोगाने तिला प्रतिभा भेटली. प्रतिभाने तिच्या आई-वडिलांना सांगून सवरून जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर शिंदे यांच्याकडे नेले. नेताना ती आवरत नव्हती. कसेबसे गाडीत घालून धरून नेले. औषध चालू केल्यावर २-३ महिन्यात तिला उतार पडायला लागला. ६ महिन्यात ती इतकी बरी झाली की स्वत: कपडे घालायला लागली, तिची झोप, खाणे-पिणे सुधारले आणि ती कामे पण करू लागली. आता तिला डोकेदुखीची तक्रार आहेच पण बाकी फारसे काही नाही. तिच्या आई-वडिलांना हायसे वाटले.

भ्रमविकारांच्या शेकडो पेशंटपैकी मथुरा ही केवळ एक आहे. औषधोपचारांनी मथुरा आता जवळजवळ बरी झाली आहे. आपल्यापैकी अनेकांनी लहानपणापासून अशा व्यक्ती पाहिलेल्या असणारच. हा आजार वेद काळापासून माहीत आहे. मराठीत याला वेड किंवा भ्रमिष्टपणा म्हणतात तर हिंदीत पागलपन. भ्रमिष्ठावस्था फार वर्षे राहिली तर त्याचे वेडात रुपांतर होते.
पण लक्षात ठेवा की प्रत्येक मनोविकार म्हणजे काही वेड नाही. भ्रमविकाराशिवाय इतरही दोन गंभीर आजार आहेत. विशेषकरून उन्माद आणि अतिनैराश्य.
हा एक टोकाचा मानसिक आजार आहे. प्रत्येक खेडे-वस्तीत अशी व्यक्ती आढळतेच कारण दर २०० लोकांमध्ये १ असे याचे प्रमाण पडते. उपचार न झालेला रुग्ण स्वत: हैराण होतो नाहीतर कुटुंबाला हैराण करतो. त्याच्यामागे सतत कुणीतरी असायला लागते. कुटुंबाची आर्थिक हानी तर होतेच पण सामाजिक अडचणीपण निर्माण होतात. पण हे मात्र नक्की की हा आजार असाध्य नाही, औषधोपचारांनी तो बहुतेक वेळा बरा होतोच. म्हणून कुणावरही वेडा म्हणून शिक्का मारू नका किंवा दोषही देऊ नका. जसा एखादा पोटाचा आजार असतो तसा हा मेंदूचा आजार आहे. यातले काही उपप्रकार तात्पुरते असतात म्हणजे येतात आणि जातात. पूर्वी याला उपचार नव्हते ते आता आहेत. म्हणूनच आता आपण याला वेड वगैरे न म्हणता गंभीर मानसिक आजार म्हणणार आहोत आणि तो बरा होतो.
हा आजार सहसा तरुण वयात सुरू होतो. (१५-३० वर्षांपर्यंत) बर्याच वेळेस एकादी दुर्घटना याला निमित्तमात्र ठरू शकते. (घरात कुणाचा मृत्यू, नापास होणे, मोठे कर्ज, नोकरी जाणे, धंद्यात नुकसान, मारहाण इ.)
अशी व्यक्ती कधीकधी इतरांना हैराण करते आणि कदाचित स्वत: मार खाते. हळूहळू याची माहिती आजूबाजूला व शेजारपाजारी होतेच. शेजारपाजार्यांनी त्रास दिला, चिडवले किंवा मारहाण केली तर हा आजार वाढतच जातो. म्हणूनच आपल्याला इतरांनाही नीट समजावून सांगावे लागेल.
कधीकधी नाइलाजाने घरातले लोक अशा माणसाला चक्क बांधून किंवा कोंडून ठेवतात. अशी काही माणसे घरातून पळून जातात किंवा हरवतात आणि कुठेतरी भीक मागत जगतात. याउलट काही नातेवाईक असहायतेने अशा माणसांना शहरामध्ये कुठेही सोडून देतात. हा आजार बरा होतो हे सर्वांना कळले तर असे प्रकार नक्की थांबतील.
हा आजार काही अंशी जनुकीय असल्याने पुढच्या पिढ्यांमध्ये उतरतो. त्या व्यक्तीच्या वाड-वडिलांमध्ये कुठेतरी असा आजार झालेला असू शकतो. पण प्रत्येक मुला-मुलीला हा आजार होईल असे नाही. आपण वंशावळ काढली तर त्यात अशा काही व्यक्ती सापडू शकतात. पण हा आजार येतो मात्र तरुण वयात तो जन्मजात नसतो आणि लहानपणीही येत नाही.
भ्रमविकाराचा फेरा किंवा झटका काही दिवसांनी थांबतो आणि रुग्ण बरा होतो.
दुसर्या एका प्रकारात केवळ एकच झटका येतो. नंतर कधी नाही.
आणखी एका प्रकारात भ्रमविकाराचा झटका येतो पण पूर्ण बरे न होता आजाराचा काही अंश कायम राहतो.
काही जणांमध्ये हा आजार काही महिन्यांच्या अंतराने येत-जात राहतो. आणखी एका प्रकारात सतत टिकून राहतो त्याला उतार पडत नाही. हा प्रकार उपचारासाठी जास्त अवघड असतो.
हे आजार लवकर ओळखण्याची आवश्यकता असल्याने त्याच्या खाणा-खुणा लक्षात घ्यायला पाहिजे. हा आजार सहसा विशीच्या आत-बाहेर वयात होतो. खालीलपैकी काही लक्षणे किंवा चिन्हे दिसतात.
महत्त्वाची चांगली गोष्ट म्हणजे या आजारासाठी आता चांगली औषधे उपलब्ध आहेत आणि बहुतेक रुग्ण याने छान बरे होतात. ही औषधे स्वस्त आहेत आणि सरकारी दवाखान्यात तर ती मोफतच मिळतात.
यातून सुमारे ७०-९५% रुग्ण सामान्य जीवन जगू शकतात अर्थात त्यासाठी कौटुंबिक आधार आणि थोडा पाठपुरावा करावा लागतो. ज्यांना असा आधार मिळत नाही ते रुग्ण बिघडत जातात. रुग्ण बरा होणार की आजार टिकून राहणार हे थोडेसे आजाराच्या उपप्रकारावरही अवलंबून असते.