मानसिक आरोग्य हे गेली अनेक शतके देश विदेशात अभ्यासाचा विषय आहे. भारतात वैदीक काळापासून आत्मा आणि मन यांचा शोध चालू आहे. पतंजली योगदर्शनात मनाबद्दल अनेक सुत्रे आहेत. महर्षी पतंजली हे योगशास्त्राची व्याख्याच मुळी योग:चित्त वृत्ती निरोध:अशी करतात म्हणजे एखाद्या शांत सरोवरात तरंग नसावेत तसे मन करणे म्हणजेच योग. अजूनही योगातील अनेक नीती मानसिक आरोग्यासाठी जगभर वापरल्या जातात. ध्यानधारणा, विपश्यना, योगनिद्रा वगैरे गोष्टींचा जगभर प्रसार झाला आहे. गौतम बुद्ध आणि महावीरानेही मानसिक शुद्धीसाठी ध्यानाची महती सांगितली आहे. परंतु या सर्व परंपरा असल्या तरी मनोविकारांचे उपचार मात्र त्यातून होणे शक्य नव्हते. म्हणूनच भगत आणि मांत्रिक हेच आजवर या क्षेत्रात टिकून राहिले आहे.
पाश्चात्य परंपरेत मनोविज्ञान शास्त्र सॉक्रीटस आणि प्लेटो च्या काळात पोचते. तरीही पाश्चात्य जगातही जादूटोणा आणि करणी वगैरे अज्ञान मूलक गोेष्टी भरपूर होत्या. असे असूनही पाश्चात्य जगात तत्वज्ञांची एक प्रदीर्घ परंपरा झाली आणि हळूहळू विज्ञानाचा उदय झाला. मानव म्हणजे मन असलेला प्राणी, आणि हे मन मेंदूत असते इथवर आपण नजर मारलेली होती.

मानवी मेंदूचे चार मुख्य भाग आहेत. मोठा मेंदू, मध्य मेंदू (थॅलॅमस), लहान मेंदू आणि मेंदूचा देठ (ब्रेन स्टेन) यात आणखी अनेक भाग आणि केंद्रे आहेत पण त्याची माहिती इथे फारशी आवश्यक नाही. मेंदूच्या विविध भागात आपली विविध कामे चालतात. या सर्व प्रक्रियांचा नकाशा सोबतच्या चित्रात दाखवला आहे.
मोठा मेंदू किंवा मुख्य मेंदू हा सर्व संवेदना स्वीकारतो आणि त्यांचे अर्थ लावतो, हालचालींचे नियंत्रण करतो, सर्व भावना, विचार, व्यक्तीमत्व, बुद्धी आणि स्मृती यांचे हे स्थान असते.
मध्य मेंदू हा मुख्यत: वरच्या मेंदूमध्ये आणि खालच्या मेंदूमध्ये सिग्नल्स नेण्याआणण्याचे काम करतो. त्याचबरोबर जागृती आणि शुद्धी राखण्याचे काम हाच भाग करतो. यातलाच एक उपविभाग शरीरातील हॉर्मोन्सचे नियंत्रण करतो. तसेच तहान-भूक, शरीराचे तपमान आणि स्वयंचलित चेतातंत्राचे नियमन करतो. यामुळे छातीआणि पोटातील निरनिराळी इंद्रिये काम करत असतात.
लहान मेंदू हा मागच्या बाजूला असतो आणि तो मुख्यत: शरीराचा समतोल, श्वसन, घास गिळणे, शिंकणे, खोकणे, आणि उचकी इ. कामे करतो. तसेच डोळे आणि डोक्याची हालचाल तो काही प्रमाणात नियंत्रित करतो.
आता आपल्याला हे माहीत आहे की माणसाचे मन हे मुख्यत: मोठ्या किंवा मुख्य मेंदूमध्ये असते. इथेच आपण ज्ञानसंवेदना, भावना, विश्लेषण, निर्णय, आज्ञा आणि स्मृतीकोश असतात. हे सर्व कामकाज अत्यंत सुव्यवस्थित आणि सुवाचित केंद्रांमध्ये चालते आणि त्यात अक्षरश: सूक्ष्म वायरिंगने जोडणी केलेली असते. मेंदूच्या पेशी आपल्या टोकांशी विशिष्ट जैव रासायनिक द्रव्ये सोडतात. ही द्रव्ये पुढच्या पेशीपर्यंत पोचून संदेश देतात आणि या पेशीत ते संदेश परत विद्युत स्वरुपात परिवर्तीत होऊन पुढे जात राहतात. ती कोणकोणती द्रव्ये आहेत याचा शोध विज्ञानाने घेतला आहे. मनोविकारांच्या मुळाशी जाताना त्या जैव रासायनिक पदार्थांमधल्या असमतोलाचा अंदाज आपल्याला आलेला आहे. याच माहितीमुळे आपण अनेक औषधे शोधून मनोविकारांवर उपचार करू शकतो. अर्थातच आता आपल्याला जादूटोणा किंवा मंत्र-तंत्रांची फिकीर करण्याची गरज उरलेली नाही.
मनोविकारांपैकी गंभीर प्रकार म्हणजे नेहमीच्या मनोवैज्ञानिक व्यापारांपासून फार्कत झालेली अवस्था असते. मात्र बरेच सामान्य मनोविकार हे नेहमीच्या राग, लोभ, भीती वगैरे भावभावनांची थोडी टोकेच असतात असे समजायला हरकत नाही. उदा. प्रत्येक माणसाला थोडाफार राग येतोच. पण कारण नसताना किंवा अतिरेकी आक्रमक राग येणे हे मात्र आपण आजारात धरतो. तसेच दु:ख, भीती या भावनांचे पण आहे. या भावनांच्या पसार्यात कुठपर्यंत ठीक आहे आणि कुठपासून बिघाड धरायचा हे ठोकताळे आता आपण बांधू शकलो आहोत. उन्माद आणि अतिनैराश्य या आजारांमध्ये सामान्य जीवन अशक्य होते किंवा कधीकधी आत्महत्या वगैरे घटनांनी संपून जाते. या आजारांच्या मुळाशी असलेले जैवरासायनिक दोष आता आपल्याला माहीत झाले आहेत.
मनोविकाराचा नेमका प्रकार ओळखणे हे मनोविकार तज्ज्ञांचेच काम आहे. तरीही कार्यकर्त्यांना काही वर्गवारी करता आल्यास आजाराची तीव्रता व अपेक्षित इलाज यांचा अंदाज बांधता येईल. मनोविकारांचे निरनिराळ्या प्रकारांनी वर्गीकरण केले जाते. यापैकी आंतरराष्ट्रीय वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे.
यापैकी आपल्या दृष्टीने तीन आणि चार हे जास्त महत्त्वाचे आहेत. तसेच एक पैकी फेफरे हे ही महत्त्वाचे आहे. इतर प्रकारांचे आपल्याला थोडे ज्ञान असले तर जीवनात त्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच इतरांना थोडेफार मार्गदर्शन करता येईल. थोडक्यात सांगायचे तर गंभीर मानसिक आजार (भ्रमविकार, उन्माद, अतिनैराश्य), फेफरे हे आजार आपल्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे आहेत. तसे पाहायला गेले तर लोक आपल्याला आणखी काही आजारांबद्दल सल्ले विचारतील यात मुख्यत: स्मृती विकार, मादक पदार्थांचे व्यसने, मतिमंदत्व आणि सामान्य मानसिक आजार.
गंभीर मानसिक आजारांमध्ये औषधोपचार लागतातच शिवाय समुपदेशनही लागते. इतर अनेक मानसिक आजारांमध्ये समुपदेशन जास्त महत्त्वाचे असते, औषधे त्यामानाने कमी.
काही मानसिक आजार आपण टाळू शकतो. यासाठी वैयक्तिक किंवा सार्वजनिक उपाय असू शकतात. काही ठळक उदाहरणे खाली दिली आहेत.