योगशास्त्र-प्रगत

शुद्धीक्रिया

हे हठयोगाचे अत्यंत महत्वाचे अंग असे नाही तर तो हठ्योगाचा आत्मा आहे. ते म्हणतात –

‘मलाकुलासू नाडीषु मारुतो नैव मध्यग:| कथं स्यात उन्मनी भाव: कार्य सिद्धिं कथं भवेत ||’

नाड्या जर मलानी भरलेल्या असतील  तर त्यातून प्राणशक्ती कशी वाहील, विशेषत: सुषुम्ना नाडीतून प्राणशक्तीचे वहन झाले नाही तर मोक्ष मिळणे कठीण आहे. कार्यसिद्धी म्हणजे मोक्ष मिळणार नाही, मनाची उन्मनी अवस्था प्राप्त होणार नाही.

शरीरातून मल बाहेर काढण्याच्या विविध संस्था आहेत, त्यातून रोज मल बाहेर काढला जातो. गुद, श्वसनेन्द्रीये, मूत्रपिंडे, त्वचा, यातून मल बाहेर काढला जातो, पण तो पूर्ण बाहेर येईलच असे नाही, तो थोडा थोडा शरीरात साठत जातो आणि त्याचा निपटारा झाला नाही तर व्याधीचे ते मूळ होते आणि अनेक विकार उद्भवतात. ऋतूबदल, आहार-विहार, ताण-तणाव ही त्याची अनेक कारणे आहेत. तेव्हां वेळोवेळी हे साठलेले मल बाहेर काढणे आवश्यक आहेत. विशेषत: हे मल पचनसंस्था, श्वसन संस्था येथे साठतात शिवाय मन हे देखील ताण -तणाव, चुकीचे विचार, वागणूक यांनी दुषित होत असते त्यामुळे इतर अवयवही विकृत कार्य करतात.

हठ्योगात मुख्य सहा प्रकारच्या शुद्धीक्रिया सांगितल्या आहे. त्यांचे पुन: उपप्रकार आहेत, अशा २३ प्रकारच्या शुद्धीक्रिया सांगितल्या आहेत.

धौती: बस्ती तथा नेति: त्राटकम नौलीकम तथा|कपालभातीश्चैतानी षट् कर्माणि प्रचक्षते||

धौती, बस्ती, नेति, त्राटक, नौली आणि कपालभाती ही सहा षट् कर्म आहेत.

धौती- पचनेद्रीयांची  शुद्धी- उपप्रकार- वातसार  वन्हीसार आणि वारीसार. वमन, विरेचन इ.

बस्ती – उत्सर्जक इंद्रिये.

नेति- नाकाची शुद्धी- जलनेती, सूत्रनेती, दंड्नेती इ.

त्राटक– डोळ्यांची शुद्धी- नेत्र प्रक्षालन, समीप आणि सुदूर त्राटक, नासिका मुद्रा, शांभवी मुद्रा. यातून मनाची पण शुद्धी.

कपालभाती- कपाल आणि मुखाची, ज्ञानेनद्रीयांची शुद्धी. श्वसन सदृश क्रिया.

या सर्व क्रिया साधकानी वेळोवेळी तज्ञ मार्गदर्शनाखाली कराव्यात. या क्रिया करण्याचा योग्य काल म्हणजे शरद आणि वसंत ऋतू होय.

या शुद्धीक्रीयातून शरीर आणि शरीरक्रिया संतुलित आणि कार्यक्षम  होतात. मनही शांत, एकाग्र, संतुलित होते.

आहार-विहार- खर तर योगशास्त्र हे २४ x ७ आचरण करण्याचे शास्त्र आहे. भ. श्रीकृष्ण देखील ६व्या अध्यायात सांगतात कि ‘ युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु| युक्त स्वप्नाव बोधस्य योगो भवति दु:खहा ||

योग दु:खहारक आहे खरा पण त्याला काही शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे. योगाच्या विविध अंगांचा अभ्यास केला जातो त्याचा परिणाम शरीर, शारीरिक कार्ये, मन आणि बुद्धी यावर हळूहळू होत असतो. ही पथ्ये न पाळल्यास त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकतो आणि मग आपण योगालाच कारणीभूत ठरवितो. आपल्या भारतात अनेक धर्म आहेत आणि बहुतेक धर्मामध्ये आहाराविषयी काही ना काही पथ्ये सांगितलेली आहेतच. अर्थात या सर्वांना शास्त्रीय बैठक आहे, त्यात पूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा आणि  विश्वाच्या पर्यावरणाचा विचार दीर्घ कालासाठी आहे.

आहार

विशेषत: आहाराविषयी सर्व योगग्रंथ काही गोष्टी आवर्जून सांगतात. मांसाहार योग करणारांसाठी पूर्ण वर्ज्य आहे. हिंसा यमात सर्व प्रथम सांगितली आहे. आपण आणि इतर प्राणी या जगासाठी आवश्यक आहे एवढेच या इथे सांगू इच्छिते. मनुष्याची शरीर रचना ही शाकाहारसाठीच आहे. तसेच असे म्हटले जाते कि ‘जैसा खावे अन्न वैसा होवे मन| हिंसक अन्न खाल्ले तर वृत्ती या हिंसकच होतील. तसेच असेही म्हटले जाते कि ‘ अन्नच तारी, अन्नच मारी, अन्न नाना विकारी हा अनुभव आपण घेतोच आहोत. आजचे खानपान फारच बिघडले असून हॉटेलमध्ये खाण्याची प्रवृत्ति फार बळावली आहे. अन्न आकर्षक आणि चवदार बनविण्यासाठी अनेक केमिकॅल्स चा उपयोग केला जातो जे आरोग्यास अत्यंत घातक आहे. त्यातून हृदय रोग, कॅन्सर, मुत्रपिंडाचे आजार, त्वचा विकार, दमा आणि इतर दुर्धर रोग उद्भवून अकाली मृत्यू होत आहेत.

आहार दोन वेळा आणि सीमित घ्यावा. यालाच योगात मिताहार म्हटले आहे. दिवसभर चरू नये.  आहाराची वेळ ही शक्यतो ठराविक असावी. रात्री फार उशिरा जेऊ नये. भोजन सात्विक ताजे असावे. फार विरुध्द गुणधर्माचे पदार्थ एकत्र खाऊ नयेत. विरुद्ध गुण पदार्थांचे मिश्रण असू नये. फार मसालेदार, तळलेले पदार्थ खाऊ नयेत. फळे, पालेभाज्या यांचा समावेश असावा. एक आयुर्वेदाचा श्लोक भोजन  कसे असावे हे थोडक्यात सांगते-    

उष्णं स्निग्धं मात्रावत् जीर्णे विर्याविरुद्धं | इष्ट देशे इष्ट सर्वोपकरणं |नाति द्रुतं नाति विलाम्बितम |
अजल्पन अहसन् तन्मना भून्जीथ | आत्मनभि समीक्ष्य सम्यक् || चरक विज्ञान||

या श्लोकाचा अर्थ  असा आहे कि भोजन कोष्ण, तेल-तूप युक्त व स्नेहाने बनवलेले असावे. अन्नाची मात्र योग्य असावी, ते सहज पचणारे असावे. अन्न हे शक्ती देणारे असावे. अन्नाचे सेवन प्रसन्न अशा जागी आणि योग्य उपकारणासहित असावे. भोजन फार हळू वा फार भराभर खाऊ नये. फारशी बडबड वा जोराने हसत भोजन करू नये, ठसका लागू शकतो आणि काय किती खातो याकडे लक्ष राहत नाही. भोजन हे शांतपणे, त्याच्याशी तन-मन एकरूप करून सेवन केले पाहिजे. अशारितीने सेवन केलेले अन्न हे आत्म्याशी जाऊन भिडते, त्याच्याशी एकरूप होते. हे नियम पाळले तरी आपले आरोग्य छान राहील.

भोजन हे आपल्या वयाप्रमाणे, पेशाप्रमाणे, आरोग्य अवस्था, देश, ऋतुकाळ याप्रमाणे घ्यावे.

अन्न हे उष्टे टाकू नये, वाया घालवू नये. आपल्या भारतीय अध्यात्मात अन्न पूर्ण ब्रह्म  मानले गेले आहे. स्वामि रामदास म्हणतात अन्न सेवन हे ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’. वदनी कवळ घेता ईश्वराचे स्मरण करावे कारण त्याच्या कृपेनेच अन्न आपणास मिळते. म्हणून भोजनाच्या आधी प्रार्थना करावी. अन्न तयार होण्याच्या साखळीतील सर्वांचे स्मरण करावे.

समारोप

आतापर्यंतच्या वाचनातून हे लक्षात आलेच असेल कि योग ही जीवन शैली आहे. नुसती शारीरिक कसरत नाही हे सर्वांनी चांगले लक्षात ठेवावे. योग म्हणजे जीवनाचा आनंद, जीवनाची समृद्धी, जीवनातील कामधेनु, जीवनातील कृतकृत्यता, पूर्ण जीवन मुक्त जीवन. नव्हे नव्हे देवत्वच.

असा हा जीवन प्रवास साधण्यासाठी योगाचे महत्व आपल्या लक्षात आलेच असेल. या योग शिक्षणात सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती योगशिक्षक. तो चांगला  अनुभवी, योगाचे खोलवर ज्ञान असणारा, साधकाला काय शिकवायचे आहे याचे ज्ञान असणारा, चांगली निरीक्षण शक्ती असणारा, स्वत: नियमित योगाभ्यास  करणारा, निर्व्यसनी, भाषेवर प्रभुत्व इ. गुणांनी युक्त असावा. पण प्रत्यक्षात याची वानवा खूप आहे. चांगले योगशिक्षक तयार झाले पाहिजेत तरच त्याचा उपयोग होईल.