बालकांचे आरोग्य

माती खाणे

ही तक्रार मुख्यत: लहान मुलांमध्ये, पण कधीकधी मोठया वयातही आढळते. (विशेषत: गरोदरपणी अनेक स्त्रियांची ही तक्रार असते.) यात माती, भिंतीचा रंग, राख, चुना, खडू, पेन्सिल, इत्यादी एरवी ‘अखाद्य’ असे अनेक पदार्थ येतात. माती खाण्याची तक्रार उद्भवण्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे-

  • आहारात लोहक्षाराची कमतरता.
  • दीर्घकाळ निव्वळ स्तनपान व बाळास वरचे अन्न वेळेवर सुरू न करणे.
  • कुठल्याही कारणाने आलेली रक्तपांढरी.
  • काही मानसिक कारण – उदा. दुर्लक्ष झाल्याची भावना मनात बळावणे.

माती खाणे हा विकार सहा ते सात महिन्यांनंतरच्या मुलांमध्ये दिसते. वयाच्या दोन वर्षापुढेही माती खाणे टिकल्यास तपासणी करून घ्यावी.

उपचार

आहारात लोहक्षार व चुनायुक्त पदार्थ असावेत. (पाहा पोषणावरचे प्रकरण), मुलाला लोहक्षाराच्या, कॅल्शियमच्या व जीवनसत्वाच्या गोळया किंवा औषध द्यावे.

माती खाणा-या मुलांना जंतविकार होतो. त्यामुळे त्याला जंताचे औषध द्यावे. रंग़ीत द्रव्ये (उदा. भिंतीचा रंग), इत्यादी पोटात गेल्याने होणारे आजार होऊ शकतात. यासाठी डॉक्टरकडे पाठवावे.

आयुर्वेद

माती खाण्यावर एक उपाय याप्रमाणे : चांगली सोनकाव 15 ग्रॅम + दीड चमचा तूप हे मिश्रण लोखंडी तव्यावर परतून घ्यावे. परतल्यावर हे मिश्रण ठिसूळ बनते. ह्या मिश्रणाच्या मुगाएवढया गोळया तयार करून घ्या. या गोळया मुलांना सकाळी सायंकाळी एकेक अशा तीन आठवडे रोज द्याव्यात. याबरोबर चिमूटभर त्रिफळा चूर्णही द्यावे. या उपायांनी मुलांचे माती खाणे थांबते.

बाल-किशोर वयातच लठ्ठपणा/स्थूलता: एक वाढती समस्या 

भारतात आतापर्यंत कुपोषण म्हणजे अल्प-पोषण (रोडावणे, खुरटणे) असाच अर्थ घेतला जात होता. आता त्यात अतिवजन  आणि पुढे स्थूलता अशी भर पडली आहे. आमच्या नाशिक सर्वेक्षणात जिल्हा परिषद आणि मनपा शाळांत अशी समस्या बिलकुल नव्हती तर खाजगी मराठी आणि इंग्रजी शाळांत 5 ते 9 % असे प्रमाण आढळले. मुद्दा असा की बाल-किशोर अतिवजन आणि स्थूलता  (Childhood Overweight and obesity-COBOW) ही मध्यम-उच्च वर्गीय समाजात एक महत्वाची समस्या बनते आहे. लवकर उपाय केले नाही तर, असे मूल पुढे स्थूल राहण्याची शक्यता असते, आणि मधुमेह, अतिरक्तदाब अशा समस्या तरुण वयातच सुरू होतात. मुलामुलींमद्धे लैंगिक बदल लवकर होतात (उदा. मुलींमद्धे पाळी लवकर येणे). कोविद काळात या समस्येची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. किशोरवयात (12 वर्षपासून पुढच्या वयात) मुलाची समस्या वाढत जाते, पण काही मुले यातून सुटून पण जातात.   

कारण परंपरा

आहाराचे प्रमाण जास्त, त्यामानाने शारीरिक हालचाल-कष्ट कमी ही बाल-किशोर अतिवजन आणि स्थूलता  समस्येची मूळ कारणे आहेत. यामागे सामाजिक आर्थिक व्यवस्था कारणीभूत ठरते. व्यावहारिक पातळीवर खालील 5 कारणे प्रमुख आहेत (अ) अधिक खाणे, त्यात गोड पदार्थांचा मारा, शीतपेये, प्रथिन-कमतरता (ब) शाळेत  आणि इतरत्र खेळ-व्यायामाचे प्रमाण कमी/नगण्य (क) घरी-दारी कोणतेही शारीरिक काम न करण्याची सवय/ पद्धत (ड) मोबाइल-टीव्ही पाहून ‘बैठी’ करमणूक आणि त्याचे व्यसन लागणे (इ) शाळेला जाण्या-येण्यासाठी बस-स्कूटर-कार- मोटरसायकलचा वापर आणि पायी चालणे/सायकल याला फाटा. याशिवाय काही मूळच्या आरोग्यसमस्या म्हणजे थायरॉइड ग्रंथीचे दोष, जनुकीय दोष असू शकतात; परंतु याचे एकूण प्रमाण 10 टक्के पेक्षा कमी असेल.  आपल्या मुळामध्ये लठ्ठपणा दिसतोय, हे पालकांच्या लक्षात येत असेल, पण याबद्दल फार उपाय करू शकत नाहीत. शाळेत शिक्षकांची भूमिका देखील मर्यादित असते. स्वत: त्या मुलाला/मुलीला देखील इतरांच्या नजरेतून किंवा टोमणे एकूण जाणीव झालेली असते पण त्याबद्दल खंत आणि राग असण्यापालिकडे त्यांचा उपाय नसतो. यावर कोणी कायकाय करावे याबद्दल संभ्रम असतो. निश्चित उपाय नसल्यामुळे डॉक्टर सांगण्यापालिकडे जात नाहीत. खरे म्हणजे या तिघा-चौघानीहि एकत्रित दीर्घ प्रयत्न केला तरच यातून मुलाची सुटका होऊ शकते.

लठ्ठपणा ओळखायचा कसा

जास्त लठ्ठ असलेले मूळ ओळखायला सोपे असते. पोट सुटणे, बेंबी खोल जाणे, वळ्या पडणे, चेहरा, छाती, दंड, मांड्या या अवयवांवर चरबीची गोलाई आणि थर, मनगट-मान जाड दिसणे या उघड खाणाखुणा आहेत. पण याची सुरुवात ओळखणे जास्त महत्वाचे आणि अवघड असते. यासाठी मोजमापे आहेत. पुण्याचे डॉ वामन आणि अनुराधा खाडीलकर यांनी यावर संशोधन करून तक्ते बनवले आहेत आणि भारतीय बालरोगतज्ञ परिषदेने हे मापदंड स्वीकारले आहेत. मुले आणि मुलींसाठी वेगळे तक्ते आहेत. वयानुसार वजन, वजन भगिले उंचीचा वर्ग (BMI) म्हणजे शरीरभार, दंडघेर, दंड-पोट-पाठ यामागे त्वचेची जाडी (चरबीमुळे) याचे मोजमाप करता येते. खरे तर ही तक्ते भारतीय मुलांसाठी पर्सेंटईल तत्वावर बनवले असल्याने त्यात वयानुसार कुपोषण, योग्य वाढ आणि लठ्ठपणा किंवा वयानुसार अधिक वाढ हे सर्व कळून येते.  बालरोगतज्ञ हे तक्ते दाखवू शकतात आणि नेटवर मिळतात तसेच मोबाइल फोनवर app देखील आहेत. हल्ली impedance मिटर यंत्रे मिळतात, त्यात शरीरातील चरबीच्या टक्केवारीचे मोजमाप करता येते.

लठ्ठपणामुळे मधुमेह-प्रवृत्ती झाली असल्यास रक्तातील साखर मोजूनच निदान करता येते. थायरॉईड संप्रेरक देखील तपासणे आवश्यक होऊ शकते.  नुकतेच भारतीय तज्ञानी लठ्ठपणात (या) आजारविरीत/आजारपूर्व आणि (ब) आजार-युक्त अशा  दोन पायऱ्या केलेल्या आहेत. या सगळ्या तांत्रिक मोजमापाशिवाय देखील जाणकार आईवडील पोट-पाठ-दंड-मांडी- मान यावरुन सहज अंदाज बांधू शकतात.

उपाययोजना

प्रत्येक मुलाची समस्या थोडी वेगळी असू शकते आणि निदान-उपाय देखील बेतावे लागतील. जागरूक पालक स्वत: देखील हे उपाय करू शकतील. यात मानसिक प्रोत्साहन देणे, आहार नियोजन आणि खेळ-काम यांचा समतोल ही मुख्य ‘रणनीती’ (कारण ही एक लढाईच असते) आहे. औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया हे अगदी क्वचित लागणारे उपाय आहेत. काही साधे उपाय पुढे दिले आहेत (अ) आहारात पोळी-भाकरी-भात प्रमाण निम्मे करून वरण, दूध, अंडी आणि भाजीपाला/फळभाजी यांचे प्रमाण वाढवावे (पुरेशा प्रमाणात प्रथिनयुक्त पदार्थ खाऊ देणे हा उपाय आहे.  (ब) चॉकलेट-आइसक्रीम, मिठाई, शीतपेये, कुरकुरे आदि हे पदार्थ अगदी कमी किंवा बंद करणे (क) अधून-मधून खाण्याची सवय थांबवून दिवसातून 3-4 वेळच खाण्यासाठी ठरवून घेणे (ड) घरातली छोटीमोठी कामे  मुलाना करायला प्रवृत्त करणे/प्रोत्साहन देणे, कामात सामील करून घेणे  (इ) धावपळ असलेल्या खेळाची सवय/गोडी लावणे (खोखो, पोहणे, फूटबॉल, पकडापकडी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिस) आणि यास्तही रोज तास-दोनतास वेळ राखुन ठेवणे (खरे तर स्वत: आई-बाबानी देखील खेळायला पाहिजे (फ) मुलांचे रोज एकूण चालण्याचे प्रमाण वाढवणे (ग) आठवड्यातून एकदा तरी आजूबाजूचे डोंगर किल्ले चढणे, याची गोडी  लावणे. (ह) शाळेत शेवटचा तास सर्व विद्यार्थ्याना घामेघुम करणाऱ्या खेळासाठी राखून ठेवणे. एकूण आहार आणि शारीरिक क्रियाकलाप यांचे गुणोत्तर बदलून ऊर्जा खर्च होईल याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

एका वाक्यात सांगायचे तर लठ्ठपणा हा जीवनशैलीचा आजार असल्याने, जीवनशैली बदलणे हेच मुख्य आणि खात्रीचे उपाय आहेत.