प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) व जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक सहाय्य व्यवस्था
नवजात बाळांच्या मृत्यूदरात घट करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेत प्रभावी नवजातबालकसहाय्यव्यवस्था (Neonatal Support System) उभारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत नवजात बालकांसाठी टप्प्याटप्प्याने सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.
१. प्राथमिकआरोग्यकेंद्र (PHC) स्तर
PHC मध्ये नवजात बालकांना प्राथमिक उपचार व स्थिरीकरण (stabilization) देण्याची व्यवस्था असते. येथे सामान्यतः Newborn Care Corner (NBCC) किंवा Newborn Stabilization Unit (NBSU) असते.
PHC मधील प्रमुख सुविधा
जन्मानंतर बाळाला उब देण्यासाठी रेडियंट वॉर्मर
जन्मानंतर लगेच श्वास न घेणाऱ्या बाळासाठी नवजात पुनर्जीवन (Neonatal Resuscitation)
कमी वजनाच्या बाळांची काळजी
स्तनपान सुरू करण्यास मदत
संसर्गाची ओळख व प्राथमिक उपचार
गरज पडल्यास बाळाला उच्च केंद्रात (जिल्हा रुग्णालय) रेफर करणे
आरोग्य कर्मचारी, ANM आणि स्टाफ नर्स यांना नवजात काळजी व पुनर्जीवनाचे प्रशिक्षण दिलेले असते.
२. जिल्हारुग्णालयस्तर
जिल्हा रुग्णालयात अधिक प्रगत सुविधा उपलब्ध असतात. येथे Special Newborn Care Unit (SNCU) असते, जिथे गंभीर आजारी नवजात बाळांवर उपचार केले जातात.
जिल्हा रुग्णालयातील प्रमुख सुविधा
इनक्युबेटर व रेडियंट वॉर्मर
ऑक्सिजन व CPAP सुविधा
नवजात संसर्ग, श्वसनाचा त्रास व नवजात बाळांची कावीळ यांचे उपचार
फोटोथेरपी
प्रशिक्षित बालरोगतज्ज्ञ व नर्सिंग स्टाफ
सतत निरीक्षण व आवश्यक औषधोपचार
निष्कर्ष
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांमधील समन्वित नवजात सेवा व्यवस्थेमुळे गंभीर बाळांना वेळेवर उपचार मिळतात. योग्य रेफरल प्रणाली, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आणि आवश्यक उपकरणे यामुळे नवजात मृत्यूदर कमी करण्यास मोठी मदत होते.
नवजातमृत्यू, अर्भकमृत्यू आणि बालमृत्यू (0 ते पाच वर्षे वयोगट)
जन्मानंतर पहिल्या महिन्यात होणारे मृत्यू म्हणजे नवजात-मृत्यू
जन्मापासून 12 महीने पर्यन्त (एक वर्ष) होणारे म्हणजे अर्भक मृत्यू
एकवर्षानंतर पासून पाच वर्षापर्यंत होणारे मृत्यू म्हणजे बालमृत्यु
आपल्या देशात पाच वर्षाच्या आतील बालमृत्यूंचे प्रमाण हजार जन्मामागे 25 इतके जास्त आहे. यात निम्मे मृत्यू म्हणजे जन्मापासून एक महिन्याच्या आत होतात
बालकांची वाढ आणि विकास
बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी खालील टप्पे आपल्याला तपासता येतात. ते जर लांबले असतील तर डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे.
लोकांकडे पाहून हसणे : २ ते ३ महिने
आधाराशिवाय बसणे : ६ ते ८ महिने
रांगणे : ७ ते १० महिने
मामा-बाबा असे बडबडणे :९ ते १० महिने
चिमटीत वस्तू उचलणे : १० ते १२ महिने
पहिले पाउल टाकणे : ११ ते १४ महिने
या सहा क्रिया आपण तपासून शकतो. दिलेल्या कालमर्यादेहून उशीर होत असेल तर डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे.
वाढ
वाढ व विकास तपासताना शारीरिक वाढ आणि डोक्याचा घेर तपासला जातो चेहऱ्यामध्ये काही बदल दिसत असल्यास त्याची नोंद घ्यावी लागते दृष्टी आणि श्रवण शक्ती तपासावी आणि प्राथमिक प्रतीक्षिप्त क्रिया बघाव्या लागतात.
बाळाच्या संगोपनामध्ये खालील पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत : आरोग्य सांभाळणे, बाळाला प्रतिसाद देणे, बाळाला सुरक्षा आणि प्रेम मिळणे, आणि शिकण्यासाठी छोट्या छोट्या संधी निर्माण करणे.
पहिल्या वर्षातील वाढ आणि विकास
वजन, उंची
पहिल्या 7 दिवसांत बाळाची नाळ पडून जाऊन बेंबी कोरडी पडलेली असते.
दहाव्या दिवशी बाळाचे वजन परत जन्मवजनाएवढे होते.
बाळाचे वजन 5 व्या महिन्यात जन्मवजनाच्या दुप्पट होते.
एक वर्षाचे मूल जन्मवजनाच्या तिप्पट वजनाचे असते.
एक वर्षामध्ये बाळाची उंची 25 ते 30 से.मी. (1 फूट) ने वाढते.
डोक्याचा घेर आणि टाळू
डोक्याचा घेर जन्मताना सुमारे 32-35 से.मी.असतो, तो सहा महिन्यात 44 से.मी. व एक वर्षात 47 से.मी. होतो.
सहा महिन्यांनंतर पुढल्या टाळूचा खड्डा कमी होऊ लागतो. 9 महिने ते 18 महिने या वेळात कधीही टाळू पूर्ण भरते. मागची टाळू जास्तीत जास्त चार महिन्यांपर्यंत पूर्ण भरते.
डोक्यावर पुढील बाजूस शंकरपाळयाच्या आकाराचा खड्डा असतो. त्याला ‘पुढली टाळू’ असे म्हणतात. डोक्याच्या कवटीची हाडे पूर्ण भरलेली नसल्यामुळे टाळूचा खड्डा तयार झालेला असतो. टाळूचे कार्य अतिशय महत्त्वाचे असते. जन्माच्या वेळी बाळ त्याच्या डोक्यापेक्षा लहान असलेल्या योनिमार्गातून बाहेर पडते. यावेळी कवटीची हाडे एकमेकांवर सरकू शकतात व त्यामुळे मेंदूवर प्रत्यक्ष दाब येत नाही. जन्मानंतर इतर शरीराच्या मानाने मेंदूची वाढ भराभर होते. यामुळे (कवटीची हाडे अजून एकमेकाला पूर्ण जुळलेली नसल्यामुळे) मेंदूला वाढण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत राहते. मेंदूच्या आकारमानाची वेगाने होणारी वाढ जवळपास पूर्ण झाल्यावर टाळू पूर्णपणे भरते, म्हणजेच कवटीची हाडे एकमेकांशी जुळतात. सर्वसाधारणपणे टाळू पूर्ण भरून येण्याचा काळ एक वर्ष ते दीड वर्ष इतका असतो.
टाळू 18 व्या महिन्यापर्यंत भरून न आल्यास काही गंभीर आजारांची शंका घ्यावी. (उदा. मुडदूस, मेंदूभोवती जास्त पाणी असणे, हाडांचे काही उपजत आजार, इत्यादी.)
टाळू तेलाने भरण्याचा व टाळू प्रत्यक्ष भरून येण्याचा (म्हणजेच कवटीची हाडे पूर्णपणे मिळून येण्याचा) काहीही संबंध नाही. पण रोज टाळू भरताना आईचे टाळूकडे लक्ष जाते. त्यामुळे टाळू उचललेली असणे, फुगणे किंवा खोल जाणे या महत्त्वाच्या खुणांकडे तिचे लक्ष राहते.
टाळूमधे तेल भरणे हे कमी वजनाच्या मुलांच्या पोषणामधे मदत करते. काही स्निग्ध आम्ले (medium chain fatty acids)टाळूतून रक्तात शोषली जातात .
टाळूमधून डोक्यातील रक्तवाहिनीचे – रोहिणीचे – ठोके कळू शकतात. यामुळेच काहीजण ‘टाळू उडते’ म्हणून घाबरून जातात. पण त्यात तसे भिण्यासारखे काही नसते.
टाळू खोल जाणे ही शरीरातले पाणी कमी झाल्याची (शोष) महत्त्वाची खूण आहे. म्हणून जुलाब किंवा उलटया होत असलेल्या मुलाची टाळू बघणे महत्त्वाचे असते. त्यावरून बाळाला होणारे जुलाब, उलटया व शोष याबद्दल कळू शकते.
टाळू फुगली असल्यास धोका संभवतो. (रडताना मात्र प्रत्येक बाळाची टाळू फुगते.)
फुगलेली टाळू : मेंदूभोवतीच्या आवरणामध्ये जास्त पाणी साचणे, मेंदूला सूज, मेंदूज्वर, मेंदूभोवती रक्तस्राव इत्यादींमध्ये टाळू फुगते. चिडचिडे मूल, ताप, उलटया व बदललेली नजर, हातापायांच्या विचित्र हालचाली, फिट्स यांबरोबर जर टाळू फुगलेली असेल तर ते मेंदूच्या सूजेचे लक्षण आहे. उपचार लगेच सुरू होणे महत्त्वाचे आहे.
विकास व इतर वाढ
4-5 आठवडयांचे बाळ आईला ओळखू लागते. हे ‘ओळखून हसणे’ दोन महिन्यांपर्यंत पूर्ण विकसित होते. जर 2 ते 3 महिन्यांचे बाळ आईला ओळखून हसत नसेल तर त्या मुलाच्या बाकीच्या वाढीकडेही काळजीपूर्वक लक्ष ठेवावे.
3 महिन्यांचे बाळ जर पोटावर पालथे ठेवले तर स्वत:ची मान व डोके अर्धवट ‘धरू’ शकते.
4 महिन्यांचे मूल मान पूर्णपणे सावरते. 5 ते 6 महिन्यांत बाळ पालथे वळू लागते.
4 महिन्यांचे बाळ छोटी वस्तू बघून हातात पकडू पाहते; पण अजून बोटांनी उचलू शकत नाही. पण 6-7 महिन्यांत खुळखुळा उचलून एका हातातून दुस-या हातात घेऊ शकते.
4 ते 7 महिन्यांत मूल अधिकाधिक हसरे, खेळकर बनते.
6-7 महिन्यांचे मूल हात पुढे टेकून एकटे बसू शकते असे बाळ जर उभे धरले तर स्वत:चे पूर्ण वजन पायावर पेलूही शकते.
8व्या – 9व्या महिन्यात बाळ ‘दादा, बाबा’ असे सुटे दोन अक्षरी शब्द बोलू शकते. बाळाच्या नावाने हाक मारल्यावर लक्ष देऊ लागते, टाटा करायला शिकते.
9 ते 10 महिन्यांत मूल रांगायला किंवा सरपटायला लागते. याच सुमाराला बोटांनी एखादी वस्तू उचलणे बाळाला जमते. पण अजूनही मुठीचा आधार घ्यावा लागतो.
12 व्या महिन्यात नुसत्या बोटांनी वस्तू उचलायला जमते.
या सर्व टप्प्यांमध्ये एखादा टप्पा मागेपुढे होऊ शकतो. लगेच काळजी करायची गरज नसते.
दात
दात येण्याची सुरुवात बहुसंख्य मुलांमध्ये पाच ते नऊ महिन्यांत खालच्या मधल्या दाताने होते व एक वर्षापर्यंत सर्वसाधारणपणे 6 ते 8 दात आलेले असतात.