हृदय व रक्ताभिसरण संस्था

अतिरक्तदाब

शरीरात रक्तवाहिन्यांच्या (रोहिण्यांच्या) जाळयामार्फत सर्वत्र रक्तपुरवठा होतो, हे आपण पाहिले आहे. रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दाब असणे आवश्यक आहे. रक्तदाब जास्त होतो त्याला अतिरक्तदाब म्हणतात.

अतिरक्तदाबाचे दुष्परिणाम हृदय, डोळा (नेत्रपटल), मूत्रपिंड, मेंदू इत्यादी अनेक अवयवांवर होतो.

  • अतिरक्तदाब हा हलक्या पावलांनी येणारा धोकादायक आजार आहे.
  • अतिरक्तदाब झाला असला तरी ब-याच जणांना त्याचा त्रास जाणवत नाही. म्हणून त्याकडे दुर्लक्ष होते.
  • मात्र अचानक हृदयविकाराचा झटका, मेंदूत रक्तस्राव, इत्यादी घटना घडू शकतात.
  • काही जणांना याची लक्षणे जाणवतात यात डोकेदुखी, चक्कर, डोळयांपुढे अंधारी, छातीत धडधड ही प्रमुख लक्षणे आहेत.

विशीवरच्या लोकांचा म्हणजे प्रौढ व्यक्तींचा रक्तदाब तपासला तर सर्वसाधारणपणे 20  टक्के लोकांमध्ये ‘अतिरक्तदाब’ आढळतो. अतिरक्तदाबाच्या व्यक्ती शोधण्यासाठी सर्वांचाच रक्तदाब तपासण्याची मोहीम घ्यावी लागते.

बसलेल्या स्थितीत डिजिटल BP मशीनने रक्तदाब मोजण्याची टप्प्याटप्प्याची पद्धत

१) रुग्णाची तयारी

रुग्णाला किमान ५ मिनिटे शांत बसू द्या, चहा, कॉफी, धूम्रपान ३० मिनिटे आधी टाळावे

आधी लघवी करून यायला सांगावे.  बीपी मापनाच्या वेळी बोलणे टाळावे


२) योग्य बसण्याची स्थिती

पाठ खुर्चीला टेकलेली असावी, पाय जमिनीवर सरळ ठेवावेत (पाय क्रॉस करू नयेत), हात टेबलवर हृदयाच्या पातळीवर ठेवावा


३) कफ (पट्टा) लावणे

योग्य आकाराचा कफ निवडा, कफ वरच्या बाहूवर घट्ट पण आरामदायक लावा, कफचा खालचा कडा कोपराच्या २–३ से.मी. वर असावा, कफ हृदयाच्या पातळीवर असावा (चित्र पहा)


४) मापनाची प्रक्रिया (Digital Machine)

डिजिटल BP मशीन सुरू करा, “Start” बटण दाबा, मशीन आपोआप कफमध्ये हवा भरेल व सोडेल, मापन चालू असताना रुग्णाने हालचाल करू नये किंवा बोलू नये. सेल बसायला सांगा.


५) वाचन (Reading) आणि नोंद करा.

स्क्रीनवर दिसणारे: सिस्टोलिक दाब (SYS),  डायस्टोलिक दाब (DIA), नाडी दर (Pulse) उदाहरण: 120/80 mmHg, Pulse 72/min


६) पुनर्मापन (Repeat)

किमान २ वेळा मोजायची पद्धत ठेवा, त्यात १–२ मिनिटे अंतर ठेवा

दोन्हीची सरासरी काढा (काही मशीनमद्धे आपोआप सरासरी येते.) अन्यथा दुसरे निरीक्षण ग्राह्य धरा.   


७) नोंद (Documentation)

डायरीत बीपी  (उदा. 130/85 mmHg) लिहा, कोणत्या हातावर मोजले ते आणि, तारीख व वेळ लिहा


 महत्त्वाच्या सूचना

पहिल्यांदा दोन्ही हातात BP मोजून जास्त असलेला हात पुढे वापरा. चुकीचा कफ आकार वापरल्यास चुकीचे मोजमाप होते. (जाड्या दंडाच्या माणसाला अरुंद पत्ता वापरला तर जास्त आकडा दिसेल-ते चुकीचे असेल).  रुग्ण हालचाल/बोलत असल्यास रीडिंग चुकीचे येते

मशीनची बॅटरी व कॅलिब्रेशन योग्य आहे याची खात्री करा

अतिरक्तदाब निदान कसे ठरवायचे

रक्तदाब आठवड्यातून दोन तीन वेळा तपासावा  आणि 2-3 आठवडे सतत जास्त आढळला  तर अतिरक्तदाब आहे असे ठरवावे. केवळ एखाद्या मोजणीत लगेच निष्कर्ष काढू नये. मात्र एखादे निरीक्षण जास्त रक्तदाबचे असेल  तर दुर्लक्ष करू नये.

रक्तदाबाचे वर्गीकरण
प्रकारसिस्टोलिक (वरचा दाब mmHg) डायस्टोलिक (खालचा दाब mmHg)
सामान्य (Normal)/योग्य< 120आणि< 80
जास्त (Elevated)130 – 139आणि80 – 89
अतिरक्तदाब स्टेज 1140-159आणि90-99
अतिरक्तदाब स्टेज 2160-180किंवा100-109
गंभीर अतरक्तदाब स्टेज 3180 आणि यापुढेआणि110 आणि पुढे

सिस्टोलिक दाब: हृदय आकुंचन पावताना होणारा दाब : डायस्टोलिक दाब: हृदय शिथिल होताना होणारा दाब

120/80 mmHg यापर्यंत योग्य रक्तदाब मानला जातो. खालचा किंवा वरचा दाब मर्यादेपेक्षा जास्त असेल तर अति-रक्तदाब मानावा.

रक्तदाबाची कारणे

रक्तदाब वाढण्यामागे अनेक कारणे किंवा पूरक बाबी  असतात. आनुवंशिकता, स्थूलता, किडनीचे (मूत्रपिंडाचे) आजार, वाढते वय, तंबाखू दारूचे व्यसन, धमनी काठिन्य, (atherosclerosis),  काही संप्रेरक विकार (उदा. थायरॉइडचे आजार), काही औषधांचा दीर्घकाळ वापर (उदा. पाळणा लांबवण्याच्या गोळया, सांधेदुखीची औषधे, स्टेरॉइडची औषधे, इ.).  रक्ताच्या नात्यात अतिरक्तदाब असला तर संबंधित व्यक्तीलाही अतिरक्तदाब असण्याची शक्यता असते. काही व्यक्तिना मात्र कारण दिसून येत नाही. 

अतिरक्तदाबाचे दुष्परिणाम

उपचार न केल्यास वाढलेल्या रक्तदाबामुळे अनेक आजार उद्भवू शकतात.

  • रक्तवाहिन्यांचे आजार – सर्वत्र रक्तवाहिन्या जाड, कडक व अरुंद होतात. याचा परिणाम म्हणून हृदय, मेंदू, डोळे, मूत्रपिंडे यांच्या रक्तवाहिन्या जाड, कडक व अरुंद होतात. मधुमेह, स्थूलता व धूम्रपान करणा-या व्यक्तींमध्ये हे परिणाम जास्त तीव्रतेने होतात.
  • हृदयाच्या रक्तवाहिन्या आक्रसल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तसेच हृदयावर कार्यभार वाढल्यामुळे हळूहळू हृदयाचे काम कमकुवत होते. कारण वाढलेल्या रक्तदाबामुळे रक्ताभिसरणासाठी जास्त जोर लावावा लागतो.
  • मूत्रपिंडावर अतिरक्तदाबाचा परिणाम होऊन त्याचे काम सदोष होऊ शकते.
  • मेंदूच्या रक्तवाहिन्या आक्रसल्यामुळे मेंदूचा झटका जसे – अर्धांगवायू होऊ शकतो. मेंदूमध्ये रक्तस्त्रावाचाही धोका असतो.
  • अतिरक्तदाबामुळे नेत्रपटलाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन दृष्टी कमी होऊ शकते.
उपचार

या आजारात पूर्ण विश्रांती, पेनिसिलीन इंजेक्शन, ऍस्पिरिन, इत्यादी औषधोपचारांची गरज असते.

महत्त्वाचे म्हणजे पुढे घसासूज-सांधेदुखी येऊ नये म्हणून दर महिन्यास पेनिसिलीनचे एक इंजेक्शन द्यावे लागते. यामुळे झडपांचे नुकसान टळू शकते. सांधेहृदय तापामुळे झडपांचे नुकसान टाळण्यासाठी दर महिन्याला पेनिसिलीनचे इंजेक्शन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

पण सांधेहृदयतापाचे समाजातले प्रमाण कमी होण्यासाठी राहणीमान सुधारणे हाच सर्वात परिणामकारक उपाय आहे.

याबद्दल सर्वसाधारण माहिती आवश्यक आहे.
अतिरक्तदाबाच्या रुग्णांनी दरमहा एकदा तरी रक्तदाब तपासून घ्यावा.

  • हलका व्यायाम व योगासने
  • साधा आहार, जेवणात मीठ कमी किंवा बंद करणे.
  • वजन जास्त असेल तर कमी करणे.
  • रक्तदाब उतरवणारी औषधे घेत राहणे हे उपचाराचे मुख्य सूत्र असते.
  • मधुमेह असल्यास त्याचे नियंत्रण करावे लागते.
  • धूम्रपान असल्यास ते बंद करावे लागेल.
  • रक्तदाब उतरवण्यासाठी अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध नियमितपणे घेणे महत्त्वाचे आहे. औषध मध्येच बंद केल्यास धोका संभवतो. यापैकी काही औषधे अगदी स्वस्त आहेत.
प्रथमोपचार

निफेडिपीन ही गोळी (कॅप्सूल) रक्तदाब खात्रीने कमी करायला अगदी उपयुक्त आहे. रक्तदाब 200/120 आकडयांवर गेला असेल तर तो लवकरात लवकर कमी करणे आवश्यक असते. अशा वेळी ही कॅप्सूल (5मि.ग्रॅ.) फोडून जिभेखाली धरली की काही सेकंदात रक्तदाब उतरायला सुरुवात होते. मात्र या गोळीच्या वापरात धोकेही आहेत. प्रथमोपचार म्हणून ही गोळी ठीक आहे. पुढचे उपचार होण्यासाठी डॉक्टरकडेच जावे लागते