लहान बालकांमध्ये देखील दृष्टीदोष असू शकतात. यासाठी योग्य त्या तज्ञाची मदत घ्यायला हवी यामध्ये खालील प्रमाणे काही विकार महत्त्वाचे आहेत .
काही जन्मजात विकृती या डोळ्याच्या पापणीपासून नेत्र पटलापर्यंत कुठेही असू शकतात. त्याचे वेळेस निदान करणे आणि उपचार करणे आवश्यक आहे
दृष्टीदोष म्हणजे डोळ्याला नंबर असतो. शाळेत प्रवेश करण्याआधी एकदा बाळाचे डोळे तपासून घ्यावे नंबर असेल तर तो चष्मा देता येतो यामुळे शाळेत मुलाला आत्मविश्वास येतो, नीट पाहता-वाचता येते आणि शिक्षण चांगले होते. चश्मा लावण्यात काही कमीपणा समजू नये. वाटल्यास नंतर अठरा वर्षानंतर लेसिक सर्जरी करून नंबर घालवता येतो सतत टीव्ही , मोबाइल स्क्रीन पाहण्याने नंबर आणखी बिघडतो.
तिरळेपणा हा आजार काही मुलांमध्ये दिसून येतो. वेळीच उपचार केल्यास तिरळेपणा कमी करता येतो किंवा घालवता येतो यामुळे नजर म्हणजे दृष्टी देखील सुधारते . यासाठी काही व्यायाम सांगतात, आणि चश्मा लागू शकतो. काही वेळा शस्त्रक्रिया लागू शकेल.
आळशी डोळा म्हणजे कमी दिसणारा डोळा. याची विविध कारणे असतात. तज्ञाकडून तपासून घ्यावे
काही बालकांमध्ये मोतीबिंदू असू शकतो. मुल दोन वर्षाचे झाल्यानंतर मग त्यावर शस्त्रक्रिया करून लेन्स बसवता येते.
बालपणीचा काचबिंदू यामध्ये डोळ्यातले प्रेशर म्हणजे नेत्रजलाचा दाब वाढतो आणि नजर कायमची कमी होते. या आजारामध्ये बाळाचे डोळे मोठे दिसतात, बुबुळ सफेद दिसते, डोळ्यातून पाणी येते व उजेड सहन होत नाही. यासाठी कमी वयात शस्त्रक्रिया करावी लागते आणि पुढे जन्मभर वेळोवेळी तपासणी करावी लागते
या आजारात डोळ्यातील अश्रूपिंड जंतुदोषित होऊन सूज येते त्यातून पाणी आणि दुर्गंधीत राहतो यावर योग्य त्या उपचाराने पूर्ण दुरुस्त होऊ शकतो वाटल्यास शस्त्रक्रिया करावी लागू शकते. 8 काही बालकांना लहानपणीच नेत्रपटलाचे आजार निर्माण होऊ शकतात
जनुकीय आजारांमुळे काही बाळांमध्ये डोळ्याची चेतातंतु (ऑप्टिक नर्व) तयार झालेले नसते त्यामुळे पूर्ण किंवा अंशतः अंधत्व येते. यासाठी रक्ताच्या नात्यांमध्ये लग्न टाळणे महत्त्वाचे आहे.
तिरळेपणा
दोन्ही डोळे समांतर कक्षात न राहण्याच्या दोषास ‘तिरळेपणा’ म्हणतात. तिरळेपणाबद्दल कमी माहिती असल्याने व अंधविश्वासामुळे मुलाच्या आयुष्याला कायमचे गालबोट लागते.
तिरळेपणावर वेळीच उपचार केल्यास, दृष्टीहीनता व तिरळेपणा दोन्हीवरही मात करता येऊ शकते.
जसजसे मुलाचे वय वाढत जाते तसतसे तिरळेपणावर उपचार करून दृष्टी परत मिळवणे अवघड होत जाते.
हा तिरळेपणा काही मुलांमध्ये कायमचा असतो तर काहींमध्ये तो मध्येच उद्भवणारा असू शकतो.
हा दोष आतील, बाहेरील, वरील किंवा खालील कोणत्याही दिशेत असू शकतो.
तिरळेपणावर वेळीच उपचार झाला नाही तर डोळा आळशी होण्याची स्थिती निर्माण होते. ही स्थिती दृष्टीहीनतेस कारणीभूत ठरू शकते.
तिरळेपणाची कारणे
आनुवंशिकता
असंतुलित स्नायुशक्ती व डोळयास होणारा कमी रक्तपुरवठा.
मोतीबिंदुमुळे निर्माण होणारी पुसट प्रतिमा, बुबुळावरील व्रण, आंतरपटलाचे रोग, दृष्टीदोष, डोळयात गाठ असणे, इ.
तिरळेपणाची लक्षणे
एक डोळा किंवा दोन्ही डोळे वेगवेगळया दिशेने पाहणे.
एका किंवा दोन्ही डोळयांमध्ये दृष्टीदोष
तीव्र सूर्यप्रकाशात तिरळेपणा असणारी मुले डोळा मिटून घेतात.
काही मुले चेहरा किंवा डोके एका ठरावीक दिशेत वाकवून वस्तुकडे बघण्याचा प्रयत्न करतात.
दोन प्रतिमा दिसतात
कायमची दृष्टीहीनता येऊ नये यासाठी केले जाणारे उपचार
दृष्टीदोषामुळे आलेला तिरळेपणा हा ठरावीक चष्म्याचा नंबर लावून घालवता येतो.
सामान्य डोळयास पट्टी (पॅच) लावून आळशी झालेल्या डोळयाची नजर वाढवता येते.
शस्त्रक्रिया
समांतर कक्षात नसलेले डोळे शस्त्रक्रियेने योग्य दिशेत आणले जातात.
शस्त्रक्रिया पूर्ण भूल देऊन किंवा फक्त डोळयांस भूल देऊन केली जाते.
शस्त्रक्रिया होणा-या मुलास सर्दी, ताप, खोकला, इ. सारखा आजार नसावा.
शस्त्रक्रिया डोळयाच्या पांढ-या भागात केली जाते.
शस्त्रक्रियेनंतर एखादाच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागते.
जरी शस्त्रक्रिया झाली असेल तरीही चष्मा वापरणे बंधनकारक आहे.
बालवयातला तिरळेपणा एकतर जन्मजात असतो किंवा दृष्टीदोषामुळे तयार झालेला असतो. तिरळेपणा आढळला तर लवकरात लवकर नेत्रतज्ज्ञास दाखवणे आवश्यक असते. शस्त्रक्रियेने तिरळेपणावर उपाय करता येतो. दृष्टीदोष असल्यास त्यावरही उपाय करावे लागतात.
आळशी डोळा
डोळयात काही विकार नसताना आणि नंबर चष्मा देऊन दुरूस्त केला तरी डोळयाची नजर कमी होणे म्हणजेच ‘आळशी डोळा’.
डोळा आळशी कशामुळे होतो?
तिरळेपणा
दोन डोळयातील चष्म्याच्या नंबरमधील तफावत.
जन्मजात मोतीबिंदू
पापणी पडणे
आळशी डोळा हा विकार बालपणीच होतो. लहान मुलांमध्ये दृष्टी तयार होण्याची प्रक्रिया नऊ वर्षापर्यंत होते. जेवढे वय लहान तेवढाच हा विकार होण्याचा संभव जास्त असतो.
डोळा आळशी का होतो?
जेव्हा दोन डोळयांमधील चष्म्याच्या नंबरमध्ये तफावत असते तेव्हा जास्त नंबर असलेल्या डोळयाकडून अस्पष्ट प्रतिमा मेंदूकडे पाठविली जाते. तिरळेपणामध्ये एकाच वस्तूच्या दोन वेगवेगळया प्रतिमा दोन्ही डोळयांकडून मेंदूस पाठविल्या जातात. त्यामधील तिरळा असलेल्या डोळयाकडून येणारी प्रतिमा ही आपोआपच दुर्लक्षित होते व तिरळा असणारा डोळा आळशी होतो. ही अस्पष्ट प्रतिमा मेंदू दुर्लक्षित करतो त्यामुळे त्या डोळयाची दृष्टी कमी होते व डोळा आळशी बनतो.
त्वरित उपचार न केल्यास हा रोग, कायमचा जडतो व नंतर कोणतीही उपाययोजना करून दृष्टी परत मिळवता येत नाही. या विकारावर उपचाराचे चांगले परिणाम मिळण्यासाठी रुग्णाचा व रुग्णाच्या नातेवाईकांचा योग्य प्रतिसाद आवश्यक असतो.
आळशी डोळयावर उपचार काय करावा?
लवकर निदान झाल्यास व लवकर उपचार केल्यास हा विकार बरा होऊ शकतो.
आळशी डोळा या विकारावरील सर्वात महत्त्वाचा उपचार म्हणजे रुग्णाकडून त्याच्या आळशी डोळयाकडूनच काम करून घेणे आवश्यक असते. चांगली दृष्टी परत मिळविण्यासाठी सामान्य (काम करणारा) डोळा पट्टी लावून झाकणे (पॅचींग) व आळशी डोळयाकडून काम करून घेणे.
रुग्णांस दृष्टीदोष असल्यास योग्य नंबरचा चष्मा देणे.
आळशी डोळा व तिरळेपणा एकत्र असल्यास शस्त्रक्रिया केली जाते.
सामान्य डोळयास पट्टी लावून ठेवण्याच्या प्रक्रियेस ‘डोळाबंद’ असे म्हणतात. ही प्रक्रिया रुग्णाच्या वयोमानानुसार व विकाराच्या तीव्रतेनुसार काही तास किंवा काही दिवसांसाठी केली जाते.
पट्टी लावणा-या (पॅचिंग केलेल्या) रुग्णांचा, पाठपुरावा हा नेत्रतज्ज्ञांकडून ठरावीक कालावधी नंतर होणे गरजेचे असते.
पट्टी लावून ठेवण्याच्या (पॅचिंगच्या) प्रक्रियेस सुरुवातीला मुलं प्रतिसाद देत नाहीत परंतु दृष्टीत सुधारणा होत राहिल्याने या प्रक्रियेचा स्वीकारही वाढत जातो.
लहान मुलांमध्ये सुरुवातीस थोडा काळच पॅचिंग केले जाते. नंतर चांगल्या परिणामांसाठी त्याचा कालावधी हळूहळू वाढवला जातो.
पॅच हा डोळयावर चेह-यालाच लावला जातो.
चष्मा वापरणा-या रुग्णांमध्येही हा पॅच चष्म्याला न लावता डोळयावरच लावला जातो.
वृद्धपणात नजर कमी होणे
हा आजार नेत्रपटलातील चेता-तंतूचे केंद्र म्हणजे मॅक्युला खराब होत गेल्याने तयार होतो. आजार सहसा दोन्ही डोळ्यात होतो म्हणजे एका डोळ्यात सुरू झाला तर दुसऱ्या डोळ्यात पण होतो. यावर वेळीच उपचार करता येतात म्हणजे निदान पुढचा दोष व नुकसान टाळता येते
याची लक्षणे म्हणजे सुरुवातीला सरळ रेखा वक्र दिसू लागतात आणि ही वक्रता वाढत जाते. वाचन करताना अक्षर एकमेकात मिसळतात, काही अक्षरे अक्षरे मधूनच दिसत नाहीत असा अनुभव येतो. जसा आकार वाढतो तसे तसे नजरेच्या मध्यभागी काळा डाग दिसू लागतो. वेळेवर उपचार न झाल्यास काळा डाग आकारांनी वाढत जातो. नंतर चालणे फिरण्याची नजर देखील जाते. यासाठी डोळ्याच्या डॉक्टरकडून तपासून घ्यावे, ते तुम्हाला पुढील तपासण्या सांगतील आणि करून घेतील.
नेमके निदान झाल्यावर उपचार करता येतात. यासाठी दोन प्रकारची इंजेक्शन्स आहेत आणि ती प्रभावी आहेत. शिवाय लेसर उपचार पण करता येतो. तसेच लेसर आणि इंजेक्शन हे दोन्ही उपचार पण संयुक्तरीत्या करता येतात. वेळीच उपचार केले तर त्रास कमी होतो आणि पुढचा त्रास टळतो .
मधूमेहामुळे दृष्टी दोष
भारतामध्ये मधुमेह (डायबेटीस ) प्रमाण खूप आहे. जवळजवळ 10 टक्के प्रौढांमध्ये मधुमेह आढळतो. या सगळ्या रुग्णांना हळूहळू नेत्र विकार होत जातात, वीस वर्ष मधुमेह असेल तर त्यातील 90 टक्के लोकांना मधुमेह-नेत्रविकार होतातच. त्यामुळे वारंवार डोळ्याची तपासणी आणि उपचार करून घेणे आवश्यक असते त्याचबरोबर मधुमेह नियंत्रणात ठेवून म्हणजे साखर नियंत्रणात ठेवून मधुमेह कमी करण्याचा प्रयत्न अवश्य करायला. दीर्घ मधुमेहामुळे खालील नेत्रविकार संभवतात:
वारंवार चष्म्याचा नंबर बदलणे, रांजणवाडी येणे, डोळ्यात होणारे रक्तस्त्राव, मोतीबिंदू, काचबिंदू, दृष्टीचेताला सूज येणे म्हणजे ऑप्टिक न्यूराइटिस. अचानक येणारा तिरळेपणा व वस्तू दोन दोन दिसणे असे काही विकार आढळतात. यापैकी मधुमेह नेत्रपटल विकार म्हणजे डायबेटिक रेटिंनोपॅथी (डारे) हा सगळ्यात महत्त्वाचा आणि नेहमी होणारा आजार आहे. यामुळे येणारे अंधत्व निवारण करणे अवघड असते जवळजवळ प्रत्येक मधुमेह रुग्णाला डारेचा विकार हा कमीजास्त प्रमाणात असतोच.
डायबेटिक रेटीनो पॅथीची कारणे विविध असतात, मुख्य म्हणजे नेत्र पटलावरील रक्तवाहिन्यांमधून रक्तातले घटक झिरपू लागतात त्यामुळे त्याला सूज येते आणि रक्ताचे ठिपके दिसतात. पटलावर बाहेर आलेले कोलेस्ट्रॉलचे पिवळी ठिपके दिसतात. काही अवस्थेत नेत्र पटलावरील रक्तवाहिन्या नष्ट होऊ लागतात आणि तो भाग हळूहळू मरू लागतो. त्या ठिकाणी नवीन रक्तवाहिन्या म्हणजे केशवाहिन्यांचे जाळे तयार होते, त्या फुटत राहतात आणि रक्तस्त्राव होत राहतो आणि त्या ठिकाणी कोळीष्टकासारखे जाळे तयार होते. शेवटी याची परिणती रेटायनल डिटॅचमेंट या भयंकर दृष्टीनाशक रोगात होते त्याचप्रमाणे नेत्रपटलातील मुख्य केंद्रीय भाग नष्ट होणे म्हणजे मॅक्युलोपॅथी हापण आजार होतो
मधुमेह आजारात यासाठी नेत्रपटलाची तपासणी दर सहा महिन्यांनी तरी करावीच लागते. फंडस फोटोग्राफी हे आणखीन एक तंत्र आहे आणि फंडस फोटोग्राफीने फोटोग्राफी करून तज्ञाकडे ती ईमेलने पाठवून रिपोर्ट मागवता येतो. रेटायनल अंजिओग्राफी हे आणखीन एक तंत्र आहे. यामध्ये हिरवे औषध टोचून नेत्र पटलावरील अंजॉग्रफी केली जाते. ऑप्टिकल कोहरंन्स टोमोग्रफी हे पण एक तंत्र आहे
उपचार
लेसर किरण-उपचार सगळ्यात यशस्वी पद्धत आहे. वीस पंचवीस मिनिटात लेसर उपचार करून रुग्ण घरी जाऊ शकतो. डोळ्यामध्ये इंजेक्शन देणे हे दुसरे तंत्र आहे. यामध्ये दोन तीन प्रकारची औषधे गरजेप्रमाणे वापरली जातात. डायबेटीक रेटिंओपॅथीची शस्त्रक्रिया यातील मुख्य भाग म्हणजे वित्रियस आणि नेत्र पटलातील रक्तवाहिन्यांचे कोष्टकासारखे जाळे काढून टाकले जाते. त्यासाठी लेसरचा पण उपयोग करता येतो.
राष्ट्रीय अंधत्व निवारण योजना
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे मुख्य मुद्दे (National Blindness Control Programme – NBCP):
उद्दिष्ट
देशातील टाळता येण्यासारखे आंधळेपण (avoidable blindness) कमी करणे.
नेत्रजागृती करणे व नेत्रसंवर्धनाला प्रोत्साहन देणे.
प्रारंभ
भारत सरकारने 1976 मध्ये राष्ट्रीय आंधत्व नियंत्रण कार्यक्रम सुरु केला.
हा भारतातील सर्वांत जुना राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आहे.
मुख्य कार्यक्षेत्रे
मोतीबिंदू शस्त्रक्रिया: मोतीबिंदूमुळे होणारे आंधळेपण कमी करण्यासाठी मोफत/कमी दरात शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध
नेत्रदान प्रोत्साहन: मृत्यूनंतर डोळ्यांचे दान करून आंधळ्या व्यक्तींना दृष्टीदान.
शालेय नेत्र तपासणी: शाळकरी मुलांचे डोळ्यांचे आरोग्य तपासणी व गरजेनुसार चष्मे उपलब्ध करणे.
नेत्ररोग उपचार: ग्रामीण व शहरी भागात नेत्र रुग्णालये, नेत्रकेंद्रे उभारून उपचार.
आरोग्य शिक्षण व जनजागृती: डोळ्यांच्या रोगांबाबत माहिती देणे व वेळेवर उपचार घेण्यास प्रोत्साहन.
प्राथमिक सेवा आणि संस्था
प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नेत्र सहाय्यकांची नेमणूक.