डोळे

डोळयातल्या जखमा

डोळयाच्या सर्व जखमांवर, विशेषत:बुबुळाच्या जखमांवर ताबडतोब नेत्रतज्ज्ञाकडून उपचार होणे आवश्यक आहे. वरून किरकोळ वाटणा-या जखमाही अंधत्वास कारणीभूत ठरू शकतात. बुबुळावर जखम किंवा व्रण असल्यास त्या डोळयाला प्रकाश अजिबात सहन होत नाही, हीच याची मुख्य खूण असते.

बुबुळावर जखम असल्यास नेत्रतज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे. बुबुळावरच्या जखमा लवकर दिसत नाहीत. डोळयात फ्लुरोसिन औषधाचा थेंब टाकला तर असा कण लवकर दिसून येतो. बुबुळावर काही कण, कचरा असल्यास अगदी काळजीपूर्वक (बुबुळास धक्का न लावता) काढता येत असल्यास काढावा. हे न जमल्यास तज्ज्ञाकडे पाठवून द्यावे. बुबुळाची चांगल्या प्रकाशात काळजीपूर्वक तपासणी न केल्यास बुबुळावरचा कण, जखम लक्षात येत नाही. मात्र दोन-तीन दिवसांत त्या ठिकाणी व्रण व पांढरटपणा येऊन दृष्टी अधू होण्याची शक्यता असते.

प्रथमोपचार

बुबुळाच्या जखमेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. प्रथमोपचार म्हणून जंतुविरोधी थेंब टाकून डोळा निर्जंतुक कापडयाच्या घडीने बांधून बंद ठेवावा. यामुळे बुबुळावरची जखम भरून यायला मदत होते. आत नवीन घाण, कचरा, जंतू जायला अटकाव होतो. गॅमा किरण वापरून निर्जंतुक केलेली कपडयाची घडी (स्टरीपॅड) औषधांच्या दुकानात उपलब्ध असते. कागदीपिशव्या स्वच्छ सुती कपडयाच्या घडया पॅकबंद करून सूर्यचुलीमध्येही निर्जंतुक करता येतील. मात्र या प्राथमिक उपचारावर थांबू नये. तज्ज्ञाकडे ताबडतोब पाठवावे.

नेत्रपटलाचे आजार

नेत्रपटल हे संवेदनाक्षम पेशींनी बनलेले असते. प्रकाश आणि प्रतिमा, संवेदना या पेशींमधून नेत्रचेता मार्फत (डोळयाची नस) सरळ मेंदूकडे पोचतात. हे नेत्रपटल अतिरक्तदाब आणि मधूमेह या दोन आजारात खराब होते व त्यामुळे अंधुक दिसते. म्हणूनच या दोन्ही आजारात नियमितपणे नेत्रपटलांची तपासणी करावी लागते. यासाठी डॉक्टर फंडोस्कोप नावाचे बॅटरीसारखे एक छोटे यंत्र वापरतात.

नेत्रपटल सुटणे

नेत्रपटल आपल्या जागेवरून सुटून डोळयामध्ये सरकण्याचा एक आजार असतो. याला आपण नेत्रपटल सुटणे असे म्हणू या. या आजाराची विविध कारणे आहेत. मुख्य लक्षण म्हणजे डोळयाच्या काही भागात अंधारी येणे व दृष्टीचे क्षेत्र कमी होणे. यावर लेझर शस्त्रक्रियेचा चांगला पर्याय आता उपलब्ध आहे. नेत्रतज्ज्ञांमध्ये आता नेत्रपटल-तज्ज्ञांची वेगळी शाखा विकसित झाली आहे.

रेटायनल डिटॅचमेंट म्हणजे नेत्रपटल सरकणे निरोगी नेत्रपटल डोळ्याच्या मागील भागात अलगद चिकटलेले असते भिंग व नेत्रपटल यामधील जागा वित्रीयस नावाच्या द्राक्षाच्या जेली सारख्या पदार्थाने व्यापलेली असते.  नेत्रपटल वित्रीयसला काही ठिकाणी घट्ट चिकटलेले असते.  जेव्हा नेत्रपटल जागेवरच सुटून येते तेव्हा त्याचे काम बंद पडते किंवा बिघडते.  

वाढत्या वयाप्रमाणे व्हिट्रेस जेली ही अधिक पातळ पाण्यासारखी  होते अशात नेत्रपटल सुटून येण्याची शक्यता असते . चाळीशी किंवा पन्नाशी नंतर ह्या प्रक्रिया सुरू होतात अशा रुग्णांना डोळ्यासमोर अचानक काळेबिंदू फिरताना दिसतात याला फ्लोटर्स असे म्हणतात काहींना वीज चमकल्याप्रमाणे भास होतो बहुतांशी लोकांमध्ये नेत्र पटलाला इजा होत नाही परंतु काही रुग्णांमध्ये नेत्रपटल जास्त टन आल्याने त्याला छिद्र पडते. अशावेळी नेत्रपटल जागेवरनं सरकू शकते . अतिरक्तदाब, मधुमेह, वृद्धत्व, निकटदृष्टी,  डोळ्यावर शस्त्रक्रिया डोळ्याला गंभीरजखमा हे आणखीन पण काही कारणे असू शकतात.

लक्षणे

डोळ्यासमोर काळा पडदा आल्यासारखं वाटतं, अंधुक दिसते.  डोळ्यासमोर काळे  बिंदु फिरताना दिसतात. दृष्टीचे क्षेत्र  संकोचते

उपचार

अशावेळी ताबडतोब नजर वाचवण्यासाठी नेत्रपटल पूर्ववत जागेवर बसवणे अत्यावश्यक असते आणि त्यासाठी शस्त्रक्रिया लागते.   त्यासाठी विविध शस्त्रक्रिया पद्धती आहेत.  लेसर शस्त्रक्रिया सामान्यपणे अधिक वापरतात.   एका पद्धतीत डोळ्यांमध्ये विशिष्ट गॅसचा बुडबुडा सोडला जातो त्यामुळे नेत्रपटल परत जाऊन आपल्या जागेस  चिकटते.  तिसरी एक पद्धत म्हणजे जेथे छिद्र पडलेले असते त्याच्या बाहेरच्या बाजूला सिलिकॉन रबरचा तुकडा शिवला जातो. आणखी  एका पद्धतीमध्ये शस्त्रक्रियेमध्ये नेत्रगोलाच्या बाजूला छोटे छिद्र पाडून त्यात बारीक यंत्र घालून नेत्र पटलावर ताण आणणारे वित्रीयस पूर्णपणे काढून टाकले जाते आणि तोपर्यंत ऑइल किंवा गॅस हात भरला जातो . ऑइल भरले असल्यास तीन-चार महिन्यांनी आणखीन शस्त्रक्रिया करून ते काढून टाकावे लागते.  गॅस मात्र आपोआप कमी होतो.  शस्त्रक्रियेचा सर्व हेतू हा नेत्रपटल जागेवर बसवणे हा आहे.  त्यानंतर येणारी नजर ही नेत्रपटलात असलेल्या उरलेल्या शक्तीवर अवलंबून असते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तीन-चार तासात रुग्ण घरी जाऊ शकतो. त्यानंतर तीन आठवडे डोके खाली घालून झोपण्याचा अथवा बसण्याचा व्यायाम करावा लागतो.  या कालावधीत घरातील कामे सुरू करताना वाकणे, जड वजन उचलणे, किंवा जास्ती व्यायाम करणे टाळावे.  शस्त्रक्रियेला शंभर टक्के यश येईल असे नसते.  काही रुग्णांच्या बाबतीत नंतर परत नेत्रपटल परत सुटू शकते.  त्यामुळे वारंवार तपासणी करणे आणि डोळ्याचे प्रेशर/दाब चेक करणे आवश्यक आहे 

बालकांमधील नेत्रपटलदोष

अपूर्ण वाढ झालेल्या नवजात बालकांमधील नेत्रपटलदोष अर्भकाच्या नेत्रपटलाची संपूर्ण वाढ होण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. आठ महिन्यांआधी जन्मास आलेल्या अर्भकाचे नेत्रपटल कमजोर असते. नेत्रपटलावरील रक्तवाहिन्यांची वाढ अपूर्ण झालेली असते. जन्मानंतर अपूर्ण वाढ झालेल्या रक्तवाहिन्यांची वाढ होताना ती दोषपूर्ण होते व दोषपूर्ण रक्तवाहिन्यांचे एक जाळे तयार होते. या सदोष रक्तवाहिन्या नेत्रपटलास नैसर्गिक रक्तपुरवठा करू शकत नाहीत व या रक्तवाहिन्यांच्या वाढीमुळे मागचा पडदा निसटू शकतो.

उपचार
  • रक्तवाहिन्यांमधील दोषाचे प्रमाण कमी असेल तर हा दोष आपोआपच नाहीसा होतो.
  • दोषाचे प्रमाण जास्त असेल तर सदोष रक्तवाहिन्यांची वाढ होऊ नये यासाठी लेसर उपचार करावा लागतो. लेसर उपचाराने पडदा निसटण्याची शक्यता कमी होते.
  • दोषाचे प्रमाण जास्त असेल तर पडदा निसटतो व यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार करावा लागतो. परंतु शस्त्रक्रिया करूनही दृष्टी पूर्ववत होण्याची शक्यता कमी असते.
  • उपचारानंतर पाठपुराव्याची गरज आहे का?
  • उपचारानंतरही कधीकधी गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे दरवर्षी नेत्रपटलाची तपासणी होणे गरजेचे आहे.
आजाराचे दूरगामी परिणाम 
  • चष्म्याचा नंबर असण्याची शक्यता जास्त असते.
  • कमजोर राहिलेला डोळा आळशी बनतो.
  • तिरळेपणा
  • दोषाचे प्रमाण जास्त असल्यास अंधत्वही येऊ शकते. उपचाराने अंधत्व येण्याची शक्यता कमी होते. परंतु ही शक्यता संपूर्णपणे टाळता येत नाही.