डोळे

मोतीबिंदू

भारतात 50 वर्षाच्या वरच्या वयोगटात सुमारे 8% लोकांना मोतीबिंदू असतो. मोतीबिंदू म्हणजे डोळयाच्या बाहुलीतले भिंग नेहमीप्रमाणे काचेसारखे पारदर्शक न राहता तांदळाच्या दाण्यासारखे पांढुरके होते. यामुळे प्रकाशकिरण आत शिरायला अडथळा होतो.

मोतीबिंदू सहसा उतारवयात येतो. मधुमेहात तो लवकर वयात येऊ शकतो.

मोतीबिंदू आल्यावर नेहमीची तक्रार म्हणजे अंधुक दिसणे. रात्री गाडी चालवतांना समोरचा लाईट जास्त त्रासदायक होतो. डोळयांसमोर काळे वर्तुळ दिसते. दिवसा (जास्त प्रकाशात) कमी दिसते. पण संध्याकाळी (कमी प्रकाश असतो तेव्हा) दिसण्यात थोडी सुधारणा होते,  इत्यादी. एकाऐवजी अनेक प्रतिमा दिसणे हे पण एक लक्षण आहे. डोळ्यासमोर पडदा आला आहे असे वाटणे,   चष्म्याचा नंबर वारंवार बदलणे जवळचे चांगले दिसते आणि पुढे दृष्टी खूप मंद होऊन अंधत्व येते 

मोतीबिंदू किती पिकला आहे यावर तक्रारींचे स्वरूप अवलंबून असते. मोतीबिंदू पिकण्याची आता वाट पाहत नाहीत लवकरात लवकर तो काढणे हे केव्हाही चांगले त्यांनी काचबिंदू होत नाही आणि दृष्टी लवकर सुधारते रंग सुधारतात 

मोतीबिंदू लवकरात लवकर शस्त्रक्रिया करून काढून त्याऐवजी डोळयातच कायमचे भिंग बसवले जाते. मात्र औषधाने मोतीबिंदू घालवणे शक्य नाही.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया

मोतीबिंदूची जुनी शस्त्रक्रिया आता पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी मोतीबिंदू काढून चष्मा दिला जात होता. आता मोतीबिंदूच्या जागी नवीन कृत्रिम भिंग बसवले जाते. या भिंगाने चष्म्याची गरजच राहिली नाही. या शस्त्रक्रियेच्या दोन पध्दती आहेत.

बिनटाक्याची ‘फिको’ पध्दत

यामध्ये छेद फक्त 3-5 मि.मी.चा असतो. यात एक सूक्ष्म हत्यार फिरवून मोतीबिंदूचा भुगा करतात व तो द्रवरुप करून शोषून घेतात. यामुळे मोतीबिंदू लहान छेदातून काढता येतो. मोकळया जागी कृत्रिम भिंग बसवतात. हे भिंग घडी करून आत सरकवले जाते व आत ते उघडते. या तंत्रामुळे छेद लहान असतो व जखमेला टाके लागत नाहीत. यात आत आणखी नवीन उपकरणे आली असल्याने छेद आणखी थोडा लहान झाला आहे. टाके नसल्यामुळे जखम लवकर भरते. शस्त्रक्रियेनंतर लगेच घरी जाता येते. या शस्त्रक्रियेला जास्त खर्च येतो. (अंदाजे रु.20000)

कृत्रिम भिंग

हे भिंग म्हणजे एक वरदानच आहे. हे उच्च प्रतीच्या प्लास्टिकचे बनवतात. यात अनेक प्रकार आहेत. त्यातल्या आधुनिक प्रकारांमुळे नैसर्गिक भिंगाच्या सारखी लवचीकता आली आहे. यामुळे आता लघुदृष्टी किंवा दीर्घदृष्टीसाठी वापरावा लागणारा चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सची गरज राहत नाही. मूळ दृष्टीदोषाचा विचार करून हे कृत्रिम भिंग निवडले जाते.

शस्त्रक्रियेनंतर सुमारे 97-98% लोकांना पूर्णपणे दृष्टीलाभ होतो. मात्र काहींच्या बाबतीत समस्या निर्माण होतात. विशेषत: साध्या टाक्याच्या शस्त्रक्रियेनंतर भिंगाच्या मागच्या बाजूला धुरकटपणा निर्माण होऊ शकतो. याला लेसर उपचार करावे लागतात.

मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या आधी तपासण्या 

 डोळ्याचे पूर्ण तपासणी केली जाते नेत्र पाटलाची तपासणी काचबिंदूचे तपासणी यांचा नंबर काढला जातो यासाठी आयओएल मास्टर हे मशीन वापरले जाते रक्ताच्या तपासणी करतात विशेषतः मधुमेह आहे नाही याबद्दल त्यानंतर फिजिशियन डॉक्टरांकडून रक्तदाब मधुमेह आणि हृदयविकांनी याची फिटनेस सर्टिफिकेट देतात 

 शस्त्रक्रिया मोतीबिंदूवर आता फेको शस्त्रक्रिया ही सर्वाधिक केली जाते या पद्धती डोळ्याच्या आवरणास दोन मिलिमीटरचा छेद घेऊन त्यातून फेको मशीन ची नळी छोटी नळी डोळ्यात घातली जाते आणि या नळीद्वारे अतिउच्च ध्वनी लहरी सोडून मोतीबिंदूचा चुरा करतात आणि काढून टाकतात यानंतर घडी केलेले लेन्स डोळ्यात त्या ठिकाणी घातले जाते 

 यात लेन्सचे  अनेक प्रकार हल्ली वापरले जातात.  मोनोफोकल लेंस म्हणजे त्याचा फोकस ठराविक ठिकाणीच पडतो-नजीकचा किंवा लांबचा.  गरजेप्रमाणे पुढे चश्मा  दिला जातो.  

सामान्यपणे मल्टी फोकल लेन्स वापरणं चांगलं पडतं त्यात डोळ्याला आणखी चष्मा घालायला लागत नाही आणि जवळचे किंवा लांबचे या दोन्हीसाठी हा लेन्स उपयोगी पडतो

तिसरा लेन्स टोरिक प्रकारचा आहे हा मुख्यतः अॅस्टिग्मॅटिझम (म्हणजे बुबुळ दंडगोलाच्या आकाराचे असणे या दोषात) या प्रकारसाठी वापरतात .

 दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया एकदम केली जात नाही,  त्यात आठवडाभर अंतर ठेवून एक शस्त्रक्रिया सुरक्षित झाली आहे याची खात्री केली जाते, मगच दूसरा करतात.

 काही वेळा मोतीबिंदू शस्त्रक्रियानंतर काही वर्षांनी लेन्सवरचा पापुद्रा धुरकट होऊ शकतो.  तो वरचा पापुद्रा धुरकटपणा याग लेसरद्वारे  दुरुस्त करता येतो 

 सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स मोफत असतात.  त्यामुळे वेगळा खर्च करण्याच्या भानगडीत पडू नये.  खाजगीत करायचे झाल्यास इनसुरन्स कवच असलेले बरे पडते.

प्रतिबंध

मोतीबिंदू होऊ नये म्हणून जेवणात लसूण भरपूर असावा असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. तसेच आपल्या देशात उन्हामुळे मोतीबिंदू जास्त प्रमाणात व लवकर होतो. उन्हात काम करताना गॉगल लावणे चांगले. डोळयावर सावली येईल अशी टोपी वापरणे हा पण चांगला प्रतिबंधक उपाय आहे. मोबाईल, संगणक व टीव्ही च्या किरणांमुळे मोतीबिंदू लवकर होतो. पण ही लक्षात असू द्यावी की मोतीबिंदू लवकर झाला तरी उत्तम शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत .

काचबिंदू

काचबिंदू म्हणजे डोळयातला (नेत्रगोलातला) दाब वाढणे. ज्याप्रमाणे शरीरात रक्तदाब वाढतो त्याप्रमाणे डोळयातील दाब वाढू शकतो. सामान्यपणे हा दाब 10-21 मिमी पारद इतका असतो. काच बिंदूचे काही प्रकार आहेत एक प्रकार हा शांतपणे चोर पावलांनी येणारा आजार आहे, दुसरा अचानक होऊ शकतो.

कारणे

काचबिंदू हा मुख्यत: प्रौढ वयात होणारा विकार आहे. 40-45 वयानंतर याचे प्रमाण जास्त असते अनुवंशिकता हे एक कारण असू शकतो, ज्यांच्या कुटुंबात काचबिंदू रुग्ण आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे. निकटदृष्टीता म्हणजे मायोपीया असलेल्या लोकांमध्ये काचबिंदूंचे प्रमाण जास्त असते, तसेच मधुमेह आणि रक्तदाब इत्यादी विकार असणाऱ्या व्यक्तीमध्ये काचबिंदू आढळू शकतो . इतर नेत्रविकारांमुळे ही काचबिंदू होऊ शकतो. मोतीबिंदू जास्त पिकल्यामुळे, डोळ्याच्या बाहुलीला सूज आल्यामुळे, डोळ्यात ट्युमर झाल्यामुळे, डोळ्याला मार लागल्यामुळे, नेत्रबाहुली जवळ अडथळा आल्यामुळे किंवा काही स्टेरॉईड्स औषधांच्या अतिवापरामुळे काचबिंदू होऊ शकतो.

लक्षणे

नेत्राजलाचा दाब प्रमाणाबाहेर वाढला, की डोळा अचानक दुखू लागतो, दृष्टी अधू होते आणि डोळयात लाली येते. डोळ्याला पाणी येत राहते, दिव्या भोवती रंगीत वर्तुळे दिसतात. पण बऱ्याच वेळेला काहीच लक्षणे नसतात हे आणखीन धोकादायक आहे. तीव्र काचबिंदू आजारात दृष्टी पूर्ण जाते.

निदान

डोळयातील दाब थोडयाशा प्रशिक्षणाने बोटाने तपासता येईल. यासाठी डोळा मिटवून वरच्या पापणीवर आपल्या दोन्ही हातांच्या तर्जनीने दाबून डोळयांतील दाबाचा अंदाज घ्यावा. मात्र नक्की निदानासाठी तज्ज्ञाकरवी तपासणी आवश्यक आहे.
टोनोमेट्री साठी संगणकीय उपकरण उपलब्ध आहे यांनी अचूक मापन होते. याचबरोबर नेत्र पटलाची पाहणी म्हणजे तपासणी करावी लागते. पेरिमेट्री म्हणजे दृष्टीक्षेत्र किती आकसले आहे याची तपासणी करतात. ऑप्टिकल कोहेरेन्स टोमोग्राफी ही अचूक तपासणी असून 10% पेक्षा कमी दृष्टी होण्याअगोदरच या तपासणीने काचबिंदूचे अचूक निदान करता येते. 

उपचार

काचबिंदू हा गंभीर आजार आहे. तज्ज्ञाकडून त्याचे ताबडतोब उपचार होणे आवश्यक आहे. डोळयातील दाब कमी करण्यासाठी तोंडाने घेण्याचे औषध-गोळया उपलब्ध आहेत. (असेटाझोलामाईड). पण यापैकी काही प्रकारात शस्त्रक्रिया आवश्यक असते.  

काचबिंदूवर अत्यंत प्रभावी औषधोपचार आहेत, मुख्यतः गोळ्या परंतु काही वेळेला इंजेक्शन द्यावे लागते. लेसर उपचाराने नेत्रजलाला वाट करून देता येते आणि काचबिंदूचा दाब कमी होतो. शस्त्रक्रिया करून डोळ्यातील अतिरिक्त नेत्रजल बाहेर वाहून नेता येते.

काचबिंदूच्या रुग्णांनी खालील गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे

  • काचबिंदूंमुळे गेलेली दृष्टी कधी परत येऊ शकत नाही. त्यामुळे लवकरात लवकर निदान आणि उपचार होणे आवश्यक आहे
  • म्हणूनच 40 वर्षाच्या पुढील प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक वर्षी काचबिंदूची म्हणजे डोळ्यातील दाबाची तपासणी करून घ्यावी
  • त्याचबरोबर नेत्रपटलाची तपासणी म्हणजे रेटायनास्कोपी पण करून घ्यावी
  • काचबिंदू विकार असल्यास नियमित तपासणी आणि उपचाराने आटोक्यात ठेवावा लागतो 

नेत्रदान (बुबुळ-कलम)

फूल पडून बुबुळ निकामी झाले तर त्यावर खरा एकच उपाय म्हणजे निरोगी बुबुळ बसवणे. यासाठी जुने रोगट बुबुळ काढून टाकतात व त्या जागी निरोगी (मृत्यूनंतर काढून घेऊन) बुबुळ कलम करतात. ही शस्त्रक्रिया सोपी आहे. पण पुरेसे लोक नेत्रदान करण्यासाठी पुढे यायला हवेत.

आपण नेत्रदानाबद्दल नेत्रपेढीला कळवले, की ते संमतीपत्र भरून घेतात. मृत्यूनंतर नेत्रपेटीला (लगेच) निरोप पाठवला, की मृत व्यक्तीचे डोळे काढून सुरक्षित ठेवतात व पापण्या शिवून टाकतात. यामुळे मृतदेह कुरूप दिसत नाही. मात्र मृत्यूनंतर दोन तासांत हे काम होणे आवश्यक आहे. तोपर्यंत डोळयांवर थंड ओला बोळा ठेवावा. पाळी येईल तसे शस्त्रक्रियेसाठी 2 अंध व्यक्तींना बोलावले जाते. रुग्णाचे आतले नेत्रपटल खराब झाले असेल तर मात्र या शस्त्रक्रियेचा उपयोग होणार नाही. नेत्रदान हे अत्यंत साधे पण महत्त्वाचे मानवतावादी कर्तव्य आहे.