आपत्कालीन / तातडीक वैद्यकसेवा

अतिदक्षता मधील उपकरणे व यंत्रे

या विभागात स्तरानुसार अनेक उपकरणे असतात. यात मल्टीपॅरा मॉनिटर( बहुविध कार्यदर्शक) व्हेंटिलेटर, डिफिब्रिलेटर, ऑक्सिजन व एअर आउटलेट, सक्शन मशीन, इन्फ्युजन पंप, सिरिंज पंप, ABG मशीन (रक्तातील प्राणवायू, कर्बवायु, सोडियाम-पोटॅशियम आदि मूलद्रव्ये मापन करणारे मशीन), ग्लुकोमीटर, पोर्टेबल एक्स-रे, अल्ट्रासाऊंड, डायलिसिस मशीन आणि बेडसाइड ECG ही प्रमुख उपकरणे असतात.

आतून (invasive) आणि बाहेरून (non-invasive) श्वसन-सहाय्य यांतील फरकश्वसन निकामी झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी आणि श्वास घेण्यास मदत करण्यासाठी दोन प्रमुख प्रकारचे श्वसन सहाय्य वापरले जाते: बाहेरून श्वसन सहाय्य आणि आतून श्वसन सहाय्य.

१. बाहेरून श्वसन सहाय्य (अनाक्रमक वायुवीजन)

या पद्धतीमध्ये रुग्णाच्या नाकावर किंवा तोंडावर विशेष मास्क बसवून दाबाने हवा आणि ऑक्सिजन दिला जातो. श्वासनलिकेत कोणतीही नळी घालावी लागत नाही.

प्रमुख प्रकार

  • CPAP (continuous positive air pressure) सतत सकारात्मक वायुदाब) 
  • BiPAP (Bilevel Positive Airway Pressure. दोन पातळ्यांवरील सकारात्मक वायुदाब) 

उपयोग

  • श्वसन-विकाराचा तीव्र झटका 
  • तीव्र दमा
  • हृदयविकारामुळे फुफ्फुसात पाणी साचणे 
  • झोपेत श्वासवरोध होण्याचा विकार  

फायदे

  • श्वासनलिकेत नळी घालावी लागत नाही 
  • रुग्ण बोलू शकतो 
  • संसर्गाचा धोका कमी 
  • तुलनेने सोपी पद्धत 

मर्यादा

  • रुग्ण शुद्धीवर आणि सहकार्य करणारा असावा 
  • मास्कमुळे अस्वस्थता होऊ शकते 
  • अतिगंभीर रुग्णांमध्ये अपुरी पडू शकते 
 २. आतून श्वसन सहाय्य (Invasive ventilation/ कृत्रिम श्वसन)

या पद्धतीमध्ये तोंडावाटे किंवा नाकावाटे श्वासनलिकेत विशेष नळी (एंडोट्रॅकियल ट्यूब) घालून ती Mechanical Ventilator शी जोडली जाते. काही रुग्णांमध्ये मानेतून ट्रॅकिओस्टॉमी करून नळी बसवली जाते.

उपयोग

  • रुग्ण स्वतः श्वास घेऊ शकत नसतो, अशावेळी  
  • कोमा किंवा बेशुद्धावस्था 
  • तीव्र श्वसन-अवरोध
  • गंभीर विषबाधा, अपघात किंवा मेंदूविकार 

फायदे

  • श्वसनावर पूर्ण नियंत्रण ठेवता येते 
  • अचूक प्रमाणात ऑक्सिजन देता येतो 
  • अत्यंत गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्यास उपयुक्त 

तोटे

  • शांत करणारी औषधे किंवा भूल लागू शकते 
  • संसर्गाचा धोका अधिक 
  • श्वासनलिकेला इजा होऊ शकते 
ICU मधील प्रमुख कामे

सतत निरीक्षण, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरद्वारे श्वसनास मदत, रक्तदाब टिकवणे, प्रतिजैविके व इतर औषधे देणे, द्रव व इलेक्ट्रोलाइट संतुलन राखणे, रक्त तपासण्या, पोषण, फिजिओथेरपी, संसर्ग नियंत्रण आणि आवश्यक असल्यास डायलिसिस करणे.

अतिदक्षता विभागात (ICU) केल्या जाणाऱ्या विशेष तपासण्या

अतिदक्षता विभागातील (ICU) रुग्णांचे निरीक्षण : सतत आणि मधूनमधून तपासणी

अतिदक्षता विभागातील (ICU) रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांच्या शरीरातील बदल त्वरित ओळखणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी दोन प्रकारचे निरीक्षण केले जाते—सतत (Continuous Monitoring) आणि मधूनमधून (Intermittent Monitoring).

सतत निरीक्षण (Continuous Monitoring)

या पद्धतीत रुग्णाला मॉनिटरशी जोडले जाते आणि महत्त्वाची जीवनचिन्हे २४ तास अखंडपणे पाहिली जातात.

सतत तपासली जाणारी मापदंड
  • हृदयाची गती आणि ECG
  • रक्तदाब (आर्टेरियल लाईनद्वारे सतत मोजणी) 
  • रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण (SpO₂)
  • श्वसनगती 
  • शरीराचे तापमान 
  • श्वसनयंत्रावरील दाब आणि श्वसनाचे प्रमाण 
  • मेंदूतील दाब (काही न्यूरो ICU रुग्णांत) 
  • मध्यशिरा दाब (Central Venous Pressure)

सतत निरीक्षणामुळे हृदयाचे ठोके अनियमित होणे, रक्तदाब अचानक कमी होणे, ऑक्सिजन घटणे किंवा श्वसन बंद पडणे यांसारखे बदल लगेच लक्षात येतात.

मधूनमधून तपासणी (Intermittent Monitoring)

काही तपासण्या ठराविक वेळाने—उदा. प्रत्येक तासाला, ४–६ तासांनी किंवा दररोज—केल्या जातात.

मधूनमधून केल्या जाणाऱ्या तपासण्या
  • मूत्राचे प्रमाण 
  • रक्तातील शर्करापातळी  
  • Arterial Blood Gas (रक्तातील वायु%) 
  • इलेक्ट्रोलाइट्स (सोडियम, पोटॅशियम) 
  • संपूर्ण रक्त-चाचणी
  • यकृत कार्य तपासणी 
  • छातीचा एक्स-रे 
  • शरीराचे वजन 
  • बेशुद्धीची पातळी (Glasgow Coma Scale): यात डोळ्यातील प्रतिक्षिप्त क्रिया, विचारलेल्या प्रश्नाला प्रतिसाद आदि घटक मोजले जातात.  
निष्कर्ष

ICU मधील निरीक्षण हे उपचाराइतकेच महत्त्वाचे असते. सतत निरीक्षणाने तातडीचे बदल त्वरित समजतात, तर मधूनमधून तपासण्यांनी शरीराच्या अंतर्गत कार्यांचे मूल्यमापन करता येते. या दोन्ही पद्धतींमुळे गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्यात मोठी मदत होते.