आपत्कालीन / तातडीक वैद्यकसेवा
अतिदक्षता विभाग
ICU हा रुग्णालयातील विशेष विभाग आहे जिथे अत्यंत गंभीर रुग्णांवर २४ तास सतत निरीक्षणाखाली दीर्घकाळ उपचार केले जातात. येथे जीवनावश्यक अवयवांना कृत्रिम आधार दिला जातो.
प्रमुख वैशिष्ट्ये
- उपचाराचा कालावधी काही दिवस ते अनेक आठवडे
- सतत मॉनिटरिंग : महत्वाच्या निर्देशांकांवर बारकाईने लक्ष ठेवणे.
- व्हेंटीलेटर, डायलिसिस, इन्फ्युजन पंप : इथे उपचारांसाठी ही साधने/उपकरणे वारंवार वापरली जातात.
- प्रशिक्षित इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर आणि ICU परिचारिका
- बहुअवयव निकामी झालेल्या रुग्णांची देखभाल
अतिदक्षता विभागात जीवाला धोका असलेल्या किंवा अत्यंत गंभीर अवस्थेतील रुग्णांवर २४ तास सतत लक्ष ठेवून उपचार केले जातात. येथे प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने रुग्णाची जीवनचिन्हे तपासत असतात. रक्तदाब, नाडी, श्वसनगती, ऑक्सिजनचे प्रमाण, हृदयाची गती, मूत्राचे प्रमाण आणि मेंदूचे कार्य यांचे बारकाईने निरीक्षण केले जाते. ICU चा उद्देश शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना तात्पुरता आधार देणे आणि मूळ आजारावर उपचार करणे हा असतो. आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे ICU मुळे अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचतात.
ICU मध्ये प्रत्येक निर्णय वेळेवर & झटपट घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. काही मिनिटांचा विलंबही गंभीर ठरू शकतो. त्यामुळे प्रोटोकॉलनुसार उपचार, सतत प्रशिक्षण, संघभावना आणि रुग्णकेंद्रित दृष्टीकोन आवश्यक असतो. रुग्णाच्या कुटुंबाला स्थिती समजावून सांगणे, अपेक्षा स्पष्ट करणे आणि उपचारांचे उद्दिष्ट सांगणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच हा खूप महागडा उपचार आहे, आणि 8-10 दिवसाचे बिल लाखों रुपये होऊ शकते. त्यामुळे रुग्णाची परिस्थिती(आजाराचे स्वरूप) रुग्णाचे वय,लागू शकणाऱ्याखर्चाचा अंदाज,आजारातून दुरुस्त होण्याची शक्यता व अपेक्षित जीवनाची गुणवत्ता या सर्व गोष्टींचा वास्तव विचार व्हावा. केवळ भावनिक – सामाजिक दडपणाखाली निर्णय होऊ नये. त्यामुळे याबाबतीत स्वत: आग्रह न करणे, इतर डॉक्टरांचा फोनवर का होईना सल्ला घेणे, योग्य आणि शक्यतो धर्मादाय हॉस्पिटल निवडणे, हा सर्व विचार महत्वाचा आहे.
अतिदक्षता विभागाचे प्रकार (Types of ICU)
वैद्यकीय ICU, शस्त्रक्रिया ICU, हृदयविकार ICU (CCU), न्यूरो ICU, ट्रॉमा ICU, नवजात शिशु ICU (NICU), बालरोग ICU (PICU) आणि प्रसूतीसंबंधी ICU असे विविध प्रकार आहेत. प्रत्येक प्रकार विशिष्ट आजार आणि वयोगटासाठी असतो.
अतिदक्षता विभागाचे स्तर (Levels)
- स्तर १ ICU मध्ये मूलभूत निरीक्षण आणि ऑक्सिजन सुविधा असतात.
- स्तर २ मध्ये व्हेंटिलेटर, इन्फ्युजन पंप आणि प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध असतात.
- स्तर ३ ICU मध्ये प्रगत मॉनिटरिंग, डायलिसिस, ब्रॉन्कोस्कोपी, तज्ज्ञ डॉक्टर आणि सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध असतात.
अतिदक्षता सेवा लागतील असे काही आजार
सेप्सिस (शरीरात गंभीर जीवाणू-दाह),तीव्र न्यूमोनिया, तीव्र दमा, हृदयविकाराचा झटका, हृदयाची अनियमित गती, स्ट्रोक-(मेंदूघात), मेंदूतील रक्तस्राव, विषबाधा, विषारी सर्पदंश, मोठे अपघात, भाजणे, शस्त्रक्रियेनंतरची गंभीर अवस्था, मूत्रपिंड निकामी होणे, यकृत निकामी होणे आणि बहुअवयव निकामी होणे ही ICU मध्ये दाखल करण्याची प्रमुख कारणे आहेत.
ICU मध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या प्रमुख वैद्यकीय समस्या/आजार
१. हृदयविकार (Cardiac)
- हृदयविकाराचा तीव्र झटका (Acute Myocardial Infarction)
- कार्डिओजेनिक शॉक
- तीव्र हृदय अपयश (Acute Heart Failure)
- जीवघेणी अनियमित हृदयगती (Ventricular Tachycardia, Ventricular Fibrillation)
- पूर्ण हृदय अवरोध (Complete Heart Block)
- हृदय बंद पडणे व पुनर्जीवनानंतरची अवस्था
- मोठ्या हृदयशस्त्रक्रियेनंतरची देखरेख
२. श्वसनविकार (Respiratory)
- तीव्र श्वसन अपयश (acute respiratory failure)
- न्यूमोनिया आणि तीव्र श्वसन त्रास संलक्षण (एक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम – एआरडीएस)
- तीव्र श्वासनलिका दाह( acute bronchitis),तीव्र स्वरूपाचा दमा, किंवा दीर्घकालीन अवरोधक फुफ्फुसरोग (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज – सीओपीडी) यांचा तीव्र झटका
- फुफ्फुसात पाणी साचणे (पल्मोनरी एडीमा)
- फुफ्फुसातील रक्तगाठी (पल्मोनरी एम्बोलिझम)
- व्हेंटिलेटरची गरज भासणारी कोणतीही अवस्था
३. चेतासंस्था विकार (Nervous System)
- Stroke/मेंदू-घात
- मेंदूतील रक्तस्राव
- डोक्याला गंभीर दुखापत
- सतत फिट्स येणे (Status Epilepticus)
- मेंदूज्वर किंवा एन्सेफॅलायटिस
- कोमा
- मेंदूतील वाढलेला दाब
४. मूत्रपिंडविकार (Renal)
- तीव्र मूत्रपिंड निकामी होणे (Acute Kidney Injury)
- डायलिसिसची तातडीची गरज
- रक्तातील पोटॅशियम फार वाढणे
- तीव्र आम्लता (Metabolic Acidosis)
- लघवी पूर्णपणे बंद होणे
५. जठरांत्र व यकृत विकार (GIT)
- मोठ्या प्रमाणात उलटीत किंवा शौचातून रक्तस्राव
- तीव्र Acute Pancreatitis
- यकृत निकामी होणे
- Hepatic Encephalopathy
- आतड्याला भोक पडणे किंवा सेप्सिस
६. रक्तविकार (Hematologic)
- तीव्र रक्तक्षय
- प्लेटलेट्स फार कमी होणे
- Disseminated Intravascular Coagulation (DIC)
- गंभीर लुकेमिया किंवा संसर्ग
- मोठ्या प्रमाणातील रक्तस्राव
७. चयापचय विकार (Metabolic)
- Diabetic Ketoacidosis (मधुमेह आजारतली केटो-आम्ल गुंतागुंत)
- गंभीर हायपर किंवा हायपोग्लायसेमिया (रक्त-शर्करा खूप जास्त किंवा कमी होणे)
- सोडियम किंवा पोटॅशियम पातळीत गंभीर बिघाड/चढउतार
- थायरॉइड किंवा ॲड्रिनल क्रायसिस
८. विषबाधा व अपघाती कारणे (Toxic)
- कीटकनाशक विषबाधा
- औषधांचे ओव्हरडोस
- सापदंश
- विंचूदंश
- कार्बन मोनॉक्साइड विषबाधा
- गंभीर भाजणे
९. इतर महत्त्वाच्या अवस्था
- Sepsis आणि सेप्टिक शॉक
- बहुअवयव निकामी होणे (Multi-organ Failure)
- मोठे अपघात (Polytrauma)
- मोठ्या शस्त्रक्रियेनंतरची देखरेख
- COVID-19 सारखे गंभीर संसर्ग