
काही मुलांना तापाबरोबर झटके येतात, डोळे फिरवणे, मुठी आवळणे,आकडी येणे अशी लक्षणे दिसतात’. याला घाबरून जाऊ नका.
मुलाला ताबडतोब कोमट पाण्याने पुसून ताप उतरवल्यास झटके थांबतात. तसेच मुलास काही इजा होणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी ठेवा, त्याच्या तोंडात चमचा किंवा कापडाचा बोळा ठेवा, म्हणजे त्याची जीभ दातात चावली जाणार नाही. त्याचे कपडे काढून त्यास मोकळे करा, शुद्धीवर आल्यावर परसिटमोल (गोळी किंवा औषधही) द्यावे. मात्र तापाचे कारण काय आहे, हे निश्चित करून उपचार करणे आवश्यक आहे.
ताप (लहान मुलांसाठी) (तक्ता (Table) पहा)
तापाचे झटके येण्याचा वयोगट हा सामान्यतःसहा महिने ते पाच वर्षापर्यंत असतो. या पलीकडील वयातील बाळाला ताप व झटका दिसल्यास इतर कारणांचा विचार करावा लागतो.
साध्या तापातील झटका : वैशिष्ट्ये
बाळाला तापात झटका येतो असे लक्षात आले, तर तापाचे औषध नेहेमी घरात ठेवावे. तसेच आजकाल एक नाकात मारण्याचा एक औषधी स्प्रे मिळतो, तोदेखील घरात ठेवावा, जेणेकरून झटका आल्याबरोबर घरातच तो थांबवू शकता आणि गंभीर धोका टाळता येतो.
अशावेळी बाळाला लगेच हॉस्पिटल मध्ये घेऊन जावे.
जुलाब-हगवण-अतिसार हा मुलांचा नंबर एकचा शत्रू आहे. लहान मुलांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये जुलाब-अतिसार या आजारांचे सगळयात वर नाव येते. जुलाब-अतिसारांमुळे मृत्यू होतातच, पण वाचलेल्या मुलांच्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. (कुपोषण, वाढ खुंटणे, इ.)
सर्वसाधारणपणे चांगले पोषण आणि स्वच्छ पाणीपुरवठा या दोन गोष्टींमुळे समाजातले जुलाब-अतिसाराचे प्रमाण खूपच कमी होईल. तसे गेल्या दशकभरात दिसून आले आहे.
अतिसाराच्या आजारांमध्ये योग्य उपाययोजना केली तर कुपोषणासारखे परिणाम आणि मृत्यू मोठया प्रमाणावर टाळता येतील. जुलाब, अतिसार पूर्ण टाळता नाही आले तरी त्यामुळे होणारा शोष टाळता येतो हे निश्चित. कुपोषणही अटळ नाही. अतिसाराची कारणे नीट समजावून घेऊन योग्य उपाययोजना गावपातळीवरही करता येते. गेल्या काही वर्षात यामुळे या आजाराने फार मृत्यू होत नाहीत.
जुलाब, अतिसाराची कारणे दोन प्रकारची असतात. एक प्रकार म्हणजे निरनिराळया जंतूंमुळे होणारे जुलाब व अतिसार. जीव-जंतुदोषांमुळे होणा-या जुलाबांमध्ये जिवाणू, विषाणू, अमीबा, जिआर्डिया हे सूक्ष्म जीव येतात. जंतांमुळे पण कधीकधी जुलाब होतात, पण जंत हे सूक्ष्मजंतू या प्रकारात येत नाहीत.
दुसरा गट म्हणजे जंतुदोषाशिवाय इतर कारणांचा गट. जंतुदोषाशिवाय इतर कारणेही असतात हे समजून घेणे आवश्यक आहे. जुलाब म्हणजे जंतुदोष असेलच असे नाही.
जुलाबाच्या या इतर कारणांमध्ये वावडे, दात येताना होणारे जुलाब, शरीरात इतर ठिकाणी असणा-या आजारांमुळे पचनसंस्थेवर होणारे परिणाम (उदा. श्वसनसंस्थेच्या जंतुदोषामुळे होणारे जुलाब), अपचन, विषबाधा, इत्यादी येतात. मुलांच्या इतर संस्थांच्या निरनिराळया आजारांत (उदा. मलेरिया, न्यूमोनिया) कधीकधी जुलाब होतात, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. मुलांना दात येताना होणारे जुलाब नेमके कशामुळे होतात हे नीट कळलेले नाही. काही औषधांमुळे सुद्धा जुलाब होतात. उदाहरणार्थ जंतू विरोधी औषधे (म्हणजेच अँटिबायोटिक्स ). अँटिबायोटिक्सच्या वापरामुळे आतड्यातले उपयुक्त जंतूही मरतात आणि त्यामुळे पचनशक्ती बिघडून जुलाब होऊ शकतात. म्हणून गरज नसताना अँटिबायोटिक्स वापरू नयेत.
सर्वसाधारणपणे ‘इतर’ कारणांमुळे होणारे जुलाब आपोआप आणि लवकर थांबतात. त्यासाठी वेगळे काही करण्याचे बहुधा कारण नसते. विषाणु-अतिसारही आपोआप थांबतो, पण यासाठी तीन ते पाच दिवस लागू शकतात.
जिवाणूंमुळे हगवण-अतिसार असेल तर जंतुविरोधी औषधे द्यावी लागतात. काही वेळा जिवाणू-हगवणही आपोआप बंद होते. ‘शिगेला’ या जिवाणूंमुळे हगवण झाल्यास रक्तही पडते. अशा वेळेस मात्र जंतुविरोधी औषध द्यावे लागते. जिवाणू हगवण आणि जंतांमुळे होणारी हगवण विशिष्ट औषधांनी एक-दोन दिवसांतच थांबते. पण म्हणून अतिसार होणा-या सरसकट सर्व मुलांना जंतुविरोधी औषधे देणे योग्य नाही. एकूण अतिसारांपैकी सुमारे पन्नास टक्के अतिसार विषाणूंमुळे होतात. विषाणूंवर कोठलेही विशिष्ट औषध चालत नाही.
अतिसार-जुलाब हे शब्द इथे एकाच अर्थाने वापरले आहेत. हगवण हा शब्दही अशाच अर्थाने वापरला जातो. या आजारांमध्ये ब-याच वेळा उलटया होतात.
या सर्व आजारांमध्ये पचनसंस्थेतले द्रवपदार्थ शोषले न जाता , उलट पचनसंस्थेत वाजवीपेक्षा अधिक स्त्राव पाझरून ते तोंडावाटे (उलटी) किंवा जुलाबावाटे बाहेर पडतात.
जंतुदोषांपैकी काही जिवाणू आतडयाच्या अंतर्भागातील आवरणावर हल्ला चढवतात यामुळे आवरणाचा दाह होतो. दाहामुळे आतील आवरणावर जखमा होतात किंवा ठिकठिकाणी आवरण गळून पडते आणि रक्तस्राव होतो. यामुळेच हगवणीत रक्त दिसते. . कधी कधी तापही येतो . शेंब पडते ती आवरण सुजून त्यातून चिकट स्त्राव बाहेर पडल्यामुळे. अतिसारामुळे बाळाची पचनशक्ती आणि भूक कमी होते. यामुळे कुपोषणाला चालना मिळते.
हगवणीच्या रोगप्रक्रियेतला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शोष. शरीरातून जुलाब-उलटयांद्वारे पाणी आणि क्षार बाहेर जाऊन शरीरात कोरडेपणा व शोष निर्माण होतो . असंख्य लहान मुले या कारणानेच दगावतात. शोष पडल्याने शरीरातील पेशी कोरडया पडतात. शोष पडल्याने रक्ताभिसरण मंदावते कारण रक्तातील पाणी कमी होऊन रक्ताचा पातळपणा कमी होतो. रक्तातील पाणी कमी झाल्याने शरीरातील अनेक संस्थांच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतो. यामुळे रक्ताभिसरणसंस्थेत फिरवण्यासाठी आवश्यक असलेले रक्ताचे माप कमी पडते. आहे तेवढया रक्ताने कामकाज चालवण्यासाठी हृदय वेगाने काम करते. यामुळे नाडी वेगाने चालते. पण फार वेळ अशी स्थिती राहिल्यास प्रमाणाबाहेर शोष पडून मेंदूला रक्तपुरवठा पुरेनासा होतो. यामुळे बेशुध्दी व त्यानंतर मृत्यू येतो.
मूत्रपिंडातून मूत्र तयार होण्याचे काम मंदावते व कालांतराने बंद पडते. यामुळे मूत्रपिंडे बिघडू शकतात.
अतिसाराच्या तक्त्यात मुख्य प्रकार नमूद केले आहेत. रोगनिदान होणे फार महत्त्वाचे आहे. सरसकट काहीतरी उपचार करणे बरोबर नाही.
जीवनजलाचे महत्त्च समजण्याच्या पूर्वी अतिसाराच्या आजारात असंख्य मुले दगावत असत. डॉक्टर उपलब्ध असल्यास शिरेतून सलाईन (मिठाचे निर्जंतुक पाणी) द्यावे लागत असे. जीवनजलाचा वापर व्यापक प्रमाणावर व्हायला लागल्यापासून असंख्य मृत्यू टळलेले आहेत. जीवनजल म्हणजे शरीरातून बाहेर पडणा-या द्रवपदार्थाची भरपाई करण्यासाठी तोंडाने दिलेले सलाईन होय.
लोकपरंपरेनुसार शहाळयाचे पाणी, भाताची पेज, इत्यादी गोष्टी दिल्या जातात. शहाळयाचे पाणी (असेल तर), लिंबूसरबत, ताक, भाताची पेज (मीठ घातलेली), पातळ पाणीदार चहा-कॉफी ही सर्व पेये या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत.
जीवनजलाचा जास्त अभ्यास झाल्यानंतर त्याचे घटक व परस्परप्रमाण ठरलेले आहेत
बालकांसाठी कमी ऑस्मोलॅरिटीचे ओआरएस (Low Osmolar ORS) – संरचना
अतिसारामुळे होणाऱ्या निर्जलीकरणाच्या उपचारासाठी WHO आणि UNICEF यांनी कमी ऑस्मोलॅरिटीचे ओआरएस (Low Osmolar ORS) सुचवले आहे. हे जुन्या ओआरएसपेक्षा अधिक परिणामकारक असून यामुळे शौचाचे प्रमाण, उलट्या आणि सलाईनची गरज कमी होते.
१ लिटर स्वच्छ पाण्यातील संरचना
| घटक | प्रमाण (ग्रॅम/लिटर) | mmol/L |
| सोडियम क्लोराईड (NaCl) | 2.6 g | सोडियम – 75 |
| ग्लुकोज (अनहायड्रस) | 13.5 g | ग्लुकोज – 75 |
| पोटॅशियम क्लोराईड (KCl) | 1.5 g | पोटॅशियम – 20 |
| ट्रायसोडियम सिट्रेट डायहायड्रेट | 2.9 g | सिट्रेट – 10 |
कमी ऑस्मोलॅरिटीचे ओआरएस बालकांमधील आणि सर्व वयोगटातील अतिसारामुळे होणारे निर्जलीकरण उपचारासाठी वापरले जाते.