बालकांचे आरोग्य

बालकांचे आजार

या वर्गीकरणात लहान मुलांचे बहुतेक आजार तथा तक्रारींची नोंद केलेली आहे. याच प्रकरणात शेवटी लहान मुलांच्या आजारांच्या काही प्रमुख लक्षणांसंबंधी तक्ते व मार्गदर्शन दिले आहे (ताप, खोकला, उलटी, खूप रडणे, इ.). याशिवाय बहुतेक आजारांची चर्चा संबंधित शरीरसंस्थेच्या प्रकरणात केली आहे. शरीरसंस्थेच्या विभागणीत न बसणारे काही आजार या भागात दिले आहेत.

या वर्गीकरणावरून असे दिसते की मुलांमध्ये पचनसंथा, श्वसनसंस्था व त्वचा यासंबंधीचे आजार व तक्रारी जास्तीत जास्त आढळतात. त्यातही जंतुदोष, जंत, इत्यादी कारणांमुळे होणारे आणि संसर्गजन्य आजार जास्त आढळतात. मोठया माणसांपेक्षा मुलांमध्ये आजारांचे प्रमाण तसे जास्त असते आणि मृत्यूचे प्रमाणही जास्त आढळते. आपल्या देशात लहान मुलांच्या आजारांमध्ये अतिसार आणि न्यूमोनिया गटांचे आजार सर्वात जास्त प्रमाणात आढळून येतात. या दोन्हीही आजारांवर योग्य वेळेत उपचार केल्यास परिणामकारक उपाययोजना होऊ शकते. बऱ्याच आजारांना लशीकरण करून प्रतिबंध करता येतो. यामुळे बालमृत्यूचे प्रमाण घटू शकेल.

लहान मुलांमध्ये नेहमी आढळणारे शरीरातील विविध संस्थांचे आजार 
पचनसंस्थादात येण्यासंबंधी त्रास, तोंड येणे, उलटया, हगवण, अतिसार, पोटात कळ, कावीळ, जंत, विषमज्वर, माती खाणे, मळाचे खडे होणे, विषबाधा (रॉकेल, इ.)
नाक- कान -घसा-श्वसनसंस्थासर्दी, ऍडेनोग्रंथी वाढ, टॉन्सिल्स-सूज, घसासूज, सायनससूज, श्वासनलिकादाह, न्यूमोनिया, क्षय, जंत-खोकला, बाळदमा, इत्यादी.
त्वचागळवे, दूषित जखमा, इसब, उवा, खरूज, गजकर्ण, नाळेत पू होणे, बेंबीतील हर्निया, इ.
डोळाअपघाती इजा, डोळे येणे, जन्मजात मोतीबिंदू, बुबुळावर व्रण किंवा जखम, रातांधळेपणा, दीर्घदृष्टी, तिरळेपणा, रांजणवाडी, लासरू(? लासूर), इ.
कानबाह्यकर्णदाह, बुरशी, कानात मळ गच्च बसणे, अंतर्कर्णदाह, कान फुटणे, बहिरेपणा.
मेंदू व मज्जासंस्थामेंदूआवरणदाह, मेंदूसूज, मेंदूज्वर, धनुर्वात, पोलिओ, मेंदूजलविकार, फेफरे, मतिमंदत्व, इ.
इतरगोवर, कांजिण्या, जर्मन गोवर, गालगुंड, कुपोषणाचा प्रकार, अपुरे दिवस, अपुरे वजन.
हृदय रक्ताभिसरण संस्थाकाही जन्मत: असलेले हृदयातील दोष उदा. हृदयाच्या पडद्यात छिद्र (VSD/ ASD इ.)झडपांचे आजार, सांधेकाळीज ताप, इत्यादी.
अस्थिसंस्थाफ्रॅक्चर, लहान मुलांचा संधीवात, पाऊल सदोष असणे, इतर हाडांची-सांध्यांची रचना सदोष असणे, मुडदूस, हाडसूज, इ.
स्नायुसंस्थाकुपोषणामुळे अशक्तता, कमी वाढ असणे, स्नायू निकामी होणे, इ.
रक्तसंस्थासदोष तांबडया पेशी, रक्तपांढरी, हिवताप, रक्ताचे कर्करोग, जंतुदोष, रक्तस्रावाची प्रवृत्ती, इ.
रससंस्थाहत्त्तीरोग, कर्करोग, गंडमाळा, इ.
संप्रेरक संस्थास्थूलता, बुटकेपणा,गलग्रंथी दोष, मधुमेह, इ.
मूत्रसंस्थाजन्मजात दोष, मूत्रपिंडदाह, मूत्राशयदाह, मूत्रनलिकादाह, लघवी अडकणे, मुतखडे, इ.
पुरुषजननसंस्थापुरूष बीजांडे वृषणात न उतरणे, बीजांडांची अपुरी वाढ, हर्निया, इ.
स्त्रीजननसंस्थाबीजांडांची अपुरी वाढ.
बाळकांचे अपघातजखमा, भाजणे, साप-विंचू चावणे, बुडणे, शॉक, कानात, नाकात खडा किंवा बी जाणे.

बाल-रोगांचे एकात्मिक आजार व्यवस्थापन

दोन ते पाच वर्षे वयोगटातील बालकांच्या महत्त्वाच्या आजारांचे एकात्मिक व्यवस्थापन : आरोग्य कार्यकर्त्यांसाठी आणि आरोग्यवर्धिनी केंद्रांसाठी यात प्रथम आई-वडिलांना आणि नातेवाईकांना माहिती विचारून घेणे आणि बालकाची प्राथमिक तपासणी करणे आणि आवश्यक तर तज्ञाकडे पाठवणे आणि त्याची गरज नसल्यास उपचार करणे ही मूलभूत कार्यपद्धती ठरलेली आहे .

(१) प्रथम माहिती घेऊन किंवा तपासणीतून या बालकास पुढीलपैकी काही गंभीर धोकादायक लक्षणे व चिन्हे दिसल्यास योग्य तो प्रथमोपचार करून तत्काळ रुग्णालयात पाठवणी करा: धोकादायक लक्षणे व चिन्हे : झटके -आकडी, बेशुद्धी, बालक निपचित पडणे, खूप शोष , सतत उलट्या, खाणे पिणे बंद होणे. 

(२) वरील धोकादायक चिन्हे लक्षणे नसल्यास पुढील पाच आजारांसाठी विचारून- तपासून गंभीर आजार वाटल्यास पुढे पाठवणे करा.गंभीर नसल्यास उपचार करा. यासाठी या पाचही आजारांची स्वतंत्र चौकट पहा : 1 जास्त ताप, 2 खोकला /दम/ धाप, 3 , गेल्या 24 तासात  तीन पेक्षा अधिक जुलाब, 4.मध्यकर्ण सूज, 5.कुपोषण. 

या पाच आजारांपैकी प्रत्येक चौकटीत दिलेल्या गंभीर खाणाखुणा असल्यास पुढे पाठवणे करा. 

1. जास्त ताप 2. दम धाप खोकला 3. अतिसार/जुलाब 4. मध्यकर्ण सूज5.  कुपोषण
सात दिवसापेक्षा अधिक ताप .किट वापरून ? मध्ये त्याचे निदान. मान ताठरणे, पुरळ, दम आणि धाप लागणे, डेंग्यू आजाराची शंका असल्यास आवळ पट्टी लावून एका इंचास 20 पेक्षा अधिक ठिपके दिसणे.श्वसन दर 50( दोन महिने ते बारा महिने वय ) किंवा 40 पेक्षा जास्त( एक वर्ष ते पाच वर्ष वय ) असल्यास, चेहरा ओठ निळसर होणे, खालच्या बरगड्या श्वास घेताना आत खेचला जाणे, कण्हणे, खाणे पिणे बंद होणे, बाळ सुस्त पडणे.पोटावरची त्वचा चिमटीत धरून सोडल्यास खूप सावकाश पूर्ववत होणे म्हणजेच जास्त शोष, डोळे खोल जाणे, हगवणीतून शेंब-रक्त जाणे.बालक रडते आणि दुखऱ्या काना जवळ हात नेते. कानाच्या मागे हाडावर दुखरी सूज असल्यास पाठवणे करा, नसल्यास उपचार करा. बालकाच्या दोन्ही पायावर सूज असेल किंवा बालकाच्या हाताचा तळवा पांढुरका असेल, दंडघेर 11.5 सेंमि पेक्षा कमी असेल आणि वजन तक्त्याप्रमाणे कुपोषित पट्ट्यात पडत असेल तर पाठवणी करा. मध्यम कुपोषण असेल तर उपचार करा.
यापैकी काही नसल्यास पुढील उपचार करा
तापासाठी कोमट पाण्याने पुसून घेऊन आजाराप्रमाणे उपचार करावेत . पॅरासिटामोल औषध l हे ताप उतरवण्यासाठी वापरावे मलेरियासाठी क्लोरोक़्विन औषध आणि इतर संसर्गासाठी अमोक्सीसिलीन 5 दिवस द्यावे.बाल निमोनिया असल्यास आणि गंभीर चिन्ह नसल्यास पाच दिवस अमोक्ससीलीन द्यावे आणि खोकल्याचे औषध द्यावे.अतिसार आणि सौम्य शोष असेल तर पहिल्या चार तासात शरीर वजनाप्रमाणे 75मिली/किलोग्रॅम जलसंजीवनी द्यावी. त्यानंतर परत तपासून उपचार करत राहावेत.मध्यकर्ण सूज यासाठी अमोक्सिसलीन पाच दिवस आणि पॅरासिटामोल औषध द्यावे  कुपोषणासाठी ऊर्जा आणि प्रथिन युक्त पदार्थ द्यावेत. अमिलेज/प्रथिन युक्त आहार द्यावा, ॲनिमिया म्हणजे रक्तपांढरी असेल तर लोह व फॉलिक ऍसिड चे औषध सुरू करावे . जन्तासाठीही औषध द्यावे.
वरील एक ते पाच ? या कोणत्याही आजारामध्ये उपचार सुरू करून घरी जाऊ द्यावे आणि आई-वडील यांना धोक्याची चिन्हे लक्षणे समजावून सांगावेत त्यापैकी काही दिसल्यास त्वरित परत यायला सांगणे आवश्यक आहे अन्यथा 48 तासात परत दाखवायला यावे लागेल असे सांगावे किंवा आपण तिथेजाऊन भेट घ्यावी.

वरीलपैकी कोणत्याही आजार असला तरी बाळाचे आहार, खाणे पिणे आणि लसीकरण याबद्दल पुरेशी माहिती घेऊन अवश्य तिथे दुरुस्ती करायला हवी.