हृदय व रक्ताभिसरण संस्था

रक्ताभिसरण संस्थेचे आजार

प्रास्ताविक

हृदयविकाराचा झटका, अतिरक्तदाब, इत्यादी आजारांबद्दल आपण ऐकलेले आहे. भारतातही या आजारांचे प्रमाण वाढत आहे. युरोप, अमेरिका तसेच आपल्याकडच्या शहरी सुखवस्तू समाजात हृदयविकार हे मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. आता ग्रामीण भागातही अतिरक्तदाब व मधुमेह या आजारांचे प्रमाण वाढत आहे.

या सर्व आजारांना प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहे. पण त्यांची पाळेमुळे समाजजीवनात, राहणीमानात आहेत. शरीरश्रमाची कामे, नियमित व्यायाम व साधा आहार या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अशी जीवनपध्दती स्वीकारली तर या आजारांचे प्रमाण कमी होईल. आरोग्यशिक्षण करणे व आजार लवकरात लवकर शोधणे हे महत्त्वाचे काम आहे. सांधेहृदयताप, अतिरक्तदाब व हृदयविकार या तीन्ही आजारांचे लवकर निदान आणि उपचार होणे आवश्यक आहे. यासाठी आता आरोग्य केंद्रे प्रयत्न करीत असतात.

हृदय व रक्ताभिसरण संस्था: कार्य

आपले शरीर अब्जावधी लहान-मोठया पेशींनी बनलेले आहे. या पेशींना काम करण्यासाठी निरनिराळे पदार्थ लागतात. उदा. साखर, पाणी, प्रथिन-घटक, प्राणवायू, जीवनसत्त्वे वगैरे. हे पदार्थ प्रत्येक पेशीपर्यंत पोचवून तिथले टाकाऊ पदार्थ गोळा करुन आणणे हे एक मोठे काम आहे. हे काम रक्ताभिसरण संस्था करते. रक्ताभिसरण म्हणजे शरीरात सर्वत्र रक्ताचे सतत चलनवलन करणे.

रक्ताभिसरणातील प्रमुख काम हृदय करते. आपले हृदय दर मिनिटाला सुमारे 60 ते 80 वेळा आकुंचन-प्रसरण पावून रक्त ढकलते. प्रत्येक आकुंचनाने रक्त ढकलले जाते आणि ते नाडीवर बोट ठेवल्यास कळू शकते. माणूस धावत आला असेल, घाबरला असेल तर ही क्रिया जोरात होते. यामुळे छातीत धडधड जाणवू शकते. हृदय दोन-तीन मिनिटे जरी बंद पडले तरी मृत्यू ओढवतो. दिवसभर हृदय हे  पंपासारखे काम करून एखादा टँकर भरेल इतक्या रक्ताचे ने-आण करतो याची आपल्याला कल्पना नसते.

हे रक्तवाहिन्यांचे जाळे (एखाद्या झाडाच्या फांद्यांप्रमाणे) सर्वत्र पसरलेले असते. शेवटी शेवटी अत्यंत सूक्ष्म केशवाहिन्यांतून हे रक्त पेशीसमूहांना पोचवले जाते. पेशींजवळ गेल्यावर पेशी रक्तातील आवश्यक घटक (प्राणवायू, साखर, प्रथिन घटक, क्षार) घेतात. तसेच पेशींमधले टाकाऊ पदार्थ (कार्बवायू) वगैरे) या केशवाहिन्यांत जातात. अशा रीतीने पेशीपर्यंत शुध्द रक्त जाऊन तेथे ते अशुध्द होते.

हे रक्त परत महा-नीलेतुन हृदयाच्या वरच्या उजव्या कप्प्यात आणले जाते. तिथून ते खालच्या उजव्या कप्प्यात जाते. तिथून पुढे ते फुप्फुसाच्या जाळयात ढकलले जाते. फुप्फुसाच्या जाळयात श्वासावाटे आलेला प्राणवायू रक्तात शिरतो. तसेच रक्तातला काही अतिरिक्त कार्बवायू श्वासावाटे बाहेर पडतो. हे शुध्द झालेले रक्त नीलांमार्फत परत वरच्या डाव्या कप्प्यात आणले जाते. असे एक चक्र पूर्ण होते. अशी क्रिया सेकंदासेकंदाला आयुष्यभर सतत चालू राहते.

खालच्या डाव्या कप्प्यातून सर्व शरीरात रक्त पोचवायचे असल्याने त्या कप्प्यात आकुंचनाचा जोर व दाब सर्वात जास्त असतो. या दाबामुळे अगदी बारीक जाळयांपर्यत रक्त ढकलले जाते. एखाद्या शुध्दरक्तवाहिनीला जखम होते तेव्हा रक्ताच्या चिळकांडया या दाबामुळेच उडतात. याउलट नीला कापली गेली तर रक्त हळूहळू वाहते; त्यातून चिळकांडया उडत नाहीत.

हृदय

छातीच्या मध्यरेषेच्या डाव्या बाजूला हृदय असते. हृदय छातीच्या पिंज-याच्या फासळयांना लागूनच आत असते. जर शरीरावर चरबी फार नसेल तर त्याची हालचाल डोळयांना दिसते. चरबी फार असेल तर मात्र ही हालचाल वरून दिसत नाही. ( हृदयात दोष उत्पन्न होऊन ते रक्त ढकलण्याचा जास्त प्रयत्न करू लागते तेव्हा ती हालचाल वर दिसते) ?. ही हालचाल नाडीच्या प्रत्येक ठोक्यासरशी दिसून येते. आपला हात हृदयावर ठेवूनसुध्दा ही हालचाल कळू शकते. तातडीच्या प्रथमोपचाराच्या वेळी हे तपासावे लागते.

आवाजनळी हृदयावर लावली तर नाडीच्या ठोक्यागणिक ‘लब – डप’ असा डबल आवाज ऐकू येतो. हृदयाच्या झडपांमध्ये दोष निर्माण झाला, की या आवाजाची पध्दत बदलते. यामुळे मध्येमध्ये ठोक्यागणिक ‘थरथर’ ऐकू येते. हृदयातल्या रक्ताच्या प्रवाहात उलटसुलट गती निर्माण झाल्यामुळे ही थरथर होते. आवाजनळी नसेल तर छातीला नुसता कान लावूनही लब- डप चा नेहमीचा आवाज किंवा थरथर ऐकू येते.

धमनी काठिन्य (रोहिण्या कडक होण्याचा आजार – Atherosclerosis)

आपल्या शरीरातील रोहिणी/धमनी म्हणजे शुद्ध रक्तवाहिन्या तरुणपणापासूनच कठीण व्हायला सुरुवात होते. पुढे पुढे या धमन्या अधिक कठीण होऊन रक्तपुरवठ्यात अडचणी व अडथळे येऊ शकतात. या विकाराला धमनीकाठीण्य किंवा इंग्रजीत Atherosclerosis असे म्हणतात. हे अडथळे मोठ्या मध्यम आणि लहान अशा सर्व रोहिण्यांमध्ये घडत जातात. हा विकार होण्यामागे अनुवंशिकता, मधुमेह, धुम्रपान, रक्तातील चरबीचे विशेषत: एल डी एल चे प्रमाण जास्त असणे,  आणि अर्थात वय वाढते वय हे मुख्य घटक असतात. या घटकांमुळे रोहिण्यांच्या आतल्या भागामध्ये दाह  व सूज निर्माण होऊन  तिथे हळूहळू कॅल्शियम म्हणजे चुना अडकायला लागतो, यामुळे धमनी कठीण होते. धमनी  कठीण व अरुंद झाल्याने तिथला रक्तप्रवाह कमी होतो आणि दुसरे म्हणजे ती फुटू शकते.  रक्तदाब वाढायला लागतो कारण प्रवाहल अडचण/विरोध होतो. ज्या अवयवातील  रोहिणी रक्तप्रवाह कमी होतो किंवा थांबतो तिथे त्याप्रमाणे दुष्परिणाम दिसतात.  यामुळे यामुळे मेंदू-घात म्हणजे पक्षाघात, हृदयविकार-झटका हे मुख्य आकस्मिक आजार संभवतात. तसेच  मूत्रपिंड कार्यक्षमता कमी होऊन मूत्रपिंडे बन्द पडत जातात.  स्नायूंना रक्तपुरवठा कमी होऊन अशक्तपणा किंवा थोड्या श्रम -कामाने किंवा व्यायामाने  दमणे असे दुष्परिणाम दिसतात. धमनिकाठिन्य विकारात स्वत: महा-रोहिणी मध्ये फुगा येणे आणि ते फुटणे असा घातक अपघात होऊ शकतो.  एकूण धमनी-काठिन्य हा सर्वत्र दुष्परिणाम करणार आजार आहे, आणि तो आतल्या आत वाढत जातो.

या आजाराचे निदान करणे काही प्रमाणात हाताने तपासून होऊ शकते, उदाहरणार्थ गळ्यातील दोन्ही धमन्या तपासल्यावर एखाद्यात रक्तप्रवाह म्हणजे नाडी कमी दाबाची  लागू शकते. परंतु निश्चित निदानासाठी इमेजिंग तंत्रज्ञान वापरावे लागते. यासाठी अवयवाप्रमाणे सोनोग्राफी,  सिटी अंजिओ, एमआरआय, अँजिओग्राफी इत्यादी विविध तंत्र उपलब्ध आहेत.  आवश्यक असेल तर ब्लॉक म्हणजे अडथळा  काढण्यासाठी  बलून अँजिओप्लास्टी करता येते. 

 धमनी काठिण्यविकार टाळण्यासाठी काही जीवनशैली सुधारणा आवश्यक आहेत. नियमित एरोबिक, व्यायाम रक्तातील चरबीचे प्रमाण म्हणजे लिपीडचे प्रमाण कमी राखणे आणि  त्यासाठी आवश्यक तर औषधे घेणे, धूम्रपान टाळणे या काही महत्त्वाच्या बाबी आहेत.  मधुमेह एक महत्त्वाचे कारण असल्यामुळे मधुमेह टाळणे किंवा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे म्हणजे एचबिए1सी 7.00  ग्रॅम पेक्षा कमी ठेवणे हे आवश्यक आहे.