पचनसंस्थेचे आजार

अपेंडिक्सदाह-सूज : तातडीक उपचाराची गरज

मोठया आतडयाच्या सुरुवातीस पोटाच्या उजव्या बाजूस अपेंडिक्स (आंत्रपुच्छ) नावाचा करंगळीएवढा अवयव असतो. याची आतली पोकळी आतडयात उघडते. हा एक निरुपयोगी अवयव समजला जातो. तिथे कधीकधी दाह होतो व सूज येते. यालाच ‘अपेंडिक्सदाह’ म्हणतात.

कधी त्यात काही अन्नपदार्थ अडकणे, सूज येणे यामुळे हा आजार उद्भवतो. जंतुदोष झाल्याने त्यात पू, आजूबाजूच्या आवरणाला सूज, इत्यादी दुष्परिणाम होतात. ऍपेंडिक्स फुटून पू पसरला तर पोटसूज होऊ शकते आणि यावर  तातडीक शस्त्रक्रियेची गरज आहे.

निदान

पोटात 7 व्या भागात म्हणजे खालच्या उजव्या कोपऱ्यात अचानक खूप दुखणे, दाबल्यास अधिक असह्य दुखणे, उलट्या हे निदान सूचक आहे. ताप येऊ शकतो. कधी कधी ऍपेंडिक्सच्या भागात सूज, गोळा येतो. दुखायला लागल्यावर सहसा मालविसर्जन होत नाही. सोनोग्राफीत चित्र स्पष्ट होऊ शकते, पण काही वेळा यातून निदान होत नाही.

ऍपेंडिक्सदाह हा गंभीर आजार आहे. यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. काही वेळा जंतुविरोधी औषधे, तोंडाने काही न घेता, शिरेद्वारा सलाईन पुरवून ऍपेंडिक्सदाह आटोक्यात येऊ शकतो. पण असे उपचार रुग्णालयात होणे आवश्यक आहे. ऍपेंडिक्स काढून टाकले तरी बिघडत नाही म्हणून काही वेळा नाहक शस्त्रक्रियेचे प्रकारही  होत असतात.

सोनोग्राफीने ऍपेंडिक्सचे निदान करायला मदत होते. एंडोस्कोपी तंत्राने निदान आणि शस्त्रक्रिया दोन्ही सोपे झाले आहे.

पोट व पचनसंस्था यांची तपासणी

पचनसंस्थेची तपासणी म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंतची तपासणी. पचनसंस्था, यकृत, पांथरी यांचे चित्र पाहिल्यावर पोटाच्या आत कोठेकोठे काय असते याची कल्पना येते. यासाठी पोटाचा ‘नकाशा’ उपयोगी पडेल. यात नऊ भाग असतात. प्रत्येक भागात वेगवेगळे अवयव असतात.

निरीक्षण

पोट नुसते पाहून ब-याच गोष्टी लक्षात येतील.

  • पोटावर सूज, फुगार असेल तर पोटाच्या आतल्या आवरणात पाणी साठले असण्याची शक्यता आहे.
  • शिरा फुगलेल्या दिसत असल्या तर आतल्या रक्तप्रवाहात अडथळा आलेला असेल.
  • पोटावर कोठे फुगवटा असेल तर आत एखादी गाठ असू शकते.

चाचपणी

पोट हाताने चाचपून तपासतात. मुख्यत: आत गाठ गोळा वगैरे लागतो काय व यकृत, पांथरी हे प्रमाणापेक्षा मोठे झाले आहेत काय आणि दुखरेपणा आहे काय हे शोधण्यासाठी ही तपासणी असते.

उजव्या बरगडीखाली यकृत व डाव्या बरगडीखाली पांथरी असते. यकृत व पांथरी वाढून मोठी झाली आहे का हे तपासण्याची विशिष्ट पध्दत आहे. काही वेळा यकृतावर दुखरेपणा असतो (उदा. कावीळ झाली असताना).

मात्र हाताने चाचपून पोटात जंत आहेत किंवा नाहीत ते सांगणे अशक्य आहे.

आवाजनळीने तपासणी

वाजनळीने पोटावर जागोजाग तपासले असता ब-याच प्रकारचे आवाज ऐकू येतात. जठरावर आवाजनळी लावली तरी भुकेची गुरगुर, हवेचे बुडबुडे, अन्नाची घुसळण वगैरे ऐकू येतील. आवाजनळी आतडयावर आली असेल तर हवेचे मागेपुढे जाणे, पातळ अन्नाचे थेंबथेंब टपकणे, अन्नरस पुढे ढकलण्याचा आवाज ऐकू येतील. गॅस किंवा वायू साठून आतडे फुगले असेल तर हवेचा व त्या पोकळीत थेंबथेंब पडल्याचा आवाज ऐकू येईल. आतडयाचा रस्ता काही कारणाने बंद झाला असेल तर मात्र हे आवाज हळूहळू मंदावतात व शेवटी बंद पडतात. फक्त मधूनमधून अन्न किंवा रस थेंबथेंब टपकण्याचा आवाजच शिल्लक राहतो.

म्हणूनच पोटाच्या ऑपरेशननंतर आवाजनळीने आतडयाची क्रिया चालू झाली ना हे वारंवार तपासतात. ब-याच वेळा पोटाच्या ऑपरेशननंतर किंवा भुलीनंतर आतडयाची हालचाल चार-पाच तास मंदावते किंवा बंद पडते. हालचाल बंद पडणे व परत चालू होणे दोन्हीही आवाजनळीच्या मदतीने कळते.

गुदाशय तपासणी

गुदाशय तपासल्याखेरीज पचनसंस्थेची तपासणी पूर्ण होत नाही असा दंडक आहे.( प्रत्यक्षात तो फारसा पाळला जात नाही.) गुदाशय तपासण्याचे मुख्य कारण म्हणजे गुदद्वाराचा कर्करोग आणि मूळव्याध होय. गुदाशयाची तपासणी दोन प्रकारे करतात. एक म्हणजे हाताच्या बोटावर रबरी मोजा चढवून त्याला तेलकट पदार्थ लावून गुदाशय आतून तपासले जाते.prostate ग्रंथीला आलेली सूज किंवा गाठ या तपासणीत समजते. बोटाला काही विचित्र गाठीसारखे आढळले तर उतारवयात कर्करोगाची शक्यता लक्षात घेतली पाहिजे.

तपासणीचा दुसरा प्रकार म्हणजे एक नळी तेलाने गुळगुळीत करून गुदाशयात सारतात. आत बॅटरीचा प्रकाश टाकून काही दोष आहे की काय हे पाहतात.(proctoscopy)

मूळव्याध अथवा मोड (पाईल्स) असल्यास ते डोळयाला दिसतात किंवा हाताला लागतात. काही वेळा बध्दकोष्ठतेमुळे गुदद्वाराच्या तोंडाशी छोटीशी जखम (गुदद्वारव्रण) झालेली असते व ती खूप दुखते.

उदराची सोनोग्राफी तपासणी

गेल्या दहा वर्षात सोनोग्राफी तपासणीची सोय सर्वत्र उपलब्ध आहे. ही तपासणी स्वस्त व निर्धोक आहे. पोटातील इंद्रियांना काही आजार आहे हे तपासण्यासाठी या तपासणीचा फार उपयोग होतो. या तपासणीत खालील दोष कळू शकतात.

  • जठर, पांथरी यांचा आकार, सूज
  • पोटातल्या कोणत्याही अवयवात खडे झाले असल्यास
  • कर्करोगाच्या गाठी
  • पाणी, पू जमा झाले असल्यास
  • आतडयांची मोठी सूज
  • मूत्रपिंडाचा आकार, सूज
  • मूत्राशयाचा आकार, प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ
  • गर्भाशय, गर्भ, स्त्रीबीजांडे, इ. ची स्थिती.
  •  ऍपेंडिक्स सूज हा आजारही  सोनोग्राफी तपासणीत बऱ्याचदा दिसून येतो..
नलिका दुर्बीण तपासणी
  • अन्ननलिका, जठर, मोठे आतडे या अवयवांची या तंत्राने (एंडोस्कोपी) आतून तपासणी करता येते.
  • पोटाला छोटे छिद्र पाडून उदरपोकळीतले अवयवही या तंत्राने तपासता येतात (लॅपरोस्कोपी).
  • आता सोनोग्राफीयुक्त स्कोपी देखील करता येते.
पचनसंस्थेच्या आजारांच्या विशेष तपासण्या

साध्या आजारासाठी या तपासण्या लागत नाहीत , मात्र लांबलेला दीर्घ आजार ,किंवा गंभीर आजाराची  शंका आल्यास गरज लागू शकते, आपले डॉक्टर याबद्दल वेळोवेळी सांगतीलच.  

  • मल-विश्लेषण-जंतु, जंत, रक्त आदि घटकासाठी   
  • क्ष-किरण चित्र
  • सोनोग्राफी
  • एंडोस्कोप वा लाप्रोस्कॉपी , म्हणजे दुर्बीण तपासणी-अन्ननलिका, जठर, मोठे आतडे यासाठी.  
  • कर्करोग-सूचक घटकांची पातळी तपासणी (उदा: प्रोस्टेट कर्करोगासाठी PSA तपासणी)
  • सीटी चित्रण
  • एमआराय (MRI)
  • पेट स्कॅन-मुख्यत: कर्करोगासाठी
रोगनिदान  मार्गदर्शक

उलटी मोठी मुले व माणसे मार्गदर्शक

जुलाब मार्गदर्शक

पोटात दुखणे मार्गदर्शक