मानसिक आरोग्य आणि मनोविकार

मनोविकार एक सामाजिक समस्या

मनोविकारांबद्दल भारतात आता कुठे जागृती होत आहे. शहरात आणि खेड्यात मनोविकारांचे प्रमाण सारखेच असते पण शहरात सोयी असल्याने सुधारणा व्हायची जास्त शक्यता असते. भारतात साधाणपणे २% प्रौढ व्यक्ती गंभीर मानसिक विकारांनी ग्रस्त असतात. याशिवाय ८% इतर लोकांना सामान्य मनोविकार असतात. पूर्वी ज्याला आपण वेड म्हणायचो तो आजार म्हणजे मुख्यत: सिझोफ्रेनिया म्हणजेच एक प्रकारचा गंभीर मानसिक आजार. पूर्वी कायद्यामुळे अशा व्यक्तींना मेंटल हॉस्पिटलमध्ये डांबले जायचे. तिथे त्यांचे बर्‍याच वेळा हालही होत असत. आता हा कायदा बदलला आहे. त्याबद्दल आपण नंतर शिकणारच आहोत. गंभीर आणि सामान्य मानसिक आजारांचे एकूण प्रमाण १०% असले तरी ते अजून काही वर्षात १५%पर्यंत वाढेल असा एक अंदाज आहे. परंतु तरीही या आजारांची लक्षणे, उपचार वगैरे गोष्टींबद्दल समाजात फार अज्ञान आहे. अशा मनोरुग्णांना लांब ठेवावे असाच एक गैरसमज पसरलेला आहे. भारत सरकार आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून मानसिक आजार शोधून उपचार करण्यासाठी योजना राबवणार होते. परंतु ही योजना कार्यान्वित झालेली नाही. काही मेडिकल कॉलेजेसमध्ये मात्र यासाठी तज्ज्ञसेवा उपलब्ध आहेत. खाजगी तज्ज्ञसेवा मुख्यत: शहरातच आहेत आणि त्या बर्‍याच कुटुंबांना परवडत नाहीत. आपल्याकडचे इतर डॉक्टर्स अशा रुग्णांना हातच लावत नाहीत असा अनुभव आहे, अपवाद काही प्रमाणात एका बाजूला आरोग्यसेवा पुरेशा नसणे आणि जागृतीचा अभाव यामुळे अजून बर्‍याच खेडोपाडी भगत आणि बुवांची चलती आहे. कधीकधी रुग्णांना अघोरी मारहाण झाल्याचे पण आपण ऐकतो, वाचतो. भुताळीण म्हणून काही मनोरुग्णांना गावकर्‍यांनी वाळीत टाकल्याचे किंवा मारहाण करण्याचेही प्रकार आपण ऐकतो. कितीतरी मनोरुग्ण घरातून हरवतात आणि दूर कुठेतरी रस्त्यावर भीक मागत असहायपणे जगतात.

भारतात सुमारे ६-७% लोकसंख्या मनोविकाराने पीडीत आहे. एकूण संख्या ६-७ कोटी अशी आहे. या सर्वांना औषधोपचार आणि समुपदेशनाची मदत उपलब्ध करणे हे केवळ डॉक्टरांच्या हातून होणे शक्य नाही.

या मनोविकारांपैकी सामान्य मनोविकार हे जास्त असतात पण मनोविकार म्हणून त्यांची ओळख नसते. वैयक्तिक गुणदोष म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते, त्यामुळे असे लोक उपचारपण घेत नाहीत. सामान्यत: उपचार न घेण्याचे हे प्रमाण ९०% आहे.

साधारणपणे गंभीर मनोविकार असलेल्या रुग्णांपैकी ५०% रुग्ण काही ना काही उपचार घेतात असे दिसते. उरलेले तसेच उपचाराविना राहतात. ही परिस्थिती आपल्याला सुधारायची आहे.

क्षेत्रकार्य 
सारांश 
तुम्हाला काय वाटते? 
माहिती 
करून पाहू