मानसिक आरोग्य आणि मनोविकार

पुनर्वसन

औषधोपचारांच्या बरोबरच रुग्णाचे मानसिक व सामाजिक पुनर्वसन करण्याचीही गरज असते. यासाठी समुपदेशकाची मदत घ्यावी. त्या व्यक्तीचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि व्यावसायिक कामकाज टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

त्या व्यक्तीसाठी मनोरंजनाचे काहीतरी मार्ग शोधले पाहिजेत. मनोरंजनाचे काही प्रकार त्या व्यक्तीशी जुळणारे असतील तर काही नाही. हे थोडे शोधावे लागेल. (भजन, वाचन, खेळ, बागकाम, शेतात काम वगैरे)

शारीरिक श्रम किंवा व्यायाम, खेळ याचा पुनर्वसनात निश्‍चित उपयोग होतो.

खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होऊ नये. शक्ती आणि आरोग्य टिकवण्यासाठी योग्य व पुरेसा आहार असला पाहिजे.

औषधोपचारांनी बहुतेक रुग्ण बरे होतात. मात्र या व्यक्तीने लग्न करावे की नाही, मुले होऊ द्यावीत का? वगैरे प्रश्‍न कुटुंब आणि डॉक्टर्स किंवा समुपदेशक यांनी ठरवायला पाहिजे. मात्र आजार बरा होईल या आशेने काही लोक लग्न लावून देतात हे काही बरोबर नाही, याने उलट दोन्ही व्यक्तींचे हाल होतात. मुख्य म्हणजे या आजाराची कल्पना न देता लग्न करणे योग्य नाही. काही मनोविकारग्रस्त व्यक्तींचे तशाच इतर व्यक्तीशी लग्न होते असे दिसते. अशा वेळी मुले न होऊ देणे श्रेयस्कर. कारण एक तर मुलांमध्ये आजाराची शक्यता असते आणि संगोपनासाठी परिस्थिती अनुकूल नसते त्यामुळे मुलावर तो अन्याय ठरेल. या व्यक्तीने स्वत:ची काळजी घेणे व इतरांवर कमीत कमी भार टाकणे एवढे मर्यादित उद्दिष्ट्य साध्य झाले तरी चांगले असते.

काही कुटुंबांना या आजाराबद्दल धार्मिक किंवा पारंपरिक इलाज, विधी इ. करावेसे वाटतात. हवे तर त्यांना हे करू द्या पण त्याबरोबर औषधोपचारांचा आग्रह धरा. त्यांच्या भावना दुखावणार नाहीत एवढी मात्र काळजी घ्या.

त्या त्या गावातल्या / वस्तीतल्या किंवा पंचक्रोशीतल्या असे काही रुग्ण व त्यांचे कुटुंबीय यांचा एक आधारगट केला तर जास्त सोपे जाते. यामुळे माणूस एकटे पडण्याची भावना राहणार नाही व एकमेकांपासून थोडा आधार मिळवता येईल.

मनोरुग्णांच्या बाबतीत स्थावर जंगम मालमत्तेच्या वारसाहक्काचा, वाटणीचा मुद्दा त्रासदायक ठरू शकतो. याबद्दल सामोपचाराने निर्णय घ्यायला पाहिजे. त्या व्यक्तीला भावा बहिणींची व इतर कुटुंबीयांची कायम मदत लागणार आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. पण तसेच त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची पण दक्षता घ्यायला पाहिजे.

कधीकधी या रुग्णांवर निरनिराळे अत्याचार घरात, शेजार्‍यांकडून किंवा वसतीगृहांमध्ये होऊ शकतात. लैंगिक छळ, व इतर मानवी हक्कांचे उल्लंघन होण्याची शक्यता असते. याबद्दल काही सूचना मिळाल्यास कुटुंबातील जबाबदार व्यक्तींशी आपण बोलले पाहिजे.

आरोग्य कार्यकर्त्यांची जबाबदारी

आपली मुख्य भूमिका ही रुग्ण बरा होण्याची असायला पाहिजे. जिथे दक्ष कार्यकर्ते आहेत तिथे अधिकाधिक रुग्ण बरे होतात हे नक्की आहे. खालील गोष्टी लक्षात ठेवा.

कुटुंबातल्या लोकांना आणि इतर जणांना या आजारांच्या खाणा-खुणा, औषधोपचारांच्या सोयी आणि इतर काळजी याबद्दल जागृत करा. हा आजार बरा होणारा आहे हे त्यांच्या मनात ठसवा.

या आजाराशी चिकटलले दूषण, कमीपणा वगैरे गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न करा. यासाठी अवतीभवतीच्या कुटुंबांमध्येही जागृती व्हायला पाहिजे. यामुळे आपोआप औषधोपचाराचे प्रमाण वाढेल व रुग्ण लवकर बरे होतील. मुख्य म्हणजे लोकांनी आजाराच्या खाणाखुणा दिसताच त्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला योग्य पद्धतीने सुचवले पाहिजे.

सरकारी जिल्हा रुग्णालयांमध्ये औषधोपचार आणि तज्ज्ञसेवा उपलब्ध असतात आणि या सेवा चांगल्या असतात. विनाकारण खाजगी डॉक्टरांची बिले वाढवून कुटुंबाचे आर्थिक नुकसान करू नका. तथापि हे आजार लांबलचक चालणारे असतात. त्यामुळे एकूण खर्च बराच होतो. म्हणूनच मोफत औषधोपचार सोडून खर्चिक उपचार करू नका.

काही सरकारी डॉक्टरांना रुग्णांच्या एकूण परिस्थितीची पुरेशी जाणीव नसते. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा अवास्तव असतात किंवा कुटुंबीयांना ते काहीवाही बोलतात देखील असा प्रकार लक्षात आला तर सौम्य शब्दात डॉक्टरांना याची कल्पना देऊन विनंती करावी. सरकारी डॉक्टरच्या अनस्थेमुळे काही लोक तिकडची पायरी चढायला तयार नसतात. ही परिस्थिती आपण बदलायला पाहिजे. त्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतील.

कुटुंबालादेखील आपण हा आजार कायमचा आहे आणि त्याची जबाबदारी कायमचीच होणार आहे याची नीट कल्पना द्यायला पाहिजे. नियमित औषधोपचारांनी रुग्ण सुधारतो पण गोळी चुकता कामा नये हे सांगायला पाहिजे. त्यांचा उत्साह आणि ऊर्जा वाढावी म्हणून अशाच इतर कुटुंबांशी त्यांची ओळख करून द्या. एकमेकांच्या मदतीने हळूहळू ते अधिक चांगले प्रयत्न करतील. बर्‍याच वेळा अशा भेटीगाठी हा एक महत्त्वाचा टप्पा होतो. त्यानंतर गोष्टी वेगाने सुधारू शकतात. हा केवळ माहितीचा प्रश्‍न नाही तर मनोभूमिकाच बदलण्याचा मुद्दा आहे.

कुटुंबीयांना इतर जबाबदार्‍यांची माहिती करून द्या. म्हणजेे इतर काळजी कशी घ्यायची, औषधांचे दुष्परिणाम, आजारातले धोके (उदा. आत्महत्या किंवा हल्याची शक्यता) स्वच्छतेबद्दल सूचना आणि युक्त्या सांगा. खाण्यापिण्याबद्दल काही सूचना इ.

त्या कुटुंबाला केवळ आजारी माणूस आणि आजार एवढीच काळजी नसते तर शिक्षण, लग्न, सामाजिक संबंध वगैरे अनेक गोष्टींची चिंता असते. कुटुंबाचा मित्र म्हणून तुम्ही या ही बाबतीत थोडीफार मदत त्यांना करू शकता. यामुळे आपलेही जीवन आणि जाणीव अधिक परिपूर्ण होत जाते.

काही रुग्णांना बरे व्हायला वेळ लागतो पण धीर धरा आणि कुटुंबीयांनाही धीर द्या.

उन्माद आणि अतिनैराश्याचे आजार

हे मनोवस्थेचे किंवा मूड बिघडण्याचे आजार असतात. उन्माद आणि अतिनैराश्य ही याची दोन टोके आहेत. काही रुग्णांमध्ये त्यातला एकच प्रकार दिसतो तर काही जणांमध्ये आलटून पालटून दोन्ही बिघाड दिसून येतात. प्रौढ लोकसंख्येच्या सुमारे १.५% प्रमाणात हे आजार आढळतात. या रुग्णांना आपल्याला आजार असल्याची गंधवार्ता नसते. त्यामुळे त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायला बरीच खटपट करावी लागते.

उन्माद

श्री. यादव वकील हे आत्ता तिशीच्या वयात आहेत. मागच्या आठवड्यात त्यांनी आपल्या अशिलाला चक्क धमकी दिली आणि मग मोठे भांडण उद्भवले. हल्ली हे वकील महाशय फारच भांडखोर आणि शिवीगाळ करणारे झाले आहेत. घरून कळते की ते आपल्या मुलांना मधून मधून मारहाण करतात आणि वडिलधार्‍यांचा अपमानपण करायला लागले आहेत. त्यांना आवरणे सोपे नसते. त्यामुळे हळूहळू त्यांचा व्यवसाय कमी होत चाललाय. त्यांच्या कुटुंबात पूर्वीपासून ही कल्पना आहे की आपला बाबा जरा गरम डोक्याचा, आक्रमक, बडबड्या आणि धसमुसळा आहे. पण हा आजार असेल असे कुणाला वाटले नाही. असे झटके त्यांना पूर्वीही आले होते पण त्याच्याकडे लोकांनी दुर्लक्ष केले. त्यांची बायको मात्र आता यामुळे हैराण झाली आहे. शेवटी त्यांच्या एका मित्राने त्यांना हळूहळू पटवून वैद्यकीय उपचारांसाठी तयार केले आहे. यादव वकिलांनाआता काहीतरी आजार आहे याची बारीक जाणीव झाली आहे. उपचाराचे थोडे बरे परिणामपण दिसताहेत.

उन्माद या आजारात माणूस अत्यंत अस्वस्थ, चिडचिडा होतो. त्याचा मूड नेहमी वर तरंगत असतो आणि एकूणच हालचालीमध्ये वेग आणि जोर असतो. अशी व्यक्ती स्वत:ला फार भारी समजते. असा झटका ३-४ महिन्यांपर्यंत टिकतो आणि मग पूर्ण बरा होतो  पण ते पुढील झटका येईपर्यंत. हा आजार काहीसा अनुवंशिक आहे; यात काही जैवरासायनिक दोष निश्‍चित असतात. अशा बर्‍याच व्यक्तींमध्ये लहानपणी मानसिक विकासात काहीतरी अडथळे पण आले असण्याची शक्यता असते. असा माणूस कुठल्याही गोष्टीला पटकन प्रतिवाद करतो. (अरे ला का रे) अशा व्यक्तीचे लक्ष चंचल असते मात्र तो/ती  यांचा मूड आनंदी किंवा अत्यानंद या पातळीवर असतो. बर्‍याच वेळा बोलण्यामध्ये फार जोर असतो आणि बोलताना थांबवणे अवघड जाते. स्वत:बद्दल भ्रामक मोठेपणाच्या कल्पना किंवा इतरांकडून धोका असल्याच्या खोट्या कल्पना दिसून येतात. पण ही व्यक्ती समाजात मिसळून वागते आणि कधीकधी काही धाडसी कृत्यपण करायला मागेपुढे पाहत नाही. भूक आणि झोप यांचे चक्र बिघडलेले असते. या लोकांना कधीकधी भडक कपडे घालावेसे वाटतात. पुरुषांना या काळात जास्त लैंगिक इच्छा जाणवते. मात्र खुद्द त्या व्यक्तीला या आजाराची काहीही जाणीव नसते, ती प्रयत्नांनी करून द्यावी लागते.

खालील काही खाणाखुणांवरून हा आजार ओळखता येईल.

  • बोलण्याचा वेग वाढलेला असणे.
  • अस्वस्थता
  • चिडचिडेपणा
  • बढाईखोरपणा किंवा भव्य दिव्य पण अवास्तव कल्पना.
  • काही लोकांमध्ये हा आजार थोडा सौम्य स्वरूपात येतो.

या आजाराला औषधोपचाराने उतार पडतो. लिथियम, कार्बामॅझेपाईन, सोडियम व्हॅलप्रोएट यापैकी औषधे वापरली जातात. कधीकधी इलेक्ट्रीक शॉक थेरपीचा उपाय करावा लागतो. तसेच समुपदेशन करून उपचार आणि एकूण वागणुकीत बदल घडवण्यासाठी सहकार्य मिळवावे लागते.

अतिनैराश्य

कल्पना बरीच वर्षे एक शांत खरे म्हणजे दु:खी म्हणून ओळखली जायची. लग्नानंतर तिला दोन मुलं झाली पण तिचे नैराश्य कमी होण्याऐवजी वाढत गेले. तिच्या नवर्‍याला तिच्या त्या दु:खीपणाचे नेमके कारण सांगताही येत नाही. सासरची सगळी मंडळी याबद्दल चिंतेतच असतात. मागच्या वर्षी कल्पनाची आई वारली आणि कल्पना इतकी दु:खी आणि निराश झाली की तिने खाणं पिणं देखील कमी करून टाकले. तिचे वजन खूप कमी झाल्यामुळे ती एकदम रोड झाली आहे. काय करावे हे कुणालाच कळत नाही. तीन महिन्यांपूर्वी तिची सासू घरात नसती तर कल्पनाने गळफास घेऊन आत्महत्याच केली असती. सासू घरी असल्याने सुदैवाने ती वाचली. पण कालच तिने परत एकदा किटकनाशकाची बाटली घेऊन आत्महत्येचा आणखी एक प्रयत्न केला. नवर्‍याच्या ओळखीच्या एका सरांनी कल्पनाची मन:स्थिती पाहून तिला मनोविकार तज्ज्ञाकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. पण कल्पना मात्र यायला तयार नव्हती पण कशीबशी ती तयार झाली. डॉक्टरांनी तिला तपासून उपचार सुरू केला आहे व दोन महिन्यात बरे वाटेल असे सांगितले आहे. फक्त गोळ्यांच्या उपचारावर आणि समुपदेशनानंतर कल्पना दोन महिने पुष्कळ सुधारते आहे. चेहरा आता जरा आनंदी दिसायला लागला आहे आणि घरातील छोटीमोठी कामेपण आता ती करायला लागली आहे. स्वत:ला बरे वाटल्यामुळे ती आता गोळ्या पण रोज घेते. गोळ्यांनी हा आजार बरा होऊ शकतो हे आधीच माहीत असते तर किती बरे झाले असते.

अतिनैराश्याचा आजार स्त्रियांमध्ये तोही तरुण वयात जास्त प्रमाणात आढळतो. एकाकी किंवा घटस्फोटीत व परितक्त्या स्त्रियांना या आजाराची शक्यता जास्त असते. या आजारात आत्महत्येचा धोकाही संभवतो. काही जैवरासायनिक आणि हार्मोनचे दोष या आजारास कारणीभूत असतात. एकाकीपणामुळे हा आजार वाढत जातो आणि आत्महत्येचा धोकाही वाढतो. काही जणांच्या बाबतीत बालपणीच्या वाढ-विकासामध्ये काही अडथळे किंवा त्रास हे ही एक या आजाराचे कारण असू शकते.

आजारनिदान
  • आजाराचे निदान करण्यासाठी खालीलपैकी निदान दोन तरी लक्षण चिन्हे असायला पाहिजे.
  • सतत दु:खी वाटणे, दैनंदिन कामकाजात रस नसणे/कमी होणे. तणाव, दु:ख किंवा चिंता दिसून येणे.
  • याशिवाय इतर काही लक्षण चिन्हेही असू शकतात.
  • झोपेत सतत व्यत्यय येणे.
  • पहाटे लवकर जाग येणे किंवा अवेळी उठणे.
  • थकवा
  • भूक जाणे.
  • कामावर किंवा शिक्षणावर लक्ष नसणे.
  • आत्महत्येचे विचार येणे.
  • छातीत धडधड, हाताला कंप, चक्कर येणे
  • शरीरात कोठेही किंवा सर्वत्र दुखणे किंवा वेदना.
  • बद्धकोष्ठ, लैंगिक इच्छा कमी होणे.
  • अतिनैराश्याचा हा झटका काही आठवडे टिकून ओसरतो पण परत येऊ शकतो. त्या व्यक्तीला अतिनैराश्याचा झटका येण्याची मनातूनच चाहूल लागू शकते.
  • अतिनैराश्याला आता परिणामकारक औषधे उपलब्ध आहेत, यासाठी औषधांच्या प्रकरणात जास्त माहिती दिली आहे. औषधाबरोबरच शॉकचे उपचार, प्रकाशकिरणांचे उपचार, चुंबकीय उपचार, व्हेगस चेतातंतू उत्तेजित करणे इ. उपायांचा उपयोग होऊ शकतो.
  • अर्थातच समुपदेशन, सामूहिक उपचार, कौटुंबिक उपचार, आणि वागणूक व्यवस्थापन या उपायांचाही उपयोग होऊ शकतो.
  • बायपोलर किंवा मूड खालीवर होणे.

बायपोलर म्हणजे उन्माद आणि अतिनैराश्य आलटून पालटून येत राहाणे. त्यामधला काळ ठीक जातो. साधारणपणे २०-३० या वयोगटात हा आजार सुरू होतो. त्याचे बरेच उपप्रकार आहेत आणि कारणेही अनेक प्रकारची आहेत. —अनुवंशिक, जैवरासायनिक, मनोविकासातील दोष, तणाव, निद्रानाश आणि थायरॉईड हार्मोनची कमतरता ही त्यातील महत्त्वाची कारणे आहेत. उन्मादाचा झटका ३-४ महिने टिकून राहू शकतो. पण अतिनैराश्याचा झटका यापेक्षाही अधिक काळ टिकू शकतो. यासाठी वापरली जाणारी औषधे म्हणजे लिथियम, कार्बामॅझेटीन तसेच मूड उत्तेजक

सामान्य किंवा साधे मनोविकार

यामध्ये न्यूरोजेस म्हणजे ताणतणावाने निर्माण होणारे काही आजार,मनविकारांचे शारीरिक अभिव्यक्ती इ. प्रकार येतात. या आजारांना सामान्यपणे औषधांपेक्षा मानसिक समुपदेशनच जास्त उपयोगी असते. अशा व्यक्तींना स्वत:च्या आजाराबद्दल जाणीव असते त्यामुळे उपचार घेण्यासाठी ते तयार असतात.

सामान्य मनोविकारांमध्ये अधीरेपणा अतिरेकी भीती आणि नादिष्टपणा हे प्रकार आहेत.

अधीरेपणा हा वास्तविक एक सामान्य मानवी पैलू आहे. अनिश्‍चित भवितव्य आणि परिणाम याबद्दल प्रत्येकाला एक उत्कंठा आणि चिंता असू शकते. मात्र या मनोविकारात ही चिंता व अधीरपणा अतिशय जास्त प्रमाणात असतो. या अधीरेपणाचे शारीरिक मानसिक परिणामही जाणवतात. हाताला कंप सुटणे, छातीत धडधड, तोतरेपणा, वेगाने श्‍वसन होणे, घाम सुटणे, चेहरा लाल होणे, गोंधळणे, पोटात किंवा छातीत गोळा येणे, घशात आवंढा येणे, लघवीची किंवा मलविसर्जनाची निकड वाटणे, स्नायूंचा तणाव आणि एकूण चंचलता या खाणाखुणा दिसतात.  या कारणांमुळे त्या व्यक्तीला त्रास तर होतोच पण प्रत्यक्ष प्रसंगात किंवा हातातले काम नीट पार पडत नाही. त्या व्यक्तीची क्षमता यामुळे कमी प्रमाणात वापरली जाते व अपयशही येऊ शकते. अपुर्‍या संवाद कौशल्यामुळे मित्र व नातेवाईक कमी होतात आणि एकूणच सामाजिक आधार कमी होतो.

अतिभीती किंवा फोबिया म्हणजे एखाद्या वस्तुप्रकाराची किंवा प्रसंगाची कायमची भीती बसलेली असणे. या आजाराची सुरुवात लहानपणीच्या काही भीतीयुक्त अनुभवात असू शकते. तसेच धाकात वाढलेले मुल आणि पालकांचे एकूण कौशल्य कमी असणे ही भीतीग्रस्ततेची कारणे असू शकतात. का आजारही स्त्रियांमध्ये जास्त आढळतो. विशीच्या आधी व नंतरच्या दशकात हा आजार उमटण्याची शक्यता असते. भीतीग्रस्ततेची पुढील काही उदाहरणे आहेत

पाली, झुरळ किंवा किटकांची भीती, सापाबद्दल अवाजवी भीती असणे, अंधाराबद्दल, वेगाबद्दल किंवा उंचीबद्दल भीती असणे. उदा. काही जणांना जत्रेतल्या पाळण्यात बसायची अत्यंत भीती असते. तर काही जणांना वेगाने जाणार्‍या वाहनांबद्दल. या मनोविकाराचा उपचार म्हणजे समुपदेशन आणि सौम्य अनुभवातून हळूहळू ही भीती काढून टाकणे. ताणतणाव घालवून सैलपणे अनुभव घेण्याचे प्रशिक्षण उपयुक्त ठरते.

पॅनिक मनोविकार म्हणजे भीतीचा अचानक अतिरेक. अशा प्रसंगी हार्ट ऍटॅक किंवा पक्षाघात होऊ शकतो. अशा व्यक्तीला जोरात धाप लागणे, छातीत जोरजोराने धडधडणे, श्‍वास न घेता येणे, दातखीळ बसणे, छातीत दुखणे, चक्कर येणे, बधीर होणे, खूप घाम येणे वगैरे लक्षणे दिसतात. मृत्यूची भीती वाटते आणि त्यामुळे अतिनैराश्य जडते. या मनोविकारावर विविध प्रकारचे मानसोपचार उपलब्ध आहेत. यामुळे भीतीचे प्रमाण पुष्कळ कमी होते.

नादिष्टपणा किंवा मंत्रचळेपणा म्हणजे एखादी कृती किंवा विचार सतत करीत राहणे. यालाच काही लोक चाळा असे म्हणतात. ही व्यक्ती आपल्या मनावरचा ताण घालवण्यासाठी एखादा चाळा परत परत करत राहते. त्या व्यक्तीच्या आतला संघर्ष यामुळे वर उफाळून येतो. हा मनोविकार साधारणपणे विशीच्या आधी आणि नंतरच्या दशकात येतो. हा मनोविकार दीर्घकाळ टिकणारा आहे. यात नैराश्य, भीतीग्रस्तता, खाण्यापिण्याचे फॅड, व्यसन इ.पैलू दिसून येतात. या मनोविकाराला औषधे आणि इतर मानसोपचार उपयोगी पडतात.

सदोष व्यक्तिमत्वाचे विविध प्रकार

काही जणांची व्यक्तिमत्वेच थोडी वेगळी आणि सदोष वाटत असतात. अशी व्यक्ती ताठर, आग्रही आणि कमी लवचिक असते. यामुळे कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक अडचणी निर्माण होतात. अशा व्यक्तींची वागणूक व स्वभाव विशीच्या आगे मागेच दिसून येते. प्रौढपणी हीच प्रवृत्ती कायम होते. याचा त्या व्यक्तीला किंवा इतरांना त्रास भोगावा लागतो. समाजात सुमारे ५-१०% व्यक्ती सदोष व्यक्तिमत्वाची असू शकतात. अनुवंशिक, जीवशास्त्रीय, सामाजिक, मानसिक विकसन आणि काही पर्यावरणीय कारणे या दोषांमागे असू शकतात. इथे आपण काही मुख्य प्रकार पाहू या.

संशयग्रस्त स्वभाव – या व्यक्ती इतरांवर कधीच विश्‍वास ठेवत नाहीत, कायम संशय घेतात आणि वाद घालत बसतात. स्वत:चे निर्णय ते सहसा बदलत नाहीत, स्वत:ला खूप महत्त्वाचे समजतात आणि इतरां बद्दल असूया बाळगतात. अशा व्यक्तींना राग लवकर येतो. इतरांचे सामान्य बोलणे वागणेही ही माणसे वेगळ्याच अर्थाने आणि प्रतिकूल पद्धतीने घेतात. त्यामुळे सतत संघर्ष व अडचणी येत राहतात.

काही व्यक्तींचा स्वभाव भ्रममूलक असू शकतो. सामाजिक दृष्ट्या ते एकाकी राहतात, त्यांना मित्र कमी असतात. आपल्यावरची टिका त्यांना सहन होत नाही. भावनिकदृष्ट्या ते थंड आणि अंतर्मुख असू शकतात. इतरांशी त्यांचे नाते एकूण कमीच असते आणि अशांना एकूणच आनंद कमी मिळतो.

लहरी स्वभाव – या व्यक्ती विचित्र पद्धतीने विचार करतात आणि वागतात. इतरांशी वागताना अस्वस्थ असतात. त्यांच्या मनात विचित्र कल्पना किंवा श्रद्धा असतात. अलिप्तपणा, लहरीपणा आणि इतरांशी फटकून वागणे हे त्यांचे विशेष आहेत.

असामाजिक स्वभाव – या व्यक्तींना पूर्वी समाजविरोधी किंवा समाजघातक व्यक्ती असे म्हणत असत. या व्यक्ती सर्वसामान्यपणे सामाजिक हिताच्या विरोधात वागतात आणि इतरांचे हक्क सहजपणे डावलतात. ते फार काळ नीट काम करू शकत नाही. त्यांचा कल गुन्हेगारी कृत्यांकडे असतो. इतरांचा मान राखणे हे त्यांच्या स्वभावात फारसे असत नाही. संयम नसणे, अचानक निर्णय घेऊन क्रिया करणे सहनशीलतेचा अभाव, भानगडी करणे, आक्रमक व हिंसाचारी वागणूक आणि अपराधी पणाची भावना नसणे ही यांची स्वभाव वैशिष्ट्ये असतात. स्वत:च्या अनुभवापासून शिकणे आणि इतरांशी चांगले संबंध ठेवणे त्यांना जमत नाही. या व्यक्तींना बराच काळ समुपदेशन करून परिस्थिती सुधारू शकते.

नाटकी स्वभाव – या व्यक्ती भावनेच्या आहारी जाणार्‍या, सारखे आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधावे म्हणून खटपट करणार्‍या आणि साहसवादी, नाटकी आणि काहीतरी नवे दाखवण्याच्या प्रयत्नात या व्यक्ती असतात आणि आकर्षित दिसण्याचा नेहमी प्रयत्न करतात. भावनिकदृष्ट्या त्या अस्थिर असतात आणि स्वकेंद्रित प्रवृत्तीच्या असतात.

स्वकेंद्रित स्वभाव – काही व्यक्ती स्वत:तच रमणार्‍या, इतरांकडे फारसे लक्ष न देणार्‍या आणि आत्मकेंद्री असतात. त्यांना टीका सहन होत नाही आणि कर्तव्य, सत्ता, यश, प्रेम किंवा हुशारीबद्दलच्या काल्पनिक समजुतीत मग्न असतात.

परावलंबी व्यक्तिमत्व – या व्यक्ती इतरांवर निर्णयासाठी आणि आधारासाठी अवलंबून असतात. इतरांच्या मदतीशिवाय त्यांना वागता येणे अवघड असते. स्वत:बद्दल कमी विश्‍वास, इतरांची टिका करण्याची प्रवृत्ती आणि टिकेबद्दल त्यांचे मन संवेदनाशील असते.

अधीर व्यक्तीमत्व – या व्यक्तींना नेहमी काहीतरी अपूर्ण राहिल्याची जाणीव, त्यामुळे तणाव आणि चिंता सतावित असते. यांना न्यूनगंड असतो तसेच आपण झिडकारले जाऊ किंवा आपल्यावर टिका होईल याची त्यांना भीती असते. सामाजिक दृष्ट्या ते थोडेसे अलिप्त आणि निगेटीव्ह म्हणजे नकारात्मक प्रवृत्तीचे  सतात.

नादिष्ट स्वभाव – या व्यक्ती कुठलीही गोष्ट परिपूर्णतेने करण्याचा आग्रह धरतात त्यामुळे स्वत:चा मोकळेपणा, लवचिकपणा  आणि सहजपणा हरवून बसतात. त्यांना चुका सहन होत नाहीत आणि स्वत:ला ते नेहमी अचूक समजतात. कुणी मतभेद व्यक्त केले, त्याबद्दल चिडणे ही त्यांची सहज वृत्ती असते. नियमांवर तंतोतंत बोट दाखवणे हेही त्यांचे वैशिष्ट्य असते. त्यांना नेहमी शंका असतात. सदसद्विवेक बुद्धीप्रधान असते. यामुळे ते कठीण आणि हट्टी स्वभावाचे होतात.

याशिवाय काही व्यक्ती स्वत:बद्दल भावनिकदृष्ट्या अस्थिर असतात. त्यांना राग आवरता येत नाही, रितेपणा वाटतो. एकटेपणाची आणि स्वप्रतिमेची त्यांना भीती असते. अशा स्वभावाला अस्थिर स्वभाव असे म्हणता येईल.

वर विविध स्वभावदोष वर्णन केलेले आहेत. नीट विचार केला तर आपल्यालाही त्यातले काही ना काही गुणदोष चिकटलेले दिसू शकतील. हे मनोविकार म्हणून अगदी ठोस स्वरूपात नसले तरी मात्रा जास्त झाल्यास स्वत:च्या प्रगतीत किंवा इतरांच्या दृष्टीने त्रासदायक ठरू शकतात. यापैकी अनेक स्वभावदोषांचा आपण वाईट स्वभाव या सृष्टीने विचार करतो. किंवा ती व्यक्ती वाईट आहे किंवा नेभळट आहे अशी विशेषणे चिकटवून देतो. मात्र यातील बरेचसे स्वभावदोष हे मानसोपचारांनी काही प्रमाणात तरी दुरुस्त करता येतात. यांना औषधांची फारशी गरज नसते. व्यक्तिगत मानसोपचार, गटप्रक्रिया, वर्तन-उपचार आणि समाजिक बदल. सामाजिक परिस्थितीत नियंत्रण करू शकतो.

लैंगिक वर्तन दोष

प्रत्येक व्यक्तीला लैंगिक प्रवृत्ती असतात आणि त्यात थोडेफार फरक असतात. बालपणी आणि तरुणपणी आजूबाजूच्या असलेल्या परिस्थितीमुळे देखील असे दोष निर्माण होऊ शकतात. काही लैंगिक दोष हे जन्मजात आणि शारीरिक स्वरूपाचे असतात. सामाजिक मानसिक आरोग्य कार्यकर्ते म्हणून आपण याबद्दल जरी फारसे काही करणार नसलो तरी आपली एकूण जाणीव प्रगल्भ होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. खाली काही लैंगिक वर्तन दोष वा प्रवृत्ती दोष थोडक्यात दिलेले आहेत. या बाबतीत कुटुंबीयांना काही मदत लागल्यास आपण योग्य त्या ठिकाणी समुपदेशनासाठी पाठवू शकाल.

लिंगबदल – या व्यक्ती स्वत:च्या शारीरिक नैसर्गिक लिंग निश्‍चितीबद्दल साशंक असतात. उदा. पुरुषी जननेंद्रिय असून आपण आतून स्त्री आहोत असे वाटणे. किंवा स्त्री जननेंद्रिय असून आपण पुरुष आहोत असे वाटणे.  काही व्यक्ती विरुद्ध लिंगी कपडे घालतात. उदा. पुरुषांनी स्त्रियांसारखा वेष करणे किंवा उलट.

लिंगपरिवर्तन – या व्यक्तींमध्ये काही शारीरिक वैशिष्ट्ये विरुद्ध लिंगी व्यक्तीचे असतात. उदा. पुरुष असून स्तन थोडे मोठे असणे किंवा दाढी,मिशा कमी असणे वगैरे. या शारीरिक दोषांचे कारण बहुधा जनुकीय दोषांमध्ये असते. यासाठी योग्य तज्ज्ञांची मदत लागते, कधीकधी शस्त्रक्रियेने प्रत्यक्ष लिंगबदलही करावा लागतो.

समलिंगी प्रवृत्ती -पुरुषाने पुरुषाबरोबर किंवा स्त्री ने स्त्री बरोबर लैंगिक संबंध ठेवणे म्हणजे समलिंगी संबंध. मात्र आजकाल हा लैंगिक दोष न समजता केवळ एक नैसर्गिक बदल समजतात.  कायद्याने समलिंगी संबंध आतापर्यंत गुन्हा म्हणून धरले जायचे. आता मात्र हा गुन्हा धरला जात नाही. यापैकी काही जोडपी आयुष्यभर लग्नाच्या नात्याने राहतात. अर्थातच या जोडप्यांमध्ये लैंगिक संबंध हे त्या त्या शारीरिक शक्यतांनुसार घडतात. उदा. पुरुष जोपडप्यांमध्ये गुदमैथुन ही सामान्य प्रक्रिया होते तर स्त्री जोडप्यांमध्ये इंद्रिय प्रवेश नसल्याने केवळ आलिंगन इ. क्रिया होतात. या जोडप्यांना अर्थातच मुल होत नाही पण ते दत्तक घेऊ शकतात. अशा जोडप्यांना उपचारांची गरज वाटली तर लैंगिक तज्ज्ञांच्या कडे पाठवावे लागते.

वस्तू मिरवणे – काही व्यक्ती भिन्न लिंगी व्यक्तींचे कपडे घालून किंवा अंतरवस्त्रे घालून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. ही एक विकृती समजली जाते. यातली एक टोकाची प्रवृत्ती म्हणजे भिन्न लिंगी व्यक्तीच्या मल मुत्रापासून आनंद मिळवणे. या सर्व दोषांबद्दल समुपदेशन, वर्तनोपचार आदी उपायांनी अनुकूल बदल घडवता येतात.

लैंगिक छळवाद – काही व्यक्ती आपल्या लैंगिक जोडीदाराला त्रास देऊन, वेदना देऊन किंवा हाल करून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. ही एक विकृती आहे आणि दंडनीय अपराध आहे.

लैंगिक आत्मपीडन- म्हणजे स्वत:वर जखम किंवा वेदना निर्माण करणे आणि त्यातून लैंगिक समाधान मिळवणे. यासाठी मानसोपचार करावे लागतात.

प्रदर्शन- इतरांच्या लैंगिक क्रिया चोरून बघणे हाही एक अपराध समजला जातो. मात्र प्रत्यक्षात याची कायदेशीर प्रक्रिया खूप अवघड व किचकट आहे.

स्पर्श विकृती- काही व्यक्तींना (बहुधा पुरुष) भिन्न लिंगी व्यक्तीस स्पर्श करणे, हसणे किंवा चोळणे या मार्गांनी विकृत मानसिक समाधान होते. यासाठी अर्थातच दुसर्‍या व्यक्तीची संमती नसतेच.

लहान मुलांचे प्रौढांनी लैंगिक पीडन करणे हा दंडनीय अपराध आहे. अशा बातम्या आपण बालसुधारगृह, अनाथाश्रम किंवा मतिमंद मुलांच्या बाबतीत पुष्कळदा ऐकतो.

काही व्यक्ती गाय, कुत्रा, शेळी आदी प्राण्यांशी लैंगिक संबंधाचा प्रयत्न करतात ही विकृती समजली जाते आणि ती दंडनीय आहे.

वरीलपैकी पाच ते अकरा क्रमांकांच्या लैंगिक विकृती कायद्याने दंडनीय आहेत पण शेवटी त्यांना समुपदेशन व मानसोपचार या मार्गानेच दुरुस्त करावे लागते. यासाठी क्वचित औषधेही लागतात.

लैंगिक विकृती हा प्रकार सोडून लैंगिक कमतरता एक दुसरा दोषप्रकार आहे. यात स्त्री किंवा पुरुषांना स्वत:च्या लैंगिक इच्छेची पुर्तता न करता येणे. त्यात कमतरता किंवा अक्षमता जाणवणे हा दोष असतो. याचे विविध प्रकार आहेत आणि त्यातल्या बर्‍याच दोषांमागे मानसिक कारणे असतात. यातून समाजात बरेच दु:ख व त्रास उद्भवतात. कौटुंबिक संघर्ष तयार होतात आणि घटस्फोटही होतात.  या सर्वांसाठी लैंगिक समुपदेशन लागते. दुर्दैवाने या क्षेत्रात भोंदू लोक पुष्कळ असून मोठी आश्‍वासने देऊन पैसा उचलणे हेच त्यांचे ध्येय झाले आहे. असे भोंदू लोक शिक्षेस पात्र असतात. लोकांनी अशा भोंदूंना बळी पडू नये म्हणून योग्य ते मार्गदर्शन करून डॉक्टरकडे आपण पाठवले पाहिजे.

निद्रादोष- बर्‍याच व्यक्तींना निद्रेचे कमी जास्त होण्याचा सतत त्रास होतो. याचे खालीलप्रमाणे काही ठळक प्रकार आहेत.

निद्रानाश (अपुरी झोप)- यामध्ये मुख्य दोष म्हणजे लवकर झोप लागत नाही व लागल्यावर मधून मधून वेळेआधीच जाग येते. याचे कारण एकतर काही शारीरिक आजार (कर्करोग), कंबरदुखी किंवा दमा असू शकतो. दारू व इतर मादक पदार्थ हे मुख्यत: झोप लागण्यासाठी देतात असा लोकांचा समज असतो. मात्र ही व्यसनेच बर्‍याच वेळेस निद्रानाशाला कारणीभूत ठरतात. मनोविकारांपैकी उन्माद,अतिनैराश्य, भ्रमविकार हे देखील निद्रानाशाला कारणीभूत असू शकतात. निद्रानाशासाठीच कौटुंबिक आणि व्यक्तिगत कारणेही असू शकतात. उदा. ताणतणाव, प्रियजनांचा मृत्यू, आर्थिक चिंता इ. काही जणांच्या बाबतीत खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती, दिवसा खूप झोप काढणे, व्यायामाचा अभाव, कॉफीचा अतिरेक वगैरे कारणे असू शकतात. काही व्यक्तींना दिवसाही प्रचंड झोप येते आणि झोपेचे चक्क झटके येतात.

निद्रा-घात म्हणजे माणूस जागा असूनही शरीर अजिबात हलवू शकत नाही अशी अवस्था.

झोपेत श्‍वसन थांबणे -हा आजार झोप मोडते व श्‍वसन चालू होते. जोराने घोरणार्‍यांच्या बाबतीत हा प्रकार संभवतो. कधीकधी यामुळे झोपेतच प्राणवायू कमी पडून हृदयविकार किंवा इतर अपघात होऊ शकतो. झोपेत चालणे, रात्री दचकून उठणे, झोपेत दात कराकरा खाणे, झोपेत बोलणे, झोपेतच लघवी करणे हे दोष जरा जास्त गंभीर दोष आहेत. यासाठी निद्रातज्ज्ञांची मदत लागू शकते.