न्यायवैद्यक
The web page is being updating
घरातला हिंसाचार
आमच्या दवाखान्यात यशोदा इतकी वर्षे अंगदुखीसाठी म्हणून येते, पण ही साधी कष्टाची अंगदुखी नसून दारूडया नव-याकडून मारहाण आहे हे कळायला उशीरच झाला खरा. तिच्या कोपरावर खरचटलेले आणि गालावर वळ पाहिल्यावरच मला शंका आली. खोदून विचारल्यावर तिने खरी कहाणी सांगितली. गेली वीस वर्षे हा छळ जवळजवळ रोज संध्याकाळी चालू आहे, आणि तिच्या चार लेकी हे सर्व भरल्या डोळयांनी पहातपहातच लहानाच्या मोठया झाल्या आहेत. आता ही सवय मोडणे अवघड आहे, सुरुवातीसच काही उपाय केला असता तर हा छळ कदाचित थांबू शकला असता.
शेकडा सुमारे चाळीस घरांमध्ये स्त्रियांना मारहाण होते. त्यात मुख्य प्रकार म्हणजे नव-याने बायकोला मारणे, याशिवाय सास-याने सुनेला मारणे, भावांनी बहिणीला मारणे,क्वचित मुलांनी आईला मारणे हेही प्रकार घडतात. शिवीगाळ, लाथा, थपडा, डोके आपटणे आणि काठी चपलांनी मारहाण, कधी कधी चक्क खूनसुध्दा! एवढे होऊन तक्रार क्वचितच होते. बाईचा जन्म म्हणून या सर्व गोष्टी खपून जातात.
कारणे?
- दारूडे नवरे तर मारहाण करतातच, पण दारूडे नसलेलेही तितकेच मारझोड करतात.
- गरिबी हे कारण म्हणाल तर श्रीमंत घरामध्येही मारहाण होते, धार्मिक घरामध्येही असे प्रकार घडतात.
- शेतकरी, कामगार, व्यापारी, बडे नोकरदार अशा सर्व कुटुंबातही असे प्रकार घडतच असतात.
- वरवर दिसणारी कारणे क्षुल्लक असतात, उदा. जेवण आवडले नाही, सासूशी नीट बोलली नाही, इ. पण खरी कारणे वेगळी असू शकतात.
- लैंगिक असमाधान/ समस्या, हुंडा, जमीन जुमल्याचा वाटा, नव-याचे इतर स्त्रियांशी संबंध अशी अनेकानेक कारणे यात असू शकतात.
- विशेष म्हणजे भारताप्रमाणेच इतर देशांमध्येही ही समस्या आहे. याला प्रगत देशही अपवाद नाहीत. मात्र भारतात काही विशेष घटक यात कारणीभूत ठरतात.
- मुलीचे लग्नावेळी वय लहान असणे, शिक्षणाचा अभाव, स्त्रियांना अर्थार्जनाची संधी नसणे (त्या कष्ट तर भरपूर करतात,पण त्या साऱ्या कष्टाचे पैशात मोजमाप होत नाही.) जुळवून केलेली लग्ने (मुलगी देणे), एकत्र कुटुंबपध्दतींचा रामरगाडा, जातपातीच्या तटबंद्यांमुळे शेजार समाजाचा आधार नसणे, कायदेशीर मदत जवळपास उपलब्ध नसणे वगैरे अनेक कारणांमुळे स्त्रियांची कुचंबणा होते.
तरी देखील याही परिस्थितीत आपण काहीतरी करणे आवश्यक आहे. काय करता येईल याची थोडक्यात रूपरेखा या प्रकरणात मांडली आहे.
‘मारझोड’ कशी ओळखावी?
बाई मारहाण लपवत असली तरी ती ओळखून काढणे हे आवश्यक आहे. आरोग्य कार्यकर्ते किंवा शेजारी-पाजारी हे काम करू शकतात.
- एखादी बाई अंगदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, इत्यादी ‘दुखी’ घेऊन नेहमीनेहमी दवाखान्यात येत असेल (अशावेळी कारण म्हणून त्या बहुतेक असे सांगतात – काम करताना पडले, खूप काम करावे लागते, ताप, इ.)
- जखम झाल्यावर 1,2,3 दिवसांनी उपचारासाठी येणारी बाई ! कदाचित मारझोडीमुळे ही जखम झाली असेल. त्यादिवशी तिला येऊ दिले नसेल किंवा संध्याकाळ-रात्र झाल्यामुळे ती बाहेरच पडली नसेल. ‘जुनी जखम’ ही महत्त्वाची खूणगाठ लक्षात ठेवा. उपचारासाठी एवढा उशीर का केला असे विचारले तर ती बहुधा काहीतरी उत्तर देईल – (वेळ मिळाला नाही, पाळी आलेली होती, मुलांच्या शाळा, शेतात तातडीचे काम होते वगैरे वगैरे)
- मुकामार/जखम, ती पण अशा ठिकाणी की पडल्यामुळे तिथे लागू शकत नाही. पडल्यामुळे होणा-या जखमा गुडघे, छाती, पोट, चेह-याचा पुढचा भाग, हाताचे तळवे, कोपर कुल्ले, इ. ठिकाणी होऊ शकतील. बाई सांगते ते कारण व मुकामार/ जखम याची संगती लागत नसेल तर शंका घ्यावी. बचावासाठी मनुष्य हातांचा ढालीसारखा वापर करतो, त्या जखमा सहज कळतात. जखमांच्या जागा व स्वरूप यावरून कारण समजू शकते.
- तोंडाने कारण सांगत असताना डोळे/चेहरा वेगळीच कहाणी सांगतात, ती ओळखणे आवश्यक आहे. यासाठी अर्थातच आपण सहृदय व जागृत असले पाहिजे.
- मारहाणीच्या जुन्या खाणाखुणांवरून शंका घेता येईल.
आपली भूमिका
कोठल्याही चांगल्या समाजात हिंसा असायला नको. निदान निरपराध व्यक्तींना हिंसा-मारहाणीला तोंड द्यायला नको. त्यातही ज्याच्यावर संरक्षणाची जबाबदारी त्यांनीच मारहाण करणे हे आणखीनच वाईट. या दृष्टीने शेजारी-पाजारी व समाजाचे घटक, राष्ट्राचे नागरिक म्हणून आपले काही कर्तव्य आहे. ‘मी काय करणार’ , ‘त्याची बायको, तो तिला मारणारच’ ‘नव-याने मारले पावसाने झोडले’, इत्यादी मनोभूमिका बदलायला हवी. घरातल्या मारहाणी थांबवण्यासाठी आपण शक्यतो प्रत्येक स्त्रीला मदत करायला हवी.
आपल्याला काय काय करता येईल?
लवकर ओळखा, लवकर दखल घ्या
- वर सांगितलेल्या खाणाखुणांवरून लवकरात लवकर हा प्रकार शोधून काढा.
- मुकामार, जखमा यांची थोडी तपशीलवार नोंद करा. या नोंदी थोडया जपून ठेवा, इतरांना सहज दिसायला नको अशा ठेवा. शक्यतो आकृती काढून ठेवा. विशेष शब्दांची नोंद ठेवा (उदा. चाबकाने मारले, भिंतीवर डोके आपटले, इ.) अशा नोंदींवर स्त्रीचे नाव न टाकता काहीतरी खूण नोंद करा.
- वैद्यकीय उपचार करा (मलमपट्टी, वेदनाशामक गोळया, इ.)
- अशा स्त्रीबरोबर सहानुभूतीने वागून एक विश्वास संपादण्याचा प्रयत्न करा. अशी मारहाण सहन करायची नाही; आपणही माणूस आहोत हे तिच्या मनावर ठसवा. विशेष करून पहिला-दुसरा प्रसंग असेल तर ही मनोभूमिका वेळीच निर्माण करायला पाहिजे. पुढचा त्रास त्याने टळू शकतो.
- सामाजिक किंवा कायदेशीर कारवाई करायची असेल तर तिची स्पष्ट संमती घेऊनच करा. तिच्या माहिती/संमतीशिवाय हे करू नका. तिने संमती दिली तरी तिच्या एकूण सुरक्षिततेचा विचार करूनच मग पाऊल टाका.
कारवाईस तिची संमती असल्यास
- मदत करू इच्छिणा-या नातेवाईकांचे पत्ते (असल्यास फोन) नोंदवून ठेवा.
- स्थानिक महिला मंडळाची मदत घ्या. अशा मंडळांना पोलिसी कारवाईचा अनुभव असतो, ते मार्गदर्शन मोलाचे ठरते.
- कारवाई करताना तिला आणखी त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी.
कारवाईला स्त्री राजी नसेल तर
- स्वसंरक्षणाचे हे मार्ग/युक्त्या तिला सांगून ठेवा.
- मारहाण व्हायची लक्षणे ओळखून सावध राहायला शिकवा.
- जवळचे नातेवाईक किंवा चांगली शेजारी माणसे यांना कल्पना देऊन ठेवावी.
- मारहाणीच्या वेळी दडायला जागा शोधून ठेवणे बरे (उदा. घरातली एखादी खोली आतून बंद करून घेणे, शेजा-याचे घर, इ.)
- असे दडून राहणे शक्य नसेल तर एखाद्या कोप-यात भिंतीकडे तोंड करून दबून बसणे, हाताने डोक्यावरचा मार झेलणे, जास्तीत जास्त मार पाठीवर घेणे.
- स्वसंरक्षणासाठी स्वत: प्रतिकार करणे पूर्ण कायदेशीर आहे. भले यामुळे त्याला इजा झाली तरी चालेल.
- सुटकेशिवाय मार्ग नाही असे वाटत असेल तर एखादी पिशवी आधीच तयार ठेवणे, त्यात एक दिवसाचे कपडे, लागणा-या वस्तू नातेवाईक-मित्रांचे पत्ते, प्रवासाचे पैसे, एखादा बिस्किटाचा पुडा वगैरे वस्तू भरून ठेवणे.
IPC → BNS कलम रूपांतर (महत्त्वाची यादी)
जीवित व शरीरावरील गुन्हे
IPC 299 → BNS 100 : सदोष मनुष्यवध (Culpable homicide)
IPC 300 → BNS 101 : खून (Murder – definition)
IPC 302 → BNS 103 : खूनाची शिक्षा
IPC 304 → BNS 105 : खून न ठरता सदोष मनुष्यवध
IPC 304A → BNS 106 : निष्काळजीपणामुळे मृत्यू
IPC 307 → BNS 109 : खुनाचा प्रयत्न
IPC 323 → BNS 115 : साधा मारहाण
IPC 324 → BNS 118 : धोकादायक शस्त्राने मारहाण
IPC 326 → BNS 118 : गंभीर दुखापत
महिला व लैंगिक गुन्हे
IPC 354 → BNS 74 : स्त्रीचा अपमान/छेडछाड
IPC 354A → BNS 75 : लैंगिक छळ
IPC 354B → BNS 76 : स्त्रीवर हल्ला/हिंसा
IPC 354C → BNS 77 : चोरून स्त्रीशरीर- आणि लैंगिक निरीक्षण
IPC 354D → BNS 78 : पाठलाग (stalking)
IPC 375 → BNS 63 : बलात्काराची व्याख्या
IPC 376 → BNS 64 : बलात्काराची शिक्षा
IPC 498A → BNS 85 : पत्नीवर क्रौर्य