औषध ही आजच्या जीवनातील आवश्यक बाब झालेली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या खालोखाल वैद्यकीय उपचारांचाच खर्च जास्त आहे. त्यातही सरासरीने औषधांचा खर्च फार मोठा आणि जाचक आहे. डॉक्टर अनेक प्रकारची औषधे लिहून देतात. पुरेसे पैसे नसल्याने बहुतेकांना निम्मीशिम्मी औषधे घेऊनच दुकानातून परत फिरावे लागते. ही सगळी दुरवस्था समजून घेण्यासाठी औषधांचा थोडाफार व्यवहार माहीत होणे आवश्यक आहे.
पहिली गोष्ट म्हणजे औषधे आवश्यक आहेत, पण बाजारात मिळणा-या अक्षरशः हजारो औषधांच्या एवढया पसा-याची काही गरज नाही. जागतिक आरोग्य संघटनेने आणि भारत सरकारने तयार केलेल्या ‘ आवश्यक औषधांच्या यादीत’ 384 औषधांत डोकेदुखीपासून कॅन्सरपर्यंतची जवळजवळ सर्व आवश्यक औषधे येतात. आपण प्राथमिक आरोग्यासाठी त्यांतली फक्त 60-100 औषधे लागतात. नेहमी लागणाऱ्या काही औषधांची यादी इथे दिलेली आहे. औषधांची गुणवत्ता (परिणामकारकता), निर्धोकपणा, उत्पादनमूल्य आणि सोपेपणा या घटकांचा विचार केलेला आहे. ह्या यादीत फक्त ‘मूळ’ औषधांचीच नोंद आहे.
औषधांना तीन प्रकारची नावे असतात. एक म्हणजे रसायनशास्त्रानुसार असणारे नाव. ते लांबलचक , गुंतागुंतीचे असते. पर्याय म्हणून औषधशास्त्रात तुलनेने सुटसुटीत नाव वापरले जाते याला ‘मूळ’ वा ‘औषधशास्त्रीय’ नाव म्हणू. तिसरे म्हणजे औषध कंपन्यांनी ठेवलेले व्यापारी टोपण नाव. एकच मूळ औषध निरनिराळया टोपण नावांनी उपलब्ध असते. ऍसिटाइल सॅलिसिलीक ऍसिड, ऍस्पिरीन, डिस्प्रिन ही एकाच औषधाची अनुक्रमे रासायनिक, औषधशास्त्रीय व टोपण नावे झाली. व्यापारी नावे (ब्रँड नेम) ठेवण्याचा उद्देश म्हणजे ग्राहकाचा बुध्दीभेद करून जास्त नफा कमावणे.
सर्व कंपन्यांनी एकाच मूळ नावाने औषध विकल्यास सर्वांची किंमत ग्राहक सारखीच ठरवतील. (म्हणजे ग्राहक स्वस्त आणि चांगले औषध घेईल). असे होऊ नये म्हणून निरनिराळी नावे ठेवली जातात. वेगळी व्यापारी नावे, आकर्षक वेष्टण, भरपूर किंमत एवढे सगळे ग्राहकांच्या माथी मारण्यासाठी डॉक्टरवर्गाला हाती धरले जाते. भेटवस्तू व सँपलच्या नादाने बहुसंख्य डॉक्टर अशी जास्तीत जास्त औषधे रुग्णांना ‘लिहून’ देतात. यातून नुकसान रुग्णांचे होते.

भारतामध्ये अनेक रुग्णांना महागड्या औषधांमुळे उपचार करणे कठीण जाते. या समस्येवर उपाय म्हणून भारत सरकारने प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMBJP) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशभर जनऔषधी केंद्रे (Generic medicine stores) सुरू करण्यात आली आहेत.
या केंद्रांमध्ये गुणवत्तापूर्ण औषधे कमी किमतीत उपलब्ध करून दिली जातात.
जनऔषधी केंद्रांमध्ये उपलब्ध असलेली औषधे प्रामुख्याने जेनेरिक औषधे असतात. जेनेरिक औषधांमध्ये मूळ औषधातीलच सक्रिय घटक (active ingredient) असतो, त्यामुळे त्यांचा उपचारात्मक परिणामही तितकाच प्रभावी असतो. मात्र या औषधांवर ब्रँड नाव नसल्यामुळे त्यांची किंमत तुलनेने खूप कमी असते. अनेक वेळा ब्रँडेड औषधांच्या तुलनेत जनऔषधी औषधे ५० ते ९० टक्क्यांपर्यंत स्वस्त असतात.
जनऔषधी केंद्रांमध्ये ताप, सर्दी-खोकला, मधुमेह, रक्तदाब, अॅनिमिया, संसर्गजन्य रोग तसेच अनेक दीर्घकालीन आजारांसाठी लागणारी औषधे उपलब्ध असतात. याशिवाय काही केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन, सर्जिकल वस्तू आणि आरोग्यविषयक इतर आवश्यक साहित्यही उपलब्ध करून दिले जाते.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वसामान्य लोकांना दर्जेदार आणि परवडणारी औषधे उपलब्ध करून देणे.
विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना या केंद्रांचा मोठा फायदा होतो. डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शननुसार रुग्ण जनऔषधी केंद्रातून स्वस्त दरात औषधे घेऊ शकतात.
सरकारच्या माहितीनुसार आज भारतातील अनेक राज्यांमध्ये हजारो जनऔषधी केंद्रे कार्यरत आहेत आणि या केंद्रांमुळे लाखो लोकांचा औषधांवरील खर्च कमी झाला आहे. त्यामुळे आरोग्य सेवा अधिक सुलभ आणि परवडणारी बनत आहे.
थोडक्यात,जनऔषधी केंद्रे ही आरोग्यसेवेतील एक महत्त्वाची सामाजिक योजना आहे.
गुणवत्तापूर्ण जेनेरिक औषधे कमी किमतीत उपलब्ध करून देऊन ही योजना सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
अनेक औषधांबद्दल डॉक्टरांना पुरेशी माहिती नसते. पुरेसे रोगनिदान न करता जास्तीत जास्त औषधे लिहून मोकळे होण्याची प्रवृत्ती असते. ग्रामीण भागात तर बहुतेक डॉक्टर होमिओपथी किंवा आयुर्वेदाचे असतात. पण ते सर्रास ऍलोपथिक औषधे वापरतात. यातून दुष्परिणाम होतील हे उघड आहे.
सामान्य जनतेला अर्थातच औषधांची कमीच माहिती असते. मुळात गूढतेचे वलय भेदून वैद्यकीय बाबींकडे पाहणे अजून तरी शक्य झालेले नाही.त्यातच आजारांची नावे इंग्रजी, औषधांची नावे इंग्रजीतून, पण बहुसंख्यांना इंग्रजी येत नाही. भरीस भर म्हणून व्यापारी नावाचा उपयोग; या सर्वातून बिचारे रुग्ण डॉक्टरांनी दिलेली औषधे मुकाटयाने घेतात. यामुळे अनेक प्रकारचे दुष्परिणामही रुग्णांना भोगावे लागतात.

कित्येक वेळा किरक़ोळ आजारांवरही सहा-सात औषधे दिलेली आढळतात. प्रतिजैविके (जंतुविरोधी औषधे), टॉनिके (जीवनसत्त्वे,क्षार, इ.) यांचा गैरवापर तर फार होतो. टॉनिकांचा एकूण भरमसाठ उपयोग अनावश्यक आहे. त्या किंमतीत रुग्णाला महिनाभर रोज एखादे अंडे वा पौष्टिक पदार्थ सहज घेता येईल. टॉनिकपेक्षा हा पर्याय अनेकपटींनी श्रेष्ठ आहे. खोकल्याच्या औषधांचाही असाच गैरवापर होतो.
आपल्याकडे अशास्त्रीय मिश्रणे, बंदी घातलेली औषधे वापरली जातात. ज्या कारणांसाठी औषध सांगितले आहे त्यापेक्षा वेगळयाच कारणांसाठी त्या औषधांचा गैरवापर होतो असेही आढळते. इंजेक्शने आणि सलाईनचा सर्रास गैरवापरही असाच वाईट आहे.