बालकांना ताप येतो आल्यास त्यावेळी पुरळ किंवा चट्टे आलेत की नाही हे पाहणे महत्त्वाचे असते. पुरळ म्हणजे त्वचेवर आलेले लालसर फोड. गोवर जर्मन गोवर कांजण्या, डेंगू, हरपीस, इत्यादी अनेक तापांमध्ये विशेष करून विषाणूतापांमध्ये पुरळ येऊ शकतात. खरूज या कीटकजन्य सूक्ष्म कीटक यांनी आजारात पण पुरळ येतात. काही औषधांच्या रिएक्शन मुळे त्वचेवर पुराळी होऊ शकतात. गांधील माशासारखे काही कीटक मधमाशा वगैरे झाला असेल तर अंगावर लहान-मोठे चट्टे येऊ शकतात.
पुरळांचे प्रकार जागा येण्याचा क्रम वगैरे यावरून त्या आजाराचे निदान निश्चित होऊ शकते यातले बरेच आजार आता लसीकरणामुळे खूप कमी झालेले आहेत. रोगनिदान मार्गदर्शकात याबद्दल खुणा व लक्षणे सांगितलेली आहेत
बालकांमधील संसर्गिक आजारांच्या धोकादायक खुणा खाली दिले आहेत त्या ओळखायला पाहिजे.

गालगुंड हा विषाणुजन्य आजार सहसा लहान मुलांमध्ये (पाच-सहा वर्षे) येतो. या वयात हा एक तसा निरुपद्रवी आजार असतो. हा आजार लहान वयात आला नाही तर मोठया वयात येण्याची शक्यता असते मोठ्या वयात जास्त त्रास होऊ शकतो. . म्हणून गालगुंड टाळण्यासाठी लस दिली जाते.
हा आजार मुलांमध्ये श्वसनामार्फत पसरतो. थोडा ताप, लाळग्रंथी (गालातील) सुजणे, दुखणे ही त्यांपैकी मुख्य लक्षणेही गालफुगी कधी कधी एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला असते.क्क़चित इतर लाळग्रंथीही सुजतात .तोंड कोरडे पडते, चावताना दुखते इ त्रास जाणवतात .. पाच-सात दिवसांत हा आजार बरा होतो.
प्रौढ व्यक्तींना किंवा किशोरवयीन मुलांमध्ये मात्र या ‘गालफुगी’ बरोबर वृषण (पुरुष) किंवा ओटीपोटात (स्त्रिया) दुखल्यास/ सुजल्यास बीजांडापर्यंत आजार पोचल्याची ही खूण असू शकते . यामुळे कायमचे वंध्यत्व येण्याची शक्यता असते. तरुण-मोठया माणसांमधील गालफुगी म्हणूनच गंभीर असते.
कधी कधी स्वादुपिंडावर सूज येते. त्यामुळे खूप पोट दुखी चा त्रास दिसल्यास मुलांना डॉक्टरकडे लवकर दाखवा .या व्यक्तींमध्ये मोठेपणी मधुमेह होण्याची शक्यता खूप असते .
काही गुंतागुंत नसेल तर लहान मुलांना नुसते paracetamol हे औषध पुरते.
गालगुंडांसाठी प्रतिबंधक लस आहे,. गालगुंडाची प्रतिकारशक्ती जन्मभर टिकते .दीड वर्ष झाल्यावर MMR ही लस देतात. त्यात गोवर बुस्तर, गालगुंड & जर्मन गोवर अशी एकत्रित लस असते.

गोवर हा मुख्यत: लहान मुलांमध्ये आढळणारा सांसर्गिक (विषाणू) आजार आहे. यात आधी सर्दी, खोकला, ताप आणि मग अंगावर पुरळ उठतात. निरोगी आणि धडधाकट मुलांना याचा विशेष त्रास होत नाही. कुपोषणामुळे आपल्या देशात गोवराचे अनेक दुष्परिणाम होतात आणि मृत्यूही होतात. म्हणूनच मुलांच्या महत्त्वाच्या 6 सांसर्गिक आजारांत गोवराचा समावेश केलेला आहे. (हे 6 आजार म्हणजे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, पोलिओ आणि गोवर.) सुदैवाने गोवराविरुध्द परिणामकारक प्रतिबंधक लस उपलब्ध आहे.
पूर्वी गोवर साधारणपणे दर दोन-तीन वर्षांनी साथीच्या स्वरुपात येत असे. आता गोवर लसीमुळे साथी कमी झाल्या आहेत. आपल्या देशात गोवर मुलाच्या पहिल्या दोन-तीन वर्षे वयातच येऊन जातो, पण तो उशिराही येऊ शकतो. गोवर एकदा येऊन गेला, की जवळजवळ आयुष्यभर टिकणारी प्रतिकारशक्ती (गोवराविरुध्द) देऊन जातो. म्हणून त्या व्यक्तीला परत गोवर होत नाही. मात्र एखाद्या व्यक्तीला गोवर झालेला नसेल तर आयुष्यात कधीही तो येऊ शकतो. गोवर उशिराच्या वयात येणे जास्त त्रासदायक असते.
काही पालक मुलाला पूर्वी एकदा गोवर होऊनही (पूर्ण लक्षणांसहित) काही मुलांना पुन्हा ‘गोवर’ निघाला असे सांगतात. बहुधा हे आजार गोवरसदृश इतर विषाणूंमुळे असतात.
गोवर हा रोग एका विषाणूमुळे होतो. हा विषाणू मानवी शरीराच्या बाहेर आपल्यासारख्या उष्ण वातावरणात फार काळ तग धरू शकत नाही. पण थंड वातावरणात तो बराच काळ राहू शकतो. म्हणून हिवाळयात हा आजार जास्त आढळतो. गोवराचा रुग्ण पुरळ यायच्या चार-पाच दिवस आधी आणि नंतर इतरांना संसर्ग देतो. विषाणुप्रवेशानंतर साधारणपणे आठ-दहा दिवसांत गोवराची लक्षणे दिसू लागतात.
गोवराचे विषाणू श्वसनावाटे प्रवेश करतात. ते आधी रसग्रंथी, पांथरी, टॉन्सिल, तोंडाचा अंतर्भाग, श्वासनलिकांचे आतले आवरण, इत्यादी जागी पसरतात. सगळयात जास्त दुष्परिणाम श्वासनलिकांच्या आतल्या भागात होतात. म्हणूनच गोवरामध्ये खोकला येतो. ब-याच वेळा पुढे श्वसनसंस्थेचे आजार होऊ शकतात. त्वचेवर उठणारे पुरळ हे सूक्ष्म केशवाहिन्यांना येणा-या सुजेमुळे उठतात. कुपोषित मुलांमध्ये या सर्व दुष्परिणामांची तीव्रता वाढते. बालकाला आधीचा क्षयरोग असेल तर तो जोर धरतो. या आजाराने कुपोषणाची तीव्रता वाढते. कधीकधी विषाणूंमुळे मेंदूसूज येते.
गोवर हा मुख्यत – लहान मुलांचा आजार आहे. (सामान्य वयोगट ९ महिने ते ५ वर्ष.)
शरीरात एकदा विषाणुप्रवेश झाला की 8 ते 12 दिवसांनी लक्षणे दिसतात. यात डोळे लाल होणे, सर्दी, बारीक ताप, खोकला, इत्यादी त्रास जाणवतो.
या काळात मोहरीएवढे लालसर ठिपके ( कोप्लिक spots) तोंडात गालाच्या अंतर्भागावर दिसतात. हे ठिपके म्हणजे गोवराची हमखास आढळणारी खूण आहे. पण एक-दोन दिवसांत हे ठिपके जातात. त्यामुळे रोगनिदानासाठी यावर अवलंबून राहता येत नाही. ठिपके दिसले तर मात्र गोवर आहे हे निश्चित होते.
आर्सेनिकम, बेलाडोना, ब्रायोनिया, चामोमिला, ड्रॉसेरा, फेरम फॉस मर्क्युरी सॉल, पल्सेटिला, -हस टॉक्स, सिलिशिया, स्ट्रॅमोनियम, सल्फर
गोवराविरुध्द सर्वात चांगला उपाय म्हणजे प्रतिबंधक लस. ही लस शासकीय आरोग्यसेवेतूनही मिळते. बाळाच्या शरीरात आईकडून आलेली प्रतिकारशक्ती सहा महिनेपर्यंत असते. म्हणून ही लस पहिल्या सहा महिन्यांनंतर 15 व्या महिन्यांत बाळाला द्यावी. याचे इंजेक्शन असते. लस दिल्यानंतर बहुतेक मुलांना काहीही त्रास होत नाही. क्वचित लस टोचल्यावर 6 ते 10 दिवसांत थोडा ताप, अंगावर लाली, किंवा पुरळ येतात. हे सर्व एक-दोन दिवसच टिकते.
लसटोचणीनंतर दोन आठवडयात प्रतिकारशक्ती निर्माण होते. ही लस अर्धवट मारलेल्या विषाणूंची बनलेली असते. म्हणून शीतकपाटात ठेवल्याशिवाय लस टिकत नाही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या लसीमुळे कायमची प्रतिकारशक्ती निर्माण होते.
एम.एम.आर. नावाच्या लसीत गोवर, जर्मन गोवर व गालगुंड या तीन आजारांविरुध्द लस एकत्र मिळते. आजकाल सरकारी दवाखान्यात गोवर आणि जर्मन गोवर यांची एकत्रित लस मिळते ,त्यास एमएम आर लस म्हणतात. खाजगी दवाखान्यात सुध्धा एम.एम.आर. ही लस मिळते.
गोवरप्रतिबंधक लस वापरून गोवर टाळणे हे फार महत्त्वाचे आहे. असंख्य मुलांचे आजारपण, मृत्यू यामुळे टाळता येतील.
गोवरासारखेच दिसणारे काही सौम्य आजार आढळतात. गोवराची लस दिली असली तरी हे आजार होण्याची शक्यता शिल्लक राहते. अशा वेळी आपल्याला लसीबद्दल शंका घेणे साहजिक आहे.
गोवर-लस दिली असली तरी काही थोडया लोकांना गोवरच्या साथीत विषाणूंचा संसर्ग होतो. यामुळे गोवरासारखाच पण सौम्य आजार होऊ शकतो.
हा गोवरासारखाच पण अगदी सौम्य आजार असतो, म्हणून याला ‘लहान गोवर’ असेही म्हणता येईल. हा आजार विषाणूंमुळेच होतो. मुख्यत: मुलांनाच (5 ते 9 वर्षे) होतो. अंगावर पुरळ उठायच्या आधी एक आठवडा आणि नंतर एक आठवडयापर्यंत इतरांना याचा संसर्ग होऊ शकतो. एकदा संसर्ग झाला की पूर्ण प्रतिकारशक्ती येत असल्याने हा आजार पुन्हा होऊ शकत नाही.
विषाणुप्रवेशानंतर सुमारे दोन-तीन आठवडयांनी याची लक्षणे उमटतात. सहसा एक-दोन दिवस किरकोळ सर्दीताप होऊन पुरळ येतात. मात्र कधीकधी पुरळ येतच नाहीत. पुरळ आले तर ते बहुधा चेहरा, छाती, पोट, इत्यादी भागांवर येतात. चेहे-यावर पुरळ असणे हे निदानाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. हे पुरळ रंगाने लालसर असतात. ते एक-दोन दिवसांतच पूर्णपणे जातात.
याबरोबर गळयात अवधाण येते. हे अवधाण आठवडाभर आधी येऊ शकते. पुरळ गेल्यावर हे अवधाण दोन-तीन आठवडे टिकू शकते. गळयामागच्या आणि कानामागच्या रसग्रंथीही यामुळे सुजतात. कधीकधी सांधेदुखी, नसांना सूज, इत्यादी त्रासही जाणवतो. पण बहुधा हा आजार आपोआप जातो व विशेष त्रास होत नाही. गरोदरपणात मात्र याचे घातक परिणाम होतात.
गरोदरपणात जर एखाद्या स्त्रीला जर्मन गोवर हा आजार झाला तर विषाणू तिच्या गर्भात शिरून अनेक प्रकारचे दुष्परिणाम होतात. जन्मजात मोतीबिंदू, काचबिंदू, हृदयाचे दोष, मूकबधिरता, नेत्रपटलाचे आजार,रक्तस्रावाची प्रवृत्ती, मतिमंदत्व, अस्थिसंस्थेचे दोष, चेतासंस्थेचे दोष, इत्यादी अनेक दुष्परिणाम होतात. म्हणून जर्मन गोवर हा आजार टाळणे फार महत्त्वाचे आहे. गर्भारपणात सुरुवातीस हा आजार झालाच तर डॉक्टर गर्भपाताचा सल्लाही देतात, कारण याचे गर्भावर गंभीर दुष्परिणाम दिसतात.
हा आजार टाळण्यासाठी लस उपलब्ध आहे, पण ती अजून गर्भारपणा पूर्वी घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवेत समाविष्ट केलेली नाही. एम.एम.आर. नावाच्या लसीत या रोगाविरुध्दची लसही असते. या लसीचे दोन डोस दिल्यावर कायमची प्रतिकारशक्ती येते.