बालकांचे आरोग्य

डांग्या खोकला

पाच वर्षाखालील (विशेषतः दोन वर्षाखालील) मुलांना होणारा हा एक गंभीर आजार आहे. एक प्रकारच्या सूक्ष्म जंतूंमुळे हा आजार होतो. हे जंतू श्वासावाटे एकमेकांकडे हा आजार पसरवतात. हा आजार खूप संसर्गजन्य आहे. या रोगाची लागण लहान मुलांत (विशेषतः दोन वर्षाखालील) सुरू होते. तीन वर्षानंतर याचे प्रमाण खूपच कमी होते.

 संसर्गानंतर 1-2 आठवडयात आजार सुरु होतो. . त्यानंतर उबळीच्या खोकल्याची अवस्था चालू होते. या आजारात सूक्ष्मजंतूंमुळे  श्वासनलिका, फुप्फुसे यांचा दाह होऊन खोकला येत राहतो. इरिथ्रोमायसिन सारखे औषध सुरवातीच्या २ आठवड्यांपर्यंत जास्त उपयुक्त ठरते. नंतर यावर औषध फारसे चालत नाही .एकदा सुरू झाला की डांग्या खोकला २ ते ३  महिने टिकतो.

सुरुवातीस 1-2 आठवडे फक्त नाक गळणे, सौम्य ताप आणि खोकला असतो. यानंतर खोकल्याची उबळ सुरु होते. हा त्रास 2 ते 6 आठवडेपर्यंत राहतो. यानंतर 1-2 आठवडयात लक्षणे कमी होतात. खोकला एकदा सुरू झाला की त्याची उबळ 10-15 मिनिटांपर्यंत टिकून राहते. कित्येक वेळा मुलाचा श्वास कोंडतो व मूल काळेनिळे पडते. उबळीमध्ये दम कोंडल्यामुळे मूल दगावू शकते. उबळ संपल्यावर कोंडलेला दम सुटतो व हवा वेगाने आत ओढली जाते. यामुळे ‘हूप’ असा शिट्टीसारखा आवाज येतो.बऱ्याच वेळी उबळीनंतरउलट्या होतात.

या उबळीमुळे अनेक धोके संभवतात.

डांग्या खोकल्याचे दुष्परिणाम
  • सतत खोकल्याने भूक कमी होऊन मूल खंगते.व कुपोषित होते. हा आजार 6 ते 8 आठवडे चालतो. जुना टी.बी.चा आजार बळावू शकतो. न्यूमोनिया – डांग्या खोकल्यामुळे दगावणा-या मुलांमध्ये मृत्यूचे कारण बहुधा (90% वेळा) न्यूमोनिया हे असते.
  • श्वासनलिकादाह – डांग्या खोकल्यामुळे खूप चिकट घट्ट असा बेडका तयार होतो. हा बेडका मुलाला खोकून काढता आला नाही तर तो अडकून बसतो. त्यामुळे जंतुदोष होण्याची शक्यता असते.
  • कान फुटण्याचा प्रकार कानाघ नळीतला दाब वाढल्यामुळे आणि जंतुदोषाने होतो.
  • सुप्तावस्थेतील क्षयरोग (क्षयरोगाचे पहिले घर) बळावतो.
  • गुदमरल्यामुळे इतर परिणाम होतातः उदा. झटके येणे,
  • निरनिराळया अवयवात रक्तस्राव होऊ शकतो. (घोळणा फुटणे, डोळयात रक्त साकळणे)
  • हर्निया, गुदाशय बाहेर पडणे

परंतु या आजाराची  लस टोचल्यावर हा आजार होत नाही.  त्रिगुणी लसटोचणी पासून या रोगाचे प्रमाण घटले आहे.

रोगनिदान

डांग्या खोकल्याची उबळ व टिकून राहणारा खोकला ह्याच रोगनिदानाच्या सर्वात महत्त्वाच्या खुणा आहेत.

उपचार

उपचारासाठी डॉक्टरकडेच पाठवावे.

  • इरिथ्रोमायसिन ने आजार थोडा कमी पडतो, पण पूर्ण बरा होत नाही. हे औषध डॉक्टरने सांगितले तरच द्यावे.
  • खोकला दाबण्यासाठी काही औषध मिळते.  याचा काही प्रमाणात उपयोग होऊ शकेल. परंतु हा आजार एकदा झाल्यावर काही आठवडे, महिने टिकून राहतो, औषधोपचारांनी विशेष फरक पडत नाही.

हा आजार होऊच नये म्हणून वेळीच मुलांना त्रिगुणी लस टोचून घ्यावी.

आयुर्वेद

अडुळशाची 10-15 पाने वाफवून रस काढावा. 10-15 मिली. रस मधासोबत द्यावा.

सितोपलादी चूर्ण + ज्येष्ठमधपावडर मधासोबत द्यावे. लहान मुलांसाठी एका वेळी 250 मि.ग्रॅ ते 500मि.ग्रॅ दिवसभरात 3-4 वेळेस द्यावे. मोठया माणसांसाठी अर्धा ते एक ग्रॅम 3-4 वेळेस द्यावे.

बाळ दमा (Childhood Asthma)

बाळदमा  किंवा बालकांचा अस्थमा हा श्वसनमार्गांचा एक दीर्घकालीन दाहजन्य (chronic inflammatory) आजार आहे. या आजारात श्वसनमार्ग नालिका अरुंद होतात आणि श्वास घेण्यास त्रास होतो. भारतात बालकांमध्ये हा आजार बराच आढळतो योग्य उपचाराने नियंत्रणात ठेवता येतो.

बालदमा आजाराची मुख्य लक्षणे म्हणजे वारंवार खोकला, श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज (wheezing), छातीत कोंडलेपणा जाणवणे आणि श्वास घेण्यास त्रास. ही लक्षणे विशेषतः रात्री, सकाळी किंवा धूळ, धूर, थंड हवा, संसर्ग किंवा व्यायामानंतर वाढू शकतात. काही मुलांमध्ये सर्दी झाल्यानंतर खोकला व श्वासाचा त्रास जास्त होतो.

अस्थमा होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. अॅलर्जी, धूळ, धूर, प्रदूषण, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, कुटुंबातील अस्थमाचा इतिहास ही सामान्य कारणे आहेत. काही वेळा हवामानातील बदल किंवा श्वसन संसर्गामुळेही अस्थमाचे झटके येऊ शकतात.

निदान प्रामुख्याने लक्षणांवर आणि वैद्यकीय तपासणीवर आधारित असते. मोठ्या मुलांमध्ये स्पायरोमेट्री चाचणी करून श्वसन कार्य तपासले जाऊ शकते.

उपचारामध्ये मुख्यतः इनहेलरद्वारे औषधे दिली जातात. यामध्ये ब्रॉन्कोडायलेटर औषधे श्वसनमार्ग मोकळे करतात, तर स्टेरॉईड औषधे दाह कमी करतात. लहान मुलांमध्ये स्पेसर किंवा नेब्युलायझर वापरणे उपयुक्त ठरते.

मोठया माणसांप्रमाणे लहान मुलांनाही दमा होऊ शकतो. याला बाळदमा म्हणतात. यासाठी पोट उडणे, डबा, इत्यादी नावेही आहेत. बाळदमा वयाच्या सहा महिन्यांनंतरच येतो. याआधी दम लागण्याचा आजार दिसल्यास न्यूमोनिया गटातला आजार आहे असे समजा.

सहा महिन्यांनंतर येणारा दमाही दोन प्रकारचा असतो. पहिल्या प्रकारचा बाळदमा पाच वर्षानंतर आपोआप नाहीसा होतो. मात्र दुसरा प्रकार पाच वर्षानंतरही टिकून राहणारा असतो. बाळदमा असणा-या बाळाच्या रक्ताच्या नातेवाईकांत (आई, वडील, भाऊ, बहीण, काका, मामा, मावशी, आत्या, आजोबा, आजी, इ.) दम्याचा विकार असल्यास त्या बाळाचा दमा कायमचा विकार होण्याची शक्यता असते. मात्र बाळदमा कोणत्या प्रकारचा आहे हे आधी ठरवणे अवघड आहे.

बाळ दमा कारणे
  • पन्नास टक्के बाळदम्यांमध्ये आनुवंशिकता हे कारण असते.
  • आनुवंशिक आणि वावडेजनक कारणांच्या संयोगाने बाळदमा होतो. हवाप्रदूषणानेही बाळदमा उद्‌भवतो. विषाणूंमुळे येणाऱ्या सर्दीतापानेही बाळदमा सुरू होऊ शकतो. पावसाळी किंवा हिवाळी हवेत बाळदमा जास्त आढळतो
  • वावडे, विषाणुदाह, राग-दु:ख, इत्यादी भावना यांमुळे अशा मुलांना दम्याची सुरुवात होऊ शकते. आनुवंशिक नसणारा बाळदमाही वावडे (धूळ,धूर, परागकण, दमट हवा ) किंवा फुप्फुसाच्या विषाणुदाहामुळे होऊ शकतो.
  • दम्यामध्ये श्वासनलिका अरुंद होणे, आतल्या आवरणाला सूज येणे आणि चिकट पाझराने बेडका तयार होणे या तीन प्रमुख प्रक्रियांमुळे हवेचा मार्ग अरुंद होतो. यामुळे श्वसनास जास्त श्रम लागतात. यामुळे धाप लागणे, श्वास वेगाने चालणे, खोकला, इत्यादी लक्षणे दिसतात.
  • याबरोबर ताप असल्यास विषाणू किंवा  जिवाणूदाह हे तापाचे कारण असू शकेल.
  • दम्याची तीव्रता कमी-जास्त असू शकते.
रोगनिदान
  • बाळदम्यात धाप, दम लागणे, जड खोकला ही मुख्य लक्षणे असतात.
  • थोडा ताप असू शकतो पण खूप ताप असेल तर न्यूमोनियाची शक्यता लक्षात ठेवावी.
  • धाप-दम लागण्याचा त्रास वारंवार होण्यावरून बाळदम्याचे निदान निश्चित करता येते.
  • न्यूमोनियातही दम्यासारखा त्रास होतो हे लक्षात ठेवा.
लक्षणे आणि चिन्हे
  • बालकाला सर्दी, शिंका अशा त्रासाने सुरुवात होते.
  • यानंतर श्वास घेणे अवघड होऊन छातीचा आवाज यायला लागतो.
  • श्वसन उथळ आणि जलद होते, नाकपुड्या फुलतात.
  • मूल मोठे असेल तर छाती दाटल्याचे सांगते.
  • खोकल्याची मधून मधून उबळ येते.
  • श्वास सोडताना शिट्टीसारखा आवाज येतो.
  • बाळदमा अधून मधून येतो. मात्र दरम्यान मुलाची तब्येत ठीक-ठाक असते.
  • लहान वयाची बालके बाळदम्याच्या श्वसनाच्या त्रासाने रडतात.त्यामुळे बाळ खूप रडत असेल तर खूप छाती भरली असण्याचीही शक्यता असते.
  • दम लागल्याने पोट उडताना (हाबके मारताना) दिसते.
  • जास्त त्रास असल्यास ओठ आणि हाताची त्वचा निळसर दिसते.
  • न्यूमोनियात जसा सुरुवातीपासून ताप असतो तसा बाळदम्यात नसतो. पण ताप 2-3 दिवसांनी येऊ शकतो.
प्राथमिक वैद्यकीय उपचार

उलटी करवणे हा घरगुती आयुर्वेदिक उपाय ब-याच वेळा उपयोगी पडतो. यासाठी वेखंड मधात उगाळून त्याचे चाटण दिल्यास उलटी होते. त्यातून चिकट स्त्राव पडून जातात आणि दमा कमी होतो. याने काही फरक न पडल्यास सालबुटामोल (औषध किंवा गोळी) औषध चांगले उपयोगी पडते. या औषधांनी श्वासनलिका रुंद, मोकळया होतात. यामुळे श्वसन सोपे होते.

ताप  असल्यास पॅरासीटामॉल द्यावे. पण मुख्यत्वे करून श्वासमार्ग मोकळा करणारी औषधे द्यावीत. तसेच बीटामिथासोन आणि लीवोसालबुटॅमॉल या मिश्रणाची वाफ द्यावी यासाठी नेबुलायझर ,रोटाहेलर पंप किंवा एरोसोल  वापरता येतो. जेणेकरून तत्काळ आराम मिळू शकतो.

मात्र अशा उपायांनी बाळदमा बरा होत नसेल तर वरील उपचार देऊन डॉक्टरकडे पाठवून द्यावे. रुग्णालयात यासाठी वेगवेगळ्या औषधी वाफारा दिला जातो. काही औषधे शिरेतून दिली जातात.याने ताबडतोब आराम पडतो.

प्रिय पालकांनो आपल्या बाळाला वारंवार खोकला आणि दम लागत असेल पण ताप नसेल तर तो बाळदमा आहे असे समजा. बाळदमा वयाच्या 1-5 वर्षांपर्यंत येऊ शकतो.

  • बाळदम्याचा पहिलाच प्रसंग असेल तर बाळाला ताबडतोब डॉक्टरांकडे न्या. डॉक्टर तातडीक उपचार करतील तसेच घरी घेण्यासाठी औषधे सांगतील.
  • बाळदम्यात सामान्यपणे इंजेक्शन आणि सलाईनची गरज नसते. श्वसनमार्गातून औषध योग्य ठिकाणी बरोबर पोहोचते.त्रास तीव्र स्वरूपाचा असेल तर त्यांची गरज लागू शकेल, तुमचे डॉक्टर तसा इलाज सांगतील.
  • तोंडाने घ्यायच्या गोळ्यादेखील श्वासमार्ग मोकळा ठेवायला मदत करतात.

तातडीक उपचारांमध्ये तीन स्वरूपात औषधे मिळतात.

अ) 100 डोसचे फवारे असलेला एरोसोल स्प्रे. या स्प्रेतून दर वेळी ठरावीक मात्रेत औषध बाहेर येते. फवाऱ्याचा खटका दाबणे आणि श्वास घेणे एकाच वेळी करावे लागते. बालकांना हे जमत नसल्याने स्पेसरचा उपयोग करावा लागतो. आपले डॉक्टर आपल्याला याबद्दल सांगतील.घरगुती स्पेसर प्लास्टिक कपला तळालाछेद देऊन तयार करता येतो. हे औषध घरीपण वापरता येते.स्पेसरच्यावापरामुळे योग्य डोस बाळाच्या श्वासमार्गात पोहोचतो.

ब) रोटाहेलर या प्रकारात औषधाच्या कॅपशूलमध्ये पावडर असते. हा प्रकार जास्त स्वस्त पडतो.थोड्या मोठ्या वयानंतर याचा वापर जमू शकतो.

क) रुग्णालय किंवा दवाखान्यात नेब्यूलायझर वापरतात.घरगुती वापरासाठी सुद्धा नेब्युलायझर उपलब्ध आहेत.यामध्ये बरीच द्रव स्वरूपातील औषधे वापरता येतात व ती सहज उपलब्धही आहेत. आजकाल नेब्यूलायझरची किंमत खूपच आवाक्यात आहे त्यामुळे आपल्या बाळाला वारंवार त्रास होत असेल तरच आपण नेब्यूलायझर विकत घेणे योग्य होईल.

घरी उपचार घ्यायचा असला तरी आपल्या डॉक्टरांना फोनवर कळवावे हे चांगले.  बऱ्याचदा स्पेसर सोबत त्याचे माहिती पत्रक येते त्याचा योग्य उपयोग करून घ्यावा.

काही तपासण्या
  • बाळदमा कोणत्या पदार्थाच्या वावड्यामुळे येतो हे शोधण्यासाठी वावडे तपासणी करावी.
  • त्याच प्रमाणे एक डायरी लिहिली पाहिजे. एकदा त्रास सुरू झाल्यानंतर त्याच्या आधीच्या दोन दिवसांत बाळाने काय काय खाल्ले, कुठे फिरवले, किंवा तुम्ही त्याला घेऊन कुठे गेला असाल किंवा वातावरणात बदल झाला असेल, या गोष्टी लिहून ठेवा. प्रत्येक वेळची अशी माहिती एकत्रित करून त्यात कुठला घटक समान आहेते पाहणे.  त्याचं त्यास वावडे आहे असं समजावे आणि मग बाळाचा त्या गोष्टीपासून संपर्क टाळावा , जेणेकरून तुम्ही त्याचा दमा खूपच नियंत्रित करू शकता.
  • छातीचा क्षयरोग किंवा न्यूमोनिया आहे/नाही हे तपासण्यासाठी छातीचा एक्स-रे लागू शकेल.
  • दमा 5 वर्षांनंतर टिकला तर फुप्फुसांची क्षमता तपासावी लागते. यासाठी पी.एफ.टेस्ट. करतात.
प्रतिबंध
  • ऋतूमानाप्रमाणे बाळदमा कमी-जास्त होतो. यासाठी थंडी-पावसात काळजी घ्या. ऊबदार कपडे चांगले.
  • अशा बालकांना सर्दीताप झालेल्या व्यक्तीपासून शक्यतो दूर ठेवा.
  • वावड्याचे कारण मिळाल्यास दमा टाळण्यासाठी प्रयत्न करता येतो.
  • वाढत्या हवा प्रदूषणामुळे बाळदमा वाढत आहे. धूळ आणि प्रदूषण यापासून अशा बाळांना शक्यतो सुरक्षित ठेवा.खोली ओल्या कापडाने साफ करा, धूळ टाळणे योग्य.तीव्र वासाचे पदार्थ दूर ठेवा, अगदी अत्तर, उदबत्ती सुध्धा. पाळीव प्राण्याच्या केसांचेहीवावडे असू शकते .
  • बाळदम्याची लक्षणे, चिन्हे दिसताच डॉक्टरांशी संपर्क करायला पाहिजे.
विशेष सूचना

बाळाचा त्रास जास्त तीव्रतेचा आहे हे कसे ओळखावे: वाढलेली श्वासगती, दम लागलेला दिसतो : नाकपुड्या फुलतात, श्वासासोबत डोके वर खाली होते, गळ्याचे स्नायू देखील काम करतात. ओठांचा रंग बदलतो, घाम येतो. असे काहीही दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

  • बाळदमा हा बराच काळ चालणारा आणि कमी-जास्त होणारा आजार आहे. याला कायमचा नाही पण तात्पुरता उपाय आहे.
  • पालकांना या आजाराची आणि उपचारांची नीट माहिती पाहिजे. यामुळे विनाकारण मनस्ताप, चुकीची आशा-निराशा, उगाचच भीती किंवा डॉक्टर बदलत राहणे या गोष्टींना आळा बसेल.
  • आपल्या बालकाच्या आजाराबद्दल बालवाडीच्या शिक्षिकांना सांगून ठेवा. तसेच प्रथमोपचाराची औषधे आणि आपला फोन नंबर देऊन ठेवा.
  • 5 वर्षं वयानंतर बहुतेक बालकांचा दमा आपोआप थांबतो. मात्र काहींना यानंतरही दमा चालूच राहतो.
  • श्वसनोपचार म्हणजे निरनिराळे सोपे प्राणायाम मुलांना शिकवा. फुगा फुगवण्याचा व्यायामही चांगला आहे.
  • मुलाला त्याचा नेहमीचा खेळ खेळू द्या. खेळामुळे श्वसनमार्ग मोकळा आणि निरोगी राहतो. पण सोबतच्या बॅगमध्ये औषधे ठेवायला पाहिजे.
  • अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू दमा असूनही यशस्वी झाले. पालकांनी निराश न होता योग्य काळजी घ्यावी.
  • कुडमुडे वैद्य किंवा भोंदू डॉक्टरांचा सल्ला-उपचार घेऊ नका. ही मंडळी बऱ्याच वेळेला स्टेरॉईड औषधांचा अतिरेक करतात.
  • गृहीत धरून उगाच सगळी फळं किंवा काही खाद्यपदार्थ बंद करू नये.