बालकांचे आरोग्य

दुस-या वर्षातील वाढ आणि विकास

वजन व वाढ
  • दुस-या वर्षभरात बाळाचे वजन सुमारे 2.5 किलोने वाढते, उंची 10 ते 12 से.मी. वाढते.
  • एक वर्षाअखेर मुलाच्या मेंदूची वाढ मोठया माणसाच्या मानाने दोन तृतियांश (म्हणजे 66टक्के) झालेली असते. (डोक्याचा घेर 47से.मी.) बाळाच्या डोक्याची वाढ दोन वर्षे पूर्ण होताच मोठया माणसाच्या चार पंचमांश (म्हणजे 80%) झालेली असते. (डोक्याचा घेर 49 से.मी.) दुस-या वर्षाअखेरपर्यंत एकूण 14 ते 16 दात येतात.
विकासाचे टप्पे
  • 12-13 व्या महिन्यात आधार धरून चालणारे मूल 15व्या महिन्यापर्यंत स्वतंत्रपणे चालते. 18व्या महिन्यापर्यंत मूल (दीड वर्ष) अडखळत पळू शकते.
  • दीड वर्षाच्या वयात एक हात धरून जिना चढणे बाळाला जमते. पण एक हात धरून उतरता यायला 20-21 महिने (पावणे दोन वर्षे) लागतात.
  • दुस-या वर्षामध्ये बाळाला आपल्या भोवतीची प्रत्येक गोष्ट कुतूहलाची वाटते व हाताळावीशी वाटते. या वयातील मुलांपासून धार असलेल्या किंवा इजा करू शकतील अशा गोष्टी, तसेच औषधे, खते, विषारी औषधे, इत्यादी दूर ठेवणे महत्त्वाचे असते.
  • दीड ते दोन वर्षे हळूहळू एकावर एक वस्तू ठेवून छोटा मनोरा करणे बाळाला जमू लागते. बोलण्याची सुरुवात करण्याच्या वयाबाबतीत प्रत्येक मुलात फरक पडतो. काही मुले लवकर शब्द उच्चारू लागतात तर काही उशिरा. पण दोन ते अडीच वर्षापर्यंत बहुतेक सर्व मुले छोटी वाक्ये बोलू शकतात. दीड ते दोन वर्षानंतर शू (लघवी) किंवा शी लागल्याची सूचना मूल देऊ शकते आणि या वयानंतर संडास किंवा मोरी वापरण्याबद्दल मुलांना शिकवता येते.

तीन ते पाच वर्षातील वाढ-विकास

वजन व उंची वाढण्याचा वेग तीन ते पाच वर्षे या वयामध्ये कमी असतो. प्रतिवर्षी वजनात सुमारे दोन किलो व उंचीत 2-3 इंच (सहा ते आठ सें.मी.) वाढ होते.

  • तीन वर्षानंतर मूल एकेका पायरीवर एकेक पाय ठेवून चढू शकते. पण उतरताना प्रत्येक पायरीवर दोन्ही पाय ठेवत उतरते. उतरताना एका पायरीवर एका पायाचा वापर करायला चौथ्या वर्षी जमते. पाचव्या वर्षी लंगडी घालणे जमते.
  • उतरताना एका पायरीवर एका पायाचा वापर करायला चौथ्या वर्षी जमते. पाचव्या वर्षी लंगडी घालणे जमते.
  • तिस-या वर्षानंतर आपले वय सांगणे, मुलगा की मुलगी सांगणे त्याला/तिला जमते.
  • दीड वर्षाचे बाळ मुठीत पेन्सिल धरून रेघोट्या काढते, २ ते ३ वर्षाला लूप, किंवा उभी आडवी रेघ काढू शकते.
  • चौथ्या वर्षानंतर फुलीचे चित्र काढता येते, तर पाचव्या वर्षानंतर तिरपी रेष असलेली आकृती (उदा. त्रिकोण) काढता येते.गोल & चौकोन काढता येऊ लागतात.
  • चौथ्या वर्षी मूल चार गोष्टी मोजू शकते, तर पाचव्या वर्षी पाच.
  • अडीच ते तीन वर्षांपर्यंत सर्व दुधाचे दात (पहिले दात) आलेले असतात (एकूण 20) हे दात पडून नवे यायची सुरुवात सहाव्या सातव्या वर्षी होते आणि कायमचे दात येऊ लागतात. 12-13 वर्षांपर्यंत सर्व कायमचे दात येतात. फक्त शेवटची दाढ 17 ते 21 या वर्षात येते. (एकूण दात 32).
  • वाढ व विकासाचे हे सर्व टप्पे थोडेफार पुढेमागे होऊ शकतात. उदा. जे मूल वेळेवर किंवा वेळेआधीच चालू लागते त्याच्याबाबतीत दात उशिरा येऊ शकतात किंवा बोलणे उशिरा येते. पण वाढीचे अनेक टप्पे उशिरा येत असतील, तर मात्र अधिक तपासणीची गरज असते.

लसीकरण

  • लहान मुलांचे कर्दनकाळ असलेले सहा रोग घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर, पोलिओ (पक्षाघात) रोगप्रतिबंधक लस दिल्याने टाळता येतात. याचबरोबर आता इतर काही लशी दिल्या जातात, याचा तक्ता इथे दिला आहे.
  • आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच न देणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्यकेंद्रात या लसी मोफत मिळतात. (वेळापत्रक व इतर माहिती आधुनिक औषधशास्त्र या प्रकरणात दिली आहे.)
  • प्रत्येक लस म्हणजे खुद्द त्या त्या रोगाचे मेलेले किंवा अर्धमेले केलेले जंतू असतात, किंवा त्या जंतूंचा अंश असतो. ही लस शरीरात गेली तर जणू काही त्या रोगाची रंगीत तालीमच होते. लसीत सबळ जंतू नसल्याने रोग तर होत नाही पण शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो.
  • प्राथमिक लसीकरणा नंतर रोगप्रतिकारक शक्ती टिकवून धरण्यासाठी बूस्टर डोस देतात.
IAP व भारत सरकार लसीकरण कार्यक्रम – तुलनात्मक तक्ता
वयभारत सरकार (GOI) लसीकरणIAP शिफारस केलेले लसीकरण
जन्मावेळीBCG, OPV-०, हिपॅटायटिस-BBCG, OPV-०, हिपॅटायटिस-B
६ आठवडेOPV-१, पेन्टाव्हॅलेंट-१ (DPT+HepB+Hib), रोटाव्हायरस, fIPV-१, PCV-१DTaP-१, IPV-१, Hib-१, HepB-२, रोटाव्हायरस१, PCV-१
१० आठवडेOPV-२, पेन्टाव्हॅलेंट-२, रोटाव्हायरस-२DTaP-२, IPV-२, Hib-२, रोटाव्हायरस-२, PCV-२
१४ आठवडेOPV-३, पेन्टाव्हॅलेंट-३, रोटाव्हायरस-३, fIPV-२, PCV-२DTaP-३, IPV-३, Hib-३, रोटाव्हायरस-३, PCV-३
९ महिनेMR-१ (गोवर-रुबेला), PCV बूस्टर, जीवनसत्त्व AMMR-१
१२ महिनेहिपॅटायटिस-A
१५ महिनेMMR-२, व्हेरिसेला, PCV बूस्टर
१६–२४ महिनेMR-२, DPT बूस्टर, OPV बूस्टर, जीवनसत्त्व ADTaP बूस्टर, IPV बूस्टर, Hib बूस्टर
१८ महिनेहिपॅटायटिस-A दुसरा डोस
२ वर्षेटायफॉईड कॉन्जुगेट लस
४–६ वर्षेDPT बूस्टरDTaP बूस्टर, IPV/OPV, MMR-३, व्हेरिसेला-२
९  ते १४  वर्षे एचपीवी २ डोसएचपीवी २ डोस
१० वर्षेTd Tdap / Td
१६ वर्षेTdTdap / Td
  • भारत सरकारचा कार्यक्रम सर्व मुलांसाठी मोफत व मूलभूत लसीकरण देतो.
  • IAP कार्यक्रम अधिक व्यापक असून अतिरिक्त संरक्षणासाठी काही अतिरिक्त लसी सुचवतो.
बी.सी.जी.
  • बाळाचा क्षयरोगापासून (विशेषत: मेंदूचा क्षयरोग) बचाव करण्यासाठी बी.सी.जी. उपयोगी आहे. ही लस डाव्या खांद्यावर कातडीमध्ये टोचतात. ही लस जन्मल्यावर लगेच दुस–या दिवशीही दिलेली चालेल. शक्यतो ही लस तीन–चार महिन्यांपर्यंत टोचली जावी. काही कारणांनी हे राहून गेल्यास एक वर्षापर्यंत तरी टोचून घेणे आवश्यक आहे.
  • टोचलेल्या जागी 15 दिवसांनी छोटी पुळी तयार होते. चार ते सहा आठवडयांत ही पुळी भरून येऊन बी.सी.जी. ची खू्रण तयार होते.
  • या जखमेवर कुठलेही औषध लावू नये. बी.सी.जी. टोचल्यावर त्या दिवशी आंघोळ घालू नये. तसेच एक दिवस ती जागा धुवू नये किंवा शेकू नये.

काही मुलांना बी.सी.जी. लस टोचल्यावर त्या बाजूच्या काखेत गाठी येतात. या गाठी दुख-या असतील तर त्यासाठी कोझालसारखे जंतुविरोधी औषध वापरावे लागेल. गाठी दुख-या नसतील तर तीन महिन्यांत गाठी आपोआप जिरतात. तीन महिन्यांत गाठी ब-या न झाल्या तर क्षयरोगविरोधी औषधे वापरावी लागतात.

पंचगुणी लस( पेंटावलांट  लस)

या लसीत डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, हेपटायटीस बी. इंफ्लुएंजा बी,   या पाच लसींचा समावेश आहे. त्रिगुणी लस वयाच्या तिस-या महिन्यानंतर प्रत्येक महिन्यात एकदा याप्रमाणे तीन वेळा (शक्यतो मांडीवर) टोचतात. लस टोचल्यानंतर एक दिवस ताप येतो. त्यासाठी पॅरासितामालची चतकोर गोळी किंवा तापाचे पातळ औषध द्यावे. संपूर्ण प्रतिकारशक्ती येण्यासाठी दरमहा पहिले तीन व नंतरचे बूस्टर डोस जरूरीचे आहे. शक्यतो पहिल्या दोन इंजेक्शनमधील अंतर दोन महिन्यांहून अधिक असू नये.

पोलिओ

पोलिओची लस दोन प्रकारांनी उपलब्ध आहे. OPV:तोंडाने पाजण्याची लस. यात पोलिओचे विषाणू हे खूप कमकुवत केलेले असतात,. हे डोस लाल रंगाचे थेंब असतात. बाळाला पोलिओचा पहिला डोस जन्मल्यानंतर 1/2 दिवसांत द्यावा. नंतरचे डोस त्रिगुणी लसीच्या बरोबरीने मुलांना तोंडाने पाजतात. ही लस उष्णतेने निकामी होते, म्हणून डोसच्या आधी व नंतर अर्धा तास गरम पाणी, गरम दूध देऊ नये.

पोलिओ लशीचा दुसरा प्रकार हा इंजेक्शनच्या स्वरुपात उपलब्ध आहे. मृत विषाणू वापरून ही लस बनवलेली असते. याचे तीन डोस देतात . प्रगत देशांमध्ये आता पोलिओ लस दिली जात नाही. त्रिगुणी लस व पोलिओ डोसमधील शक्ती उष्णतेमुळे नाहीशी होते. यासाठी या लसी शीतकपाटात (रेफ्रिजरेटर) ठेवाव्या लागतात. थंडाव्यात न ठेवलेले डोस देऊन न देण्यासारखे आहे कारण त्यातील काम करणारे कमकुवत जंतू नष्ट होतात.. यासाठी डॉक्टरकडे, आरोग्यकेंद्रांमध्ये मुलांना डोस दिले जातात त्या ठिकाणी चालू स्थितीतील शीतकपाट असायला पाहिजे. (काही वैद्यकीय व्यावसायिक शीतकपाटाची सोय नसतानाही तसेच हे डोस देतात. त्यामुळे बाळाचा फायदा तर होत नाहीच, पण बाळाला लस देऊन घेतल्याचे खोटे समाधान पालकांना मिळते व पोलिओचा धोकाही संभवतो.)

पल्स पोलिओ – गेली अनेक वर्षे ही मोहीम भारतभर राबवली जाते. यात तोंडाने पोलिओ थेंब पाजले जातात.

गोवर प्रतिबंधक लस

गोवर हा तसा साधा आजार असला तरी अशक्त किंवा कुपोषित मुलांमध्ये तो जीवघेणा ठरू शकतो. अशा मुलांमध्ये गोवरानंतर न्यूमोनिया, छातीत कफ (श्वासनलिकादाह) किंवा दबलेला क्षयरोगाचा आजार उफाळून येऊ शकतो. कित्येकदा या आजारानंतर हगवण, रक्ती आव लागते. यामुळे मुळात सौम्य कुपोषित असलेली मुले जास्तच कुपोषित होतात. म्हणून गोवर लस महत्त्वाची असते.

बाळाला नवव्या महिन्यात एक गोवर लसीचे इंजेक्शन व 15 व्या महिन्यात किंवा दीड वर्ष पूर्ण झाल्यावर बूस्टर (फेरडोस) इंजेक्शन द्यावे. गोवर लसीनंतर ताप किंवा गाठही येत नाही. हे इंजेक्शन त्वचेखाली देतात. या लसीसाठीही शीतकपाट आवश्यक असते.

द्विगुणी लस

यामध्ये फक्त घटसर्प व धनुर्वात प्रतिबंधक लस असते. यात डांग्या खोकल्याविरुध्दची लस नसते. कारण चौथ्या वर्षानंतर डांग्या खोकला होण्याची शक्यता कमी असते. चौथ्या वर्षाच्या बूस्टरसाठी द्विगुणी लसीची इंजेक्शने व पोलिओ डोस देतात.

काही कारणांनी मुलाला तिस-या वर्षापर्यंत कुठलीच लस दिलेली नसेल तर प्रत्येक महिन्यात एक अशी द्विगुणी लसीची तीन इंजेक्शने व पोलिओ डोस द्यावे. एक वर्षाने दोन्हींचे बूस्टर व पाचव्या वर्षी दुसरा बूस्टर द्यावा.

लसीकरणाचे वेळापत्रक

रोगप्रतिबंधक लसींनी आपले आयुर्मान वाढले आहे. देवीसारख्या रोगांचे उच्चाटन झाले आहे. पोलिओसारख्या जायबंदी करणाऱ्या आजारांपासूनही लसी संरक्षण देत आहेत. निरनिराळ्या लसीसाठी निश्चित वेळापत्रक असते. याबद्दल आता आपण माहिती घेऊ या.

मुले आणि किशोरींसाठी आणखी काही लसी


आता काही नवीन लसीमुळे विशेष आजारांविरुद्ध संरक्षण मिळू शकते. खर्चाचा विचार करून त्या घ्यायला हरकत नाही.

  • पी.सी.व्ही. 7 ही लस सहाव्या आठवड्यानंतर घ्यावी. याने न्यूमोनिया, मेनेंजायटीस आणि कानात पू होण्यापासून संरक्षण मिळते.
  • कांजिण्या लस. ही लस 15व्या महिन्यानंतर घ्यावी.
  • अ कावीळ, 18व्या महिन्यानंतर घ्यावी.
  • किशोर वयीन मुलींसाठी आणखी महत्वाची लस म्हणजे HPVलस.
  • HPV लस 
  • भारताने देशातील महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग असलेल्यागर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी, २०२६ च्या सुरुवातीला १४ वर्षे वयोगटातील मुलींना लक्ष्य करून देशव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू केली . या कार्यक्रमात क्वाड्रीव्हॅलेंट लसीच्या एकाच डोसचा वापर केला जातो आणि दरवर्षी १.१५ कोटी मुलींना ही लस दिली जाते. 
  • भारतातील एचपीव्ही लसीबद्दल प्रमुख तपशील
  • लक्ष्यित लोकसंख्या: १४ वर्षे वयोगटातील मुलींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले असून, ३ महिन्यांच्या विशेष मोहिमेअंतर्गत १.१५ कोटी मुलींना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.
  • लसीचा प्रकार: या मोहिमेत क्वाड्रीव्हॅलेंट लस (गार्डसिल-४) वापरली जाते, जी एचपीव्ही प्रकार ६, ११, १६ आणि १८ यांना संरक्षित करते.
  • मात्रा: व्याप्ती वाढवण्यासाठी, वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यासाठी आणि पुरवठ्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाकरिता एकल-मात्रेचे वेळापत्रक वापरले जात आहे
  • उपलब्धता:
  • सार्वजनिक क्षेत्र: अनेक सरकारी लसीकरण मोहिमांमध्ये मोफत.
  • खाजगी क्षेत्र: उपलब्ध, ज्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे उत्पादित, भारताने विकसित केलेली सर्व्हॅवॅक (Cervavac) ही लस समाविष्ट आहे.
  • उपलब्ध प्रकार: तीन लसींना मान्यता देण्यात आली आहे. सर्वारिक्स, गार्डसिल आणि गार्डसिल-९.
  • खर्च: जरी सरकारी योजना मोफत असली तरी, सर्व्हवॅकसारखे खाजगी बाजारातील पर्याय उपलब्ध आहेत, ज्यातील काही पर्यायांची किंमत प्रति डोस सुमारे ₹2000 आहे.
  • लसीकरण वेळापत्रक (खाजगी): 9-14 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी 2-डोसचे वेळापत्रक (0, 6 महिन्यांनी 0.5 मिली) दिले जाते., तर 15-26 वर्षे वयोगटातील व्यक्तींना 3-डोसचे वेळापत्रक (0, 2, 6 महिन्यांनी 0.5 मिली) दिले पाहिजे.
  • देण्याची पद्धत: स्नायूमध्ये, सामान्यतः दंडात.
  • सुरक्षितता: ही लस सर्वसाधारणपणे सुरक्षित असून, इंजेक्शन दिलेल्या जागी वेदना, डोकेदुखी किंवा सौम्य ताप यांसारखे सौम्य सामान्य दुष्परिणाम असू शकतात .
  • संमती: लसीकरण ऐच्छिक असून, शाळा-आधारित/निर्दिष्ट स्थळांवरील लसीकरण मोहिमांसाठी पालकांची माहितीपूर्ण संमती अनिवार्य आहे. 
  • महत्त्व:
    भारतात एचपीव्ही लस अत्यंत महत्त्वाची आहे कारण ती गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळू शकते, ज्यामुळे देशात दरवर्षी अंदाजे ८०,००० मृत्यू होतात. ही लस उच्च-जोखमीच्या एचपीव्ही स्ट्रेन्स (प्रकार १६ आणि १८) विरुद्ध अत्यंत प्रभावी (९३-१००%) आहे. 
विशेष सूचना
  • सरकारी लसी सर्व मुलांना मोफत उपलब्ध आहेत. आरोग्यकेंद्रात लसीकरणाचे छापील वेळापत्रक आणि माहिती मिळेल.
  • प्रत्येक लसीच्या वेळेला आरोग्य कर्मचारी व डॉक्टर सांगतील तो सल्ला नीट समजून त्याप्रमाणे काळजी घ्या.
  • काही लसीनी सौम्य ताप येतो. याने काळजीचे कारण नाही. शंका असल्यास आरोग्यसेवकांना विचारा.
  • सर्व लसी विशिष्ट थंड तपमानात राखाव्या लागतात. नाहीतर त्या निकामी होतात. शीतकरणाबद्दल शंका वाटत असेल तर आरोग्यसेवक-डॉक्टर यांना विचारून खात्री करा.
  • एखादी लस घ्यायला उशीर झाला तर आरोग्यसेवकांना विचारा. ते तुम्हाला लस कधी घेता येईल हे सांगतील.
  • लसीकरणाबरोबर मुलांना अ जीवनसत्वाचा डोसपण दिला जातो. हा डोस दर 6 महिन्यांनी घ्यायचा असतो. पण वेळापत्रकामुळे तो 6 महिने, एक वर्ष, दीड वर्ष याचवेळी दिला जातो. या जीवनसत्वामुळे बालकाचे डोळे निरोगी राहतात आणि प्रतिकारशक्ती वाढते.
  • आपल्या गावातल्या, वॉर्डातल्या 100% बालकांचे लसीकरण झाले पाहिजे.