बोटातून किंवा नीलेतून रक्तनमुना घेऊन त्यातील रक्तद्रव्याचे प्रमाण तपासता येते. याच्या पध्दती अनेक आहेत. प्रत्येक पध्दतीत येणा-या उत्तरांमध्ये थोडा थोडा फरक असतो.
भारतामधील लोह भरपाई कार्यक्रम (Iron Supplementation Program in India)
भारत सरकारने अॅनिमिया मुक्त भारत (Anemia Mukt Bharat) हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला आहे, हा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा (NHM) एक भाग आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध वयोगटांसाठी लोह व फॉलिक अॅसिड (IFA) पूरकता दिली जाते:
या कार्यक्रमात कृमिनाशक औषध (Albendazole), पोषण शिक्षण, आणि हिमोग्लोबिन तपासणी यांचाही समावेश आहे. शाळा, अंगणवाडी व आरोग्य केंद्रांमार्फत हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो.
अॅनिमिया (रक्ताल्पता) हा केवळ लोहाच्या कमतरतेमुळेच होत नाही, तर प्रथिनांच्या कमतरतेमुळेही तो वाढू शकतो. प्रथिने शरीरातील अनेक महत्त्वाच्या जैविक प्रक्रियांमध्ये आवश्यक असतात, विशेषतः रक्तनिर्मितीत (hematopoiesis).
प्रथम, हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी प्रथिने आवश्यक असतात. हिमोग्लोबिन हा ग्लोबिन (प्रथिन) आणि हीम (लोहयुक्त भाग) यांचा बनलेला असतो. त्यामुळे प्रथिनांची कमतरता असल्यास ग्लोबिन तयार होण्यात अडथळा येतो आणि परिणामी हिमोग्लोबिन कमी होते.
दुसरे म्हणजे, अस्थिमज्जेत (bone marrow) लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी प्रथिने गरजेची असतात. प्रथिनांच्या अभावामुळे RBC निर्मिती मंदावते, ज्यामुळे अॅनिमिया निर्माण होतो.
तिसरे म्हणजे, प्रथिने लोहाच्या वहनात मदत करतात. ट्रान्सफेरिन (transferrin) आणि फेरीटिन (ferritin) ही लोह वाहून नेणारी व साठवणारी प्रथिने आहेत. प्रथिनांची कमतरता असल्यास लोहाचा योग्य वापर होत नाही, जरी शरीरात लोह उपलब्ध असले तरी.
तसेच, प्रथिनांची कमतरता असल्यास आतड्यांमधून लोहाचे शोषण (absorption) कमी होते आणि रोगप्रतिकारशक्तीही कमी होते, ज्यामुळे संसर्ग वाढून अॅनिमिया अधिक गंभीर होऊ शकतो.
कुपोषण (protein-energy malnutrition) असलेल्या मुलांमध्ये अॅनिमिया अधिक प्रमाणात दिसतो, कारण त्यांना प्रथिने व लोह दोन्हीची कमतरता असते.
अशा प्रकारे, अॅनिमिया टाळण्यासाठी केवळ लोह नव्हे तर पुरेशी प्रथिने असलेला संतुलित आहार (दूध, डाळी, अंडी, कडधान्ये) अत्यंत आवश्यक आहे.
आर्सेनिकम, बेलाडोना, कल्केरिया फॉस, फेरम फॉस, हेपार सल्फ, लॅकेसिस, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, फॉस्फोरस, पल्सेटिला, सेपिया, सिलिशिया, सल्फर
प्रत्येक मिली. रक्तामध्ये तांबडया रक्तपेशींची संख्या सुमारे 50 लाख असते.
या पेशींची निर्मिती कमी वेगाने आणि विघटनाचे प्रमाण त्यापेक्षा जास्त असेल तर एकूण पेशींची संख्या कमी होते. यामुळे रक्तपेशींची ‘टंचाई’ तयार होते.
अशी विविध कारणे असल्यामुळे रक्तपांढरीमागचे कारण ओळखून त्यावर उपचार होणे आवश्यक आहे.
रक्तद्रव्य तयार करण्यासाठी लोह, प्रथिने आणि ‘ब’ जीवनसत्त्व हे प्रमुख घटक लागतात. यातील कोठलाही घटक कमी पडला तर रक्तद्रव्य पुरेसे तयार होत नाही. यामुळे प्रत्येक तांबडया पेशीत रक्तद्रव्य कमी प्रमाणात आढळते. या घटकांचा अन्नातून पुरेसा पुरवठा न होणे, हे रक्तपांढरीचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.
लोह म्हणजे लोखंड. हिरव्या पालेभाज्या, कोंडयासहित धान्य, कडधान्ये, प्राण्यांचे मांस, यकृत यांत विशेष लोह असते. पण स्वयंपाकात लोखंडाची भांडी (तवा, कढई, उलथने, लोखंडी चाकू) वापरतात, त्यापासून काही प्रमाणावर लोहाचा पुरवठा होतो. शरीरात जुन्या रक्तपेशी मोडल्यानंतर निघणारे लोह परत वापरले जाते. म्हणूनच सहसा लोहाची कमतरता होऊ नये. भारतीय शाकाहारी जेवणात लोहाचे प्रमाण कमी असते. त्यातच काही शाकाहारी घटकांमुळे आहे त्या लोहाचे पचन शोषण नीट होत नाही. उदा. कोबी, चहा, इ. पदार्थांनी आहारातले लोह वाया जाते. म्हणून जेवणानंतर अर्धातास चहा घेऊ नये.
आणखी एक म्हणजे सतत, वारंवार रक्तस्राव असेल तर लोहाचा पुरवठा कमी पडतो. (उदा. मासिक पाळीतून होणारा रक्तस्राव, मूळव्याध किंवा हुककृमींमुळे होणारी रक्तातील घट). हुककृमी (आकडेकृमी) या आतडयाच्या आतील आवरणाला जळवांप्रमाणे चिकटून राहतात व रक्त पीत राहतात. दीर्घकाळ हुककृमी राहिल्या तर त्यामुळे रक्तपांढरी होण्याची शक्यता असते. या कारणांमुळे स्त्रिया आणि मुलांमध्ये रक्तपांढरीचे प्रमाण जास्त असते.
कोठल्याही पेशी तयार होण्यासाठी मुख्य वस्तू म्हणून प्रथिनांची गरज असते. प्रथिने म्हणजे शरीराच्या बांधणीतल्या दगड-विटा आणि चुना-सिमेंट असतात. तांबडया रक्तपेशींच्या निर्मितीसाठीही प्रथिने लागतात. कुपोषणात रक्तपांढरी हा एक सामान्य घटक असतो. सर्वांगसूज (कुपोषण) झालेल्या मुलांमध्ये रक्तपांढरी हमखास आढळते.
‘ब’ जीवनसत्त्वांपैकी एक घटक – फोलिक ऍसिड – भाजीपाल्यात आढळणारा आहे. हिरव्या भाज्यांचे प्रमाण आहारात पुरेसे नसेल तर रक्तद्रव्यांची निर्मिती कमी प्रमाणात होते.
आपल्या शरीरात एकूण सुमारे 5 ग्रॅम लोह असते. यातले बहुतेक लोह रक्तद्रव्यात असते.
रक्तद्रव्यात लोह असते ते प्रत्येक पेशीतल्या ऊर्जावापर प्रक्रियांमध्ये लागते. त्यामुळे लोहकमतरता ही दुहेरी नुकसान करते.
निरोगी अवस्थेतले रक्तद्रव्याचे प्रमाण आणि रक्तपांढरीतले रक्तद्रव्याचे प्रमाण यांचा तक्ता आधीच दिला आहे.
रक्तद्रव्याची कमतरता हळूहळू अनेक महिने तयार होत राहिली तर शरीर त्याला सरावते. यामुळे सहसा याची लक्षणे जाणवत नाहीत. थोडा थकवा जाणवतो. तरी औषधोपचार लागावा इतका त्रास जाणवत नाही. वरवर निरोगी दिसणा-या ब-याच स्त्रियांच्या बाबतीत रक्तद्रव्य 8 ते 10 इतक्या कमी प्रमाणात आढळते.
रक्तद्रव्याचे प्रमाण आठच्याही खाली गेले तर मात्र बहुधा लक्षणे जाणवतात. निस्तेजपणा, (फिकटपणा) थकवा, दम लागणे ही सुरुवातीची लक्षणे असतात. रक्तद्रव्याचे प्रमाण फार कमी असेल तर छातीत धडधडणे, पायावर सूज, सतत आजार, जंतुदोष होत राहणे, इत्यादी त्रास जाणवतो.
मात्र हीच कमतरता अचानक तयार झाली (उदा. रक्तस्राव, तीव्र जंतुदोष, इ.) तर त्रास जाणवतो. हिवतापानंतर येणारा थकवा याच कारणामुळे येतो.
माती खाण्याची इच्छा हे लक्षण स्त्रियांना जाणवते. काही मुले माती खातात हे उघड लक्षण असते.
निरोगी अवस्थेत डोळयांच्या पापण्यांच्या आतील लालसरपणा व नखांचा लालसरपणा सहज लक्षात येतो. याउलट रक्तपांढरी असेल तर नखे व डोळयातील आवरण निस्तेज, पांढुरके, फिकट दिसतात. या आजारात जिभेचा लालसरपणा जाऊन तीही फिकट, गुळगुळीत दिसते.

सकस आहार, हिरव्या पालेभाज्या, अळीव, गूळ, नाचणी, स्वयंपाकात लोखंडी वस्तूंचा वापर यातून रक्तपांढरी टळू शकते. जेवणात लिंबू वापरल्याने लोह चांगले पचते.
शरीरात इतर काही आजार, कृमी असल्यास त्यावर उपचार होणे आवश्यक आहे. मुलाना दर सहा महिन्यांनी जंताचे औषध द्यावे. यासाठी अंगणवाडीत आणि शाळेत दरवर्षी 10 फेब्रुवारी आणि 10 ऑगस्ट या तारखा ठरलेल्या असतात.
गर्भवती किंवा अंगावर पाजणा-या मातांना शासकीय आरोग्य केंद्रातर्फे फेरसच्या 100 गोळया रोज एक याप्रमाणे दिल्या जातात. खरे म्हणजे 200 गोळया देण्याची गरज असते. नेहमीच्या आहाराला पूरक म्हणून या गोळयांचा चांगला उपयोग होतो.
पाच वर्षाखालील मुलांसाठी फेरसच्या निम्म्या शक्तीच्या गोळया किंवा पातळ औषध मिळते. तेही 100 दिवस घ्यायचे असते.
रक्तपांढरीचे व इतर जीवनसत्त्वांच्या अभावाचे आपल्या देशात प्रचंड प्रमाण आहे. हे पाहून अनेक कंपन्यांनी टॉनिकच्या बाटल्यांचा औषधाच्या बाजारपेठेत पूर आणला आहे. ही टॉनिके महाग आणि त्यामानाने कमी उपयोगी असतात. त्यांतल्या कित्येकांत पुरेशी औषधेही नसतात. चांगली चव आणि डॉक्टर मंडळींचा पाठिंबा या बळावर टॉनिकांच्या व्यापारात कंपन्यांनी प्रचंड नफा मिळवला आहे. फेरस गोळया याच योग्य आणि वाजवी आहेत. इतर टॉनिके, द्रवरूप औषधांचा विशेष उपयोग नसतो.