रक्ताचे चार प्रमुख गट आहेत. (ए, बी, एबी आणि ओ) हे गट रक्तात असलेल्या विशिष्ट घटकांप्रमाणे केलेले आहेत. या ए, बी घटकांशिवाय ‘आर-एच’ नावाचा एक घटकही सुमारे 85 टक्के व्यक्तींत असतो. अशा व्यक्तींच्या रक्तगटाला + (पॉझिटिव्ह) म्हणतात. ज्या व्यक्तींत हा घटक नसतो त्याला – (निगेटिव्ह) म्हणतात. मराठीत धन (+) व ऋण (-) असे शब्द वापरता येतील.
एखाद्याचे रक्त दुसऱ्या व्यक्तीला चालणे किंवा न चालणे म्हणजे काय हे आता समजावून घेऊ या. रक्तात एखादा पदार्थ गेला की त्यावर प्रथिनांच्या कणांचा हल्ला होतो. या न्यायाने A गटाच्या व्यक्तीस B गटाचे रक्त दिल्यास B पदार्थावर हल्ला होईल. कारण निसर्गतः A गटाच्या व्यक्तीत B घटक सापडत नाही. सुरुवातीस हे काही प्रमाणात खपून जाते. नंतर मात्र अशी चूक झाल्यास वरीलप्रमाणे मोठा घोटाळा होतो. म्हणून सर्वसाधारणपणे रक्त द्यायचे झाल्यास त्याच एका गटाचे रक्त चालते. उदा. ए + (पॉझिटिव्ह) व्यक्तीला रक्त द्यायचे असल्यास ए + लागते. B+ve व्यक्तीला B+ve रक्त चालते. दुसरे रक्त दिल्यास रक्तात गाठी होऊन मृत्यू येऊ शकतो.
ओ – रक्तात कोठलाच घटक नसतो. त्यामुळे हे रक्त कोणालाही दिले तर चालते.
| व्यक्ती | कोणत्या गटाचे रक्त चालते |
| A+ | A+ve किंवा O+ve किंवा O-ve |
| B+ | B+ve किंवा O+ve किंवा O-ve |
| AB+ | A, B, AB O+ve किंवा O-ve |
| O+ | O+ O-ve |
| O- | O- फक्त O-ve |
| A- | A-ve किंवा O-ve |
| B- | B-ve किंवा O-ve |
| AB- | AB- किंवा O-ve |
‘एबी पॉझिटिव्ह’ या व्यक्तीला कोणाचेही रक्त चालते. हे दोन अपवाद सोडल्यास सर्वसाधारणपणे विशिष्ट गटाचे रक्तच द्यावे लागते. काही गटांचे रक्त (उदा. ए-) दुर्मिळ असते.

रक्तदान व रक्त भरणे हे शब्द आपण ऐकलेले असतात. प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर रक्त असते. आपल्या आयुष्यात काही वेळा रक्त भरण्याची गरज लागू शकते.
रक्तदान हे या दृष्टीने खरेच जीवदान आहे.
रक्तदान करणारी व्यक्ती निरोगी असणे आवश्यक आहे. यासाठी रक्तद्रव्याचे प्रमाण निदान 10 ग्रॅम च्या वर असावे. तसेच गेल्या सहा महिन्यांत कावीळ किंवा विषमज्वर झालेला नसावा. एड्स व सांसर्गिक आजार नाही याची खात्री करावी लागते. मात्र तरीही एड्सचा धोका पूर्णपणे टळत नाही (याचे कारण विंडो पीरियड). यानंतर अशा व्यक्तीचे सुमारे 250 मि.ली. रक्त काढून घेतले जाते. लगेच गरज नसेल तर ते 4 सेंटीग्रेड तपमानात थंड ठेवले जाते. गरज पडेल तेव्हा हे रक्त शरीराच्या तपमानाच्या जवळ आणून योग्य गटाच्या व्यक्तीला देण्यात येते.
रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात फार भीती आहे. पण ही भीती पूर्णपणे अनाठायी आहे. शरीरातल्या एकूण रक्ताच्या फक्त पाच टक्के रक्त काढले जाते. शस्त्रक्रियेच्या वेळी बरेच नातेवाईक रक्तदानास घाबरतात. अपरिचित व्यक्तीकडून रक्तदानातून काही सांसर्गिक आजार पसरण्याची शक्यता असते. (कावीळ, एड्स, इ.) या धोक्यामुळे व्यावसायिक रक्तदात्यांकडून रक्त घेतले जात नाही. रक्तदान शिबिरातून किंवा निरोगी व्यक्तीकडून रक्त घेतले जाते.
रक्तदानानंतर त्यातले काही रक्त घटक वेगळे केले जातात. काही रुग्णांना पूर्ण रक्त देण्याऐवजी विशिष्ट घटक द्यावे लागतात. याला इंग्रजीत कंपोनंटस् असे नाव आहे. पुढीलप्रमाणे घटक वेगळे केले जातात. – तांबडया रक्तपेशी, ग्रॅन्युलोसाईट (पांढ-या पेशी), प्लाझ्मा, प्लेटलेट्स (रक्तकणिका)
बाहेरून रक्त देण्याचे काही धोकेही असतात.
चुकीच्या गटाचे रक्त भरले गेले तर रक्त गोठण्याची क्रिया चालू होऊन मृत्यू येण्याची शक्यता असते. अशा रुग्णाला सुरुवातीस थोडे रक्त गेल्यानंतर लगेच थंडी वाजणे, अस्वस्थता, मळमळ, उलटी, इत्यादी त्रास होतो. त्यानंतर छाती, कंबर यांत वेदना चालू होते. नाडी आणि श्वसनाचा वेग वाढतो. रक्तदाब कमी कमी होत जातो आणि रुग्ण दगावण्याची शक्यता असते. रुग्ण वाचला तर काही वेळाने कावीळ होते. लघवीत लालसरपणा उतरतो (रक्तद्रव्य). कदाचित मूत्रपिंडाचे कामकाज बंद पडू शकते. लवकर निदान झाले तर धोका टाळणे शक्य असते.
अनेक सांसर्गिक आजारांचा (एड्स, कावीळ) थोडा का होईना धोका असल्याने नातेवाईक, मित्रमंडळी यांचेच रक्त देणे केव्हाही चांगले.
एड्स या गंभीर आजाराच्या धोक्यामुळे रक्ताची एड्स विषयक तपासणी करणे अनिवार्य ठरले आहे. यासाठी एलिझा तपासणी करतात. तपासणीचा खर्चही येतो, त्यामुळे रक्त देणे खर्चीक झाले आहे. पण या गोष्टीला सध्या तरी पर्याय नाही. याचबरोबर कावीळ (हेपाटायटिस बी) यासाठीही तपासणी केली जाते. रक्तदानानंतर हे दोन ‘आजार नाहीत’ असा निष्कर्ष निघाला तरच त्या व्यक्तीचे रक्त वापरासाठी स्वीकारले जाते. एक धोरण म्हणून त्या व्यक्तीस सदर निर्णय सांगितला जात नाही. असे करणे धोक्याचे असले तरी रक्तदान यंत्रणेने मुद्दाम असा निर्णय घेतला आहे. नाहीतर एड्स चाचणी घेणा-यांची गर्दी झाली असती. तसेच यामुळे एड्सबद्दल तपासणी होते म्हणून काही रक्तदाते मागेही राहिले असते.
रक्त संक्रमण (Blood Transfusion) ही जीवन वाचवणारी वैद्यकीय प्रक्रिया आहे. भारतात रक्तसंकलन, साठवण, तपासणी आणि वितरण यांचे नियमन करण्यासाठी औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० (Drugs and Cosmetics Act, 1940) अंतर्गत नियम लागू आहेत. या कायद्यानुसार रक्तपेढी (Blood Bank) चालवण्यासाठी परवाना आवश्यक असतो. रक्तपेढींनी ठरवलेल्या मानकांनुसार स्वच्छता, उपकरणे, प्रशिक्षित कर्मचारी आणि गुणवत्ता नियंत्रण पाळणे बंधनकारक आहे.
रक्तदान स्वेच्छेने, नि:स्वार्थपणे आणि सुरक्षित पद्धतीने व्हावे यावर कायदा भर देतो. विक्रीसाठी रक्त घेणे किंवा देणे बेकायदेशीर आहे. दात्याची योग्य तपासणी करूनच रक्त स्वीकारले जाते, ज्यात हिमोग्लोबिन पातळी, वैद्यकीय इतिहास आणि संसर्गजन्य आजारांची चाचणी (जसे HIV, हेपाटायटिस B/C, मलेरिया, सिफिलिस) केली जाते. यामुळे प्राप्तकर्त्याला सुरक्षित रक्त मिळते.
रक्त घटक विभाजन (components) जसे पॅक्ड सेल्स, प्लाझ्मा, प्लेटलेट्स यांचा योग्य वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते. रुग्णालयांनीही परवानाधारक रक्तपेढ्यांमधूनच रक्त घ्यावे लागते. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड व शिक्षा होऊ शकते.
या कायद्यामुळे रक्त संक्रमण सुरक्षित, पारदर्शक आणि दर्जेदार राहते, ज्यामुळे रुग्णांचा जीव वाचवण्यास मोठी मदत होते.
रक्तस्रावामागे अनेक प्रकारची कारणे आढळतात. इतर उपचाराबरोबर अडुळसा रस व गूळ किंवा साखर देऊन उपयोग होऊ शकेल. यासाठी अडुळसा पानांचा रस तयार करावा लागतो. रस तयार करण्यासाठी 12-15 अडुळसा पाने वाफवून, वाटून रस काढावा. यात सुमारे 15-20 मि.ली. रस आणि त्याबरोबर चमचाभर खडीसाखर (किंवा गूळ किंवा साखर) मिसळून रोज एकदा याप्रमाणे 7 ते 10 दिवस द्यावा. काही रुग्णांच्या बाबतीत या उपचाराने रक्तस्रावाच्या प्रवृत्तीला आळा बसतो.
ज्या रुग्णांना त्वचेखाली स्त्राव होण्याची (लाल ठिपके दिसतात) प्रवृत्ती असते त्यांना रक्तबंधनी गोळी (100 मि.ग्रॅ.) सकाळी व संध्याकाळी द्यावी. याप्रमाणे 7 दिवस उपचार करावेत.