पाच वर्षाखालील (विशेषतः दोन वर्षाखालील) मुलांना होणारा हा एक गंभीर आजार आहे. एक प्रकारच्या सूक्ष्म जंतूंमुळे हा आजार होतो. हे जंतू श्वासावाटे एकमेकांकडे हा आजार पसरवतात. हा आजार खूप संसर्गजन्य आहे. या रोगाची लागण लहान मुलांत (विशेषतः दोन वर्षाखालील) सुरू होते. तीन वर्षानंतर याचे प्रमाण खूपच कमी होते.
संसर्गानंतर 1-2 आठवडयात आजार सुरु होतो. . त्यानंतर उबळीच्या खोकल्याची अवस्था चालू होते. या आजारात सूक्ष्मजंतूंमुळे श्वासनलिका, फुप्फुसे यांचा दाह होऊन खोकला येत राहतो. इरिथ्रोमायसिन सारखे औषध सुरवातीच्या २ आठवड्यांपर्यंत जास्त उपयुक्त ठरते. नंतर यावर औषध फारसे चालत नाही .एकदा सुरू झाला की डांग्या खोकला २ ते ३ महिने टिकतो.
सुरुवातीस 1-2 आठवडे फक्त नाक गळणे, सौम्य ताप आणि खोकला असतो. यानंतर खोकल्याची उबळ सुरु होते. हा त्रास 2 ते 6 आठवडेपर्यंत राहतो. यानंतर 1-2 आठवडयात लक्षणे कमी होतात. खोकला एकदा सुरू झाला की त्याची उबळ 10-15 मिनिटांपर्यंत टिकून राहते. कित्येक वेळा मुलाचा श्वास कोंडतो व मूल काळेनिळे पडते. उबळीमध्ये दम कोंडल्यामुळे मूल दगावू शकते. उबळ संपल्यावर कोंडलेला दम सुटतो व हवा वेगाने आत ओढली जाते. यामुळे ‘हूप’ असा शिट्टीसारखा आवाज येतो.बऱ्याच वेळी उबळीनंतरउलट्या होतात.
या उबळीमुळे अनेक धोके संभवतात.
परंतु या आजाराची लस टोचल्यावर हा आजार होत नाही. त्रिगुणी लसटोचणी पासून या रोगाचे प्रमाण घटले आहे.
डांग्या खोकल्याची उबळ व टिकून राहणारा खोकला ह्याच रोगनिदानाच्या सर्वात महत्त्वाच्या खुणा आहेत.
उपचारासाठी डॉक्टरकडेच पाठवावे.
हा आजार होऊच नये म्हणून वेळीच मुलांना त्रिगुणी लस टोचून घ्यावी.
अडुळशाची 10-15 पाने वाफवून रस काढावा. 10-15 मिली. रस मधासोबत द्यावा.
सितोपलादी चूर्ण + ज्येष्ठमधपावडर मधासोबत द्यावे. लहान मुलांसाठी एका वेळी 250 मि.ग्रॅ ते 500मि.ग्रॅ दिवसभरात 3-4 वेळेस द्यावे. मोठया माणसांसाठी अर्धा ते एक ग्रॅम 3-4 वेळेस द्यावे.
बाळदमा किंवा बालकांचा अस्थमा हा श्वसनमार्गांचा एक दीर्घकालीन दाहजन्य (chronic inflammatory) आजार आहे. या आजारात श्वसनमार्ग नालिका अरुंद होतात आणि श्वास घेण्यास त्रास होतो. भारतात बालकांमध्ये हा आजार बराच आढळतो योग्य उपचाराने नियंत्रणात ठेवता येतो.
बालदमा आजाराची मुख्य लक्षणे म्हणजे वारंवार खोकला, श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज (wheezing), छातीत कोंडलेपणा जाणवणे आणि श्वास घेण्यास त्रास. ही लक्षणे विशेषतः रात्री, सकाळी किंवा धूळ, धूर, थंड हवा, संसर्ग किंवा व्यायामानंतर वाढू शकतात. काही मुलांमध्ये सर्दी झाल्यानंतर खोकला व श्वासाचा त्रास जास्त होतो.
अस्थमा होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. अॅलर्जी, धूळ, धूर, प्रदूषण, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, कुटुंबातील अस्थमाचा इतिहास ही सामान्य कारणे आहेत. काही वेळा हवामानातील बदल किंवा श्वसन संसर्गामुळेही अस्थमाचे झटके येऊ शकतात.
निदान प्रामुख्याने लक्षणांवर आणि वैद्यकीय तपासणीवर आधारित असते. मोठ्या मुलांमध्ये स्पायरोमेट्री चाचणी करून श्वसन कार्य तपासले जाऊ शकते.
उपचारामध्ये मुख्यतः इनहेलरद्वारे औषधे दिली जातात. यामध्ये ब्रॉन्कोडायलेटर औषधे श्वसनमार्ग मोकळे करतात, तर स्टेरॉईड औषधे दाह कमी करतात. लहान मुलांमध्ये स्पेसर किंवा नेब्युलायझर वापरणे उपयुक्त ठरते.
मोठया माणसांप्रमाणे लहान मुलांनाही दमा होऊ शकतो. याला बाळदमा म्हणतात. यासाठी पोट उडणे, डबा, इत्यादी नावेही आहेत. बाळदमा वयाच्या सहा महिन्यांनंतरच येतो. याआधी दम लागण्याचा आजार दिसल्यास न्यूमोनिया गटातला आजार आहे असे समजा.
सहा महिन्यांनंतर येणारा दमाही दोन प्रकारचा असतो. पहिल्या प्रकारचा बाळदमा पाच वर्षानंतर आपोआप नाहीसा होतो. मात्र दुसरा प्रकार पाच वर्षानंतरही टिकून राहणारा असतो. बाळदमा असणा-या बाळाच्या रक्ताच्या नातेवाईकांत (आई, वडील, भाऊ, बहीण, काका, मामा, मावशी, आत्या, आजोबा, आजी, इ.) दम्याचा विकार असल्यास त्या बाळाचा दमा कायमचा विकार होण्याची शक्यता असते. मात्र बाळदमा कोणत्या प्रकारचा आहे हे आधी ठरवणे अवघड आहे.

उलटी करवणे हा घरगुती आयुर्वेदिक उपाय ब-याच वेळा उपयोगी पडतो. यासाठी वेखंड मधात उगाळून त्याचे चाटण दिल्यास उलटी होते. त्यातून चिकट स्त्राव पडून जातात आणि दमा कमी होतो. याने काही फरक न पडल्यास सालबुटामोल (औषध किंवा गोळी) औषध चांगले उपयोगी पडते. या औषधांनी श्वासनलिका रुंद, मोकळया होतात. यामुळे श्वसन सोपे होते.
ताप असल्यास पॅरासीटामॉल द्यावे. पण मुख्यत्वे करून श्वासमार्ग मोकळा करणारी औषधे द्यावीत. तसेच बीटामिथासोन आणि लीवोसालबुटॅमॉल या मिश्रणाची वाफ द्यावी यासाठी नेबुलायझर ,रोटाहेलर पंप किंवा एरोसोल वापरता येतो. जेणेकरून तत्काळ आराम मिळू शकतो.
मात्र अशा उपायांनी बाळदमा बरा होत नसेल तर वरील उपचार देऊन डॉक्टरकडे पाठवून द्यावे. रुग्णालयात यासाठी वेगवेगळ्या औषधी वाफारा दिला जातो. काही औषधे शिरेतून दिली जातात.याने ताबडतोब आराम पडतो.
प्रिय पालकांनो आपल्या बाळाला वारंवार खोकला आणि दम लागत असेल पण ताप नसेल तर तो बाळदमा आहे असे समजा. बाळदमा वयाच्या 1-5 वर्षांपर्यंत येऊ शकतो.
तातडीक उपचारांमध्ये तीन स्वरूपात औषधे मिळतात.
अ) 100 डोसचे फवारे असलेला एरोसोल स्प्रे. या स्प्रेतून दर वेळी ठरावीक मात्रेत औषध बाहेर येते. फवाऱ्याचा खटका दाबणे आणि श्वास घेणे एकाच वेळी करावे लागते. बालकांना हे जमत नसल्याने स्पेसरचा उपयोग करावा लागतो. आपले डॉक्टर आपल्याला याबद्दल सांगतील.घरगुती स्पेसर प्लास्टिक कपला तळालाछेद देऊन तयार करता येतो. हे औषध घरीपण वापरता येते.स्पेसरच्यावापरामुळे योग्य डोस बाळाच्या श्वासमार्गात पोहोचतो.
ब) रोटाहेलर या प्रकारात औषधाच्या कॅपशूलमध्ये पावडर असते. हा प्रकार जास्त स्वस्त पडतो.थोड्या मोठ्या वयानंतर याचा वापर जमू शकतो.
क) रुग्णालय किंवा दवाखान्यात नेब्यूलायझर वापरतात.घरगुती वापरासाठी सुद्धा नेब्युलायझर उपलब्ध आहेत.यामध्ये बरीच द्रव स्वरूपातील औषधे वापरता येतात व ती सहज उपलब्धही आहेत. आजकाल नेब्यूलायझरची किंमत खूपच आवाक्यात आहे त्यामुळे आपल्या बाळाला वारंवार त्रास होत असेल तरच आपण नेब्यूलायझर विकत घेणे योग्य होईल.
घरी उपचार घ्यायचा असला तरी आपल्या डॉक्टरांना फोनवर कळवावे हे चांगले. बऱ्याचदा स्पेसर सोबत त्याचे माहिती पत्रक येते त्याचा योग्य उपयोग करून घ्यावा.
बाळाचा त्रास जास्त तीव्रतेचा आहे हे कसे ओळखावे: वाढलेली श्वासगती, दम लागलेला दिसतो : नाकपुड्या फुलतात, श्वासासोबत डोके वर खाली होते, गळ्याचे स्नायू देखील काम करतात. ओठांचा रंग बदलतो, घाम येतो. असे काहीही दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.