
मुलांच्या वाढीसाठी आणि कृमिप्रतिबंधासाठी विडंगाचे बी (वावडिंग) पाण्यात उकळून हे पाणी मुलांना प्यायला द्यावे. दिवसाला सहा दाणे विडंग पुरते. विडंगारिष्ट नावाचे तयार औषधही मिळते. हे औषध चार वर्षावरील मुलांसाठी दोन चमचे रोज याप्रमाणे तीन आठवडे द्यावे. तीन आठवडे थांबून परत एकदा तीन आठवडे औषध द्यावे.
भारतीय परंपरेत बाळांना तेल लावण्याचे फार महत्त्व आहे. तीळ, शेंगदाणे, खोबरे, सूर्यफूल, इत्यादींची तेले अंगाला चोळण्यासाठी वापरता येतात. टाळू भरण्याबरोबरच अंगाला तेल चोळण्याने शरीरात ते शोषले जाऊन पोषण होते. कृश दुबळी मुलेही या उपायाने सुधारतात असे सिध्द झाले आहे. अति कुपोषण असलेल्या मुलांना मात्र तेल मालिश करू नये.
कुपोषित मुलांचे पोषण चांगले होण्यासाठी डबाबंद आहारापेक्षा बाजरी, गहू, चणा, तांदूळ यांचे मिश्रण स्वस्त व सकस असते. या मिश्रणामध्ये काही विशिष्ट औषधी वनस्पती मिसळून अधिक पोषक आहार होतो. बला, अतिबला, जपा, तालीमखाना, इत्यादी वनस्पतींची चूर्णे मिसळून तयार केलेल्या धान्यखिचडीला यवागू असे नाव आहे.
लहान मुलांच्या बाबतीत आहार भूक कमी आहे अशी तक्रार अनेक पालक करतात. बाळसे धरावे म्हणून पुन्हापुन्हा बळेच खाऊ घालण्यासाठी प्रयत्न होतो. काही बाळांची पचनशक्ती मंद असल्याने अशा प्रयत्नांना यश येत नाही. सर्व बाळांची प्रकृती सारखीच नसते.
पचनशक्ती मंद असलेल्या बालकांना दूध, केळी, अंडी, मासे यांऐवजी गव्हाच्या साळीच्या लाह्या, फुटाणे, इत्यादी पदार्थांनी पचन सुधारते. मध, मूग भाजून तयार केलेले पीठ चांगले अंगी लागते. हे जर लक्षात घेतले नाही तर नुसत्या पोषक पदार्थाचा मारा करून अजीर्ण होते. यामुळे उलट आजारच होतात असा अनुभव आहे.
क्षीरबस्ती हा पोषण सुधारण्याचा आणखी एक चांगला उपाय आहे. अपु-या दिवसांच्या बाळांसाठी क्षीरबस्ती उपयुक्त आहे. बाळाला शी होऊन गेल्यानंतर ही क्षीरबस्ती द्यावी. क्षीरबस्ती म्हणजे कडू औषधे टाकून उकळलेले दूध असते. असे 15-20 मि.ली. दूध (शरीराच्या तापमानाचे) पिचकारीने हळूहळू गुदद्वारातून गुदाशयात सोडावे. तीन ते सहा तासांत ही बस्ती रक्तामध्ये शोषली जाते. हा उपचार नियमित केल्यानंतर पोषण सुधारते असा अनुभव आहे.
बाळाच्या पहिल्या दोन-तीन दिवसांत अंगावरचे दूध नसल्यास 3 थेंब तूप + 2 थेंब मध हे मिश्रण सकाळी-सायंकाळी चाटवावे. याबरोबरच अंगावरचे दूध पाजणे चालूच ठेवावे.
बालकांचे आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे ही समाजाची आणि शासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. भारतात बालकांच्या संरक्षणासाठी विविध कायदे आणि योजना लागू आहेत. बालहक्क (Child Rights) म्हणजे प्रत्येक बालकाला निरोगी जीवन, शिक्षण, संरक्षण आणि विकासासाठी मिळणारे मूलभूत अधिकार.
भारताने १९९२ मध्ये United Nations Convention on the Rights of the Child (UNCRC) स्वीकारला. या करारानुसार प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क, विकासाचा हक्क, संरक्षणाचा हक्क आणि सहभागाचा हक्क मिळतो. या तत्त्वांवर भारतातील अनेक कायदे व कार्यक्रम आधारित आहेत.
भारतातील महत्त्वाच्या बालहक्कांमध्ये आरोग्यसेवा, पोषण, शिक्षण, ओळख(जन्मनोंदणी), शोषणापासूनसंरक्षणआणिसुरक्षितवातावरण यांचा समावेश होतो. बालमजुरी, बालविवाह, लैंगिक शोषण आणि बाल तस्करी यांसारख्या समस्यांपासून मुलांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009, Protection of Children from Sexual Offences Act, 2012 आणि Prohibition of Child Marriage Act, 2006 असे महत्त्वाचे कायदे लागू आहेत.
आरोग्य क्षेत्रात बालकांचे हक्क जपण्यासाठी लसीकरण, पोषणकार्यक्रम, नवजातशिशूंचीकाळजीआणिशालेयआरोग्यसेवा महत्त्वाची आहेत. अंगणवाडी सेवा, पोषण अभियान आणि शालेय आरोग्य कार्यक्रम यांद्वारे बालकांच्या आरोग्य आणि विकासासाठी प्रयत्न केले जातात.
आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी बालकांचे आरोग्य तपासणे, कुपोषण व आजार लवकर ओळखणे, लसीकरण पूर्ण करणे आणि पालकांना योग्य मार्गदर्शन देणे आवश्यक आहे. तसेच बालहक्कांचे उल्लंघन दिसल्यास संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणे हीही त्यांची जबाबदारी आहे.
बालकांचे हक्क जपणे हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य कर्मचारी, शिक्षक आणि पालक यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे प्रत्येक बालकाला सुरक्षित, निरोगी आणि सन्मानपूर्ण जीवन मिळू शकते.