योगशास्त्र हे भारतीय परंपरेतील अनेक महान शास्त्रापैकी एक शास्त्र आहे. वेदांबरोबर अनेक दिव्य शास्त्रे जसे- व्याकरण, ज्योतिष, गणित इ. आजही ज्यांचा प्रगत शास्त्रामध्ये समावेश होतो तसेच योगशास्त्र आहे. एव्हढेच नव्हे तर आज त्याचा सर्व जगभर बोलबाला आहे, सर्व जग त्याचा अनुभव घेत आहे, त्याचा अभ्यास करीत आहे आणि आपले जीवन समृद्ध करीत आहेत. ही सर्व शास्त्रे म्हणजे जगाच्या संस्कृतीतील मुकुटमणीच होत. या शास्त्रात जणू मानवाच्या उत्थानासाठी देवत्वापर्यंतचा राजमार्गच आखून दिला आहे. पण काळाच्या ओघात आणि विज्ञानाच्या रेट्यात हे शास्त्र पडद्याआड गेले असतांना देखील काही संत, योगाचार्य, पंडित, स्वामि विवेकानंद, स्वामी सत्यानंद, शिवानंद सारख्या विभूतींनी या शास्त्राचे महत्व, त्याची अपूर्वाई आणि अनुभव जगाला दिले आणि जगभर योगाचा प्रचार, आणि प्रसार सर्व क्षेत्रात जोमाने होत आहे. स्वामि कुवलयानंद यांनी तर योगशास्त्र आधुनिक विज्ञानाच्या भाषेत मांडण्यासाठी कैवल्यधाम लोणावळा येथे एका प्रयोगशाळा १०० वर्षापूर्वी सुरु केली आणि योगाचे वैज्ञानिक महत्व अधोरेखित केले.
योग म्हणजे काय?- युज् या संस्कृत धातूपासून योग या शब्दाची व्युत्पत्ती झाली असून त्याचा अर्थ जोडणे, एकत्र आणणे, मिलन घडवून आणणे असा आहे. मिलन तरी कोणाचे घडवायचे आहे? आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन घडवून आणून मनुष्यात्वापासून देवत्वापर्यंतचा प्रवास घडविणे हे योगशास्त्राचे परमध्येय आहे. पण आज तर अशी धकाधकीची आणि ताणतणावाची परिस्थिती आहे कि शरीर आणि मन यांचाच मेळ बसणे कठीण झाले आहे. आत्मा-परमात्मा हे शब्द शब्दाच्या पलीकडेही फारसे परिचित नाहीत, तर त्यांचे मिलन समजणे दूरच. शरीर आणि मन हे मानवी अस्तित्वाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोन्ही एकमेकावर अवलंबून आहेत. पण मन हे अधिक सामर्थ्यवान आहे. त्याच्या मर्जीशिवाय शरीराची एक पेशी तर काम करेल काय? या शरीर आणि मनाचा मेळ घालण्याची गरज ओळखून योगशास्त्राची निर्मिती हजारो वर्षापूर्वी भारतवर्षात झाली. माणसाच्या जीवनावर मनाची पकड-पगडा असतो हे भारतीय ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी जाणले आणि योगशास्त्र म्हणजे ‘भारतीय मानसशास्त्र’ अशी संज्ञा दिली गेली. भारतीय अध्यात्म्यात ‘मन’ ही संकल्पना हजारो वर्षापासून आहे, मात्र आधुनिक विज्ञानात मनाला केवळ १५० ते २०० वर्षात ओळखले गेले. आज मात्र आधुनिक शास्त्र ही मान्य करते कि ९० ते ९५ टक्के आजार हे मनोकायिक आहेत. आज २१ व्या शतकात धकाधकी आणि ताण -तणावामुळे या मनोकायिक आजारांनी वय वर्षे ५ पासून सर्वच ग्रस्त आहेत आणि त्यातून अनेक भयानक आजार डोके वर काढत आहेत. डॉक्टर पण कंटाळून सांगतात आता ‘योग’ करून पहा.
हजारो वर्षापासुन अनेक ऋषी-मुनी, आचार्य, संत, आधुनिक विचारवंत यांनी विविध योग ग्रंथ -सूत्र, श्लोक, संवाद , गद्य रुपात योग लोकांपुढे विविध भाषेत मांडला. मात्र प्रमाणित ग्रंथ म्हणून ‘पातंजल योग दर्शन’ चा स्वीकार केला जातो. अनेकांनी योगाची विविध अंगे सांगितली आहेत मात्र त्याचा अंतिम परिणाम मात्र सर्वांनी एकच सांगितला आहे तो म्हणजे समाधी होय.
आता आपण योगाची विविध अंगे त्यांची वैशिष्ठ्ये पाहू या, विशेषत: पतंजली मुनींनी जी अंगे सांगितली आहेत त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊ या- ही अंगे पुढीलप्रमाणे- १)यम २) नियम ३) आसन ४)प्राणायाम ५) प्रत्याहार ६) धारणा ७) ध्यान ८) समाधी. या अंगाविषयी आपण थोडक्यात माहिती आणि त्यांचे मानवी व्यक्तित्वावर, जीवनावर कसा परिणाम होतो ते पाहू या.
यम- यम या शब्दाचा अर्थ आहे नियंत्रण. माणूस हा सामाजिक प्राणी आहे हे आपण जाणतोच. समाजामुळे आपले जीवन आणि अस्तित्व अवलंबून आहे. जसा समाज तसे आपण घडतो. पतंजलींनी त्याचे भान प्रथम ठेवून नंतर योगाभ्यास सांगितला आहे. यमात पतंजलींनी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह अशा पाच व्रतांचा समावेश केला आहे. या पाच व्रतामुळे मनुष्य उच्च नैतिक पातळी गाठतो शिवाय समाजाचे उत्थान आणि चारित्र्य बांधले जाते. समाज सुसंस्कृत, सुशील, एकसंध, निरोगी आणि समृद्ध बनतो.
नियम– समाजाप्रमाणे आपले वैयक्तिक आरोग्य, आपले संस्कार, कर्तव्ये, कर्मे ही नेटकी करून आपलेही जीवन अर्थपूर्ण, समृद्ध, कृतकृत्य करता आले पाहिजे. यासाठी पतंजली मुनी काही गोष्टी करावयास सांगतात. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, आणि ईश्वरप्रणिधान या पाच गोष्टींचा आपल्या वैयक्तिक जीवनात समावेश करावयास सांगतात. त्यामुळे आपले जीवनही उच्च पातळीवर राहिल्याचा अनोखा आनंद होतो.
या यम-नियमांचे पालनही पुढील आसनादि अंगांचा अभ्यास करण्यासाठी सहाय्यक ठरतात. यम नियमांचा उल्लेख हठयोग प्रदीपिका या स्वात्मारामांच्या ग्रंथातही आढळतो. त्यांनी १०-१० यम-नियम सांगितले आहेत. तेही समाज आणि जीवन घडवून आणतात.
आसन- जनमानसात लोकप्रिय असलेले अंग म्हणजे आसन. किंबहुना योग म्हणजेच आसन आणि आसन म्हणजे योग असा पक्का समज आहे. तेव्हढे केले कि आम्ही योग केला असा गैरसमज मात्र सर्वत्र योगाविषयी झाला आहे. मात्र सर्व अध्यात्मात आसन हे एक गौण अंग समजले जाते. योगात उच्च साधना करण्यासाठी शरीराची योग्य जडण-घडण ही आवश्यकच आहे. हठयोगात असे असे म्हटले आहे कि ‘कुर्यात तदासनम् स्थैर्यं आरोग्यं चांगलाघवं||’ म्हणजे आसने केल्याने शरीराला स्थैर्य, आरोग्य आणि हलकेपणा येतो. शरीर असे झाल्याने पुढील प्राणायाम, ध्यान- धारणादि साधना या सहज शक्य होतात. योगाची सुरवात आसनाच्या अभ्यासानेच करावी आणि त्याचा अनुक्रम बदलू नये तरच योग फलित होतो. आसनाच्या बाबतीत पतंजलींचा विचार थोडा वेगळा आहे. विशिष्ठ आसनांचा काहीही उल्लेख न करता आसन कसे असावे ते फक्त तीन सुत्रांद्वारे त्याच्या फलीताचाही त्यात समावेश करतात.
स्थिर सुखमासनम् – आसन स्थिती स्थिर आणि सुखकारक असावी.
प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम् – आसन स्थिर आणि सुखकारक होण्यासाठी प्रयत्न पूर्वक शरीर शिथिल करून नंतर प्रयत्नदेखील शिथिल करावेत आणि अनंतापर्यंत मनाला न्यावे.
ततो द्वंद्वानभिघात:||- अशा आसनामुळे मनातील द्वंद्व, चलबिचलता कमी होते. मन स्थिर होते.
या पातळीपर्यंत आसनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. अर्थात हे सर्व करून घेणे ही योग शिक्षकाची जबाबदारी आहे. आसनांचा अभ्यास मनाच्या पातळीपर्यंत आला पाहिजे असे पतंजली सांगतात. शरीर किती लवचिक आहे हे गौण आहे. मात्र या गोष्टीकडे योगशिक्षक फारसे लक्ष देत नाहीत हे आजचे कटु सत्य आहे. आसनात स्पर्धा पण नको आहे. आपण आपणाशी एकरूप झाले पाहिजे.
या रीतीने अभ्यास केल्यास अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचाही निपटारा होऊ शकतो.
आसने ८४ लक्ष प्रकारची असल्याचा आपल्या अध्यात्मात उल्लेख आहे. पतंजली मुनी कोणत्याहि विशिष्ठ आसनाचा उल्लेख करीत नाहीत. हठयोग ग्रंथात काहींनी १५ आसनांचा उल्लेख करून त्याचे विधी, फलित आणि निषेध यांचे वर्णन केले आहे. काहीजण ३२ आसनांचे असेच वर्णन केले आहे तर काहींनी ८४ आसनांचे वर्णन केले आहे. मात्र आसने कोणतीही करा मात्र त्यात पतंजलींनी सांगितलेली स्थिरता, सुखकारकता, शिथिलता आणि मनाची शांती मिळते कि नाही हे पाहणे जरुरीचे आहे.
आसनांचे वर्गीकरण अनेक प्रकारे केले जाते- १- आरोग्यात्मक आसने– या आसनांनी नित्य अभ्यास केल्याने अनेक आजारांवर मात करता येते वा नियंत्रण मिळविता येते. वजन कमी होते, उत्साही वाटते, चापल्य येते, मन संतुलित होते, एकाग्रता वाढते, निर्णयशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो, काही आजार नियंत्रणात येतात असे अनेक फायदे आढळून येतात. आसनांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते

ही आसने प्राणायाम, धारणा- ध्यान इ. अंगाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहेत. या आसनात पाठीचा कणा हा सहज शिथीलतेने ताठ राहतो त्यामुळे प्राणशक्तीचे वहन सहजरीत्या होते आणि त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. मन सहज एकाग्र होते. शरीराची बैठक स्थिर राहते, तोल जात नाही, झोप येत नाही, मन सजग राहते. यामध्ये पद्मासन, वज्रासन, स्वस्तिकासन, सिद्धासन इ. बैठक स्थितीतील आसनांचा समावेश होतो.
आसने, प्राणायाम किंवा ध्यान केल्यानंतर वा करण्यापूर्वी विश्रांतीची गरज भासते. ती विश्रांती योग्य रीतीने मिळावी यासाठी पाठीवर झोपून शवासन किंवा पालथे झोपून मकरासनात विश्रांती घेता येते. या असणातून अगदी थोड्या वेळात शारीरिक , मानसिक आणि भावनिक विश्रांती साधता येते. आणि पुढच्या अंगाचा अभ्यास करता येतो वा आपल्या इतर कामाला उत्साहाने लागू शकतो.
हठ्योगात या आसनाशिवाय अन्य चार आसनांना खूप महत्व देण्यात आले आहे. ती आसने म्हणजे- सिद्धासन, भद्रासन, सिंहासन आणि पद्मासन. सिद्धासन केल्याने मोक्षाचा मार्ग मोकळा होतो असे म्हटले आहे.
आसनांचा अभ्यास हा शास्त्रशुद्ध झाला पाहिजे मगच पुढची प्राणायामाची साधना करणे सोपे जाते. मुनी पतंजली पण हेच सांगतात, ‘तस्मिन सति…..’ असे म्हणून आसनाकडे निर्देश करतात. तर हठ्योगात त्यांनी अनेक अटी खालील श्लोकातून सांगितल्या आहेत.
अथासने द्रुढे योगी वशी हितमिताशन: | गुरूपदिष्ट मार्गेण प्राणायामान् समभ्यसेत ||
याचा अर्थ असा कि आसनात स्थिरता आली कि, हितकर आणि मितकर आहार घेणाराने आणि प्राणायाम योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासावा. याचे कारण असे कि प्राणायाम योग्य रीतीने केल्यास सर्व रोग विनाशकारी आह ए मात्र त्याचा योग्य रीतीने अभ्यास नाही केला तर साधक सर्व रोगांनी ग्रासला जातो. म्हणून प्राणायाम हा योग्य रीतीन अभ्यासला जावा हे फार फार महत्वाचे आहे. टीवी वर पाहून, दुसर्याचे पाहून वा वाचून प्राणायाम खरोखर करू नये. प्राणायाम हे दुधारी शास्त्र आहे.
प्राण + आयाम = प्राणायाम. प्राण = प्राणशक्ती, शरीर उर्जा ज्यामुळे शरीर काम करते. आयाम = ती शक्ती सर्व शरीरात योग्य रीतीने पसरविली जावी जेणेकरून शरीर पूर्ण क्षमतेने कार्यरत राहावे, निरोगी राहावे. प्राणायाम म्हणजे जाणीवपूर्वक श्वसनात बदल घडवून आणायचे असतात, श्वासाची गती सजगतेने कमी जास्त करायची कृती होय. हे सर्व मनाच्या पातळीवर होत असते. यामुळे प्राणायामाने मन, मज्जासंस्था, बुद्धी यावर जास्त परिणाम होतो.. शरीरातील कार्यशक्ती म्हणजे त्रिदोष हे सतत काही ना काही कारणाने असंतुलित होत असतात आणि शरीराचे कार्य बिघडवीत असतात, प्राणशक्ती असंतुलित होत असते, मनही दुषित होत असते; मात्र प्राणायामाने प्राणशक्ती संतुलित राहून, शरीर आणि मन एकोप्याने काम करतात, मज्जा संस्था शांत राहते, बुद्धी तेज राहते. शिवाय यापुढचे जे अंग धारणा यासाठी मनाची सज्जता होते.
प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत. शिवाय ते आपल्या प्रकृतीप्रमाणे किंवा शारीरिक विकृती प्रमाणे गुरूच्या सल्ल्याने करावेत. आपल्या गरजेप्रमाणे, एखाद्या कार्यसिद्धीसाठी, ऋतूप्रमाणे प्राणायामाचे नियोजन करावे. मात्र आपल्या सर्वसाधारण आरोग्यासाठी मुलभूत प्राणायाम सर्वांनीच करणे आवश्यक आहे. यासाठी काही गोष्टींची पूर्तता आवश्यक आहे…
प्रथम आसनांचा अभ्यास अर्धा तास करावा. …..शवासन २-४ मिनिटे गरजेप्रमाणे जरूर करावे….. ध्यानात्मक आसन……सजग संथ श्वसन ……. दीर्घ श्वसन….. योगिक श्वसन ……. अनुलोम -विलोम प्राणायाम …….नाडी शोधन प्राणायाम काही (प्राण वाहन करणाऱ्या नाड्यातील शुद्धी) काही आवर्तने……..थोडी विश्रांती. गरजेप्रमाणे भस्रिका, सुर्यभेदन, चंद्रभेदन, शितली, सित्कारी, उज्जायी, भ्रामरी असे प्राणायाम करावेत. गुरूंचा सल्ला आवश्यक आहे.
प्राणायामानंतर धारणा ध्यानाचा अभ्यास जरूर करावा कारण त्यासाठी मन सिद्ध झालेले असते. मन एकाग्र शांत झालेले असते. ‘प्राणायामाने मनाची ‘धारणासू च योग्यता मनस:|’ असे पतंजली मुनी सांगतात. जसा वेळ असेल त्याप्रमाणे ध्यान करावे. घाई असल्यास करू नये. मनाची एकाग्रता भंग होऊ देऊ नये.
प्राणायाम करतांना श्वसनावर ताण आल्यास लगेच थांबावे. ओढून ताणून करू नये. शिंक, खोकला इ. आवेग आल्यास ते मोकळे करावेत. प्राणायाम उरकून घेऊ नये. प्राणायामात कोणाशी स्पर्धा करू नये.
प्राणायामाच्या प्रकारांना योगात अष्टकुंभक असेही म्हटले जाते. ते असे-
सुर्यभेदन्मुज्जायी सित्कारी शितली तथा | भस्रिका भ्रामरी मुर्च्चा प्लाविन्यष्ट कुम्भका: ||
सुर्यभेदन, उज्जायी, सित्कारी, शितली, भस्रिका, भ्रामरी, मूर्च्छा आणि प्लाविनी. यापैकी मूर्च्छा आणि प्लाविनी यांचा क्वचित अभ्यास केला जातो वा शिकविला जातो. प्रथम नाडीशोधन प्राणायामाचा अभ्यास करावा. नंतर इतर १-२ प्राणायामाचा अभ्यास जरुरीप्रमाणे अभ्यास करावा. सुर्यभेदन, भस्रिका, उज्जायी हे प्राणायाम शरीरात उष्णता निर्माण करतात. हे प्राणायाम हिवाळ्यात वा कफ विकारात करावेत. सित्कारी, शितली, चंद्रभेदन हे प्राणायाम उन्हाळ्यात व पित्त विकारात करावेत. भ्रामरी प्राणायाम रोज करावा. याने मन विचार, भावना शांत होतात. शालेय विद्यार्थ्यांसाठी चंचलता निवारण, एकाग्रता साधणे, हट्टीपणा, बुद्धी सामर्थ्य वाढविण्यासाठी विशेष उपयुक्त आहे.
प्राणायामाचे सर्वसाधारण परिणाम- प्राणायामाने पूर्ण शरीरावरच नव्हे तर प्रत्येक पेशीवर परिणाम होतो. प्रत्येक इंद्रीयसमुहावर परिणाम होतो. याहि पुढे जाऊन मन, भावना, मज्जासंस्था, बुद्धी, यावर विशेष परिणाम होतो. हे अंतःकरणाचे सूक्ष्म अवयव आहेत, ज्यांच्यामुळे शरीर कार्य होत असते.
असे अनंत फायदे प्राणायामातून होतात.
प्राणायामाच्या बाबतीत नियम काटेकोरपणे पाळणे हे फार महत्वाचे आहे हे मागेच पहिले आहे. तसेच योग्य योगशिक्षक पण महत्वाचा आहे. साधकाच्या श्वसनाचे त्याला व्यवस्थित निरीक्षण करता आले पाहिजे आणि चुका दुरुस्त करता आल्या पाहिजेत. तसेच त्याला स्वत:ला अचूक प्राणायाम दाखविता आला पहिजे. योग्य सूचना देता आल्या पाहिजेत. १५-२० मिनिटे योगाभ्यास करून घेणे आवश्यक आहे. शिथिलीकरण नीट करून घेतले पाहिजे. श्वसनाच्या हालचाली शिक्षकाला नीट कळल्या पाहिजेत. मात्र इतक्या बारकाईने लक्ष देणाऱ्या शिक्षकांची वानवा आहे. हे आजचे सत्य आहे. मुळात शिक्षक चांगले घडविले गेले पाहिजेत. म्हणजे हे योगशास्त्र योग्य रीतीने पुढे सरकेल. साधकानेही प्राणायाम नीट शिकला पाहिजे. नुसतेच नाक दाबून काही होणार नाही. टीव्हीत पाहून तर अजिबात करू नये. त्याने एकाग्रता राहत नाही, आपण काय करतो आहोत हेही कळत नाही. चूक कि बरोबर करतो, हे समजत नाही.
प्राणायामाच्या सुरवातीला दुध आणि तूप यांचे सेवन करणे आवश्यक आहे. कारण प्राणायामाने शरीरात उष्णता वाढते. ती कमी करण्यासाठी दुध आणि तूप यांचे सेवन काही दिवस आवश्यक आहे. नंतर नाही घेतले तरी चालू शकते.