योग-शास्त्र

प्रत्याहार

प्रति +आहार अशी या शब्दाची फोड आहे. प्रती= विरुद्ध  आहार= अन्न. हे जे अंग आहे ते आपल्या इंद्रियांच्या नियंत्रणासाठी आहे. या इंद्रियांचा आहार काय आहे? तर त्यांचे त्यांचे विषय. ही इंद्रिये कोणती आणि किती? मानवाची एकूण ११ इंद्रिये आहेत आणि त्यांचे ११ विषय आहेत.

ज्ञानेंद्रिये आणि त्यांचे विषय – डोळे – पाहणे वा रूप ज्ञान. कान – ऐकणे वा शब्द ज्ञान.  नाक – वास वा गंध ज्ञान. जीभ – चव वा रसज्ञान आणि त्वचा – स्पर्शज्ञान. ही ज्ञानेंद्रिये आपणास जगाची जाणीव विविधप्रकारे करून देतात.

कर्मेंद्रिये- वाक – वाचा, बोलणे. पाणि = हात – देवाण घेवाण, कामे करणे. पाद- शरीरास इकडे-तिकडे नेणे.  उपस्थ = जननेंद्रिये, जनन करणे, पायु = गुद. शरीरातील मल बाहेर टाकणे. कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रियांकडून आलेल्या ज्ञानाला प्रतिसाद देतात.

मन- हे फार महत्वाचे इंद्रिय आहे. ते सूक्ष्म इंद्रिय आहे. ते उभयान्वयी म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय पण आहे. मनाच्या उपस्थितीशिवाय  ज्ञानेंद्रिये ज्ञान ग्रहण करू शकत नाही. तर मनाच्या आज्ञेशिवाय कर्मेंद्रिये पण काम करू शकत नाही. मन या दोहोनाही नियंत्रित करते. मनाच्या मर्जीशिवाय काहीच घडू शकत नाही.

मनाला विषयापासून दूर ठेवणे म्हणजे प्रत्याहार होय. त्याशिवाय योग साधला  जाऊ शकत नाही. मनाचे भरकटणे, चंचलता दूर झाली तरच योग साधला जाईल, निदान साधकाला १-२ तास या विषयांपासून दूर राहता आले पाहिजे. शरीर, श्वास यावर मन एकाग्र झाले पाहिजे. म्हणजे प्रत्याहार साधला जाईल. अर्थात हे सतत प्रयत्न केल्यानेच साधता येईल. उदा- दारू पिणे, धुम्रपानावर नियंत्रण नसणे, दिवसभरात खूप चहा पिणे, अमली पदार्थ सेवन इ  व्यसने म्हणजे जीवाशी धोकाच आहे. अशा अनेक सवयींचे आपण गुलाम होऊन जीवन बर्बाद होऊ शकते. यासाठी आपली इंद्रिये नियंत्रित ठेवली पाहिजे.

बहिरंग आणि अंतरंग योग

या इथे आपण आतापर्यंत यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार या अंगांचा अभ्यास केला. या पाच अंगांना ‘बहिरंग योग असे म्हणतात कारण ही साधना दिसून येते, शरीर -श्वसनेन्द्रीये या पातळीवर  केली जाते. या पुढील तीन अंगे म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी यांना ‘अंतरंग योग म्हटले जाते. याविषयी आपण पाहू या.

धारणा- ध्यान आणि समाधी यांना सामान्यत: एकत्रितपणे ध्यान म्हटले जाते तर पतंजली मुनी यांना ‘संयम’ म्हणतात. ‘त्रयं एकत्र संयम:’ असे सांगितले आहे. पहिली पाच बहिरंग् योगाची साधना नीट अभ्यासली कि अंतरंग  योगाची अवस्था आपोआप घडून येते. यासाठी वेगळे काही करावे लागत नाही; मात्र आसन-प्राणायाम यातून शरीर आणि मन यांची ध्यानासाठी तयारी होते. साधक अंतर्यात्रेसाठी अंतर्मुख होतो. आसनातून तो ‘अनंतसमापत्तीची’ स्थिती येते तर प्राणायामातून ‘धारणासू च योग्यता मनस:’ म्हणजे म्हणजे मन धारणेसाठी तयार होते. सर्व साधारण ध्यानाची जी प्रारंभिक अवस्था जी आहे ती धारणापासून सुरु होते आणि ती अवस्था पुढे पक्व होत समाधीपर्यंत पोहोचते. समाधी म्हणजे चित्ताचा लय होये, न-मन अशी अवस्था होणे.

धारणा – ही साधना कोणत्यातरी वस्तूवर, स्थानावर, ओमकार चित्र, इष्ट देवता वा शरीरावयावर व विचारावर अशा मंगलकारक विषयावर चित्ताला बांधून ठेवणे, स्थिर करणे. ही एकाग्रतेची प्राथमिक अवस्था आहे. मात्र या आलम्बनाच्या (विषय) बाहेर चित्त जाता कामा नये. ही साधना एखाद्या ध्यानात्मक आसनात बसून समकायशिरोग्रीव असे शरीर ठेवावे. शरीर-मन पूर्ण ओमकरमय एकरूप झाले पाहिजे.

ध्यान- जेव्हां  धारणा पक्की होये आणि त्याच्या आलम्बनातील एखाद्याच  प्रत्ययावर मन सतत एकाग्र-एकरूप बराच वेळ राहते तेव्हा ती ध्यानाची अवस्था होते. धारणेतील त्या विषयातील बाकीच्या प्रत्ययांचा मनात अस्तित्व राहत नाही. फक्त एकच प्रत्यय.

समाधी- संयमाची प्रगत परिपक्व अवस्था म्हणजे समाधी. या अवस्थेत ध्यानातील प्रत्ययच फक्त जाणीवेत राहतो. अन चित्ताची शुण्यप्रत अवस्था होते. तो प्रत्ययरूप होऊन जातो. स्वत:ची पण वा स्व ची देखील जाणीव राहत नाही. पतंजली यालाच ‘स्वरूप शून्यामिव असे म्हणतात. त्रिपुटी(ध्याता,ध्येय,ध्यान) संपून मन  एकरूप होते, त्यांच्या वेगळेपणातील सीमारेषा पुसल्या जातात.

समाधीचे अनेक भेद, नावे, आणि अवस्था भेद अनेक ग्रंथात मांडले गेले आहेत पण शेवटी मोक्ष वा मुक्ती हेच ध्येय आहे. हठ्योगात समाधीला ‘नादानुसंधान’ म्हटले आहे.

परिणाम- धारणा ध्यान आणि समाधी यातून अनेक फायदे वा सिद्धी मिळतात. पण सर्वात महत्वाचे फळ मुनी पतंजली सांगतात- तज्जयात प्रज्ञालोक: | म्हणजे विशेष ज्ञानाचा प्रकाश पडतो. बुद्धी प्रगल्भ होते. ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त होते.

  • ज्या गोष्टीवर ध्यान  केले जाते त्याविषयीचे त्याचे पूर्ण ज्ञान होते. जसे ‘चंद्रे ताराव्युह ज्ञानम् ||’ अणिमादि  अष्टसिद्धी प्राप्त होतात.
  • मन शांत एकाग्र होते.
  • ज्ञान आणि विवेक प्राप्ती.
  • सत्याचा शोध आणि बोध होतो.
  • विश्लेषणात्मक बुद्धीला चालना.
  • योग्य निर्णय क्षमता. कमी वेळात अधिक कार्य. लवकर यश.
  • शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक उत्साह आणि विकास.
  • निराशा, विफलता, अस्वस्थता आणि न्युनगंडता यातून मुक्ती.
  • समस्या निवारण अधिक सुलभ.
  • वैज्ञानिक, संशोधक, विद्यार्थी यासाठी अधिक उपयुक्त. यांनी कमीतकमी  एक तास तरी ध्यान करावे.
  • सर्व शरीर संस्था कार्य सुरळीत. विकार मुक्ती.
  • ज्ञान समृद्धी. दुष्कर्म मुक्ती. अघटीतापासून मुक्ती.
  • कैवल्य प्राप्ती.

याप्रमाणे आपण योगाच्या सर्व अंगांचा विचार केला जेणे करून आपले जीवन सुखी, निरोगी, समृद्ध, आनंदी, परिपूर्ण, अर्थपूर्ण होईल. याशिवाय आणखी काही गोष्टींचा विचार करणे जरुरीचे आहे. हे विचार हठयोग प्रणालीत मांडले गेले आहेत- मुद्रा, शुद्धीक्रिया आणि आहार.

मुद्रा

मुद्रांचा अभ्यास ही पण एक उच्च साधना आहे. मुद्रा म्हणजे हावभाव. या अनेक भारतीय नृत्यशास्त्रात वापरल्या जातात. न बोलता मनांतील सुख-दु:खाचे भाव, राग द्वेष हे कळतात. योगशास्त्रात मुद्रांचा अभ्यास वेगळा प्रभाव दाखवतात. यांचा अभ्यास केल्याने उर्जेचे वलय पूर्ण होते, उर्जेचे बहिर्गमन थांबून प्राणशक्तीचे वहन योग्य दिशेने होते. मुद्रा अत्यंत सूक्ष्म पातळीवर कार्य करतात, विशेषत: अंत:स्रावी ग्रंथी आणि मज्जा संस्थेवर यांचा विशेष प्रभाव पडतो. मुद्रांनी साधनेचे ध्येय जरा लवकर प्राप्त होते.

या मुद्रा चेहेरा, हात व आसनांच्या माध्यमातून केल्या जातात. जसे खेचरी मुद्रा, शांभवी मुद्रा, षण्मुखी मुद्रा इ. चेहेऱ्यावर केल्या जातात. ध्यान, ज्ञान, चिन्मुद्रा, भैरवी, प्राण, ब्रह्म इ. मुद्रा हातामध्ये केल्या जातात. विपरीत करणी, सिंह, वज्रासन मुद्रा, त्रिबंध मुद्रा, महा मुद्रा इ. या आसन स्वरुपात केल्या जातात.

शुद्धीक्रिया

हे हठयोगाचे अत्यंत महत्वाचे अंग असे नाही तर तो हठ्योगाचा आत्मा आहे. ते म्हणतात –

‘मलाकुलासू नाडीषु मारुतो नैव मध्यग:| कथं स्यात उन्मनी भाव: कार्य सिद्धिं कथं भवेत ||’

नाड्या जर मलानी भरलेल्या असतील  तर त्यातून प्राणशक्ती कशी वाहील, विशेषत: सुषुम्ना नाडीतून प्राणशक्तीचे वहन झाले नाही तर मोक्ष मिळणे कठीण आहे. कार्यसिद्धी म्हणजे मोक्ष मिळणार नाही, मनाची उन्मनी अवस्था प्राप्त होणार नाही.

शरीरातून मल बाहेर काढण्याच्या विविध संस्था आहेत, त्यातून रोज मल बाहेर काढला जातो. गुद, श्वसनेन्द्रीये, मूत्रपिंडे, त्वचा, यातून मल बाहेर काढला जातो, पण तो पूर्ण बाहेर येईलच असे नाही, तो थोडा थोडा शरीरात साठत जातो आणि त्याचा निपटारा झाला नाही तर व्याधीचे ते मूळ होते आणि अनेक विकार उद्भवतात. ऋतूबदल, आहार-विहार, ताण-तणाव ही त्याची अनेक कारणे आहेत. तेव्हां वेळोवेळी हे साठलेले मल बाहेर काढणे आवश्यक आहेत. विशेषत: हे मल पचनसंस्था, श्वसन संस्था येथे साठतात शिवाय मन हे देखील ताण -तणाव, चुकीचे विचार, वागणूक यांनी दुषित होत असते त्यामुळे इतर अवयवही विकृत कार्य करतात.

हठ्योगात मुख्य सहा प्रकारच्या शुद्धीक्रिया सांगितल्या आहे. त्यांचे पुन: उपप्रकार आहेत, अशा २३ प्रकारच्या शुद्धीक्रिया सांगितल्या आहेत.

धौती: बस्ती तथा नेति: त्राटकम नौलीकम तथा| कपालभातीश्चैतानी षट् कर्माणि प्रचक्षते||

धौती,बस्ती, नेति, त्राटक, नौली आणि कपालभाती ही सहा षट् कर्म आहेत.

धौती- पचनेद्रीयांची  शुद्धी- उपप्रकार- वातसार  वन्हीसार आणि वारीसार. वमन, विरेचन इ.

बस्ती – उत्सर्जक इंद्रिये.

नेति- नाकाची शुद्धी- जलनेती, सूत्रनेती, दंड्नेती इ.

त्राटक– डोळ्यांची शुद्धी- नेत्र प्रक्षालन, समीप आणि सुदूर त्राटक, नासिका मुद्रा, शांभवी मुद्रा. यातून मनाची पण शुद्धी.

कपालभाती- कपाल आणि मुखाची, ज्ञानेनद्रीयांची शुद्धी. श्वसन सदृश क्रिया.

या सर्व क्रिया साधकानी वेळोवेळी तज्ञ मार्गदर्शनाखाली कराव्यात. या क्रिया करण्याचा योग्य काल म्हणजे शरद आणि वसंत ऋतू होय.

या शुद्धीक्रीयातून शरीर आणि शरीरक्रिया संतुलित आणि कार्यक्षम  होतात. मनही शांत, एकाग्र, संतुलित होते.

आहार-विहार- खर तर योगशास्त्र हे २४ x ७ आचरण करण्याचे शास्त्र आहे. भ. श्रीकृष्ण देखील ६व्या अध्यायात सांगतात कि ‘युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु| युक्त स्वप्नाव बोधस्य योगो भवति दु:खहा ||

योग दु:खहारक आहे खरा पण त्याला काही शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे. योगाच्या विविध अंगांचा अभ्यास केला जातो त्याचा परिणाम शरीर, शारीरिक कार्ये, मन आणि बुद्धी यावर हळूहळू होत असतो. ही पथ्ये न पाळल्यास त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकतो आणि मग आपण योगालाच कारणीभूत ठरवितो. आपल्या भारतात अनेक धर्म आहेत आणि बहुतेक धर्मामध्ये आहाराविषयी काही ना काही पथ्ये सांगितलेली आहेतच. अर्थात या सर्वांना शास्त्रीय बैठक आहे, त्यात पूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा आणि  विश्वाच्या पर्यावरणाचा विचार दीर्घ कालासाठी आहे.

आहार

विशेषत: आहाराविषयी सर्व योगग्रंथ काही गोष्टी आवर्जून सांगतात. मांसाहार योग करणारांसाठी पूर्ण वर्ज्य आहे. हिंसा यमात सर्व प्रथम सांगितली आहे. आपण आणि इतर प्राणी या जगासाठी आवश्यक आहे एवढेच या इथे सांगू इच्छिते. मनुष्याची शरीर रचना ही शाकाहारसाठीच आहे. तसेच असे म्हटले जाते कि ‘जैसा खावे अन्न वैसा होवे मन| हिंसक अन्न खाल्ले तर वृत्ती या हिंसकच होतील. तसेच असेही म्हटले जाते कि ‘ अन्नच तारी, अन्नच मारी, अन्न नाना विकारी’ हा अनुभव आपण घेतोच आहोत. आजचे खानपान फारच बिघडले असून हॉटेलमध्ये खाण्याची प्रवृत्ति फार बळावली आहे. अन्न आकर्षक आणि चवदार बनविण्यासाठी अनेक केमिकॅल्स चा उपयोग केला जातो जे आरोग्यास अत्यंत घातक आहे. त्यातून हृदय रोग, कॅन्सर, मुत्रपिंडाचे आजार, त्वचा विकार, दमा आणि इतर दुर्धर रोग उद्भवून अकाली मृत्यू होत आहेत.

आहार दोन वेळा आणि सीमित घ्यावा. यालाच योगात मिताहार म्हटले आहे. दिवसभर चरू नये.  आहाराची वेळ ही शक्यतो ठराविक असावी. रात्री फार उशिरा जेऊ नये. भोजन सात्विक ताजे असावे. फार विरुध्द गुणधर्माचे पदार्थ एकत्र खाऊ नयेत. विरुद्ध गुण पदार्थांचे मिश्रण असू नये. फार मसालेदार, तळलेले पदार्थ खाऊ नयेत. फळे, पालेभाज्या यांचा समावेश असावा. एक आयुर्वेदाचा श्लोक भोजन  कसे असावे हे थोडक्यात सांगते-    

उष्णं स्निग्धं मात्रावत् जीर्णे विर्याविरुद्धं | इष्ट देशे इष्ट सर्वोपकरणं |नाति द्रुतं नाति विलाम्बितम |
अजल्पन अहसन् तन्मना भून्जीथ | आत्मनभि समीक्ष्य सम्यक् || चरक विज्ञान||

या श्लोकाचा अर्थ  असा आहे कि भोजन कोष्ण, तेल-तूप युक्त व स्नेहाने बनवलेले असावे. अन्नाची मात्र योग्य असावी, ते सहज पचणारे असावे. अन्न हे शक्ती देणारे असावे. अन्नाचे सेवन प्रसन्न अशा जागी आणि योग्य उपकारणासहित असावे. भोजन फार हळू वा फार भराभर खाऊ नये. फारशी बडबड वा जोराने हसत भोजन करू नये, ठसका लागू शकतो आणि काय किती खातो याकडे लक्ष राहत नाही. भोजन हे शांतपणे, त्याच्याशी तन-मन एकरूप करून सेवन केले पाहिजे. अशारितीने सेवन केलेले अन्न हे आत्म्याशी जाऊन भिडते, त्याच्याशी एकरूप होते. हे नियम पाळले तरी आपले आरोग्य छान राहील.

भोजन हे आपल्या वयाप्रमाणे, पेशाप्रमाणे, आरोग्य अवस्था, देश, ऋतुकाळ याप्रमाणे घ्यावे.

अन्न हे उष्टे टाकू नये, वाया घालवू नये. आपल्या भारतीय अध्यात्मात अन्न पूर्ण ब्रह्म  मानले गेले आहे. स्वामि रामदास म्हणतात अन्न सेवन हे ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’. वदनी कवळ घेता ईश्वराचे स्मरण करावे कारण त्याच्या कृपेनेच अन्न आपणास मिळते. म्हणून भोजनाच्या आधी प्रार्थना करावी. अन्न तयार होण्याच्या साखळीतील सर्वांचे स्मरण करावे.

समारोप

आतापर्यंतच्या वाचनातून हे लक्षात आलेच असेल कि योग ही जीवन शैली आहे. नुसती शारीरिक कसरत नाही हे सर्वांनी चांगले लक्षात ठेवावे. योग म्हणजे जीवनाचा आनंद, जीवनाची समृद्धी, जीवनातील कामधेनु, जीवनातील कृतकृत्यता, पूर्ण जीवन मुक्त जीवन. नव्हे नव्हे देवत्वच.

असा हा जीवन प्रवास साधण्यासाठी योगाचे महत्व आपल्या लक्षात आलेच असेल. या योग शिक्षणात सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती योगशिक्षक. तो चांगला  अनुभवी, योगाचे खोलवर ज्ञान असणारा, साधकाला काय शिकवायचे आहे याचे ज्ञान असणारा, चांगली निरीक्षण शक्ती असणारा, स्वत: नियमित योगाभ्यास  करणारा, निर्व्यसनी, भाषेवर प्रभुत्व इ. गुणांनी युक्त असावा. पण प्रत्यक्षात याची वानवा खूप आहे. चांगले योगशिक्षक तयार झाले पाहिजेत तरच त्याचा उपयोग होईल.