योगशास्त्र-प्रगत

प्राणायाम

आसनांचा अभ्यास हा शास्त्रशुद्ध झाला पाहिजे मगच पुढची प्राणायामाची साधना करणे सोपे जाते. मुनी पतंजली पण हेच सांगतात, ‘तस्मिन सति…..’ असे म्हणून आसनाकडे निर्देश करतात. तर हठ्योगात त्यांनी अनेक अटी खालील श्लोकातून सांगितल्या आहेत.

अथासने द्रुढे योगी वशी हितमिताशन: | गुरूपदिष्ट मार्गेण प्राणायामान्  समभ्यसेत ||

याचा अर्थ असा कि आसनात स्थिरता आली कि, हितकर आणि मितकर आहार घेणाराने आणि प्राणायाम योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासावा. याचे कारण असे कि प्राणायाम योग्य रीतीने केल्यास सर्व रोग विनाशकारी आह ए मात्र त्याचा योग्य रीतीने अभ्यास नाही केला तर साधक सर्व रोगांनी ग्रासला जातो. म्हणून प्राणायाम हा योग्य रीतीन अभ्यासला जावा हे फार फार महत्वाचे आहे. टीवी वर पाहून, दुसर्याचे पाहून वा वाचून प्राणायाम खरोखर करू नये. प्राणायाम हे दुधारी शास्त्र आहे.

प्राण + आयाम = प्राणायाम. प्राण = प्राणशक्ती, शरीर उर्जा ज्यामुळे शरीर काम करते. आयाम = ती शक्ती सर्व शरीरात योग्य रीतीने पसरविली जावी जेणेकरून  शरीर पूर्ण क्षमतेने कार्यरत राहावे, निरोगी राहावे. प्राणायाम म्हणजे जाणीवपूर्वक श्वसनात बदल घडवून आणायचे असतात, श्वासाची गती सजगतेने कमी जास्त करायची कृती होय. हे सर्व मनाच्या पातळीवर होत असते. यामुळे  प्राणायामाने  मन, मज्जासंस्था, बुद्धी यावर जास्त परिणाम होतो.. शरीरातील कार्यशक्ती म्हणजे त्रिदोष हे सतत काही ना काही कारणाने असंतुलित होत असतात आणि शरीराचे कार्य बिघडवीत असतात, प्राणशक्ती असंतुलित होत असते, मनही दुषित होत असते; मात्र प्राणायामाने प्राणशक्ती संतुलित राहून, शरीर आणि मन एकोप्याने काम करतात, मज्जा संस्था शांत राहते, बुद्धी तेज राहते. शिवाय यापुढचे जे अंग धारणा यासाठी मनाची सज्जता होते.

प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत. शिवाय ते आपल्या प्रकृतीप्रमाणे किंवा शारीरिक विकृती प्रमाणे गुरूच्या सल्ल्याने करावेत. आपल्या गरजेप्रमाणे, एखाद्या कार्यसिद्धीसाठी, ऋतूप्रमाणे प्राणायामाचे नियोजन करावे. मात्र आपल्या सर्वसाधारण आरोग्यासाठी मुलभूत प्राणायाम सर्वांनीच करणे आवश्यक आहे. यासाठी काही गोष्टींची पूर्तता आवश्यक आहे…

प्रथम आसनांचा अभ्यास अर्धा तास करावा. …..शवासन २-४ मिनिटे गरजेप्रमाणे  जरूर करावे….. ध्यानात्मक आसन……सजग  संथ श्वसन ……. दीर्घ श्वसन….. योगिक श्वसन ……. अनुलोम -विलोम प्राणायाम …….नाडी शोधन प्राणायाम काही (प्राण वाहन करणाऱ्या नाड्यातील शुद्धी) काही आवर्तने……..थोडी विश्रांती. गरजेप्रमाणे भस्रिका, सुर्यभेदन, चंद्रभेदन, शितली, सित्कारी, उज्जायी, भ्रामरी असे प्राणायाम करावेत. गुरूंचा सल्ला आवश्यक आहे.

प्राणायामानंतर धारणा ध्यानाचा अभ्यास जरूर करावा कारण त्यासाठी मन सिद्ध झालेले असते. मन एकाग्र शांत  झालेले असते. ‘प्राणायामाने मनाची ‘धारणासू च योग्यता मनस:|’ असे पतंजली मुनी सांगतात. जसा वेळ असेल त्याप्रमाणे ध्यान करावे. घाई असल्यास करू नये. मनाची एकाग्रता भंग होऊ देऊ नये.

प्राणायाम करतांना श्वसनावर ताण आल्यास लगेच थांबावे. ओढून ताणून करू नये. शिंक, खोकला इ. आवेग आल्यास ते मोकळे करावेत. प्राणायाम उरकून घेऊ नये. प्राणायामात कोणाशी स्पर्धा करू नये.

प्राणायामाच्या प्रकारांना योगात अष्टकुंभक असेही म्हटले जाते. ते असे-

सुर्यभेदन्मुज्जायी सित्कारी शितली तथा |  भस्रिका भ्रामरी मुर्च्चा प्लाविन्यष्ट कुम्भका: ||

सुर्यभेदन, उज्जायी, सित्कारी, शितली, भस्रिका,  भ्रामरी, मूर्च्छा आणि प्लाविनी. यापैकी मूर्च्छा आणि प्लाविनी यांचा क्वचित अभ्यास केला जातो वा शिकविला जातो. प्रथम नाडीशोधन प्राणायामाचा अभ्यास करावा. नंतर इतर १-२ प्राणायामाचा अभ्यास जरुरीप्रमाणे अभ्यास करावा. सुर्यभेदन, भस्रिका, उज्जायी हे प्राणायाम शरीरात उष्णता निर्माण करतात. हे प्राणायाम हिवाळ्यात वा कफ विकारात करावेत. सित्कारी, शितली, चंद्रभेदन हे प्राणायाम उन्हाळ्यात व पित्त विकारात करावेत. भ्रामरी प्राणायाम रोज करावा. याने मन विचार, भावना शांत होतात. शालेय विद्यार्थ्यांसाठी चंचलता निवारण, एकाग्रता साधणे, हट्टीपणा, बुद्धी सामर्थ्य वाढविण्यासाठी विशेष उपयुक्त आहे.

प्राणायामाचे सर्वसाधारण परिणाम- प्राणायामाने  पूर्ण शरीरावरच नव्हे तर प्रत्येक पेशीवर परिणाम होतो. प्रत्येक इंद्रीयसमुहावर परिणाम होतो. याहि पुढे जाऊन मन, भावना, मज्जासंस्था, बुद्धी, यावर विशेष परिणाम होतो. हे अंतःकरणाचे  सूक्ष्म अवयव आहेत, ज्यांच्यामुळे शरीर कार्य होत असते.

  • नाडी शोधनाने किंवा अनुलोम – विलोम प्राणायामाने चांगल्या आरोग्याचा लाभ होतो. इडा आणि पिंगळा या नाड्या संतुलित होतात. आधुनिक भाषेत सांगायचे झाले तर Sympathetic आणि Parasympathetic प्रणालित संतुलन येते.
  • श्वसनेन्द्रीये आणि फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते. अधिक ऑक्सिजन शरीरात घेतला जातो. विशेषत: सर्दी, पडसे, खोकला हे वारंवार होणारे आजार नियंत्रणात येऊन नंतर कायमचे बरे होतात.
  • मेंदू अधिक तल्लख, सजग-जागरूक होतो. बुद्धीच्या अनेक पैलूंचा विकास होतो- ग्रहण, आकलन, स्मरण शक्ती- साठवण- आठवण अधिक चांगली होते, कल्पनाशक्ती, तर्क, संशोधन, सारासार विवेक इ. चा चांगला विकास होतो. मन पटकन एकाग्र होते.चिडचिडेपणा जातो. थोडक्यात पतंजली सांगतात- ‘तत: क्षीयते प्रकाशावरणम ||’ बुद्धीवरील मळभ दूर होते. ज्ञान प्रकट व्हायला सुरवात होते.
  • अंत:स्रावी ग्रंथी प्रणाली सुधारते आणि सर्व  शरीर कार्ये सुधारतात. शरीर हलके आणि चपळ होते.
  • पचन चांगले होते. भूक चांगली लागते. उत्सर्जनाचे कार्य व्यवस्थित होते.
  • हृदयाभिसरण चांगले होते. रक्तदाब नियंत्रणात राहतो. वा काही त्रास असल्यास नियंत्रित होऊ शकतो.
  • जननेन्द्रियांची कार्ये सुधारतात, विशेषत: महिलांना त्यांच्या सर्व प्रकारच्या समस्यासाठी प्राणायाम फार सहाय्यक ठरतो.
  • व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास होतो. देहयष्टी आकर्षक होते. चालण्या बोलण्याची छाप पडते. बिनधास्तपणा, निडरता, धीटपणा, नम्रता, विनयशीलता इ. गुण वर्धित होतात.

 असे अनंत फायदे प्राणायामातून होतात.

प्राणायामाच्या बाबतीत नियम काटेकोरपणे पाळणे हे फार महत्वाचे आहे हे मागेच पहिले आहे. तसेच योग्य योगशिक्षक पण महत्वाचा आहे. साधकाच्या श्वसनाचे त्याला व्यवस्थित निरीक्षण करता आले पाहिजे आणि चुका दुरुस्त करता आल्या पाहिजेत. तसेच त्याला स्वत:ला अचूक प्राणायाम दाखविता आला पहिजे. योग्य सूचना देता आल्या पाहिजेत. १५-२० मिनिटे योगाभ्यास करून घेणे आवश्यक आहे. शिथिलीकरण नीट करून घेतले पाहिजे. श्वसनाच्या हालचाली शिक्षकाला नीट कळल्या पाहिजेत. मात्र इतक्या बारकाईने लक्ष देणाऱ्या शिक्षकांची वानवा आहे. हे आजचे सत्य आहे. मुळात शिक्षक चांगले घडविले गेले पाहिजेत. म्हणजे हे योगशास्त्र योग्य रीतीने पुढे सरकेल. साधकानेही प्राणायाम नीट शिकला पाहिजे. नुसतेच नाक दाबून काही होणार नाही. टीव्हीत पाहून तर अजिबात करू नये. त्याने एकाग्रता राहत नाही, आपण काय करतो आहोत हेही कळत नाही. चूक कि बरोबर करतो, हे समजत नाही.

प्राणायामाच्या सुरवातीला दुध आणि तूप यांचे सेवन करणे आवश्यक आहे. कारण प्राणायामाने शरीरात उष्णता वाढते. ती कमी करण्यासाठी दुध आणि तूप यांचे सेवन काही  दिवस आवश्यक आहे. नंतर नाही घेतले तरी चालू शकते.

प्रत्याहार

प्रति +आहार अशी या शब्दाची फोड आहे. प्रती= विरुद्ध  आहार= अन्न. हे जे अंग आहे ते आपल्या इंद्रियांच्या नियंत्रणासाठी आहे. या इंद्रियांचा आहार काय आहे? तर त्यांचे त्यांचे विषय. ही इंद्रिये कोणती आणि किती? मानवाची एकूण ११ इंद्रिये आहेत आणि त्यांचे ११ विषय आहेत.

ज्ञानेंद्रिये आणि त्यांचे विषय – डोळे – पाहणे वा रूप ज्ञान. कान – ऐकणे वा शब्द ज्ञान.  नाक – वास वा गंध ज्ञान. जीभ – चव वा रसज्ञान आणि त्वचा – स्पर्शज्ञान. ही ज्ञानेंद्रिये आपणास जगाची जाणीव विविधप्रकारे करून देतात.

कर्मेंद्रिये- वाक – वाचा, बोलणे. पाणि = हात – देवाण घेवाण, कामे करणे. पाद- शरीरास इकडे-तिकडे नेणे.  उपस्थ = जननेंद्रिये, जनन करणे, पायु = गुद. शरीरातील मल बाहेर टाकणे. कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रियांकडून आलेल्या ज्ञानाला प्रतिसाद देतात.

मन- हे फार महत्वाचे इंद्रिय आहे. ते सूक्ष्म इंद्रिय आहे. ते उभयान्वयी म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय पण आहे. मनाच्या उपस्थितीशिवाय  ज्ञानेंद्रिये ज्ञान ग्रहण करू शकत नाही. तर मनाच्या आज्ञेशिवाय कर्मेंद्रिये पण काम करू शकत नाही. मन या दोहोनाही नियंत्रित करते. मनाच्या मर्जीशिवाय काहीच घडू शकत नाही.

मनाला विषयापासून दूर ठेवणे म्हणजे प्रत्याहार होय. त्याशिवाय योग साधला  जाऊ शकत नाही. मनाचे भरकटणे, चंचलता दूर झाली तरच योग साधला जाईल, निदान साधकाला १-२ तास या विषयांपासून दूर राहता आले पाहिजे. शरीर, श्वास यावर मन एकाग्र झाले पाहिजे. म्हणजे प्रत्याहार साधला जाईल. अर्थात हे सतत प्रयत्न केल्यानेच साधता येईल. उदा- दारू पिणे, धुम्रपानावर नियंत्रण नसणे, दिवसभरात खूप चहा पिणे, अमली पदार्थ सेवन इ  व्यसने म्हणजे जीवाशी धोकाच आहे. अशा अनेक सवयींचे आपण गुलाम होऊन जीवन बर्बाद होऊ शकते. यासाठी आपली इंद्रिये नियंत्रित ठेवली पाहिजे.