मूत्रसंस्था – शरीरशास्त्र

मूत्रपिंडविकार

अचानक मूत्रपिंडे बंद पडणे (मूत्रपिंडघात) (Acute Renal Shutdown)

दोन्ही मूत्रपिंडे अचानक बंद पडणे हा प्रकार काही विशिस्त प्रसंगी होऊ शकतो. खूप रक्तस्त्राव, जुलाब-कॉलेरा यामुळे शोष पडून रक्तपरवाह कमी होणे, रक्तदाब खूप कमी होऊन मूत्रपिंडाचा रक्तपुरवठा थांबणे, भाजलेले रुग्ण, विषबाधा, मूत्र-पिंड सूज, शस्त्रक्रिया, शरीरात मोठी जंतुडओष (सेप्सिस) आदि. असे काही झाले तर हा आजार-अपघात संभवतो. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाल असे होऊ शकते. हा प्रकार लगेच उपचार झाल्यास दुरुस्त होऊ शकतो. फक्त नातेवाईक, डॉक्टर यांनी तो वेळीच ओळखला पाहिजे. याची प्रमुख खूण म्हणजे लघवी न होणे. दम लागणे, शिवाय त्या त्या आजाराची लक्षण-चिन्हे देखील असतात. रक्त तपासणीत क्रिएटिनिन वाढलेले दिसते. यावर ताबडतोब रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे, वेळ घालवू नये.

मूत्रपिंड-विकार (Chronic Renal Failure)

आठवडे/ महीने दीर्घकाळ चालणारा मूत्रपिंडविकार उपचाराने दुरुस्त होतो किंवा कायम राहू शकतो. मूत्रपिंडविकाराची कारणे व प्रकार खूप आहेत. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे 10000 रुग्ण या आजाराने दगावतात, कारण निदान उशिरा होते आणि मूत्रपिंड-रोपणाचा आवश्यक उपचार आपल्या गरजेपेक्षा फार कमी उपलब्ध आहे. फक्त 10% रुग्णांना हा उपचार मिळू शकतो ही वस्तुस्थिती आहे. हा विकार पुढे दिल्याप्रमाणे महाराष्ट्रात अनेक भागात/समूहात जास्त दिसून येतो:

  • उष्ण प्रदेशात, खाणीत, उष्णता असलेल्या कारखान्यात किंवा उन्हात काम करणे, आणि पाणी कमी पिणे (अशा व्यक्तीने दिवसातून पाच-दहा लिटर पाणी पीत राहणे आवश्यक आहे ) एरवी प्रौढ व्यक्तीने रोज 2-3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
  • मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ यातील पाणी-पिण्यासाठी भूजल-पाण्यावर  अवलंबून असणारे तालुके/समूह. एका अभ्यासात 14% प्रौढ लोकाना हा आजार दिसून आला. यापैकी 72% लोकांमध्ये कोणताही आजार-कारण दिसत नव्हते. (क्षारयुक्त पाणी हे कारण असू शकते)
  • मधुमेह किंवा अतिरक्तदाब असलेले रुग्ण अधिक प्रमाणात मूत्र-पिंड विकार ग्रस्त होतात. रोहिणी म्हणजे रक्तवाहिन्यात चरबी-गंज चढल्यामुळे देखील हा आजार होतो.
  • जिथे पेयजल/पिण्याचे पाणी जास्त क्षारयुक्त आढळते, विशेषकरून बोरवेलचे पाणी वापरतात अशा समूहात.
  • कीटकनाशक वापर जास्त असलेल्या शेती-प्रदेशात-उदय; विदर्भ (आपले प्रसिद्ध संशोधक डॉ हिम्मतराव बावस्कर यांनी अकोला-बुलढाणा-अमरावती या भागात सर्वे केले असतं हजारी 1.8 लोकाना मूत्रपिंडविकार, 214 लोकाना मुतखडे झाल्याचे आढळले)  
  • याशिवाय हा आनुवंशिक आजार असू शकतो.   
मुख्य लक्षणे आणि चिन्हे

बऱ्याच रुग्णाना (50%) याची लक्षणे लवकर दिसून येत नाहीत . इतराना खालील पैकी लक्षणे आणि चिन्हे दिसतात .

  • लघवीचे प्रमाण कमी होते.
  • लघवीत प्रथिने उतरतात
  • मळमळ-उलटी होते,
  • रक्तातील निरनिराळया घटकांचे (क्रिएटिनिन) प्रमाण बदलते,
  • रक्तदाब वाढतो,
  • शरीरात पाणी व क्षार साठल्याने सर्वत्र सूज येते.
  • दम लागतो,
  • रक्त-पांढरी म्हणजे अनेमिया होतो.
  • त्वचेला खाज सुटते,
  • वेळेवर उपचार  नाही झाले तर हृदय बंद पडून मृत्यु येतो. मूत्रपिंड आणि हृदयविकार यांच्यात घनिष्ट परस्पर संबंध असतात.

लघवी कमी होण्याचा अर्थ अस, की मूत्रपिंडाचे काम मंदावत आहे.

ह्या रोगांचे तज्ज्ञांकरवीच निदान व उपचार होणे आवश्यक आहे. मात्र वेळीच शंका घेणे व योग्य डॉक्टरकडे पाठवणे एवढे मात्र आपण करू शकतो. शरीरावर सूज असलेल्या रुग्णाला लघवीचे प्रमाण विचारा. हे प्रमाण कमी आढळल्यास ताबडतोब डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे. खरे म्हणजे शरीरावर सूज असेल तर बहुधा गंभीर आजार असतोच.

मूत्रपिंडावरचे उपचार गुंतागुंतीचे आणि दीर्घकाळ चालणारे असतात. त्यात येणारे यश मर्यादित असते. बिघडलेल्या मूत्रपिंडावर जास्त ताण येऊ नये म्हणून खाण्यापिण्यावर अनेक नियंत्रणे येतात. मीठ-पाण्याचे प्रमाण कमी करणे व इतर औषधोपचार हाच मुख्य उपाय असतो. यासाठी लघवीचे प्रमाण लक्षात घ्यावे लागते. कधीकधी कृत्रिम डायलिसीस करावे लागते. डायलिसीस म्हणजे रक्तातून टाकाऊ पदार्थ गळून काढून टाकण्यासाठी कृत्रिम व्यवस्था असते.

डायलिसीसमुळे मूत्रपिंडे बंद पडलेल्या रुग्णांना जीवनदान मिळालेले आहे. मूत्रपिंडाचा आजार तात्पुरता असेल तर डायलिसीस नंतर बंद करता येते. मात्र कायमच्या आजारात डायलिसीस नियमितपणे करावे लागते.

डायलिसीस (रक्ताची धुलाई-गाळणे)

डायलिसीस म्हणजे मूत्रपिंडाचे काम कृत्रिमरित्या करणे. म्हणजे रक्तातील युरिया, इ. पदार्थ धऊन टाकणे. यासाठी वेगवेगळी तंत्रे उपलब्ध आहेत.

पेरिटोनियल (पोटाचे) डायलिसीस – पोटात आतडयांवर सर्वत्र एक सूक्ष्म पदर असतो. याचा वापर करून रक्तातले नको असलेले काही पदार्थ बाहेर आणता येतात. यासाठी पोटाच्या या आवरणात द्रवपदार्थ 20-30 मिनिटे सोडला जातो. रक्तातले काही पदार्थ भौतिकशास्त्राच्या नियमानुसार या द्रवात येतात. मग हा द्रव काढून टाकला जातो. यानंतर ही प्रक्रिया काही वेळा परत परत केली जाते. कोणत्याही छोटया रुग्णालयात हा उपचार करता येतो. त्यात काही धोका असतो पण योग्य प्रशिक्षणाने तो कमी होतो. नवीन तंत्रे उपलब्ध झाल्याने हे तंत्र थोडे मागे पडले आहे.

पोटाचे नियमित डायलिसीस

रुग्णालयापासून दूर राहणाऱ्या रुग्णांना याचा विशेष उपयोग आहे. यासाठी एक टेफ्लॉन नळी कायमची पोटाच्या पोकळीत बसवली जाते. यात 2 लिटर द्रवपदार्थ सोडतात आणि 6 तासांनी तो काढून घेतात. यानंतर परत ताजा द्रवपदार्थ भरला जातो व परत 6 तासांनी काढला जातो. ही प्रक्रिया परत परत केली जाते. 24 तासांत 4 वेळा असे करतात. रोजच ही प्रक्रिया केली जाते. यामुळे रुग्ण आपले बाकीचे कार्यक्रम ठरवून पार पाडू शकतो. कधीकधी यात पोटात जंतुदोष होऊ शकतो. या उपचाराचा मासिक खर्च रु. 15-25000 पर्यंत जाऊ शकतो.

रक्ताचा डायलिसीस

यामध्ये रक्ताचा प्रवाह बाहेर आणून एका यंत्रात फिरवला जातो. याच यंत्रात दुसऱ्या बाजूला एक द्रवपदार्थ फिरत असतो. रक्त व द्रव एकमेकात मिसळू शकत नाहीत, कारण त्यात एक आधी पातळ पडदा बसवलेला असतो. रक्तातील काही पदार्थ या पडद्यातून द्रवात उतरतात.

हल्ली रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक संगणकयुक्त डायलिसीस मशिन्स उपलब्ध असतात. प्रत्येक रुग्णाला योग्य असे सेटिंग त्यात करता येते. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात सर्व गरजू रउगणणा मोफत डायलिसिस सेवा उपलब्ध आहे. आठवड्यातून दोन वेळ डायलिसिस करावे लागते.

डायलिसीस यंत्र म्हणजे एक कृत्रिम मूत्रपिंड असते. यात आता खूप सुधारणा झाल्या आहेत. तरीही त्यात धोके व दुष्परिणाम असू शकतात. याचा मासिक खर्चही बराच असतो. म्हणूनच ज्यांना शक्य आहे असे रुग्ण मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया करून घेतात.

एकाच व्यक्ति गरजेप्रमाणे आणि सोयीपरमाणे एक किंवा दोन्ही पद्धतीने डायालिसीस करू शकते, यासाठी जिल्हा रुग्णालयात मार्गदर्शन उपलब्ध आहे.

डायलिसिस : आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी माहितीपूर्ण लेख

प्रस्तावना

मानवी शरीरातील मूत्रपिंड (किडनी) हे अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत. त्यांचे प्रमुख कार्य म्हणजे रक्तातील अपायकारक पदार्थ (waste products) आणि अतिरिक्त पाणी फिल्टर करून शरीरातून मूत्राच्या स्वरूपात बाहेर टाकणे.

जेव्हा मूत्रपिंडाचे कार्य ८५–९०% पेक्षा अधिक कमी होते, तेव्हा शरीरात विषारी पदार्थ साठू लागतात. अशा स्थितीत “डायलिसिस (Dialysis)” ही उपचारपद्धती रुग्णाचे जीवन टिकविण्यास मदत करते.

डायलिसिस म्हणजे काय?

“डायलिसिस” म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ, अतिरिक्त पाणी आणि मीठ यांचे कृत्रिमरीत्या (artificially) काढून टाकणे. ही प्रक्रिया मूत्रपिंडाच्या कार्याचे काही अंशी प्रतिस्थापन (replacement) करते, परंतु मूत्रपिंड बरे करत नाही.

डायलिसिसचे प्रकार

1. हेमोडायलिसिस (Hemodialysis)

  • रक्त शरीराबाहेर मशीनमधून फिरवले जाते.
  • मशीनमधील “डायलायझर” नावाच्या फिल्टरद्वारे रक्त शुद्ध केले जाते.
  • शुद्ध झालेले रक्त पुन्हा रुग्णाच्या शरीरात परत पाठवले जाते.
  • साधारणपणे आठवड्यात २ ते ३ वेळा, प्रत्येक सत्र ४–५ तास चालते.
  • प्रवेशमार्ग (Access): AV फिस्टुला, AV ग्राफ्ट किंवा सेंट्रल व्हेनस कॅथेटर.

2. पेरिटोनियल डायलिसिस (Peritoneal Dialysis)

  • रुग्णाच्या पोटाच्या पोकळीत (peritoneal cavity) एक विशेष द्रव (dialysate) टाकला जातो.
  • हा द्रव पोटातील पडद्यामधून (peritoneum) विषारी पदार्थ शोषून घेतो.
  • काही वेळानंतर हा द्रव बाहेर काढला जातो.
  • प्रकार: CAPD (Continuous Ambulatory Peritoneal Dialysis) आणि APD (Automated Peritoneal Dialysis).
डायलिसिसपूर्व तयारी
  • आरोग्य कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्यावयाच्या बाबी:
  • रुग्णाचे वजन, रक्तदाब, तापमान मोजणे.
  • रक्त तपासण्या (Hb, Urea, Creatinine, Electrolytes) तपासणे.
  • डायलिसिस मशीनची स्वच्छता व निर्जंतुकीकरण (disinfection).
  • प्रवेशमार्ग (access site) तपासणे — सूज, लालसरपणा, पू नाही याची खात्री करणे.
  • योग्य डायलायझर, सलाईन, हिपरीन, टेप इ. साहित्य तयार ठेवणे.
डायलिसिसदरम्यान काळजी
  • रुग्णाचे रक्तदाब, नाडी, तापमान नियमित मोजणे.
  • हेमोडायलिसिसमध्ये रक्त गळती किंवा clotting होऊ नये म्हणून हिपरीनचा वापर.
  • रुग्णाला उलट्या, डोकेदुखी, छातीत दुखणे किंवा थकवा जाणवतो का हे विचारणे.
  • मशीनवरील flow rate, pressure आणि time लक्षपूर्वक पाहणे.
डायलिसिसनंतरची काळजी
  • रुग्णाचे वजन पुन्हा मोजून, काढलेले द्रव प्रमाण नोंदवणे.
  • प्रवेशमार्ग स्वच्छ व कोरडा ठेवणे.
  • रुग्णाला योग्य आहार व द्रवपदार्थ सेवनाबाबत सल्ला देणे.
  • गुंतागुंत (hypotension, cramps, संक्रमण) असल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्याला कळवणे.
डायलिसिस मुळे संभाव्य गुंतागुंत
  • रक्तदाब कमी होणे (Hypotension)
  • स्नायूंचे आकडी (Cramps)
  • संक्रमण (Infection)
  • रक्त गळती
  • अ‍ॅलर्जिक प्रतिक्रिया
  • थकवा व अशक्तपणा
रुग्ण शिक्षण
  • आरोग्य कर्मचाऱ्यांची जबाबदारी रुग्णाला शिक्षित करण्याची आहे:
  • प्रवेशमार्ग स्वच्छ व कोरडा ठेवणे.
  • पाणी व मिठाचे सेवन मर्यादित ठेवणे.
  • औषधे वेळेवर घेणे.
  • वजन व रक्तदाब नियमित तपासणे.
  • डायलिसिस सत्र चुकवू नये.
  • संतुलित आहार — उच्च दर्जाचे प्रथिन (उदा. अंडी, दुध), कमी पोटॅशियम असलेले फळे.
निष्कर्ष

डायलिसिस ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी जीवनरक्षक प्रक्रिया आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी योग्य तांत्रिक कौशल्यासोबत रुग्णाभिमुख (patient-centered) दृष्टी ठेवणे अत्यावश्यक आहे.
नियमित निरीक्षण, स्वच्छता, आणि रुग्ण शिक्षण यामुळे डायलिसिस उपचार अधिक सुरक्षित आणि प्रभावी होतो.

मूत्रपिंड रोपण ( Kidney Transplant)

काही जणांच्या बाबतीत यात निकामी मूत्रपिंडाऐवजी इतर निरोगी व्यक्तीचे मूत्रपिंड बसवण्याची शस्त्रक्रिया केली जाते. प्रत्येकाच्या शरीरात दोन मूत्रपिंडे असतात. त्यातले एखादे दिले तरी शरीराचे अडत नाही. मात्र या शस्त्रक्रिया अत्यंत खर्चीक आणि गुंतागुंतीच्या असतात.

डायलिसीसच्या ऐवजी ज्यांना शक्य आहे त्यांना मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया बरी पडते. याचा खर्च सध्या एकूण 5-10 लाखाच्या आसपास जातो. मूत्रपिंड दान करणारा योग्य दाताही भेटला पाहिजे. मूत्रपिंड-दाता हा रूग्णाचा रक्ताचा नातेवाईक असणे कायद्याने आवश्यक आहे. असा नातेवाईक नसल्यास शासनाकडून बऱ्याच प्रयत्नाने परवानगी मिळवावी लागते. मूत्रपिंडाचा काळा व्यापार व गुन्हेगारीचा काही प्रकार उघडकीस आल्याने यासंबंधी कायदा आहे. ब्रेनडेड झालेल्या रुग्णाकडून दोन मूत्रपिंडे दोन रुग्णाना उपयोगी पडू शकतात.

ज्याला मूत्रपिंड द्यायचे आहे, त्याची पूर्ण तपासणी केली जाते. त्याची स्वत:ची शारीरिक स्थिती निरोगी असायला पाहिजे. आपल्या देशात अजून मेंदू-मृत व्यक्तीचे मूत्रपिंड काढून बसवण्याची पध्दत सुरू झाली आहे. अपघातात किंवा आजाराने मेंदू निकामी झाला आहे असे रुग्ण रुग्णालयात असतात. योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करून त्यांचे मूत्रपिंड काढता आल्यास बऱ्याच मूत्रपिंड गरजूंना जीवदान मिळू शकते. नुकत्याच मृत झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढताना मूत्रपिंड चांगल्या अवस्थेत पाहिजे. यासाठी ते लवकरात लवकर काढावे लागते आणि थंड राखावे लागते.

  • मूत्रपिंड काढल्यानंतर ते लवकरात लवकर रुग्णाच्या शरीरात रोपण करतात. यासाठी संबंधित रुग्ण वैद्यकीयदृष्टया पूर्वतयारी करून सज्ज करावा लागतो.
  • मूत्रपिंड रोपण करताना देणारा आणि घेणारा यांचे रक्तगट, पेशीगट जुळले तरच उपयोग असतो. तसेच घेणाऱ्याच्या शरीरात कर्करोग, एड्स असे आजार नाहीत आणि मानसिक आजार नाही याची खात्री करावी लागते.
  • एवढे करून काही रुग्णांमध्ये बसवलेले मूत्रपिंड शरीर स्वीकारत नाही. लगेच किंवा कालांतराने हे मूत्रपिंड निकामी होते. यासाठी काही औषधे वर्षभर घ्यावी लागतात. या औषधांचे पण दुष्परिणाम असतात.
  • हल्ली मूत्रपिंड रोपणाचे शास्त्र खूप प्रगत झाले आहे. त्यामुळे सुमारे 85-90% मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत.
  • डायलिसीसच्या मानाने यात एकूण जीवनमान व समाधान जास्त असते.
  • याचा खर्च आज फार असला तरी निवडक शासकीय रुग्णालयात या शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेतून सवळतीने उपलब्ध आहेत. एकूण सुमारे 10 लाख खर्चापैकी आता 5 लाख शासकीय योजनेतून मिळतात.

आयुर्वेदामध्ये मूत्रपिंडाच्या विकारांवर अनेक औषधोपचार सुचवले जातात. त्याबद्दल आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने संशोधन अजून तरी अपूर्ण आहे.