
जपानीज एन्सेफेलायटीस हा आजार डासांमार्फत होणारा प्राणीजन्य रोग आहे. या रोगाची साथ आशिया खंडातील अनेक देशात अधून मधून उद्भवत आहे. चीन, जपान, कोरिया, इंडोनेशिया, बांगला देश, भारत, इ. देशात या रोगाची साथ मधून मधून येते.
या रोगाचा प्रादुर्भाव विशेषतः ग्रामीण भागात आढळून येतो. मात्र शहरानजिकच्या वस्तीत/ झोपडपट्टीतसुध्दा या रोगाची साथ आढळून आली आहे. ग्रामीण भागात तसेच झोपडपट्टीत पुष्कळ डुकरे आढळतात. या डुकरांमध्ये जपानी मेंदूज्वराचे विषाणू मोठया प्रमाणात असतात. क्युलेक्स या डासांच्या मादीद्वारे या विषाणूंचा प्रसार होतो. हे डास डुकरांना चावतात. डुकरांना मात्र या विषाणूपासून काहीही अपाय होत नाही. डुकरे-पाणपक्षी-डास-माणूस या निसर्गचक्रात आजारचे विषाणू राहतात आणि संक्रमित होतात. भातशेती हा यासाठी आदर्श परिसर असतो, त्यामुळे आशा राज्यांमध्ये (उत्तर प्रदेश, ब्ऊहार, ओरीसा) हा आजार पुष्कळ होता, त्यात लशीकरणामुळे आळा बसला आहे.
या डुकरांना चावलेले डास जेव्हा माणसांना चावतात, तेव्हा 9 ते 12 दिवसांनंतर माणसांमध्ये जपानी मेंदूज्वर हा रोग दिसू लागतो. या विषाणूंची बाधा झालेले मादी डास पुढील डासांच्या पिढीत सुध्दा या विषाणूंचा प्रसार करतात. ज्या भागात स्थलांतर करणारे बगळयासारखे पक्षी काही काळ वास्तव्य करतात, तेथेही या पक्ष्यांकडून डासांमार्फत या रोगाचा प्रसार होऊ शकतो. या रोगाचा अधिशयन काल 5 ते 15 दिवस असतो.
या रोगाचे विषाणू रक्तात फार अल्पकाळ टिकत असल्याने या रोगाचा प्रसार माणसांमार्फत होत नाही. माणसाला झालेला जंतूसंसर्ग त्या व्यक्तीपुरताच मर्यादित राहून थांबतो.
या रोगाची लागण लष्करातील सैनिकांना होण्याची जास्त शक्यता असते. तसेच विदेशी प्रवासी जर ग्रामीण भागात एक महिन्याहून अधिक काळ वास्तव्य करणार असतील तर त्यांनाही या रोगाची लागण होण्याची शक्यता असते.
या रोगाचे वैशिष्टय म्हणजे या रोगाची साथ मोठया प्रमाणावर कधीही येत नाही. 4-6 व्यक्तींना लागण व त्यातील 1- 2 मृत्यू असे काहीसे चित्र आढळून येते. ज्यांना या रोगाची लक्षणे दिसतात त्यापैकी 20 ते 50 टक्के व्यक्ती मृत्युमुखी पडतात. मृत व्यक्तींमध्ये 65 वर्षावरील व्यक्तींचे प्रमाण जास्त आढळते.
या रोगाची बाधा होऊनही बहुतेक व्यक्तींमध्ये या रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत. या रोगाची लक्षणे 15 वर्षातील मुलांमध्ये किंवा 65 वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये आढळून येतात. मात्र ज्या भागात या रोगाची पूर्वी साथ आलेली नसेल, अशा भागात कोणत्याही वयोगटात रोगाची लक्षणे दिसून येतात. मध्यवर्ती चेतासंस्थेवर- मेंदूवर या रोगाचा प्रभाव दिसून येतो.
सुरुवातीला ‘फ्लू’ सारखी लक्षणे दिसून येतात. ताप येतो, डोके ठणकते, मळमळते, उलटी येणे, जुलाब होणे, इ. लक्षणे दिसून येतात.
ज्यांच्या मेंदूस या रोगाच्या विषाणूंमुळे सूज आली असेल अशा थोडया व्यक्तींना जीभ अडखळणे, हात-पाय थरथरणे, चालताना पाय लटपटणे, अर्धांगवायू होणे, इ. लक्षणे दिसतात. या रुग्णात मनाची गोंधळलेली स्थिती होणे, वागणुकीत बदल होणे, इ. लक्षणेही आढळून येतात.
या रोगाची लागण प्रसूतिपूर्व काळात गरोदरपणाच्या 6 महिन्याच्या कालावधीत झाल्यास गर्भपात किंवा मुदतपूर्व प्रसूती संभवते.
ज्या व्यक्ती मृत्यूच्या तावडीतून सुटतात, त्यापैकी दोन तृतियांश व्यक्तींना या रोगाची कायम स्वरूपी हानी सोसावी लागते. लुळेपणा, कंपवात, मानसिकतेत बदल, मतिमंदपणा, इ. ने त्या व्यक्तीची कायमची हानी होते.
या रोगाचे निदान रक्तद्रव्याची तपासणी करून तसेच पाठीच्या मणक्यातील पाणी तपासणी करून करता येते.
या रोगावर कोणतेही प्रभावी औषध नाही. सहाय्यक उपचार, चांगली शुश्रूषा करणे, यास विशेष महत्त्व आहे. अशा संशयित रुग्णास सरळ रुग्णालयात दाखल करावे. हाता-पायात लुळेपणा आलेल्या रुग्णांना पुढे भौतिकोपचार/ व्यायामोपचार देणे आवश्यक असते.
अतिप्रमाणात मद्यपान (Alcohol) केल्यामुळे चेतासंस्थेवर गंभीर परिणाम होतात. मेंदू व मज्जारज्जूवर होणाऱ्या या परिणामांना “अल्कोहोलिक न्यूरोडॅमेज” असे म्हणतात. दीर्घकाळ मद्यपान केल्याने मेंदूतील पेशींचे नुकसान होते, स्मरणशक्ती कमी होते आणि विचार करण्याची क्षमता घटते. काही रुग्णांमध्ये गोंधळ, व्यक्तिमत्त्व बदल आणि निर्णयक्षमता कमी होणे दिसते.
मद्यपानामुळे Wernicke encephalopathy आणि Korsakoff syndrome हे विकार होऊ शकतात, जे प्रामुख्याने व्हिटॅमिन B1 (थायामिन) कमतरतेमुळे होतात. यामध्ये डोळ्यांच्या हालचाली बिघडणे, चालण्यात अडचण आणि गंभीर स्मृतिभ्रंश दिसतो. तसेच, “अल्कोहोलिक न्युरोपथी”मध्ये हात-पायात मुंग्या येणे, जळजळ, कमजोरी आणि चालण्यात त्रास होतो.
अशा रुग्णांमध्ये लवकर लक्षणे ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. मद्यपान थांबवणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. योग्य आहार, विशेषतः बी-व्हिटॅमिन्सची पूर्तता, औषधोपचार आणि पुनर्वसन यामुळे रुग्णाची स्थिती सुधारू शकते. जागरूकता आणि समुपदेशन हे प्रतिबंधासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.