
जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्याच मुळी केली आहे ती अशी – शारीरिक मानसिक आणि आत्मिक सुख समाधान म्हणजेच आरोग्य. शरीरातल्या एखाद्या अवयवाचा विकार किंवा आजार झाल्यावर जसे शरीराचे काम बिघडते आणि दु:ख होते तसेच मनाचेही आजार आणि विकार होतात. त्याने त्या माणसाला दु:ख आणि पीडा होत असते.
मात्र दुर्दैवाने मानसिक आजार हा जणू काही त्या माणसाची गैर वागणूक किंवा दोष किंवा दुर्दैव, शाप वगैरे समजून शिक्का मारला जातो. ही सामाजिक धारणा आपल्याला बदलायची आहे. एक शास्त्रीय, मानवीय आणि नैतिक मनोभूमिका बाळगून मनोविकारग्रस्त स्त्री पुरुषांना बरे व्हायला आपण मदत करू शकतो आणि खरोखर माणसात आणू शकतो.
मानवी इतिहासात मन आणि मनोरुग्ण यांच्याबद्दल प्राचीन काळापासून निरनिराळ्या देशांनी विचार आणि चिंतन मनन असे संशोधन झाले आहे. मनोविकारांचे एक अंधार युग संपून विज्ञानाच्या प्रकाशात आपण हे आजार पाहू शकतो. मनोविज्ञानामुळे मनोविकारांचे एकूण चित्रच पालटले आहे. यानंतर अजूनही प्रगती होणार आहे. जे काल असाध्य वाटत होते ते आजार औषध उपचारांच्या टप्प्यात आलेले आहेत.
हे मनोविज्ञान आणि त्याची फळे अजून समाजातल्या सर्व थरात, खेड्यापाड्यात आणि घरोघर पोहोचवायचे काम आपणच करू या. यासाठी केवळ मनोविकार तज्ज्ञ डॉक्टरांवर अवलंबून न राहता त्यांच्याबरोबर एक कार्यकर्त्यांची साखळी तयार करावी लागेल. अशा शुभंकर मनोविकार कार्यकर्त्यांसाठी ही पुस्तिका आहे.
मानसिक आरोग्य कार्यकर्त्यांसाठी माहिती पुस्तिका हातात देताना आम्हाला आनंद होत आहे. बेसिक नीडस् इंडिया या संस्थेच्या वतीने मला हे काम सुचवल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. या संस्थेचे महाराष्ट्रातील कार्यकर्ते विशेषत: नंदुरबार, औरंगाबाद, जव्हार, त्र्यंबक आदी भागातले कार्यकर्ते व संस्था यांनी मला त्याच्या क्षेत्रात फिरवून आणले व समस्यांची ओळख करून दिली. याआधी मला या समस्यांची जाणीव कमीच होती हे मान्य केले पाहिजे. या पुस्तकात काही भाग डॉ. विक्रम पटेल यांच्या पुस्तकातून तर काही वेबसाईटस् वरून घेतला आहे. यातील चित्रे ही श्री.ज्ञानेश बेलेकर यांनी काढलेली आहेत.
हे पुस्तक आपल्यासारखे कार्यकर्ते कुटुंबातील काळजीवाहू मंडळी, आणि इतर जिज्ञासू वाचकांसाठीच आहे. याचा मुख्य उद्देश मनोविकारांबद्दलची आपली माहिती, जाणीवा आणि मनोभूमिका बदलणे हाच आहे. मनोविकारांसाठी आरोग्य कार्यकर्ते उर्फ शुभंकर म्हणून आपण कितीतरी गोष्टी करू शकतो. भारतात मूळातच मनोविकारतज्ज्ञ डॉक्टर फारच कमी आहेत आणि आहेत ते मुख्यत: मोठ्या शहरांमध्येच आहेत. पण तरीही हे पुस्तक डॉक्टरांची जागा भरून काढण्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांच्या तयारीसाठी आहे. आपण शुभंकर कार्यकर्ते मनोविकार तज्ज्ञांना पूरक आणि साहायक कामे पार पाडणार आहोत.
एखादा मनोरुग्ण मनोविकार तज्ज्ञाकडे नेईपर्यंत अनेक प्रकारची कामे आपल्याला करावी लागतील. यात मुख्यत: सामाजिक जागृती, कुटुंबांना घरातला मनोविकारग्रस्त माणूस शोधण्यासाठी मदत करणे आणि डॉक्टरांपर्यंत घेऊन जाणे हे तर अगदीच महत्त्वाचे काम आहे पण वैद्यकीय उपचारांनंतरही नियमित पाठपुरावा आणि मदत केल्याशिवाय अपेक्षित यश मिळणार नाही. म्हणजेच डॉक्टरांकडे नेईपर्यंत आणि डॉक्टरांकडून परत आल्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला कार्यरत राहायचे आहे.
खरे म्हणजे मनोविकारग्रस्त व्यक्ती आणि कुटुंबाबरोबर आपण त्यांच्या डॉक्टरांकडे जाऊ शकलो तर एकूण आजार व पाठपुराव्याचे मुद्दे समजायला जास्त उपयोग होतो पण हा मामला जरा खाजगी असल्याने डॉक्टर कार्यकर्त्यांना तपासणीचे वेळी आत घेतीलच असे नाही. तरीही डॉक्टरांकडून आपणही उपचार समजावून घेणे महत्त्वाचे असते. घरी परतल्यानंतर नियमित उपचारांबद्दल खात्रीशीर पाठपुरावा करणे हे काम असतेच पण औषधांचे काही दुष्परिणाम झाले तर त्याच्यावर लक्षही ठेवायला लागते. गंभीर मानसिक आजारांच्या उपचारात त्या कुटुंबालाही बराच त्रास, खर्च आणि आर्थिक नुकसान पडू शकते. काही मनोविकारग्रस्तांना स्वत:च्या आजाराची मूळात जाणीव नसतेच त्यामुळे त्यांच्याकडून सहकार्य मिळतेच असे नाही. खेड्यातल्या रुग्णांना आणि कुटुंबांना तर हा सर्व त्रास दुप्पट असतो. अनेकजण मधेच निराश होऊन उपचार सोडून देतात. त्यांना धीर द्यावा लागतो. कार्यकर्त्यांचे सहकार्य नसेल तर बरीच मंडळी उपचार सोडून देतात असे दिसून आले आहे त्यामुळे आपला सहभाग डॉक्टरांइतकाच महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्या.
त्या कुटुंबाच्या शेजार-पाजारी देखील आपल्याला कधीकधी सांगून सवरून मदत मिळवावी लागते. त्या मनोरुग्णाकडून काही त्रास झाला तर तो उदार मनाने समजून येण्यासाठी आणि मदत करण्यासाठी शेजार्यांनाही काही भूमिका पार पाडावी लागते. इतरांकडून चिडवणे, त्रास देणे, मारहाण वगैरे त्रास झाला तर एकूण उपचारात व्यत्यय निर्माण होतो. हे आपण प्रयत्नपूर्वक टाळू शकतो. आपले मुख्य काम म्हणजे मनोरुग्णांना आणि कुटुंबांना दिलासा देऊन उपचार पूर्ण करून घेणे आणि एका अडचणीच्या टप्प्यातून त्यांना सुखरुप बाहेर काढणे.
भारतामध्ये आपल्या एकूण आरोग्यव्यवस्थेत मानसिक आरोग्यांचे फारसे काही स्थान नाही; त्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्तेही नाही. सामान्यपणे इतर कोणतेही डॉक्टर मनोविकारांना उपचार करायला उत्सुक नसतात कारण त्यांना तसे प्रशिक्षण आणि अनुभव नसतो. म्हणूनच सामान्य डॉक्टरांचेही या दृष्टीने प्रशिक्षण झाले तर फार बरे होईल. या पुस्तिकेतून स्वयंसेवक, पॅरामेडिक आणि परिचारिकांचे प्रशिक्षण होऊन खेडेगावांमध्ये काहीतरी काम सुरू होऊ शकते. हे पुस्तक शहरी आणि ग्रामीण या दोन्ही दृष्टिकोनातून तयार केलेले आहे. हे पुस्तक वाचून कुटुंबातील मंडळीही आपल्या माणसांची देखभाल समजून उमजून आणि जास्त तयारीने करतील अशी आम्हाला खात्री आहे. औषधोपचार पूर्ण करून आपला माणूस परत माणसात आणणे ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. हे पुस्तक यासाठी आपल्याला मदत करेल.

एकूण समाजात मनोविकारांबद्दल फार गैरसमज आणि घृणा, भीती वगैरे भावना आहेत. मनोरुग्ण म्हणजे काहीतरी संकट किंवा लांछन असा सर्रास समज आहे. या परिस्थितीत अनेक कुटुंबे आपल्या घरातला आजार लपवून किंवा दाबून ठेवतात आणि शास्त्रीय उपचारांपासून दूर भटकत राहतात. असा त्रास उगीचच अंगावर काढणे किंवा वेळ पैसा घालवत राहणे हे खरोखरच व्यर्थ आहे. आपण जेवढ्या लवकर या गुंत्यातून वाट काढू तेवढे त्या मनोरुग्णासाठी आणि कुटुंबासाठी चांगले असते.
मनोरुग्णाच्या औषधउपचारांबरोबरच इतर काही पूरक उपचार पद्धतीही आहेत त्याची माहिती आपल्याला या पुस्तकातून मिळेल. या पूरक पद्धतींचाही यथायोग्य वापर आपण हळूहळू करायला शिकू शकतो.