मानसिक आरोग्य आणि मनोविकार

नोंदी ठेवा

आपल्या कामाची दैनंदिन नोंद ठेवा. यात काय काय काम केले, कोण कोण भेटले, काय अडचणी आल्या, त्यांचे निराकरण कसे केले, काही पत्ते व फोन नं. वगैरे गोष्टींची नोंद ठेवावी. काही विशेष घटनांचीही नोंद करा.

आपल्या कामाचे नियोजन करून डायरीमध्ये नोंदवून ठेवा.

रुग्णांच्या कुटुंबीयांना देखील एक छोटी वही देऊन त्यात आवश्यक नोंदी करायला सांगा. यात उपचार, औषधांचे काही दुष्परिणाम, डॉक्टरांची भेट वगैरे नोंदी असाव्यात.

निरनिराळे अहवाल, पत्रके आणि इतर कागदपत्रांसाठी एक फाईल ठेवा. फाईल ठेवण्याचे काम कदाचित तुमची संस्थाच करेल.

कॅमेरा किंवा मोबाईल असेल तर काही फोटो घेऊन ठेवा. उपचाराआधी आणि नंतर किती फरक पडतो हे फोटोवर पण कळून येते. अर्थात हे फोटो शक्यतो इतर कुणाला दाखवू नयेत कारण ते खाजगी असतात. फोटो काढण्याच्या आधी कुटुंबाला सांगून ठेवा व पूर्व संमती घ्या. रुग्णांच्या फोटोंशिवाय त्या त्या घराचे, व्यक्तीच्या कामाच्या जागेचे, कुटुंबीयांचे फोटोही संग्रही असू द्यावेत.

आपल्या कार्यक्षेत्रातील मनोविकारग्रस्त कुटुंबातील संपर्काचे फोन नं./मोबाईल नं. नोंदवून ठेवा. उपचारासाठी कॉल करून किंवा संदेश पाठवून आठवण करता येईल.

दर तीन महिन्यांनी एक गोषवारा तयार करा. यात नवे रुग्ण, जुने रुग्ण, रुग्ण भेटी, डॉक्टरांच्या भेटी, आरोग्यसंवादाचे कार्यक्रम वगैरे मुद्दे असावेत. गोषवार्‍याची एक प्रत संस्थेला द्या आणि एक आपल्याकडे ठेवा. यासाठी तुमच्या संस्थेकडे एखादा नमुना मिळू शकेल. या गोषवार्‍याच्या मदतीने आपल्या कामाची प्रगती व त्रुटी यांचे आकलन होऊ शकते.

प्रत्येक तिमाहीचे नियोजन आपल्याकडे आधीच पाहिजे. यात आपण काय काय करणार आहोत हे नोंदवून ठेवा.

तुमच्या कार्यक्षेत्रातल्या खेड्यांचा सोपा नकाशा बनवून संबंधित घरांवर खुणा करा.

मानसिक आरोग्याचे काम हे सांघिक काम असते. हे काम आपण एकट्याने नाही तर सांघिक पद्धतीने करायचे आहे. यासाठी आपले संस्थेतले सहकारी, आरोग्य खात्याचे इतर कर्मचारी व स्वयंसेवक, गावातील शिक्षक व ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नगरसेवक, आणि अर्थातच सरकारी रुग्णालयातले मनोविकार तज्ज्ञ यांच्याशी समन्वय असायला हवा. आपण एकट्याने जे करतो त्यापेक्षा सांघिक पद्धतीने केले तर अनेक पटींनी फायदा होतो.

कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या काही अडचणी

लोकांमध्ये मनोविकारांबद्दल पुरेशी जागृती नाही 
औषधांबद्दल लोकांना माहिती नसते 
कुटुंबातील लोक ऐकत नाहीत. 
जरा बरे वाटले की औषधे बंद करतात. 
मिटींगला माणसे जमत नाहीत. 
या आजारांबद्दल गैरसमजच फार आहेत. 
उपचारांमध्ये धरसोड फार असते. 
लोकांना मनोविकार असल्याचे मान्यच नसते. 
केाही लोक मनोविकारांना जादूटोणाच समजतात. 
  
सरकारी रुग्णालयांमध्ये फार अडचणी येतात. 
प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयी नसतात. 
ग्रामीण रुग्णालयात सोयी नसतात. 
  
मनोविकार ओळखायला अवघड असतात 
अनेक डॉक्टरांनाही मनोविकारांची नीट माहिती नसते. 
मनोविकारांची वर्गवारी करणे फारच कठीण. 
पेशंट बांधलेला असेल तर उपचार फार अवघड होतात. 
मनोविकारग्रस्त माणसांशी संवादच होऊ शकत नाही. 
आठवड्याभरात बरे नाही वाटले तर औषध बंद करतात. 
औषधांनी आराम पडला नाही तर आशा सोडून देतात. 
उपचारांनी फरक पडला तरी लवकर औषधे बंद करतात. 
  
कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बरी नसते त्यामुळे अडचण 
आजार लपवण्याकडे जास्त प्रवृत्ती 
घरातले लोक रुग्णांना चांगले वागवत नाहीत. 
मनोविकार म्हणजे कलंक हा गैरसमज काढणे फारच अवघड 
शेजारी-पाजारी सहकार्य करत नाहीत. 
पेशंट स्त्री असेल तर फारच अवघड होते. 
कुटुंबातील लोक रुग्णासाठी वेळ द्यायला तयार नसतात. 
पेशंटला अलग पाडले जाते. त्यामुळे अडचण 
भगतांवर ज्यादा विश्‍वास असतो, आमच्यावर कमी. 

कुटुंबातील काळजीवाहू सदस्यांची जबाबदारी

मनोविकार कुठल्याही कुटुंबात होऊ शकतो, शहर असो की खेडे. नागरी व ग्रामीण समाजात त्याचे प्रमाण सारखेच असते पण उपचारांबद्दल जागृती मात्र कमी-जास्त असते. त्यामुळेच नागरी,शहरी कुटुंबातले जास्त मनोरुग्ण लवकर बरे होतात तर खेड्यांमध्ये हे प्रमाण कमी असते.

मनोविकारग्रस्त व्यक्ती असलेल्या प्रत्येक कुटुंबाला त्याचा त्रास असतोच. एकतर आपल्या समाजात मनोविकार म्हणजे एक लांछन किंवा कलंक असतो. त्यामुळे आजार लपवायचीच जास्त इच्छा असते. कुटुंबाचे सामाजिक संबंध कमी होतात किंवा बिघडतात. लग्न जमवणे आणखी अवघड असते. बहुतेक वेळा आजार तरुण वयात उमटत असल्याने शिक्षण, रोजगार, नोकरी, सामाजिक संबंध, लग्न किंवा मुलांची देखभाल या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात.

शिक्षण कमी असेल तर त्या कुटुंबात अडचणी येऊ शकतात. एकतर असे लोक आधी भगतबुवाकडेच जायला बघतात यामुळे वेळ आणि पैसा बरबाद होतो. मनोविकारांच्याकडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन पटवायला अशा कुटुंबांमध्ये फार अवघड पडते. हा दैवी शाप नाही व जादूटोणा नाही हे पटवणेही जड जाते. अर्थात अनेक शिकलेले लोक पण अशा गोष्टींवर विश्‍वास ठेवतात पण त्याचे प्रमाण कमी असते आणि ते लवकरच रस्ता बदलू शकतात.

अनेक कुटुंबांमध्ये मनोविकारग्रस्ताला राहायला वेगळी खोली नसते. त्यामुळे देखभाल करणे अवघड होते व इतरांना त्रासही होतो. त्या रुग्णालाही त्याचा त्रास होतो.

गंभीर मानसिक आजार हा सामाजिक सृष्ट्या एक दूषण होऊन जाते. त्या कुटुंबाकडे लोक बोट दाकवतात ही भीती असते. स्वत: त्या मनोविकारग्रस्त व्यक्तीलाही शिक्षण, कामधंदा व सामाजिक संबंधांमध्ये कमीपणा येतो. एकतर ते इतरांसारखे पूर्ण कार्यक्षमतेने काम करू शकत नाहीत किंवा शिकू शकत नाहीत. त्यातही सामाजिक अडचणींची भर पडते. परस्परांमधला संपर्क तुटण्याने गोष्टीआणखी अवघड होतात.

आपल्या समाजात दर २० कुटुंबांमागे एखादा गंभीर मानसिक रुग्ण असतोच. यापैकी एक तृतियांश मनोरुग्ण स्वत:ची सामान्य काळजीही घेऊ शकत नाहीत. उदा. स्वच्छता, खाणे-पिणे, अपघात टाळणे इ. म्हणूनच अशा व्यक्तींची काळजी घेण्यासाठी घरात माणसे लागतात. मतिमंद मुलांच्या बाबतीत तर हा प्रश्‍न आणखीनच तीव्र असतो. अशा परिस्थितीत कुटुंबाचे आर्थिक चक्र बिघडते आणि कुटुंब आर्थिक दुष्टचक्रात अडकण्याची शक्यता असते. मूळात कुटुंब गरीब असेल तर या सर्वच अडचणी वाढतात. उपचारासाठीही पैसे आणि वेळ लागतातच. त्यामुळे मनोविकारग्रस्त व्यक्तीकडे कुटुंबाचे दुर्लक्ष होऊ शकते. आणि स्त्री मनोरुग्ण असेल तर हा त्रास अधिकच जास्त होतो.

मनोविकारग्रस्त व्यक्तीची काळजी घेण्यासाठी कुटुंब हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. संस्था किंवा सरकार यांची भूमिका शेवटी दुय्यमच असते. भारतात कुटुंब व्यवस्था शिल्लक आहे ही भाग्याची गोष्ट आहे. काळजीवाहू नातेवाईकांसाठी खालील काही मुद्दे महत्त्वाचे आहेत.

  • वेळच्या वेळी गोळ्या व उपचार देणे.
  • वेळोवेळी समुपदेशनासाठी घेऊन जाणे.
  • मनोविकारग्रस्त व्यक्तीचे पुनर्वसन आणि कुटुंबाचे उत्पन्न चालू ठेवणे.
  • इतर कुटुंबांशी व समाजाशी संपर्क तुटू न देता त्यांची मदत मिळवणे
  • मनोविकारग्रस्त व्यक्ती स्त्री असेल तरी दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे.
  • रुग्णाची दैनंदिन जबाबदारी बहुधा घरातल्या स्त्रियांवर येऊन पडते मात्र त्या ते एकट्या करू शकत नाही. ही जबाबदारी घरातल्या मंडळींनी वाटून घेतली पाहिजे. यासाठी पुरुषी चौकट मोडायला शिकले पाहिजे.
  • मनोरुग्ण स्त्री असेल तर लग्न मोडणे किंवा सोडून देण्याची शक्यता जास्त असते. आधीच मुले असतील तर समस्या आणखी बिकट होते.
  • खरे म्हणजे मनोविकारग्रस्त व्यक्तीची काळजी वाहावी यासाठी त्या कुटुंबाची मानसिक किंवा इतर तयारी झालेलीच नसते, प्रशिक्षणही नसते. बर्‍याच वेळा या अचानक आलेल्या आघाताने कुटुंब खचून जाते. त्यामुळे कुटुंबाची मनोभूमिका तयार करणे हे फार महत्त्वाचे काम आहे.
  • मनोरुग्ण स्त्री असेल तर पुरुषांकडून तिची स्वच्छता वगैरे होणे थोडे अवघडच होते. याउलट पुरुष रुग्ण आक्रमक-अनावर होत असेल तर स्त्रियांना त्यांची देखभाल करणे जड जाते.
कुटुंबात काळजीवाहक कोण होऊ शकते?
  • अशी व्यक्ती खुद्द कुटुंबात राहत असणे आवश्यक आहे.
  • मनोविकारग्रस्त व्यक्तीशी काळजीवाहक व्यक्तीचे नाते व भावबंध चांगले असायला पाहिजे तरच हे काम सोपे होईल.
  • काळजीवाहक व्यक्तीने समोरची परिस्थिती मनोमन स्वीकारलेली असावी आणि स्वत:च्या भूमिकेबद्दल नाईलाज नाही तर उत्साहाची भावना असायला पाहिजे.
  • काळजीवाहक व्यक्तीला यासाठी पुरेसा वेळ काढता आला पाहिजे.
  • काळजीवाहक व्यक्तीने धीर न सोडता खंबीर राहिले पाहिजेे.
  • मनोविकारग्रस्त माणूस घरात ठेवूनच बरा करायचा आहे रुग्णालयात नाही याबद्दल काळजीवाहकाची श्रद्धा पाहिजे. त्या त्या मनोविकाराबद्दल काळजीवाहक व्यक्तीला पुरेशी माहिती आणि कौशल्य असले पाहिजे.
  • एकापेक्षा अनेक काळजीवाहक व्यक्ती असल्यास चांगले.
काळजीवाहकाच्या मुख्य जबाबदार्‍या
  • मनोविकारग्रस्त व्यक्तीची स्वच्छता, आहार, निद्रा इ. काळजी घेणे हे प्रथम कर्तव्य आहे.
  • नियमित औषधोपचार आणि समुपदेशनाच्या तारखा पाळणे.
  • पुनर्वसनासाठी मदत करणे
  • कामात-करमणुकीत गुंतवणे
  • मनोविकारग्रस्त व्यक्तीचे कौटुंबिक, सामाजिक संबंध सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणे आणि सहभागाला प्रोत्साहन देणे
काही निरीक्षणे
  • मॅनिया किंवा उन्माद झालेल्या व्यक्तींना सांभाळणे काळजीवाहकाला जरा जास्त जड जाते.
  • त्या मानाने भ्रमविकार आणि निराशाविकार झालेल्या व्यक्ती सांभाळणे सोपे असते.
  • काही झाले तरी कुटुंबाला या रुग्णासाठी वेळ द्यावाच लागतो, खर्चही वाढतो आणि थोडा त्रासही होतो.
  • कुटुंबाच्या उत्सव-मनोरंजन वगैरे गोष्टींवर थोड्या मर्यादा येतात. कदाचित काही व्यक्तींकडे थोडे दुर्लक्ष होते हे सगळे स्वीकारावे लागते.
  • वृद्ध आई-वडिलांना मनोविकारग्रस्त मुलांना सांभाळणे जडच जाते.
  • काही वेळा भ्रमविकार किंवा उन्मादग्रस्त व्यक्ती कुटुंबीयांना मारहाण करतात, हे सहन करावा लागते.
  • काळजीवाहक व्यक्तींच्या मनावर त्याचा अनेक प्रकारे ताण येतो.
  • सामाजिक संबंध आणि मनोरंजनात काटकसर केल्यामुळे आणि खाजगीपणा कमी झाल्यामुळे एकूण कौटुंबिक ताण अजूनच वाढतो.
  • कुटुंबाला काही आर्थिक ताणही सहन करावा लागतोच.
  • कित्येकदा काळजीवाहक व्यक्ती १-२ असतात आणि कुटुंबातली इतर मंडळी यात लक्ष घालत नाही.
  • काही काळजीवाहकांना या ताणामुळे स्वत:च निराशेचा अनुभव येतो आणि म्हणून त्यांनादेखील जुळवून घ्यायला शिकावे लागते.
  • शेजार-पाजार या कामात थोडी मदत किंवा आधार मिळाला तर एकूण काम सोपे होते. अशा अनुकूल परिस्थितीतल्या मनोविकारग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज कमी पडते असे अनुभव आहेत.
  • काही काळजीवाहक व्यक्ती या कामातून चक्क समाधान किंवा एक आत्मिक आनंद मिळवतात. अशा व्यक्ती माहिती घेत राहतातआणि कौशल्ये शिकतात त्यामुळे त्यांची या आजाराची एकूण जाणीव वाढते.
  • काही काळजीवाहक व्यक्ती खर्चाच्या भीतीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रसंग टाळतात असे दिसते.
  • एखाद्या समाजाची एकूण संस्कृती आणि कुटुंबातली रचना यावर काळजीवाहक व्यक्तीची भूमिका ठरू शकते.

काही समाजांमध्ये मनोविकारांबद्दल एवढा बाऊ केला जात नाही आणि आजारी माणसाची काळजी घेणे हे सांस्कृतिक मूल्य मानले जाते. याउलट काही सामाजिक-आर्थिक स्तरांमध्ये अशा व्यक्ती कुटुंबाबाहेर टाकल्या जातात. कधीकधी प्रत्यक्ष आई-वडीलांवरही अशी पाळी येऊ शकते. छोट्या कुटुंबांमध्ये माणसे कमी असल्यामुळे काळजीवाहकाचे काम जास्त अवघड होते. कुटुंबाच्या डॉक्टरांकडून अवास्तव अपेक्षा असल्या, अपुरा समज असला तसेच काही वैवाहिक व वारसा हक्काचे प्रश्‍न असले तर अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. काळजीवाहकाने भावनिकदृष्ट्या किती गुंतायचे हे ठरवून वागले पाहिजे.

कुटुंबातला मुख्य काळजीवाहक हा सर्व दृष्टीने महत्त्वाचा असतो. आरोग्य कार्यकर्त्यांनी त्यांना हरप्रकारे मदत केली पाहिजे.

मनोविकारतज्ज्ञ डॉक्टर्स आणि समुपदेशकही यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

मनोविकारांची लक्षणे व चिन्हे

मनोविकार निरनिराळ्याअनेक लक्षण-चिन्हांना घेऊन येतात. मात्र बहुतेक वेळेस त्यांना स्वत:ला त्याची जाणीव कमी असते. ही लक्षणे-चिन्हे बहुधा नातेवाइक किंवा मित्र मंडळीच सांगू शकतात. खाली दिलेल्या अनेक लक्षण चिन्हांपैकी काही थोडीच प्रत्येक मनोरुग्णामध्ये दिसून येतील सगळी नाही.