मानसिक आरोग्य आणि मनोविकार

घरगुती शुश्रुषा

त्या कुटुंबाकडून जेवढी काळजी आणि निगरानी शक्य आहे तेवढेच या माणसाचे आयुष्य असते, स्वच्छता म्हणजे मल मूत्रादि स्वच्छता, खाऊ-पिऊ घालणे आणि पडण्या-घसरण्यापासून सांभाळणे या मुख्य महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हा माणूस कुणाशीही नाते ठेवू शकत नाही कारण त्याचे स्मरणच गेलेले असते. गृह शुश्रुषेसाठी लागल्यास काही प्रशिक्षण घेता येते. अंग कोमट पाण्याने पुसून घेणे, कपडे काढणे-घालणे, तोंड व दातांची स्वच्छता, लघवीचे भांडे देणे, बेडपॅनमधील मलविसर्जन आणि त्यानंतरची स्वच्छता, अंथरुण घालणे आणि स्वच्छ ठेवणे, वेळच्या वेळी खाऊ-पिऊ घालणे आणि औषधे देणे.

ताप खोकले, जुलाब किंवा बद्धकोष्ठ होऊ शकतात त्यासाठी उपचार करावेत. रुग्णाला बिछान्यात पडून खालच्या भागात जखमा होतात (शय्याव्रण) हे टाळण्यासाठी दर अर्ध्या तासाने कुस बदलावी लागते. सारखे पाठीवर झोपून चालत नाही. पाण्याची किंवा हवेची गादी किंवा किमान प्लॅस्टिकचे बुरबुडे असलेले अंथरुण यासाठी फार उपयुक्त आहे. यामुळे त्याच्यावर दबाव येत नाही. शारीरिक स्वच्छतेबरोबरच अंथरुण आणि खोली स्वच्छ ठेवावी व जखम होईल अशा वस्तू किंवा पद्धती टाळाव्यात. अर्थातच एकच माणूस हे करू शकत नाही. त्यासाठी ३-४ माणसांची टीम पाहिजे. जर कुटुंबात पुरेशी माणसे नसतील तर शेजार्‍या पाजार्‍यांनी ही जबाबदारी घेतली तर फारच चांगले. खरे म्हणजे असे प्रशिक्षित स्वयंसेवक पाहिजेत.

अनेक शहरांमध्ये अशा रुग्णांसाठी दैनंदिन रोजावर प्रशिक्षित साहायक मिळतात आणि यात रोजगाराची संधी खूप आहे. स्त्रियांना अशा स्वरुपाचे काम मिळू शकते आणि रोजगारही बरा मिळतो. याचा दुसरा अर्थ असा की कुटुंबाला अशा व्यक्तींसाठी मासिक खर्च १०-१५ हजार रुपयांपर्यंत लागू शकतो.

वृद्धाश्रम

सर्वच कुटुंबांमध्ये अशा रुग्णांना सांभाळायला सोयी किंवा पुरेशी माणसे नसतात. त्यामुळे वृद्धाश्रमांमध्ये रुग्णांना ठेवण्याची पद्धत वाढत आहे. अश निवारागृहात मासिक शुल्कावर किंवा सरकारी अनुदानावर अनेक वृद्धांचा सांभाळ केला जातो. शहरांमधली लहान घरे, कामाची धावपळ इ. कारणांमुळे वृद्धाश्रम काही बाबतीत बरे पडतात. मात्र ज्यांनी आपला सांभाळ केला आहे त्या आई-वडिलांना केवळ काही खर्च देऊन प्रेमाशिवाय लांब ठेवणे ही संस्कृती म्हणून योग्य नाही. त्यांना पुरेसे प्रेम व आधार देणे त्या त्या पिढीचे कर्तव्य असते.

मानसिक आजारांवर इतर पूरक उपचार पद्धती

मानसिक आजारांवरचे उपचार म्हणजे केवळ काही गोळ्या इंजेक्शने नाहीत, त्यात इतर अनेक घटक असतात. अर्थात गोळ्या औषधे विशेष करून गंभीर मानसिक आजारात लागतातच. समुपदेशन म्हणजे व्यक्तिगत संवादातून बरे व्हायला मदत करणे, समस्या समजावून घेणे आणि त्यावर उत्तरे शोधायला मदत करणे हा सर्व उपचारांचाच महत्त्वाचा भाग आहे. उपचार करणारे डॉक्टर्स औषधे आणि समुपदेशनाचा यथायोग्य वापर करून रुग्णाला मनोविकारांवर नियंत्रण मिळवायला मदत करतात. म्हणूनच केवळ गोळ्यांवर अवलंबून राहता येत नाही. याशिवाय इतरही काही पूरक उपचार पद्धती आहेत. प्रत्येक कुटुंबाला त्याबद्दल आपण योग्य माहिती देऊन मदत केली पाहिजे. इतर पूरक उपचार पद्धतींचा उपयोग करून मनोविकारांवर जास्त लवकर नियंत्रण मिळवता येते आणि जीवनाची गुणवत्ताही वाढू शकते. कुटुंबालादेखील याचे बरेच फायदे होतात. रुग्णोपचारात मानवता पूर्ण व्यवहारासाठी पूरक उपचार पद्धतींचा निश्‍चित उपयोग होतो. या पाठात आपण काही पूरक उपचार पद्धतींबद्दल माहिती घेणार आहोत.

समुपदेशन म्हणजे बोलण्यातून आणि देहबोलीतून रुग्णाशी आणि कुटुंबीयांशी अर्थपूर्ण संवाद करणे. यातूनच बरे होण्याचा मार्ग सापडतो. समुपदेशन म्हणजे केवळ बोलणे किंवा प्रश्‍न विचारणे नाही तर समोरच्या व्यक्तीच्या मनात स्वत:बद्दल जागृती आणि नवा दृष्टिकोन घडवून स्वत: त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधायला मदत करणे आहे म्हणजेच ते एक शास्त्र आणि कला पण आहे. रुग्णाची किंवा समोरच्या व्यक्तीची यातून सघन मनोभूमिका तयार होते. डॉक्टरला भेटायच्या आधी व नंतर समुपदेशन करण्याचा प्रघात आहे. सामान्यपणे समुपदेशन म्हणजे त्या व्यक्तीशी एकांतात घडवायची प्रक्रिया असते. मात्र मनोरुग्णांच्या बाबतीत निवडक कुटुंबीय पण हजर राहू शकतात. समुपदेशनासाठी एकदा नाही तर अनेकदा संवाद करावा लागतो. त्यातूनच हळूहळू मानसिक भूमिका बदलते. त्यासाठी पुरेसा वेळ चिंतन, मनन करावे लागते. यासाठी बर्‍याच वेळेस समुपदेशकाला चिंतन, मनन करावे लागते.

समुपदेशनातले काही संवादामध्ये मनोविकार किंवा व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी मूल्यमापन पत्रकानुसार विकार निदान केले जाते. बुध्यांक चाचणीही अशाच विशेष मूल्यमापन पत्रकाच्याआधारे केली जाते. यातून त्या व्यक्तीचे भावनिक बौद्धिक आणि इतर तपशिल समोर येतो. यातून काही अंदाज बांधायला त्या त्या मनोविकाराप्रमाणे किंवा समस्येप्रमाणे समुपदेशनाचा आशय आणि पद्धत ठेवावी लागते. मुख्य म्हणजे समुपदेशकाला चांगला अनुभव असावा लागतो. चांगल्या समुपदेशकामुळे सुपरिणाम होतात तर अननुभवी किंवा उथळ समुपदेशनामुळे नुकसान होण्याचीही उदाहरणे असतात.

गट उपचार पद्धती

गट उपचार पद्धती हा कमी वेळात तीच साधने गटाबरोबर वापरून अधिक लाभ मिळवण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी उपयोगी ठरते. पण हे केवळ वेळ वाचवण्याचे साधन नाही तर गटातल्या आंतरप्रक्रियेमुळे एकमेकांपासून शिकणे, अनुभवणे, पडताळणे, रस्ता शोधणे अशी व्यापक प्रक्रिया आहे. यातूनच बौद्धिक तसेच भावनिक आधार तयार होऊन इतरांच्या चुकांपासून किंवा अनुभवांपासून शिकायला मिळते आणि स्वत:च्या मनोवस्थेवर सखोल विचार करता येतो. आपल्यासारखेच इतरही लोक आहेत असे समजल्यावर प्रयत्न करायला हुरूप येतो. एवढेच नाही तर उपचार वर्ग संपल्यानंतरही हे सदस्य एकमेकांमध्ये संवाद चालू ठेवू शकतात. अल्कोहोलिक ऍनानिमस हे अशा गट उपचार पद्धतीचे एक ठळक उदाहरण आहे. हल्ली अनेक आजारांसाठी काही आधारगट आहेत. उदा. मतिमंदत्व, स्वमग्नता, स्पास्टीक, फेफरे, गंभीर मानसिक आजार, स्मरण विकार, व्यसने आणि इतर अनेक शारीरिक स्वरूपाचे आजार (मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर इ.) काही आजार गटांमध्ये रुग्णाबरोबर त्याचे कुटुंबीयही सामील होतात. केवळ डॉक्टर पेशंट संबंधांपेक्षा आधारगट ही जास्त सघन व अर्थपूर्ण प्रक्रिया असते.

आपण आपल्या ग्रामीण परिसरातही असे आधारगट निर्माण करू शकतो. यातून मनोरुग्ण आणि त्याचे कुटुंबीय एकत्र भेटायला संधी निर्माण होते आणि सुखदु:खे वाटून पुढची वाट सोपी होते. यात अनेक प्रकारचे प्रश्‍न सुटायला मदत होते. काही समस्या शास्त्रीय किंवा तांत्रिक स्वरूपाच्या असतात. उदा. रुग्णाला औषध कसे घ्यायला लावायचे. याउलट काही समस्या व्यावाहारिक असतात. उदा. रुग्णासाठी वाहनव्यवस्था काय करायची? काही सामाजिक समस्याही असतात. उदा. लग्ने किंवा मुले होऊ देण्याबद्दल. काही समस्या भावनिक असतात. उदा. समाजात मिळणारी वाईट वागणूक किंवा एखाद्याचा मृत्यू वगैरे.  आम्ही आयोजित केलेल्या एका आधारगट चर्चेत अशी समस्या पुढे आली की जिल्हा रुग्णालयात बर्‍याच वेळा आपली औषधे शिल्लक नसतात. म्हणजे तिथे जाऊनही फारसा उपयोग नसतो. शेवटी ज्यादा खर्च करून दुकानातून औषधे घ्यावी लागतात. यावर एकाने असे सांगितले की रुग्णकल्याण समितीकडे निधीअसतो व त्यांना लागणारी औषधे खरेदी करून उपलब्ध करता येतात. यासाठी रुग्ण कल्याण समितीच्या काही सदस्यांना भेटून विनंती केली तर काम होऊ शकते. म्हणजेच एखाद्या समस्येला एकत्र बसून उत्तर शोधता येते. केवळ एकट्याने अशी शक्यता झाली नसती.

चित्रकला उपचार पद्धती

आयुर्वेद होमिओपथी किंवा इतर पारंपारिक उपचार

योगोपचार

योगशास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे. मानवाचे शारीरिक वमानसिकआरोग्य टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी भारतात हे शास्त्र विकसित झाले. महर्षी पतंजलीच्या योगसुत्रांमुळे या शास्त्राची संक्षेपाने सूत्रे दिली आहेत. या योग सूत्रांवरून या शास्त्राची खोली आणि व्याप्ती जाणवते.

योग म्हणजे केवळ आसने नव्हे. आसने ही केवळ योगाची शारीरिक तयारी करण्यासाठी आहेत म्हणजे साधन आहे साध्य नाही. योगसुत्रांमध्ये खरे म्हणजे आसनांचा उल्लेख नाही. केवळ स्थिर बसण्यासाठी आसनाचा वापर करावा असे म्हटले आहे. हल्लीच्या योगवर्गांमध्ये आसने विस्ताराने शिकवली जातात. त्याचबरोबर प्राणायाम, शवासन व योगनिद्रा, ध्यान इ. इतरही अंगे शिकवली जातात. मूळ अष्टांग योगशास्त्र हे आठ पायर्‍यांचे असून त्यात यमनियम म्हणजे वागणुकीचे नियमही अंतर्भूत असून शेवटची पायरी म्हणजे समाधी आहे.

योगिक पद्धतीत शरीराला मानवेल व सुखावेल इतका ताण देणे अपेक्षित असते. यामुळे शरीर लवचिक होते आणि श्‍वसन संथ होऊन ताण हलका होतो. तसेच त्यात इंद्रियाचा रक्तपुरवठा सुधारून त्याचे आयुष्य वाढते. योगासने करताना वेदना होऊ देऊ नयेत. म्हणजेच वेदना व्हायच्या आधीच प्रयत्न थांबवावेत.

योगातला आपल्या दृष्टीने महत्त्वाचा भाग म्हणजे दीर्घ व संथ श्‍वसन यामुळे शरीरतील चेतासंस्थेचा विश्राममूलक विभाग जास्त उपयोगात येतो. साधारणपणे नेहमीच्या धावणे, पळणे, वजन उचलणे या व्यायामात चेतासंस्थेचा दुसरा विभाग म्हणजे सिपथॅटिक चेतासंस्था जास्त उपयोगात येते. म्हणूनच व्यायाम आणि योगशास्त्र या भिन्न गोष्टी आहेत. योगातील शरीर कृत्यांमुळे व प्राणायामामुळे शरीरातील रक्तप्रवाह व प्राणवायूचा प्रवाह संतुलित होतात, अवयवांना अधिक प्राणवायू मिळतो आणि शरीरातील मार्ग व पोकळ्या स्वच्छ व्हायला मदत होते. याचबरोबर मनाचा ताण जाऊन चेतना जागृतीचा लाभ होतो. यामुळे मन एकाग्र करायला मदत होते. मन एकाग्र झाल्यामुळे हाती घेतलेल्या कामात आणि शैक्षणिक प्रयत्नात जास्त यश मिळू शकते.

शवासन आणि योगनिद्रा हे ताणतणाव कमी करण्यासाठी सर्वोत्तम तंत्रे आहेत. योगोपचारामुळे शरीराचेआरोग्यवर्धन होते, काही आजार दुरुस्त होतात आणि मानसिक प्रसन्नता व उत्साह वाढतो. याचबरोबर अतिरक्तदाबासारखे काही मानसिक ताणाशी संबंधित आजारही बरे व्हायला मदत होते. आपण आरोग्य कार्यकर्त्यांनी देखील जमेल तितकी योगविद्या शिकून इतरांचा लाभ करून दिला पाहिजे. मनोरुग्णांना तर त्याचा निश्‍चित उपयोग होतो.

आयुर्वेद

मानसिक विकारांसाठी आयुर्वेदात अनेक उल्लेख सापडतात. उन्माद वगैरे आजारांची कल्पना आयुर्वेद शास्त्रातही होती. आयुर्वेदाने त्रिदोष कल्पनेतून मानसिक आजारांची कारण मिमांसा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.अर्थातच आधुनिक वैद्यक विज्ञानातल्या संकल्पनाविषयी याचा संबंध आहे.

आधुनिक वैद्यकीय उपचारांऐवजी मनोविकारांवर आयुर्वेदिक औषधे वापरावी असे आम्ही इथे सांगत नाही. त्यासाठी फारच संशोधन होणे बाकी आहे मात्र मनोविकारांच्या संदर्भात सुपोषण, ऋतुचर्या, पथ्यापथ्य इ. कल्पनांचा व्यावहारिक उपयोग करू शकतो. यामुळे निदान आजाराची तीव्रता कमी होण्यासाठी आणि त्या व्यक्तीला आजारातून लवकर बरे होण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

ज्येष्ठमध, शिलाजित इ. काही औषधी वनस्पती मेंदू विकारांमध्ये उपयोगी पडतात असे आयुर्वेद म्हणतो. ही अनेक औषधे यांचा वापर वैद्यांच्या सल्ल्यानुसार पुरक म्हणून करायला हरकत नाही. युनानी औषध पद्धती आपल्याकडे इस्लामी परंपरेतून आली असली तरी ती मूळ ग्रीक पद्धती आहे. (युनानी म्हणजे ग्रीक) यातही काही औषधे मनोविकारांसाठी सांगितली जातात. अनुभवी हकीमांच्या सल्ल्याने याचा वापर करायला हरकत नाही.

होमिओपथी

होमिओपथीच्या शास्त्राप्रमाणे शारीरिक व मानसिक आजार वेगळे नसतात, किंबहुना मानसिक लक्षणांवरूनच अनेक आजारांचे निदान होमिओपथीत करतात. होमिओपथिक औषध निवडताना मुख्यत: मानसिक लक्षणांचाच जास्त निर्णायक उपयोग होतो. होमिओपथीत असे वारंवार दिसून येते की एखाद्या उपाय योजनेने काही मानसिक लक्षणे चक्क बरी होतात. उदा. माझ्या माहितीतल्या एका पॅथनुसार दिलेल्या गोळ्यांनी तीव्र मानसिक आजार पण बरा झाला व परत गोळ्या घ्याव्या लागल्या नाहीत. मात्र हेच औषध अशा इतर रुग्णांमध्ये उपयोगी पडेलच असे नाही. होमिओपथीत असे ठोकताळे बांधणे शक्य नसते. अमूक एक मानसिक आजार तमुक एका होमिओपथी औषधाने बरा होईलच अशी शाश्‍वती देता येत नाही मात्र प्रयोग करून पाहायला हरकत नाही.

म्हणूनच आधुनिक वैद्यक शास्त्राला पर्याय म्हणून मनोविकारात होमिओपथीचा वापर करा असे सांगता येणार नाही. मात्र मनोविकार हे मेंदूतल्या जैवरासायनिक घटनांमुळे होत असल्यामुळे होमिओपथिक औषधांचा त्यावर उपयोग होणे शक्य आहे. म्हणून मनोविकारांच्या सुरुवातीच्या अवस्थांमध्ये अनुभवी होमिओपथी तज्ज्ञाकडे सल्ला घ्यायला काहीच हरकत नाही. याने काही आठवड्यात आराम नाही वाटला तर आधुनिक वैद्यकाच्या डॉक्टरांकडे जायला आपण मोकळे असतोच.

इतर पद्धतींच्या मर्यादा

इतर व पूरक उपचार पद्धतींचा उपयोग जरी असला तरी मंत्र तंत्रादि अंधश्रद्धेपासून आपण सावध व दूर असणे आवश्यक आहे. यामुळे केवळ वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो. याऐवजी सरळ आधुनिक उपचार परवडतात.

आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार मनोविकारांचे बर्‍यापैकी विश्‍लेषण झालेले आहे आणि उपचारही निश्‍चित झालेले आहेत. यात आणखीही प्रगती चालू आहे. या शास्त्राच्या मर्यादा आणि बलस्थाने, दुष्परिणाम, यश,अपयश हे आपल्याला बर्‍यापैकी माहीत आहे. इतक्या तपशिलात इतर उपचारपद्धतींबद्दल माहिती उपलब्ध नाही. म्हणूनच पर्याय म्हणून नाही तर पूरक उपचारपद्धती म्हणून यंोग/आयुर्वेद/होमिओपथी इ. चा विचार/ वापर  करायला हरकत नाही. यातून एकूण बरे होण्याची प्रक्रिया वेगाने होते आणि एकूण जीवनाची गुणवत्ताही वाढते.

पोषण पुनर्वसन वगैरे

मानसिक आजारांवर उपचार करताना इतरही काही गोष्टींचे भान ठेवायला पाहिजे. एकतर रुग्णाला योग्य घरगुती किंवा संस्थात्मक वातावरणात आणायला पाहिजे. बेघर अवस्थेत उपचार करू नयेत. रस्त्यावरचा रुग्ण रस्त्यावर बरा होऊ शकत नाही. त्याला घरात आणून प्रेम व मानसिक आधार मिळाल्यावरच त्याची प्रगती होऊ शकते. सहानुभूतीशिवाय मनाचे विकार भरून येत नाहीत.

याचबरोबर खाण्या-पिण्याची काळजी घेतली पाहिजे. योग्य आहार, जीवनसत्वे, प्रथिने, फळे यांचा समावेश असायला पाहिजे. उपचारामध्येही याचा उपयोग होतो.

आधुनिक वैद्यक शास्त्रात मानसिक आजार हे नियंत्रणात ठेवता येतात पण कायमचे बरे करणे आणि औषध बंद करणे शक्य नसते. आयुर्वेद किंवा होमिओपथीमध्ये अशी शक्यता असू शकते पण त्याबद्दल पुरेसा अभ्यास झालेला नाही.

मनोविकारांसंबधी कायदे, नीतीसंहिता, हक्क व जबाबदार्‍या

मानसिक आरोग्याचे एकूण जग हे अत्यंत गुंतागुंतीचे जग आहे. यात मानसशास्त्र, समाजशास्त्र, मानवी हक्क, शोषण, उपेक्षा आणि कधीकधी हिंसादेखील असते. प्राचीन काळीही मनोरुग्णांना नियंत्रित करण्यासाठी काही कायदे होतेच. ब्रिटिश काळात गंभीर मानसिक रुग्णांना विशेष बंदीगृहामध्ये ठेवण्यासाठी कायदा तयार झाला. हा कायदा स्वातंत्र्यानंतर ३० वर्षांनी बदलला गेला. हे व इतर अनेक कायदे मनोरुग्णांचे एकूण जग नियंत्रणात ठेवण्यासाठी वापरले जातात. मात्र मनोरुग्णांचे उन्नयन किंवा कल्याण हा हेतू त्यात आतापर्यंत नव्हता.

मनोरुग्णांकडे दुर्लक्ष करणे किंवा निष्काळजीपणा होण्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. खाली ती नमूद केली आहेत.

शाळा कॉलेजात किंवा देवालयांमध्ये मनोरुग्णांना येऊ न देणे किंवा हकलवून लावणे.

सौम्य मतिमंदत्व असलेल्या मुलांना सामान्य शाळेत प्रवेश नाकारणे.

मनोरुग्णांसाठी विशेष शाळा तशा कमीच आहेत. एकूण मतिमंद किंवा मनोरुग्णांचे शिक्षण ही एक सामाजिक समस्या आहे.

सामान्य शाळांमध्ये मतिमंद किंवा मानसिक विकार असलेल्या मुलांना इतर मुलांच्या चिडवण्यापासून संरक्षण देणे हे महत्त्वाचे काम आहे पण बरेच शिक्षण त्याबद्दल गंभीरपणे प्रयत्न करत नाही. अशा मुलांना होणार्‍या मानसिक आजारांमुळे शिक्षणाची प्रक्रिया आणखीनच कठीण आणि वेदनादायक होते. ही मुले स्वत:च या प्रवाहातून बाजूला पडू बघतात.

शारीरिक अपंगत्व व मानसिक अपंगत्व यात समाजही बर्‍याच वेळा भेदभाव करतो. शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना समाजाची सहानुभुती मिळू शकते पण मनोरुग्णांच्या बाबतीत अलिप्तता किंवा चिडवणे, त्रास देणे वगैरे घटना होऊ शकतात. त्यांच्याबद्दल सहानुभूती कमी असते. समाजाची एकूणच प्रवृत्ती याबद्दल थोडी प्रतिकूल असते. काही वेळा मारहाण, शिवीगाळही केली जाते. मनोविकार ही एक जैवरासायनिक दोषांमुळे होणारी घटना आहे., याचा दोष त्या व्यक्तीकडे नाही हेच अनेक वेळा विसरले जाते. याबद्दल शास्त्रीय माहितीचा प्रसार होऊन पुरेशी जागृती व्हायला पाहिजे आणि समाजाची मनोभूमिका बदलायला पाहिजे.

वैद्यकीय व्यावसायिक म्हणजे डॉक्टर्सदेखील या प्रश्‍नात भेदभाव करू शकतात. एकतर बर्‍याच जनरल डॉक्टर्सना मनोविकारांची नीट माहिती नसल्यामुळे त्यावर उपचार न करता ते तज्ज्ञांकडे जायला सांगतात. यामुळे बरेच जण प्रत्यक्ष उपचाराला मुकतात. त्यांनी अशा रुग्णांना समजावून घेणे व शक्य ते प्राथमिक उपचार करणे आवश्यक आहे. थोड्या प्रयत्नांनी हा बदल होऊ शकतो. मनोरुग्ण म्हणजे मेंटल हॉस्पिटल असे समीकरण सर्वसामान्य डॉक्टरांच्या मनात असणे ही फार चांगली गोष्ट नाही. मानसिक आजारांना शॉक ट्रिटमेंट लागते असाही एक सामान्य गैरसमज आहे.

यापेक्षा भयंकर प्रश्‍न म्हणजे मानसिक रुग्ण आणि मतिमंदांवर होणारे अत्याचार व हिंसा. शिवीगाळ हे तर अगदी प्राथमिक अत्याचार आहेत. थट्टा करणे, उपेक्षा ही देखील शाब्दिक हिंसाच आहे. प्रत्यक्ष मारहाण करणे ही उघड हिंसा आहे. त्याही पलीकडे लैंगिक अत्याचार करणे ही तर फार घृणास्पद गोष्ट आहे. अनेक निवासी संस्थांमध्ये असे सर्व अत्याचार होतात असे दिसून आले आहे. त्यातून त्यांना शारीरिक इजा व दुष्परिणाम सहन करावे लागतात. अशा व्यक्तींकडून अतिश्रमाची किंवा घृणास्पद कामे करून घेणे, असुरक्षित कामे करून घेणे हा देखील हिंसाचारच आहे. बांधून घालणे किंवा कोंडून ठेवणे हे ही अत्याचारच आहे. याबद्दल मोठी जागृती होण्याची गरज आहे. काही वेळा कुटुंबातूनच असे अत्याचार होतात, कधी नाइलाजाने तर कधी हेतूपूर्वक .

अन्नपाणी न देणे, वैद्यकीय सेवेपासून वंचित ठेवणे, इतरांशी संबंध येऊ न देणे किंवा तोडणे हे ही अत्याचारच आहेत.

मनोरुग्णांच्या मानवी हक्कांसंबंधी

मनोविकारांची शास्त्रीय कारणे, उपचार आणिअपेक्षित परिणाम याबद्दल अधिक जागृती होण्याची गरज आहेच. पण याही पेक्षा मानव समाजातल्या या उपेक्षित माणसांच्या मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून देखील विचार आणि कृती व्हायला पाहिजे.

भारतीय घटनेच्या चौकटीत अशा रुग्णांचा विकास शैक्षणिक संधी, संस्थात्मक आधार, संरक्षण आणि शारीरिक गरजा या सगळ्यांबद्दल घटनात्मक हक्क आहेत आणि त्यांचे पालन व्हायला हवे हा त्यांचा हक्क आहे एका सुसंस्कृत देशामध्ये हे हक्क त्यांना मिळायला पाहिजे. मनोविकारग्रस्त किंवा मतिमंद स्त्रिया, मुलींचा प्रश्‍न त्यात जास्त महत्त्वाचा आहे. त्यांच्यावर लहान मोठे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अत्याचार होण्याची शक्यता असते.  कधीकधी कुटुंबात तर कधी बाहेरच्या समाजात पण घडू शकते. त्यांना तक्रार करता येत नसेल किंवा समज कमी असेल तर असा धोका जास्त असतो.  कधीकधी त्यांच्याकडून कष्टाची कामे करून राबवून घेतले जाते. अवांछित गर्भधारणा किंवा प्रसुती या समस्या आहेतच. गर्भपाताचा हक्क त्यांना असतोच तोही बर्‍याच वेळेस दुर्लक्षिला जातो. मनोरुग्ण किंवा मतिमंदांच्या संस्थांमध्ये असे अत्याचार होणे हे तर फारच चिंताजनक आहे.

गंभीर आजाराने ग्रस्त मनोरुग्णांना सोडून देणे ही एक प्रथा पूर्वीपासून आहे. असे अनेक लोक रस्त्यातून कट्यावर, रेल्वे स्टेशन्सवर, देवळांमध्ये आणि तीर्थक्षेत्री भीक मागून कसेबसे राहतात. काही मनोरुग्ण घरातून अचानक बेपत्ता होतात आणि हरवतात. या मूलत: आजारी लोकांना त्यांच्या त्यांच्या कुटुंबांमध्ये पोचवणे आणि उपचार व इतर निगरानीची व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. नुकतेच असे वाचले की मुंबईतल्या एका मनोविकार तज्ज्ञाने असे सुमारे दीड हजार मनोरुग्ण शोधून त्यांच्या कुटुंबाशी भेट घडवून आणली आहे. ही मोठीच मानवसेवा आहे.

मनोविकार टाळण्यासाठी आणि झालेले लवकर शोधून उपचार करण्यासाठी चळवळ असायला हवी. सफल उपचार हेच खरे समाजाच्या डोळ्यात अंजन घालेल. उपचाराने माणूस बरा होतो आणि आत्मप्रतिष्ठेने जगू शकतो आणि समाजाला योगदान करू शकतो हे दिसले पाहिजे. अशी अनेक उदाहरणे आहेत.

कायदा आणि मनोविकार

भारतीय राज्यघटनेत कलम ३१ प्रमाणे आजारांवर उपचार, उपचारांचा हक्क मुलभूत हक्क म्हणून मान्य केला आहे. याशिवाय १९८७ च्या मानसिक आरोग्य कायद्यानुसार मनोरुग्णांच्या सुरक्षिततेसाठी काही तरतुदीही केल्या आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने आवाहन केले आहे की मनोरुग्णांना मानवतेने आणि प्रतिष्ठेने वागवले पाहिजे. भारत सरकारने या आंतरराष्ट्रीय करार पत्रावर सही केली आहे.

मानसिक आरोग्य कायदा १९८७

या कायद्यानुसार पूर्वीचा ब्रिटिश अमलातील कायदा रद्द करून नवीन तरतुदी अमलात आलेल्या आहेत. मानसिक आरोग्य संस्था (निवासगृहे) या कायद्यानुसार तपासण्याची आणि परवानगीची/ परवानगी नाकारण्याची तरतूद केली आहे. या कायदेशीर तरतुदीशिवाय कुणीही मानसिक आरोग्य संस्ता म्हणजे निवारागृहे काढू किंवा चालवू शकणार नाही.

मनोरुग्णांना योग्य ते पालन पोषण पुरवण्याची जबाबदारी आणि त्यांच्या मालमत्तेच्या अधिकारांबद्दल तरतुदी केल्या आहेत. मनोरुग्ण निवारा गृहांमध्ये मनोरुग्णांना दाखल करता येते आणि मोकळीकही मागता येते.

मनोरुग्ण या निवारागृहांमध्ये दाखल करण्यासंबंधी पोलिसांचे अधिकार निश्‍चित केले आहेत.

या कायद्यानुसार प्रत्येक राज्यात मानसिक आरोग्य अधिकार संस्था नेमून त्यांचे कामकाज आणि जबाबदार्‍या निश्‍चित करण्यात आल्या.

१९९५ चा अपंगांसाठीच्या तरतूदी आणि समान संधी कायदा

कोणत्याही अपंग व्यक्तीच्या अधिकारांचे संरक्षण आणि समाजात त्यांचा समान सहभाग याबद्दल तरतुदी जारी केल्या आहेत. मानसिक आजार हेही अपंगत्वाचा एक प्रकार म्हणून यात अंतर्भूत आहेत.

अपंग व्यक्तींविरुद्ध भेदभाव किंवा अन्याय केल्यास राज्याचे अपंग पुनर्वसन कारवाई करू शकतात तसेच त्यांच्याकडे दाद मागता येते. अपंगांना मिळणार्‍या सवलती मनोरुग्ण किंवा मतिमंदांनाही लागू आहेत. यात बस किंवा रेल्वेच्या भाड्याच्या सवलती, व्यावसायिक कर्जे उत्पन्न करात सूट (सेक्शन ८०डी आणि सेक्शन ८०यू) यांचा समावेश आहे. मनोरुग्ण व मतिमंदांच्या संस्थांनी आणि कुटुंबीयांनी याची नोंद घ्यावी व सवलती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. मनोरुग्णांना सरकारी नोकर्‍यात आरक्षण नाही पण इतर अपंगांना मिळून ३% सरकारी जागा राखीव ठेवल्या आहेत. अर्थात याचे पालन फारसे होत नसल्याचा अनुभव आहे.

मोफत शिक्षणाचा अधिकार १८ वर्षे वयापर्यंत सर्व अपंगांना आहे. मतिमंदांना योग्य त्या संस्थांमध्ये शैक्षणिक संधी मिळणे अनिवार्य आहे. मात्र बरेच मानसिक आजार तरुण वयातच येत असल्यामुळे शाळा प्रवेशाच्या समस्या इथे फारशा लागू नाही.

इतर कायदे

भारतीय कॉन्ट्रॅक्ट (करार) कायदा १८७२ नुसार मनोविकारग्रस्त व्यक्तीही व्यावसायिक करार करू शकते पण करार करते वेळी त्यांची मनस्थिती ठीक नसेल तर करार रद्द होऊ शकतो. अशा एखाद्या कराराला रद्द करण्याचे अपील असेल तर आवश्यक ते पुरावे दोन्ही बाजूंनी सादर करावे लागतील.

वारसा हक्क कायदा १९२५ नुसार मनोविकारांवर उपचार घेत असणार्‍या व्यक्तींसाठी खाजगी ट्रस्ट स्थापन करण्याची तरतूद आहे. या ट्रस्टकडे त्यांच्या मालमत्तेची जबाबदारी असेल. याची अधिक माहिती स्टेट बँकेच्या स्थानिक शाखेत मिळू शकेल. मात्र गंभीर मनोविकारग्रस्त व्यक्ती आपली प्रॉपर्टी स्वत:हून विकू शकणार नाही. (कारण त्यांना या व्यवहारात फसवले जाईल म्हणून कायद्यानुसार ट्रस्टची तरतूद केलेली आहे. )

भारतीय विवाह कायदा १९५५ आणि १९५६ तसेच घटस्फोटासाठी १८६९चा कायदा तसेच पारशी विवाह आणि घटस्फोटी कायदा १९३६ आणि इस्लामी कायद्यानुसार त्या त्या धर्मात लग्न आणि घटस्फोटाच्या तरतुदी आहेत. मानसिक आजारी व्यक्तींसाठी हेच कायदे लागू आहेत.

फौजदारी कायदा आणि भारतीय दंडविधान कलमात असलेल्या तरतुदी मनोरुग्णांसाठी स्वतंत्रपणे तपासल्या जातात. उदा मनोरुग्णाने आजाराच्या झटक्यात एखादे गुन्हेगारी कृत्य केले व कोर्टात आजाराचा मुद्दा दाखवला गेला तर त्यांची रवानगी सामायिक तुरुंगाऐवजी मनोरुग्णांच्या निवारागृहात होऊ शकते. गुन्हा करण्याचा हेतू असल्याशिवाय गुन्हा धरला जात नाही.

सारांश

ही पुस्तिका मानसिक आरोग्य कार्यकर्त्यांसाठी आणि काळजीवाहू कुटुंबग्रस्तांसाठी तयार केली आहे. शिवाय मानसिक आरोग्य व आजारांचे महत्त्वाचे मुद्दे स्वयंसेवकांपर्यंत आणि सर्वसामान्य समाजापर्यंत पोचवणे हाही आमचा उद्देश आहे. भारतात शहरात तसेच खेड्यातही मनोविकारग्रस्त लोक असतात. सुमारे हजार लोकवस्तीत अंदाजे १० व्यक्ती मनोविकारग्रस्त असू शकतात. यात मुख्यत: गंभीर मानसिक आजार, फेफरे, मतिमंदत्व हे आजार गृहीत धरलेले आहेत मात्र सामान्य मानसिक आजारांचा यात समावेश केलेला नाही.

भारतात मनोविकारांसाठी विशेष आरोग्यसेवांची असलेली तरतूद एकूण गरजेच्या मानाने फार अपुरी आहे. मानसिक आरोग्य कार्यकर्ते, मनोविकार तज्ज्ञ आणि मनोरुग्णांसाठी रुग्णालये या सगळ्यांचीच मोठी कमतरता आहे. सरकारी सेवा तर कमी आहेतच पण खाजगी क्षेत्रातही या सेवा कमीच पडतात. प्रत्येक जिल्ह्यात अशा सोयी असायला पाहिजेत. पण केवळ डॉक्टर आणि परिचारिकाच नव्हे तर मनोविकारासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि उपक्रम ही आवश्यक आहेत. तरच ती गरज भरून निघू शकेल.

मानसिक आरोग्य कार्यकर्त्यांमुळे एकूण मनोविकार सेवा सुधारू शकतील. आपले काम मुख्यत: जाणीव जागृती, लवकर रोगनिदान आणि उपचार तसेच नियमित पाठपुरावा आणि समस्यांचे निराकरण करणे हे आहे. मनोविकारग्रस्त कुटुंबांनाआपण भावनिक आधार व प्रेरणा देत राहिले पाहिजे. मनोरुग्णांचे उपचार हे खरे म्हणजे कार्यकर्त्यांचे काम नाही पण प्रसंगी आणि खडतर प्रदेशांमध्ये ते ही काम कदाचित अंगावर घ्यावे लागेल. अर्थातच कार्यकर्त्यांना अनेक अडचणी येतील त्यावर अभ्यासाने मात करावी लागेल.

व्यसनाधीनता ही समाजातली मोठी समस्या असली तरी या पुस्तिकेत कार्यकर्त्यांनी याबद्दल उपक्रम करावेत अशा अपेक्षेने माहिती दिलेली नाही. केवळ कुठे मदत मिळू शकेल याची माहिती कार्यकर्त्यांनाअसावी एवढाच हेतू ठेवला आहे.

कुटुंबातल्या काळजीवाहू सदस्यांनी स्वत: पुढे प्रशिक्षण घेऊन घरगुती शुश्रुषा शिकून घेतली पाहिजे. मुळात त्यांनी त्या मनोरुग्णाला मनोमन आपली जबाबदारी समजून त्याच्या/तिच्या उपचारात दक्षपणे सहभागी व्हावे लागेल यासाठी कुटुंबातल्या आणखी २-३ सदस्यांची मिळून एक टीम असायला पाहिजे. एकट्यादुकट्याचे ते काम नाही.

या पुस्तिकेत दिलेल्या लक्षण चिन्हांवरून आपल्याला संभाव्य मनोरुग्ण शोधता येतील. यात गंभीर मानसिक आजार आणि सामान्य मानसिक आजार या दोन्ही प्रकारच्या लक्षण चिन्हांचा समावेश आहे. पण कधीही केवळ एवढ्या लक्षण चिन्हांवरून कुणावरही मनोरुग्णाचा शिक्का मारू नका. याबद्दलचा योग्य निर्णय ते ते डॉक्टर करतील. त्यांच्यापर्यंत घेऊन जाणे हेच आपले प्रमुख काम आहे.

मनोविकारांबद्दल आणि मानसशास्त्राबद्दल आपल्याला आता बरीच जीवशास्त्रीय माहिती विज्ञानातून प्राप्त झालेली आहे. मनोविकारांची जैवरासायनिक कारणे बर्‍याच प्रमाणात समजलेली आहेत त्यामुळे मनोविकार हे आता गूढ राहिलेले नाही ही जाणीव पसरणे महत्त्वाचे आहे.

काही मनोविकार आपल्याला प्रतिबंधक कार्यक्रमातून टाळता येतील किंवा कमी करता येतील.  गलगंड टाळण्यासाठी आयोडिनयुक्त मीठाचा वापर, विवाहपूर्व अनुवंशिक समुपदेशन, मुले वाढवताना होणार्‍या चुका टाळणे, व्यसन प्रतिबंध, पक्षघाताचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना, स्मरणविकार टाळण्याचे काही उपाय आपण कमी अधिक प्रमाणात करू शकतो. काहीआजार टाळता येत नाहीत पण ते लवकर शोधून वेळीच औषधोपचार करता येतात. मानसिक आजार आपण गंभीर आणि सामान्य अशा दोन वर्गात घालू शकतो. गंभीर मानसिक आजार हे तर महत्त्वाचे आहेतच पण काही सामान्य मानसिक आजार, मतिमंदत्व आणि व्यसनाधीनता हे ही महत्त्वाचे प्रश्‍न आहेत. भारतीय समाजरचनेत वृद्धांची संख्या वाढती असल्याने स्मरण विकार देखील त्याप्रमाणात वाढत आहेत. याचबरोबर बालसंगोपनात नव्या अनेक चुकांमुळे काही मानसिक आजार निर्माण होतात. फेफरे किंवा फीट येणार्‍या व्यक्तींना देखील योग्य मार्गदर्शनाची व आधाराची गरज असते. केवळ उपचार पुरत नाही. बहुतेक मानसिक आजारांसाठी आता बर्‍यापैकी औषधोपचार उपलब्ध आहेत. अगदी गंभीर मानसिक आजारात देखील औषधोपचाराने ६०-७०% रुग्णांमध्ये सुधारणा होते हे निश्‍चित. अपेक्षित परिणाम मिळाला नाही तर इतरही औषधे उपलब्ध आहेत. ही सर्व औषधे जिल्हा रुग्णालयात तर पाहिजेतच पण ग्रामीण रुग्णालयातही उपलब्ध केल्यास अनेकांची पायपीट व खर्च वाचेल. उपचारात नियमितता व सुसुत्रता येईल. यातील बहुतेक औषधे स्वस्त आहेत आणि सरकारी दवाखान्यात ती मोफतच मिळतात. त्यामुळे औषधांशिवाय राहण्याचे कुणालाही कारण नाही. या औषधांचे अपेक्षित परिणाम, दुष्परिणाम समजून घेऊन कुटुंबीयांनी काळजी घ्यायची असते. यातील बहुतेक औषधे सुरक्षित ठेवायची आहेत. औषधांबरोबर काही रुग्णांमध्ये इलेक्ट्रिक शॉकचे उपचारही लागू शकतात. या सर्व गोष्टी आपले डॉक्टर आपल्याला सांगतीलच.

आपल्या शासकीय रुग्णालयातल्या डॉक्टर्स व कर्मचार्‍यांनी खरे म्हणजे मानसिक आजाराच्या दृष्टीने जास्त संवेदनाशील व्हायला पाहिजे व रुग्णांना चांगला प्रतिसाद दिला पाहिजे. यात शासकीय संस्था कमी पडत असल्यामुळे बरेच रुग्ण विनाकारण खाजगी डॉक्टरकडे जाऊन अनाठायी खर्च करतात. आपण कार्यकर्त्यांनी याबद्दल समाजात व रुग्णालयांमध्ये थोडे रुजवात करणे आवश्यक आहे.

पण केवळ औषधपाणी म्हणजे उपचार असे नाही. यासाठी इतरही अनेक उपचारपद्धती पूरक म्हणून उपयुक्त आहेत. यामध्ये अधिक संशोधन होण्याची पण गरज आहे. योगोपचारांचा अनेक समस्यांमध्ये उपयोग होतो. कधीकधी आयुर्वेद, होमिओपथी उपचारांचाही उपयोग होऊ शकतो. गट उपचार पद्धतीमुळेही बरेच लाभ होतात आणि एक सामुहीक प्रयत्न होतो. कार्यकर्त्यांनी यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत.

समुपदेशन हे मानसिक आरोग्यात आणि आजारांमध्ये एक महत्त्वाचे साधन आहे. यात अनेक उपप्रकार आहेत. गट उपचार पद्धती हा त्यातलाच एक भाग आहे. चित्रकलेतून उपचार, आधारगट वगैरे उपाय पण महत्त्वाचे ठरू शकतात.

पुनर्वसनाची गरज असते हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. उपचारानंतर सामान्यपणे त्या व्यक्तीला आपले नेहमीचे काम करता यावे अशी अपेक्षा आहे. त्यामुळे कुटुंबात आणि समाजात त्या व्यक्तीचे समुचित पुनर्वसन होऊ शकते. काही विशेष कौशल्ये शिकून व्यावसायिक पुनर्वसन करावे लागेल. काम करताना सुरक्षित राहण्यासाठी काही बाबतीत खास प्रयत्न करावे लागतील. उदा. फीट येणारे पेशंट. काम करताना त्या व्यक्तीची प्रतिष्ठा आणि सुरक्षितता महत्वाची आहे. त्यांच्यावर अत्याचार किंवा दुर्लक्ष होणार नाही याची पण दक्षता घ्यायला पाहिजे.

भगत – मांत्रिक वगैरे मंडळींचे खरे म्हणजे काम संपले आहे. फार झाले तर ते रुग्णांचे दु:ख हलके करण्यासाठी मदत करू शकतील. काही मांत्रिक-भगत अघोरी उपायाने परिस्थिती बिघडायला कारणीभूत होते. यात उगीचच वेळ व पैसा जातात त्यामुळे या बाबतीत एक शास्त्रीय आणि इतर प्रसंग भूमिका घेऊन मानसिक आरोग्याकडे पाहायला शिकवायला पाहिजे. मानसिक आजारामधील अति गूढता कमी होऊन वैज्ञानिक मुद्दे लोकांना समजले तर आपले काम लवकर होईल.

मानसिक आरोग्य कायदा १९८७ हा पूर्वीच्या ब्रिटिश कायद्यापेक्षा कितीतरी चांगला आहे. पण त्यालाही काही मर्यादा आहेत. हा कायदा मुख्यत: मनोरुग्णांसाठी संस्था काढणे, चालवणे वगैरेंबद्दल जास्त भर देणारा एकूण मानसिक आरोग्यसेवा सुधारणे आणि वाढवणे यासाठी या कायद्याचा तसा फार उपयोग नाही. मनोरुग्णांचे घटनात्मक आणि कायदेशीर हक्क, मानवी प्रतिष्ठा आणि वैद्यकीय गरज तसेच सुरक्षितता या सर्वांबद्दल दक्षता घ्यायला हवी. अत्याचार तर पूर्णपणे टाळले पाहिजेत. या दृष्टीने संस्थांवरही निगरानीची गरज आहे. एकूणच समाजाचा मानसिक आरोग्याबद्दलचा दृष्टिकोन आणि समज सुधारण्याची गरज आहे.