औषध शरीरात घेतल्यावर ते कसे काम करते हे समजून घेण्यासाठी औषधशास्त्रात चार महत्त्वाच्या प्रक्रिया सांगितल्या जातात – शोषण (Absorption), वितरण (Distribution), क्रिया (Action) आणि उत्सर्जन (Elimination).
औषध शरीरात घेतल्यावर प्रथम ते रक्तात शोषले जाते. गोळ्या किंवा कॅप्सूल तोंडाने घेतल्यास त्या पोट आणि लहान आतड्यात विरघळतात व तेथून रक्तात शोषल्या जातात. इंजेक्शन दिल्यास औषध थेट रक्तप्रवाहात किंवा स्नायूमध्ये जाते. औषध किती वेगाने शोषले जाईल हे त्याच्या रासायनिक गुणधर्मांवर, अन्नाच्या उपस्थितीवर आणि शरीराच्या स्थितीवर अवलंबून असते.
रक्तात शोषले गेलेले औषध शरीरातील विविध अवयवांपर्यंत पोहोचते. रक्तप्रवाहाद्वारे औषध मेंदू, हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि इतर ऊतींमध्ये वितरित होते. काही औषधे विशिष्ट अवयवांमध्ये जास्त प्रमाणात जमा होतात. उदाहरणार्थ, काही औषधे मेंदूवर परिणाम करतात तर काही हृदय किंवा फुफ्फुसांवर कार्य करतात.
औषध शरीरातील विशिष्ट पेशींवर किंवा रासायनिक प्रक्रियांवर परिणाम करून आपली क्रिया दाखवते. काही औषधे जंतू नष्ट करतात (उदा. अँटिबायोटिक्स), काही वेदना कमी करतात (उदा. वेदनाशामक), तर काही रक्तदाब किंवा मधुमेह नियंत्रणात ठेवतात. औषध शरीरातील विशिष्ट रिसेप्टर नावाच्या घटकांशी जोडले जाऊन परिणाम निर्माण करते.
शरीरात कार्य झाल्यानंतर औषधाचे अवशेष बाहेर टाकले जातात. याला उत्सर्जन म्हणतात. बहुतेक औषधे मूत्रपिंडांद्वारे मूत्रातून बाहेर पडतात. काही औषधे यकृताद्वारे पित्तातून, तर काही घाम, श्वास किंवा मलाद्वारे बाहेर पडतात. शरीरातून औषध किती वेगाने बाहेर पडते यावर त्याचा परिणाम किती काळ टिकेल हे ठरते.
अशा प्रकारे शोषण, वितरण, क्रिया आणि उत्सर्जन या चार टप्प्यांमुळे औषध शरीरात योग्य प्रकारे काम करते आणि रोगांच्या उपचारासाठी उपयोगी ठरते.
औषध म्हणजे एक रासायनिक पदार्थ असतो. रोगावरच्या उपचाराबरोबर इतर अनेक परिणामही औषधाने होत असतात. यांतले काही परिणाम शरीराच्या दृष्टीने वाईट असू शकतात. दुष्परिणामांचे दोन प्रकार आहेत :
रिअॅक्शन म्हणजे प्रतिक्रिया. हा आगंतुक दुष्परिणामच असतो. कोठल्याही औषधाची प्रतिक्रिया येऊ शकते; पण इथे आपण ‘अचानक येणारी प्रतिक्रिया’ एवढाच मर्यादित अर्थ घेऊ. रिअॅक्शनबद्दल आता जरा समजावून घेऊ.
एखादे औषध (इंजेक्शन, गोळया, पातळ औषध यांपैकी) रुग्णास दिल्यानंतर ते रक्तात प्रवेश करते. त्या क्षणी त्या पदार्थाविरुध्द शरीरातल्या तयार प्रतिघटकांचा त्या विशिष्ट पदार्थाशी संयोग होऊन शरीरात अचानक काही द्रव्ये तयार होतात.यामुळे शरीरात ‘हिस्टॅमिन’ नामक द्रव्य अचानक वाढते. हिस्टॅमिनमुळे शरीरातल्या केशवाहिन्यांचे सर्व जाळे अचानक फाकून बहुतेक रक्त या जाळयात उतरते. यामुळे रक्तदाब अचानक कमी होतो. यामुळे मेंदूस रक्तपुरवठा कमी होतो व चक्कर येते. या बरोबरच खूप घाम येणे, नाडी वेगाने चालणे, वावडयामुळे शरीरावर गांध,खाज येणे, श्वासनलिकांचे जाळे आकुंचन पावून श्वास कोंडणे, दम लागणे, इत्यादी दुष्ट परिणाम होतात. बेशुध्दीही येऊ शकते. रिअॅक्शन तीव्र असेल आणि उपचार मिळाले नाही तर मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत. अशी रिअॅक्शन एखाद्याला पेनिसिलीन इंजेक्शनने येते .
रिअॅक्शनचे वैशिष्टय असे, की ती विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट औषधाचे वावडे असेल तरच येते. एकाच औषधाची एकजात सर्वांना रिअॅक्शन येईल असे नाही. तसेच एखाद्या व्यक्तीला विशिष्ट एक औषध चालत नसले, तरी दुस-या औषधांची अशीच रिअॅक्शन येईल असे नाही. म्हणून रिअॅक्शन- विशिष्ट औषध टाळून इतर औषधयोजना करता येते. पण ते ठरावीक औषध मात्र त्या रुग्णाने पूर्णपणे टाळावे हे चांगले. शक्य झाल्यास (रक्तगटाच्या माहितीप्रमाणे) अशा रिअॅक्शन आणणा-या औषधांची नावे लिहून असे कार्ड जवळ बाळगणे चांगले. म्हणजे हे औषध टाळायला मदत होईल.
इंजेक्शनमुळे जशी ‘रिअॅक्शन’ येऊ शकते, तशीच रिअॅक्शन तोंडाने घ्यायच्या औषधानेही येऊ शकते. फक्त इंजेक्शनची रिअॅक्शन लगेच (मिनिटभरात) तर औषधगोळयांची रिअॅक्शन काही काळाने (5-10 मिनिटे ते तासापर्यंत) येते.
औषध घेतल्यावर खाज सुटणे, चक्कर येणे, छातीत कोंडल्यासारखे वाटणे, खूप घाम येणे, इत्यादी परिणाम दिसून आल्यास ही रिअॅक्शन असू शकेल. अशा वेळेस रुग्णाला ताबडतोब इंजेक्शने द्यावी लागतात.
ही औषधे झटकन मिळावीत यासाठी एका पेटीत ही इंजेक्शने, सलाईनचे सामान, निर्जंतुक सिरिंज, सुई,, इत्यादी साधनसामग्री नेहमी तयार ठेवतात. रिअॅक्शन जास्त असेल तर मृत्यू येऊ शकतो, पण सौम्य असेल तर काही वेळाने आपोआपच आराम वाटू शकतो. रिअॅक्शनची शक्यता तशी फारच कमी असते. पेनिसिलीन इंजेक्शनने लाखात एकाला रिअॅक्शन येते.