मधुमेह

टाइप २ मधुमेहाचे कारण आणि धोका-दायक घटक

मधुमेह आजार-प्रक्रिया (मधुमेह कसा होतो)

आपल्या शरीरात साखर आणि मेद (चरबी) यांचे व्यवस्थापन करणारे इन्सुलिन  हे संप्रेरक जठरामागे स्वादुपिंड अवयवातील बीटा पेशीतून स्त्रवते. कोणतेही छोटेमोठे खाणेपिणे झाले की इन्सुलिन संप्रेरक रक्तात स्त्रवते आणि पचनातून रक्तात आलेल्या ग्लुकोज साखरेचे नियोजन करते. त्यातून मुख्यत: पेशींची उर्जेची गरज भागवणे ,तसेच (अ) स्नायू आणि यकृतात ही साखर  ग्लायकोजेनच्या स्वरुपात  साठवणे आणि (ब) उरलेली साखर मेदपेशीत मेद म्हणून साठवणे ही कामे घडतात. सामान्य व्यक्तीच्या बाबतीत ग्लायकोजेन निर्मितीसाठी स्नायू हेच 95% साखर उचलतात, आणि उरलेले यकृत घेते.

आपल्या शरीरातील सर्व पेशी त्यांचे काम करण्यासाठी लागणारी उर्जा मुख्यत: ग्लुकोज जाळून मिळवतात. (मेंदूच्या पेशी , लाल रक्त पेशी,मूत्रपिंडाच्या आतील भागातील पेशी तसेच डोळ्यातील बुबुळ & भिंग यांना उर्जेच्या गरजेसाठी फक्त ग्लुकोज वापरता येते.बाकी इतर सर्व अवयवांच्या पेशी, ग्लुकोज वापरता न आल्यास स्वत:च्या उर्जेची गरज प्रथिने व मेदाम्ले जाळून काहीप्रमाणात  भागवू शकतात.) ही रक्तातील ग्लुकोज पेशींमध्ये पोचवण्यासाठी त्यांना इन्सुलिन या संप्रेरकाची गरज असते. त्यामुळे आपण काहीही खाल्ले की रक्तामध्ये स्वादुपिंडातून इन्सुलिन स्त्रवते.

वारंवार खात राहिल्याने पुन्हा पुन्हा इन्सुलिनचा स्त्राव होत राहतो.व तसे होत राहिल्यामुळे पुढे पेशींमध्ये इन्सुलिन प्रतिरोध /निरुपाय निर्माण होतो. तेव्हा निर्माण झालेले इन्सुलिन काम करू शकत नाही. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरात आधिक आधिक इन्सुलिन निर्माण होत राहते. व त्या इन्सुलिन मुळेच अधिक चरबीचीही  निर्मिती होत राहते.पण  इन्सुलिन संप्रेरक पातळी वाढलेली असते तरी त्याचा उपयोग कमी होतो आणि रक्तात साखर पातळी वाढत राहते. म्हणजेच इन्सुलिन संप्रेरकाचा ‘निरुपाय ‘ होतो. यामुळे मधुमेह होतो.

इन्सुलिन -निरुपाय हा टाइप2 मधुमेह आजाराचा मुख्य कारणीभूत घटक आहे.

बैठे जीवन, वारंवार व अधिक खाणे, वजन वाढणे, लठ्ठपणा, उतारवय, आनुवंशिकता

रक्तातील इन्सुलिन वाढणे आणि – इन्सुलिन निरुपाय,

रक्तातील साखर वाढणे-टाइप 2 मधुमेह

मधुमेह-शक्यता वाढवणारे धोकादायक घटक

१. आनुवंशिकता (Family History)

आई-वडील किंवा भावंडांना मधुमेह असल्यास त्या व्यक्तीला मधुमेह होण्याची शक्यता बळावते.

२. लठ्ठपणा

विशेषतः पोटाभोवती चरबी साचल्यास इन्सुलिन निरुपाय वाढतो.

३. शारीरिक निष्क्रियता

नियमित व्यायामाचा अभाव मधुमेहाचा धोका वाढवतो.

४. वाढते वय

वय वाढत जाते तसे इन्सुलिन स्त्रवणाऱ्या बीटा पेशींची कार्यक्षमता दरवर्षी क्रमश: 2%ने कमी होत जाते. मधुमेह झाल्यास हे प्रमाण 10% इतके वेगाने होते.

५. उच्च रक्तदाब

मधुमेह आणि उच्च रक्तदाब अनेकदा एकत्र आढळतात. माधुमेहाने  रक्तवाहिन्या कठीण होत  जातात, त्यामुळे अतिरक्तदाब विकार होतो.

६. रक्तातील चरबीचे विकार

रक्तातील मेदाम्ले म्हणजे ट्रायग्लिसराइड्स वाढणे व HDL कमी असणे हे महत्त्वाचे जोखीम घटक आहेत.

७. गर्भावस्थेतील मधुमेह

पूर्वी गर्भावस्थेत मधुमेह झालेल्या स्त्रियाना पुढे टाइप २ मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.

८. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS)

या विकारात स्त्री-बीजान्डकोषात पाणीदार गाठी होतात. इन्सुलिन निरुपाय झाल्याचा हा परिणाम असतो.

९. धूम्रपान

मधुमेह आजारात होणारे रक्तवाहिन्यांचे नुकसान तंबाखू मुळे आणखीन वाढते, त्यामुळे नेत्रपटल, हृदय, मूत्रपिंडे, चेतासंस्था यांना होणारे नुकसान वाढते.

१०. निद्रानाश आणि झोपेतील-श्वसन-अवरोध

अपुरी झोप आणि झोपेतील-श्वसन-अवरोध असेल तर मधुमेहाची शक्यता आणि गुंतागुंत वाढते.

इंडियन डायबेटीस रिस्क स्कोअर: भारतीय मधुमेह-शक्यता वर्तवण्याचे गुणपत्रक 

इंडियन डायबेटीस रिस्क स्कोअर (IDRS) ही भारतातील प्रौढ व्यक्तींमध्ये टाइप २ मधुमेहाचा धोका ओळखण्यासाठी विकसित केलेली एक सोपी विनाखर्च तपासणी पद्धत आहे. ही पद्धत समुदाय स्तरावर संभाव्य मधुमेह-शोधक पद्धत म्हणून उपयोगी आहे.

IDRS मध्ये चार प्रमुख घटकांचा विचार केला जातो: वय, कंबरेचा घेर (abdominal obesity), शारीरिक हालचाल (physical activity) आणि मधुमेह विकाराचा कौटुंबिक इतिहास. प्रत्येक घटकाला विशिष्ट गुण दिले जातात आणि एकूण गुणांवरून मधुमेहाचा धोका ठरवला जातो. आधी मधुमेह आहे असे माहीत असेल तर या पद्धतीचा उपयोग करत नाही, तर केवळ मधुमेह-संभाव्यता ओळखण्यासाठी उपयोग करतात)  

भारतीय मधुमेह संभाव्यता गुणांकन (Indian Diabetes Risk Score – IDRS)
घटकश्रेणीगुण
वय३५ वर्षांपेक्षा कमी
 ३५–४९ वर्षे२०
 ५० वर्षे किंवा अधिक३०
पोटावरील स्थूलता (कंबरेचा घेर)स्त्रिया: ८० से.मी. पेक्षा कमी / पुरुष: ९० से.मी. पेक्षा कमी
 स्त्रिया: ८०–८९ से.मी. / पुरुष: ९०–९९ से.मी.१०
 स्त्रिया: ९० से.मी. किंवा अधिक / पुरुष: १०० से.मी. किंवा अधिक२०
शारीरिक हालचालनियमित व्यायाम आणि शारीरिक श्रमाचे काम
 व्यायाम किंवा शारीरिक श्रम यांपैकी एकच२०
 व्यायाम नाही आणि बैठे (sedentary) काम३०
मधुमेहाचा कौटुंबिक इतिहासकुटुंबात मधुमेहाचा इतिहास नाही
 आई किंवा वडील यांपैकी एकाला मधुमेह१०
 आई आणि वडील दोघांनाही मधुमेह२०
एकूण कमाल गुण : १००

गुणांचे अर्थ

  • ३० पेक्षा कमी: मधुमेहाचा धोका कमी 
  • ३०–५०: मध्यम धोका 
  • ६० किंवा अधिक: मधुमेहाचा धोका जास्त;

IDRS गुण 60 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास रक्तातील साखरेच्या तपासण्या (Fasting Blood Sugar, HbA1c) करणे आवश्यक मानले जाते. ही पद्धत विशेषतः ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपयुक्त आहे कारण कोणत्याही प्रयोगशाळा चाचणीशिवाय उच्च-जोखीम व्यक्ती शोधता येतात.

मधुमेहाचे लवकर निदान आणि प्रतिबंध यासाठी IDRS हे भारतातील एक प्रभावी, सोपे आणि वैज्ञानिक वर्गवारीचे साधन मानले जाते.