
शरीरात अनेक प्रकारच्या ग्रंथी आहेत. त्यांत मुख्य प्रकार दोन आहेत. पहिला प्रकार म्हणजे तयार होणारा रस नळीवाटे आणून सोडणा-या ग्रंथी उदा. लालोत्पादक पिंड, स्वादुपिंडाचा काही भाग, यकृत, इ. या ग्रंथींतून तयार होणारे रस ‘स्थानिक’ स्वरुपाची कामे करतात. (उदा. लाळेमुळे पचनाची सुरुवात होणे, पित्तरसामुळे आतडयात स्निग्ध पदार्थाचे पचन होणे, इ.)
ग्रंथींचा दुसरा प्रकार म्हणजे अशी नळी नसलेल्या ग्रंथी. यांचा रस सरळ रक्तात मिसळतो. या ग्रंथींतून किती रस पाझरावा याचे नियंत्रण रक्तातील रासायनिक घडामोडींवर व चेतासंस्थेच्या आदेशावर अवलंबून असते.
या दुस-या प्रकारच्या ग्रंथींमध्ये तयार होणा-या रसांना ‘संप्रेरक’ रस म्हणता येईल. कारण या रसांमुळे शरीरातील अनेकविध क्रियांचे प्रेरण व नियंत्रण होते. या संप्रेरकांचे काम अगदी विशिष्ट असते. उदाहरणार्थ, पुरुषसंप्रेरकांमुळे ‘पुरुषी लक्षणे’ दिसतात. थायरॉईड किंवा गलग्रंथीतून येणारी संप्रेरके शरीरातल्या अनेक रासायनिक घडामोडींवर नियंत्रण ठेवतात. पिटयुटरी या मेंदूखालच्या ग्रंथीतून येणा-या संप्रेरकांमुळे शरीराची वाढ होते. स्त्रीबीजांडातून येणा-या संप्रेरकांमुळे स्त्रीत्वाची लक्षणे, गर्भधारणा, इत्यादी गोष्टी शक्य होतात.
आपल्याला संप्रेरकांच्या अस्तित्वाची जाणीव सहसा होत नाही. जेव्हा संप्रेरकांचे प्रमाण कमीजास्त होऊन शरीरात उलथापालथ होते तेव्हाच ही जाणीव होते. हे बदल अचानक होतात किंवा हळूहळू दिसतात. पण संप्रेरकाच्या पातळीतल्या बदलांचे परिणाम निश्चितपणे खूप दूरवर होतात.
काही संप्रेरके आता तयार करता येतात उदा थायारोईड,स्त्री व पुरुष संप्रेरके, इन्सुलिन इत्यादी.त्यामुळे संप्रेरक ग्रंथींच्या आजारासंबंधी उपचारांमध्ये क्रांती झाली आहे.
संप्रेरके म्हणजे रासायनिक पदार्थ असतात. त्यांचे काम अगदी विशिष्ट प्रकारचे असते. संप्रेरकांची रक्तातील पातळी अगदी सूक्ष्म आणि काटेकोर असते. त्यात थोडा फरक पडला तरी त्या त्या कामावर दूरगामी परिणाम होतात.
काही संप्रेरके वाढीच्या कामासाठी आवश्यक असतात. उदा. पिटयुटरीमधून येणारे ‘वाढ-संप्रेरक'(ग्रोथ हार्मोन), तसेच गलग्रंथीतून येणारे थायरॉक्झिन. वाढीच्या काळात यांचे प्रमाण कमी असेल तर वाढ खुंटते. वाढ-संप्रेरकांचे वाढीच्या काळातले प्रमाण गरजेपेक्षा जादा असेल तर उंची व रुंदी प्रमाणाबाहेर वाढतात, अगदी आठ-नऊ फुटांपर्यंत उंची जाऊ शकते.
स्त्रीसंप्रेरकांचे काम अनेकविध स्वरुपाचे असते उदा. मासिक पाळी येणे, स्त्रीबीज बाहेर पडणे, गर्भधारणा, स्त्रीत्वाची इतर लक्षणे – आवाज मृदू असणे, चरबीचे प्रमाण, अवयवांची गोलाई, केसांची विशिष्ट ठेवण, स्त्री-जननसंस्थेची वाढ व कार्य, इ. पुरुषसंप्रेरकांचे कामही अगदी विशिष्ट असते. उदा. दाढीमिशा, लैंगिक इच्छा, शरीरातील ठेवण, पुरुषी आवाज, इ.
स्त्रीसंप्रेरकांचा उपयोग मोठया प्रमाणात कुटुंबनियोजनासाठी होत आहे. पुरुषसंप्रेरकेही जास्त प्रमाणात वापरली जात आहेत. यांचा दुरुपयोगही मोठया प्रमाणावर होत आहे. या प्रकरणात संप्रेरकांच्या कमीजास्त प्रमाणाने होणा-या आजारांची माहिती घेऊ या.
अंतःस्रावी ग्रंथी (Endocrine glands) शरीरात हार्मोन्स तयार करून रक्तात सोडतात. हे हार्मोन्स वाढ, ऊर्जा, रक्तातील साखर, प्रजनन, झोप आणि ताणतणाव यांचे नियंत्रण करतात.
| ग्रंथी | प्रमुख हार्मोन्स | मुख्य कार्य | सामान्य आजार |
| पिट्यूटरी ग्रंथी | वाढ हार्मोन, थायरॉईड उद्दीपक हार्मोन (TSH, ACTH, FSH, LH) | शरीराची वाढ व इतर ग्रंथींचे नियंत्रण | अतिवाढ रोग(Gigantism), ॲक्रोमेगली, खुजेपणा, पिट्यूटरी गाठ |
| थायरॉईड ग्रंथी | थायरॉक्सिन (T3, T4), कॅल्सिटोनिन | चयापचय, ऊर्जा, उष्णता नियंत्रण | थायरॉईड कमी कार्यरत होणे, थायरॉईड अतिसक्रियता, गॉइटर, थायरॉईड कर्करोग |
| पॅराथायरॉईड ग्रंथी | पॅराथायरॉईड हार्मोन | कॅल्शियम संतुलन | पॅराथायरॉईड कमी कार्यरत होणे, पॅराथायरॉईड अतिसक्रियता, हाडे ठिसूळ होणे |
| ॲड्रिनल ग्रंथी | ॲड्रिनालिन, कॉर्टिसोल, अल्डोस्टेरॉन | ताणतणाव प्रतिसाद, रक्तदाब नियंत्रण | ॲडिसन रोग, कुशिंग सिंड्रोम, ॲड्रिनल गाठ |
| अग्न्याशय / पॅन्क्रियास | इन्सुलिन, ग्लुकागॉन | रक्तातील साखर नियंत्रण | मधुमेह, रक्तातील साखर कमी होणे |
| अंडाशय | इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन | मासिक पाळी, गर्भधारणा | पॉलिसिस्टिक अंडाशय विकार, वंध्यत्व, अंडाशय निकामी होणे |
| वृषण | टेस्टोस्टेरॉन | पुरुषी वैशिष्ट्ये, शुक्राणू निर्मिती | लैंगिक हार्मोन कमतरता, वंध्यत्व |
| पायनियल ग्रंथी | मेलाटोनिन | झोप-जागेपणाचे नियंत्रण | निद्रानाश, झोपेचे विकार |
| थायमस ग्रंथी | थायमोसिन | रोगप्रतिकारक शक्ती विकास | मायस्थेनिया ग्रॅव्हिसशी संबंधित विकार |
| हायपोथॅलॅमस | विविध उद्दीपक हार्मोन्स | भूक, तहान, तापमान नियंत्रण | डायबेटीस इन्सिपिडस, हार्मोनल असंतुलन |

ही ग्रंथी डोक्याच्या कवटीत मेंदूच्या खाली एका सुरक्षित कप्प्यात असते. यातून अनेक प्रकारची संप्रेरके तयार होतात.
सहज माहितीसाठी आपण दूधसंप्रेरकाचे काम पाहू या. गरोदरपणात स्तनांची वाढ होतच असते. दूधसंप्रेरकाने स्तनातील दूध निर्माण करणा-या भागाची वाढ होते व चरबीही वाढते. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीनंतरच स्तनातून स्त्राव यायला सुरुवात होते. बाळंतपणानंतर लगेच दूध बाहेर पडण्याची क्रिया होणे आवश्यक आहे. एकदा सुरू झाल्यावर मग ही क्रिया प्रत्येक स्तनपानाच्या वेळी आपोआप होते. बाळाला अगदी पहिल्यांदा स्तनपान देताना बाळाचे ओठ बोंडाला लागून चेतासंस्थेतर्फे हा चोखण्याचा संदेश पिटयुटरी ग्रंथीपर्यंत पोहोचतो व त्यातून दूधसंप्रेरक पाझरते. त्याचा परिणाम प्रत्यक्ष दुग्धजनक पेशींवर होऊन दूध यायला सुरुवात होते. (बाळंतपणाआधी मात्र ही क्रिया होऊ शकत नाही). बाळंतपणानंतर लवकरात लवकर म्हणजे चार-सहा तासांत ही घटना घडणे फायद्याचे असते. जेव्हा हे घडत नाही तेव्हा स्तनपान सुरूच होत नाही किंवा दूध लवकर उतरत नाही.
स्त्रीबीजांडाचे कामकाज चालण्यासाठीही पिटयुटरीतून अनेक संप्रेरके येतात. या संप्रेरकांमुळे स्त्रीबीज तयार होते, ते बाहेर पडते, शिवाय आणखी काही महत्त्वाची कामे होतात. यामुळे मासिक पाळीचे चक्र चालू राहते.