बालकांचे आरोग्य

कांजिण्या

कांजिण्या हाही प्रामुख्याने लहान मुलांचा आजार आहे. हा आजार एकदा येऊन गेला, की परत होत नाही. पण काही व्यक्तींमध्ये हे विषाणू सुप्तावस्थेत राहतात आणि प्रौढावस्थेत ‘नागीण’ या रोगाद्वारे प्रकट होतात. प्रौढावस्थेत झालेला कांजण्या हा आजार जास्त त्रासदायक असतो. एवढा अपवाद सोडल्यास कांजिण्या हा अगदी सौम्य आणि मर्यादित स्वरूपाचा आजार आहे. त्यासाठी वेगळे काही करण्याची आवश्यकता नसते. दहा वर्षे वयापर्यंत बहुतेकांना कांजिण्या होऊन जातात. साधारणपणे जानेवारी ते जूनपर्यंतच्या काळात कांजिण्या येतात.

रोगनिदान

कांजिण्यांचे विषाणू निकट संपर्काने व श्वासावाटे शरीरात प्रवेश करतात. सुमारे दोन आठवडयांनंतर रोगलक्षणे उमटतात. आजाराच्या सुरुवातीच्या काळात थंडीताप, पाठदुखी, खोकला, सर्दी, डोळे लाल होणे, इत्यादी त्रास होतो. हा त्रास एखादा दिवसच असतो. पण प्रौढ वयात हा त्रास दोन-तीन दिवस टिकतो.

ताप सुरू झाल्यानंतर एक-दोन दिवसांत अंगावर पुरळ उठतात. पुरळ बहुधा छाती, पोट यांवर जास्त असतात. पुरळांची सुरुवात लालीने होते, नंतर त्यात पाणी भरते, मग पू होतो व नंतर खपली धरते. हे सर्व बदल पाच दिवसांतच होतात. पुरळ एकामागोमाग दोन-तीन वेळा उठतात, त्यामुळे शरीरावर निरनिराळया प्रकारचे पुरळ एकदमच दिसू शकतात.या फोडांवर आग व खाज येणे हे सामान्यपणे दिसते.  खपली धरायला सुरुवात झाली, की आजार संपलेला असतो.

उपचार

कांजिण्यांसाठी वेगळे उपचार करावे लागत नाहीत. तापासाठी पॅरासिटामाल दिले की पुरते. खाज वा आग जास्त होत असेल तर calamin lotion सारखे औषध वरून लावता येते . तसेच खाजेसाठी cetrizineसारखे औषध उपयुक्त असते. पण रोज आंघोळ जरूर असावी. स्वच्छता राखल्याने इतर जंतूंची लागण होत नाही. कांजिण्या होऊ नयेत या साठी लस उपलब्ध आहे.

गोवर, जर्मन गोवर, गालगुंड , कांजिण्या हे सर्व आजार खूप संसर्गजन्य आहेत. सर्वसामान्य मुलांमध्ये त्यांची गुंतागुंत सहसा दिसत नाही, पण प्रौढ वयात ,गर्भारपणात , तसेच इतर काही कारणांनी रोग प्रतिकार शक्ती कमी झाली असेल, तर गंभीर गुंतागुंत दिसण्याची शक्यता वाढते. या सर्व आजारांविरुद्ध लाशी उपलब्ध आहेत, त्या योग्य वेळापत्रकानुसार जरून देऊन घ्याव्यात .

आकस्मिक मूत्रपिंडसुज ग्लोमेरुलोनेफ्रायटिस (Acute Glomerulonephritis)

तीव्र ग्लोमेरुलोनेफ्रायटिस हा मूत्रपिंडातील गाळणींचा (glomeruli) अचानक होणारा दाह आहे. हा आजार बहुतेक वेळा घशातीलकिंवात्वचेतीलस्ट्रेप्टोकोकलसंसर्गानंतर काही आठवड्यांनी दिसून येतो. हा विकार साधारणपणे शालेय वयाच्या मुलांमध्ये अधिक आढळतो.

या आजाराची मुख्य लक्षणे म्हणजे लघवीचा रंग लालसर किंवा कोकाकोला सारखा दिसणे (रक्तमूत्र), चेहरा पायांवर सूज, लघवीचे प्रमाण कमी होणे आणि रक्तदाब वाढणे. काही मुलांमध्ये डोकेदुखी, उलट्या किंवा अशक्तपणा दिसू शकतो.

निदानासाठी मूत्र तपासणी करून त्यामध्ये रक्त व प्रथिने तपासली जातात. तसेच रक्त तपासणीद्वारे मूत्रपिंडाच्या कार्याचे परीक्षण केले जाते.

उपचारामध्ये विश्रांती, मीठ पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे, आवश्यक असल्यास रक्तदाब नियंत्रणाची औषधे आणि संसर्ग असल्यास प्रतिजैविके (antibiotics) दिली जातात. काही वेळा सूज कमी करण्यासाठी औषधेही दिली जातात.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुलांमध्ये लघवीचा रंग बदलणे, चेहऱ्यावर सूज येणे किंवा रक्तदाब वाढणे ही लक्षणे ओळखून त्वरित डॉक्टरांकडे पाठवणे आवश्यक आहे. योग्य वेळी उपचार मिळाल्यास बहुतेक मुलांमध्ये मूत्रपिंडाचे कार्य पूर्णपणे सुधारते.

न्यूमोनिया गटातील आजार

न्यूमोनिया हा खालच्या म्हणजे अंतर्गत श्वसनसंस्थेचा – वायुकोशाचा दाह आहे. हा दाह जिवाणू, विषाणू,किंवा इतरही काही प्रकारच्या सूक्ष्मजीवांमुळे होतो. याशिवाय विषारी हवा (उदा. रॉकेलच्या वाफा) उलटीतून आलेले द्रवपदार्थ श्वसनसंस्थेत घुसणे, इत्यादी कारणांपैकी कशानेही न्यूमोनिया होऊ शकतो.

बाळाचा जन्म होताना काही बाळांच्या बाबतीत गर्भजल किंवा रक्त बाळाच्या श्वसनसंस्थेत ओढले जाऊ शकते. तिथे नंतर जंतुदोष होउन न्युमोनिया होऊ शकतो

एकूण न्यूमोनियाचे मुख्य कारण म्हणजे जंतुदोष होय. जंतुदोषामुळे वायुकोशाचा दाह होऊन त्यास सूज येते. यामुळे तिथले कामकाज बंद पडते. न्यूमोनिया बहुधा एका बाजूच्या फुप्फुसाच्या काही भागातच होतो. (पण तो दोन्ही बाजूंनाही होऊ शकतो) दाह व सूज यांमुळे या भागात वेदना असते. पण लहान मुले ही वेदना सांगू शकत नाहीत. श्वसनसंस्थेचा काही भाग तात्पुरता निकामी झाल्यामुळे इतर भागावर श्वसनाची जास्त जबाबदारी येते. त्यामुळे दम लागतो.

बाल न्यूमोनिया

या आजाराने खूप बाळे दगावतात. बालन्यूमोनिया हा फुप्फुसाच्या एका भागात जंतुदोष झाल्याने होणारा आजार आहे. यात खोकला, ताप, दम लागणे ही मुख्य लक्षणे असतात. लोकभाषेत याला डबा होणे , पोटात येणे अशीही नावे आहेत. बालन्यूमोनियाचे मृत्यू जंतुविरोधी औषध दिल्याने टळतात.

हा आजार सहसा पाच वर्षाखालील मुलांमध्ये होतो पण त्यातही विशेष करून पहिल्या दोन वर्षात याचे प्रमाण जास्त असते. मूल कुपोषित असेल तर हा आजार होण्याचा धोका आणि मृत्यूची शक्यताही जास्त असते. गोवराच्या तापानंतर,तसेच डांग्या खोकल्याच्यापाठीही हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. अपु-या दिवसांच्या किंवा अशक्त मुलांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते. हा आजार साथीचा नसतो. पण थंडी-पावसात या आजाराचे प्रमाण जास्त असते.

रोगनिदान

या आजाराची मुख्य लक्षणे म्हणजे खोकला, ताप व दम लागणे.

नुसता ताप, खोकला (पण दम नाही) असेल तर त्याला बालन्यूमोनिया न म्हणता ताप-खोकला म्हणतात. असे साधे आजार शक्यतो बाह्य श्वसनसंस्थेत (नाक, घसा,) किंवा श्वासनलिकेत जंतुदोष झाल्यामुळे होतात.

ताप, खोकला, दम लागणे या तीन लक्षण-चिन्हांवरून बालन्यूमोनियाचे निदान होऊ शकते. बालन्यूमोनिया सौम्य आहे की गंभीर हे आपण ओळखायला शिकू शकतो. सौम्य आजार असेल तर गावात तुम्ही उपचार करू शकाल. तीव्र आजार असेल तर रुग्णालयात पाठवायला पाहिजे. योग्य उपचाराने मूल वाचू शकते.

दम लागण्याची तपासणी
  • बाळ दर मिनिटास किती वेळा श्वास घेते, हे मोजून दम लागला आहे की नाही ते ठरते.
  • दोन महिन्यांपेक्षा लहान बाळ असेल तर श्वसनगती मिनिटास 60 पेक्षा जास्त असल्यास दोष समजावा.1 वर्षापर्यंतचे बाळ असेल तर मिनिटास 50 पेक्षा जास्त श्वसनगती असल्यास दोष समजावा.

6 महिने ते 1 वर्षापेक्षा मोठया मुलांमध्ये मिनिटाला 40 पेक्षा अधिक श्वसन गती असेल तर दोष समजावा. हे तुम्हाला घडयाळाच्या सेकंद काटयाबरोबर छातीची हालचाल मोजून कळू शकते. यासाठी पूर्ण मिनिटभर श्वसन मोजा. श्वसनाची गती बरेचदा अनियमित असल्याने पूर्ण मिनिटभर मोजावेच लागते.

या बरोबरच नाकपुडया फुललेल्या दिसतात .

बालन्यूमोनिया सौम्य आहे की गंभीर ?

ताप, खोकला, दम लागणे या झाल्या न्यूमोनियाबद्दल प्राथमिक गोष्टी. याव्यतिरिक्त खालीलपैकी एखादीही खूण असेल तर आजार जास्त आहे हे निश्चित.

  • श्वास आत घेताना खालची बरगडी आत ओढली जाणे. यासाठी बाळाचा कपडा वर करून पोट-छाती पाहा.
  • श्वास आत घेताना बाळ कण्हत असल्यास.
  • श्वास बाहेर सोडताना शिटीसारखा आवाज येणे.
  • झटके (बाळाचे सौम्य झटके ओळखायला आपल्याला शिकायला पाहिजे).
  • बाळाने अंगावरचे दूध न ओढणे.
  • पोट डांबरलेले असणे/ फुगून येणे.
  • बाळ सतत झोपणे, लवकर जागे न होणे, जागे झाले तर लगेच झोपणे.
  • मूल आधीच कुपोषित असेल तर धोका जास्त असतो.
  • शरीराचे तपमान नेहमीपेक्षा कमी होणे. (बाळाचे अंग गार पडणे) हा बाळ गार पडण्याचा प्रकार दोन महिन्यांपेक्षा लहान मुलात होऊ शकतो, हा तापाच्या उलट आणि जास्त धोकादायक प्रकार आहे हे लक्षात घ्या.
  • त्वचा, जीभ, ओठ यांवर थोडी निळसर झाक असेल तर धोका आहे. अशा बाळाच्या रक्तात प्राणवायू कमी, कार्बनवायू जास्त म्हणून असे होते.
उपचार

योग्य वेळेत प्रतिजैविके, शरीरातील पाणी कमी होऊ न देणे, तापाचे औषध असे उपचार ताबडतोब सुरू करावे व रुग्णालयात पाठवून द्यावे. उपचार लवकर सुरू झाल्यास हमखास गुण येतो. पण उशीर झाला तर यात बाळ दगावू शकते.  म्हणून सर्व प्रयत्न वेळीच करायला पाहिजे.

खोकला मुलांसाठी (तक्ता (Table) पहा)