स्मरणशक्ती कमी होणे म्हणजे वाढत जाणारा विसराळूपणा ही एक गंभीर समस्या आहे.वाढणारे जीवनमान, वाढते वय आणि वृध्दांची संख्या हे त्याचे प्रमुख कारण आहे. या आजाराने अनेक व्यक्ती एक प्रकारे अपंग होतात. हळूहळू दैनंदिन व्यवहार करणेही अवघड व्हायला लागते. या विकारामागे काही वेगवेगळी कारणे आहेत. त्यातली काही उपचारला चांगला प्रतिसाद देतात.
रक्तप्रवाह कमी झाल्याने विस्मरण
उतारवयात मेंदूचा रक्तप्रवाह कमी व्हायला लागतो. एकूणच शरीरात रक्तवाहिन्या अरुंद होत असतात, त्यात छोटे मोठे अडथळे येत राहतात, सूक्ष्म रक्तस्राव होत राहतात. शरीरात अनेक इंद्रियात यामुळे बिघाड होतात. मात्र मेंदूत रक्तप्रवाहातले अडथळे खूप नुकसानकारक असतात. मेंदूत विशिष्ट कामासाठी विशिष्ट जागा ठरलेल्या असतात. याच कारणाने पक्षाघातही होतो. मात्र पक्षाघातासाठी अचानक मोठा अडथळा कारणीभूत ठरतो. विस्मरण व मानसिक क्षीणता अनेक सूक्ष्म अडथळयांमुळे येते. या विकाराचे मुख्य कारण म्हणजे मेंदू आकसत जातो व अकार्यक्षम होतो. मेंदूतले सूक्ष्म तंतू एकमेकात गुंतून जाळी तयार होतात. मेंदूत beta amyloid & Tau या सदोष प्रथिनाचे प्रमाण वाढत जाते. रक्तवाहिन्यांमध्ये देखील थर जमायला लागतात. यामुळे रक्तप्रवाहाची कुचंबणा होते.
हा विकार उतारवयातच येतो. यामध्ये विस्मरण, स्थळ काळाचे भान कमी होणे, मूड बदलणे, वाक्ये न बोलता येणे, परत परत तेच शब्द येणे, ओळखायला न येणे, बोलणे न समजणे, आणि एकूण भ्रमिष्टपणा ही वाढती लक्षणे दिसून येतात. शब्दसंपत्ती कमी होत जाते. वाक्यरचना तुटक होते,स्व-भान जाते. आणि शेवटी व्यक्ती मूक होते. पुढेपुढे दैनंदिन व्यवहार – खाणे, पिणे, स्वच्छता, कपडे घालणे वगैरे गोष्टीपण अवघड होत जातात. हळूहळू व्यक्ती परावलंबी होतात.
या आजारात साधारणपणे निरनिराळ्या बौध्दिक कमतरता निर्माण होतात.
शेवटी शेवटी असा माणूस पूर्णपणे मनविरहीत आणि परावलंबी होतो. ही परिस्थिती घरात सर्वांनाच दु:ख व पीडादायक असते. निदान झाल्यानंतर साधारणपणे 7-8 वर्षात मृत्यू येतो.
याचबरोबर इतरही शारीरिक-सामाजिक समस्या असू शकतात: वृद्धत्व ,तणाव ,एकटेपणा, कधी वैवाहिक जोडीदार नसणे किंवा निघून जाणे, स्थूलता. या सर्व समस्या परिस्थिती आणखी बिकट करतात. अनेक वृद्धाश्रमही अशा आजारी व्यक्तीना प्रवेश/दाखल करून घेत नाहीत. काही संस्था मात्र याला अपवाद आहेत (उदा: तपस -बालेवाडी पुणे). काही संस्था फक्त दैनंदिन काळजी घेतात, रात्री घरी सोडतात.
अल्झायमर प्रतिबंध
या आजाराबद्दल संशोधनाने काही प्रतिबंधक मुद्दे माहीत झाले आहेत ते पुढीलप्रमाणे
भारतात या आजारावर योगासने, प्राणायाम, ब्राह्मी वनस्पती यावर प्रयोग चालू आहे.
व्यवस्थापन
या आजारावर नक्की औषधे अद्याप मिळालेली नाहीत. काही औषधांचा वापर केला जातो, पण उपयोग मर्यादित आहे. याशिवाय काही मानसोपचारांचा अभ्यास चालू आहे.
घरातल्या इतर व्यक्तींवर या आजारी माणसाची विशेष जबाबदारी येऊन पडते.
गंभीर स्वरुपाच्या मानसिक आजारांबरोबर स्मृतिभ्रंश (विस्मरण-विकार) येऊ शकतो. विशेषत: अतिनैराश्य किंवा वेड लागणे, इ. विकारात हाही भाग दिसून येतो. उतारवयात येणा-या विस्मृती-विकारापेक्षा याची लक्षणे वेगळी असतात. याचा वयोगट पण बराच आधी म्हणजे तरुणवयात सुरु होतो.
मद्यपि, व्यसनाधीन व्यक्तीच्या शरीरात ब जीवनसत्त्व (थायमिन) कमतरता निर्माण होते. त्वचा काळपट होणे, यकृत खराब होणे याबरोबरच मानसिक क्षीणता व विस्मृतीविकार वाढायला लागतो. या आजाराची एक प्रमुख खूण म्हणजे चालण्यात येणारा असमतोल. या विकारात खूप पूर्वीची स्मृती टिकून राहते, पण नुकत्याच झालेल्या गोष्टी विसरल्या जातात. याबरोबरच एकूण गोंधळलेपण, अलिप्तता, असमंजसपणा, इ. बदल दिसतात. ब जीवनसत्त्वापैकी थायमिन औषधाची मात्रा देऊन या आजारात सुधारणा होऊ शकते.
याशिवाय इतर अनेक आजारांमुळे विस्मृतीविकार होतो. यांची यादी खूपच मोठी आहे, पण काही उदाहरणे म्हणजे – मेंदूत रक्तस्त्राव, सिफिलिस-गरमी, मेंदूत गाठी, मेंदूसूज, मेंदूज्वर, मेंदूआवरण दाह, फिट, अपस्मार-मिरगी, लकवा, इत्यादी.