पचनसंस्थेचे आजार

हगवण-जुलाब

शौचाला पातळ होणे हे लहानपणापासून सर्वांच्या अनुभवाचे असते. मात्र यात खालीलप्रमाणे काही प्रकार असतात.

  • पाण्यासारखे पातळ जुलाब असल्यास अतिसार म्हणतात.
  • मळाला नुसता पातळपणा असेल तर हगवण म्हणतात. परंतु सामान्य लोकभाषेत असा स्पष्ट फरक दिसून येत नाही.
  • आव हगवण (आमांश) दोन प्रकारची असते. रक्तशेंब असणारी व नुसती शेंब पडणारी.
  • हगवण हा शब्द दोन्ही प्रकारांना (लहान व मोठया आतडयाचा आजार) वापरतात.
  • हगवणीत पडणारे रक्त मोठया आतडयात जखमा झाल्याने पडते. या जखमा जंतूंच्या आक्रमणामुळे होतात. सर्वच प्रकारचे जंतू आतडयाला इजा करत नसल्यामुळे नेहमी रक्त पडत नाही.

हगवणीचा आजार लहान आतडयात असेल तर त्यातले अन्न व पाणी शोषले न जाता बहुतेक सर्व अन्न-पाणी तसेच बाहेर पडते. त्यामुळे पातळ, पाण्यासारखे जुलाब होतात. पोटात अन्न नसले तरी लहान आतडयात पाणी, रस पाझरून त्याचेच जुलाब होतात.

  • पातळ जुलाबाबरोबर काही वेळा कळ येते तर काही वेळा कळ येत नाही.
  • पटकी व अतिसारामध्ये हे जुलाब भाताच्या पेजेसारखे पांढरे असतात. पातळ जुलाबामध्ये सहसा रक्त पडत नाही.
  • पटकी व अशा काही आजारांत जुलाब व उलटया एकत्रच होतात. पण बहुधा उलटी आधी येते व मग जुलाब चालू होतात.

हगवणीचा आजार जर मोठया आतडयात असेल तर जुलाब फार पातळ होत नाहीत. यात बहुधा चिकट पदार्थ (शेंब) व कधीकधी रक्त पडते. बहुतेक वेळा पोटात कळ येते आणि दुखत राहते. या प्रकाराला आमांश (आव) म्हणण्याचीही पध्दत आहे.

मुलांच्या अतिसारासाठी मुलांच्या आजारांच्या प्रकरणात माहिती दिली आहे. या प्रकरणात फक्त 6 वर्षानंतरची मुले, तरुण, प्रौढ यांच्यासाठी सूचना आहेत.

जुलाबाचे कारण शोधा

हगवण-जुलाबाची अनेक कारणे असतात. अपचन, वावडे ही कारणेही असतात. मात्र हगवणीला जिवाणू, अमिबा, विषाणू ही महत्त्वाची कारणे आहेत. जुलाबाचे कारण शोधून योग्य तो इलाज करावा लागतो. अमिबा किंवा जंतुदोषाचे जुलाब असल्यास विशिष्ट औषधे वापरावी लागतात. मात्र ब-याच वेळा जुलाब ‘विषाणूं’मुळे होतात आणि यांत औषधे उपयोगी पडत नाहीत, उलट प्रतिजैविक औषधे मात्र निकामी होण्याचा धोका वाढतो.

जुलाबाचे मुख्य कारण म्हणजे दूषित अन्न-पाणी. पाणी स्वच्छ आणि पुरेसे पाहिजे. राहणीमान सुधारण्याने स्वच्छता वाढते व रोग कमी होतो. ज्या लोकांना अपुरे, अशुध्द पाणी मिळते त्यांना या प्रकारचे आजार सतत होतात. लहान मुलांमध्ये तर जुलाब, अतिसार प्रमाण फार आहे. शहरातल्या झोपडपट्टयांतही याचे प्रमाण पुष्कळ आहे. नदी, उघडे झरे, उघडया विहिरी यांच्या पाण्यात सहसा हे जंतू आढळतात. मुख्य म्हणजे मानवी किंवा प्राण्यांची विष्ठा व पिण्याचे पाणी यांचा संबंध आला तर हे आजार उद्भवतात. कूपनलिकांमुळे मात्र या आजारांचे प्रमाण घटले आहे.

हे सर्व रोग सूक्ष्मजंतूंमुळे (जिवाणू, अमिबा, विषाणू) होतात. हे सूक्ष्मजंतू हगवण-आजा-याच्या विष्ठेतून येतात. हे जंतू हाताने, अन्नावाटे; पाण्यावाटे, अन्नातून किंवा माशीच्या संपर्काने पसरतात. यासाठी हातांची, भांडयांची स्वच्छता, नखे कापणे, अन्न झाकून व सुरक्षित ठेवणे, इत्यादी काळजी घेणे आवश्यक आहे. जिवाणू-हगवण ही बहुधा साथीमध्ये येऊ शकते. पावसाळयात सुरुवातीला दोन्ही प्रकारची हगवण जास्त दिसते.

जुलाबाच्या तक्त्यात पाहिल्यानंतर जुलाबांची निरनिराळी कारणे ध्यानात येतील.

अनेकदा ही दोन्ही प्रकारची (जिवाणू, अमिबा) हगवण एकत्र येते. पैकी कोणत्याही एकासाठी औषध दिले तरी मग ती चालूच राहते. दोन्ही आजारांच्या खाणाखुणांमध्ये थोडा फरक आहे.

  • जिवाणू हगवणीत कळ, मुरडा जास्त प्रमाणात असतो. यात पहिल्या दोन-तीन जुलाबांत विष्ठा पडून गेल्यावर नंतरच्या जुलाबात केवळ रक्तशेंब पडते, कधीकधी ताप येतो.
  • अमिबा या एकपेशीय प्राण्यामुळे दर वेळेस सैल, पातळ, हगवण होते. ब-याच वेळा शेंब पडते. क्वचित रक्तही पडते. वारा सरणे, अर्धवट जुलाब होऊन आत काहीतरी राहिल्याची भावना राहणे, ही सर्व अमिबा हगवणीची चिन्हे आहेत. ही हगवण टिकून राहण्याची शक्यता असते.
  • जिआर्डिया या अमिबासारख्या एकपेशीय प्राण्यामुळे येणारी हगवण फेसकट असते. त्याबरोबर बहुधा आवाज येतो व याचे जुलाब रोखून धरता येत नाहीत.
  • अपचनाचे निदान करताना अपचनाची माहिती, करपट ढेकर, इत्यादींवरून खात्री करता येते.
प्रतिबंध

मानवी विष्ठा व्यवस्थापन, हात धुणे, पिण्याचे शुद्ध पाणी, अन्न-सुरक्षित असणे ही यासाठी महत्वाचे आहे. सार्वजनिक पातळीवर स्वच्छ भारत योजना यासाठी महत्वाची आहे.

हगवण व जुलाबाचे उपचार

जंतुविरोधी औषधे

हगवण निरनिराळया प्रकारची असल्यामुळे कारण निश्चित करणे आवश्यक आहे. (रोगनिदान तक्ता पाहा).

  • विषाणू हगवणीसाठी खास औषध आधुनिक शास्त्रात नाही.
  • जिवाणू-हगवणीसाठी टेट्रासायकलीन , कोट्रायमेथाकझाझोल , फ्युराझोलीडिन इत्यादी यांपैकी विशिष्ट औषध देतात .
  • अमिबा व जिआर्डिया यांमुळे येणा-या हगवणीत मेट्रोनिडाझोल हे औषध वापरतात .
  • जंतामुळे येणा-या हगवणीत जंतावरचे अलबेंडेझोल हे औषध वापरावे. (मोठया माणसांना सहसा जंतामुळे हगवण होत नाही.) मात्र हा त्रास सामान्यपणे लहान मुलांना होतो.
जलसंजीवनी, आणि घरगुती द्रवपदार्थ

हगवण : शौचास  ब-याच वेळा होणे, मोठे जुलाब होणे इत्यादींमुळे शरीरातले पाणी कमी पडून शोष पडतो. शोष टाळण्यासाठी किंवा आधीच शोष झाला असेल तर उपचार म्हणून मीठ-साखर पाणी (जलसंजीवनी) चालू करा. (तपशील मुलांच्या आजारात पाहा.) यामुळे शरीरातील क्षार व पाण्याची भरपाई होते. नारळाचे पाणी, चहा, कॉफी, पेज, सरबत, इ. द्रवपदार्थही चांगले असतात.

शरीरातून गेलेल्या पाण्याची भरपाई करताना ते थोडयाथोडया प्रमाणात द्यावे. दर पाच-दहा मिनिटांनी तीन -चार चमचे असे दिल्यास पचनसंस्थेत शोषले जाते. एकदम जास्त दिल्यास जुलाब किंवा उलटी होण्याची शक्यता असते.

हगवण : आयुर्वेदिक उपचार

जुलाबाची कारणे अनेक आहेत. कारणांप्रमाणे विशिष्ट उपचार करावे लागतात. या विशिष्ट उपायांव्यतिरिक्त पचनक्रिया सुधारण्यासाठी काही पाचक औषधे आयुर्वेदात सांगितली आहेत.

एक उपाय म्हणजे त्रिकटू चूर्ण (सुंठ, मिरे, पिंपळी) एक-दोन ग्रॅम मात्रेत दिवसातून दोन-तीन वेळा द्यावे. जुलाब थांबल्यावर पाचक औषधे दोन-तीन दिवसांपर्यंत चालूच ठेवावीत.

  • पाण्यासारखे किंवा भाताच्या पेजेसारखे पातळ जुलाब होत असतील तर हा उपाय करावा. आले, कांदा किसून त्यांचा वस्त्रगाळ रस एकेक चमचा एकत्र करून त्यात किंचित कापूर मिसळावा. दर पंधरा मिनिटांनी तीन वेळा हे औषध द्यावे. यानंतर हेच औषध पाऊण तासाने देत राहावे. या उपायाने तीव्र उलटया-जुलाब तात्पुरते थांबतात. यानंतर बडीशेप, पुदिना यांचे अर्क उकळलेल्या पाण्यात टाकून हे कोमट पाणी देत राहावे. अर्क तयार नसल्यास उकळलेले आठ कप पाणी + 25 ग्रॅम बडीशेप ठेचून + 50 ग्रॅम ओला पुदिना ठेचून औषधी पाणी तयार करता येते. (बडीशेप, पुदीना घातल्यावर पाणी परत उकळू नये, गार झाल्यावर गाळूनघ्यावे..)
  • हगवण किंवा जुलाब थांबण्यासाठी कुटजघनवटीच्या दोन गोळया तीन वेळा द्याव्यात.
  • मळाबरोबर आव, शेंब पडत असेल आणि मलविसर्जनानंतर अर्धवट भावना होत असेल तर 15 ते 25 मि. ली तिळाचे किंवा करडईचे तेल प्यायला द्यावे.
  • कोमट पाण्यात चमचाभर तूप टाकून प्यायला दिल्यावरही चांगला गुण येतो. किंवा याऐवजी शेंगदाणा तेल 10-15 मि.ली इतके द्यावे.

अपचनाचे जुलाब असतील तर त्या दिवसापुरते द्रव पदार्थ देत राहावेत. यासाठी तांदूळ किंवा कणीक पाण्यात उकळून वरचे पाणी मीठ साखर व आले किंवा सुंठ, मिरपूड टाकून द्यावे. यामुळे लवकर आराम वाटेल. (आले किंवा सुंठ, मिरपूड, इत्यादी पाणी उकळतानाच टाकावे)