चेतासंस्था

Page Under Maintenance

अपघातात मेंदूला मार लागणे

आपल्याकडे वाहन अपघात वाढत आहेत. रस्त्यावरच्या अपघातात, मारामारीत डोक्याला जखम होऊन मेंदूस मार लागण्याची शक्यता असते. (दुचाकी वाहनांवर हेल्मेट वापरणे आवश्यक आहे.) वरून या जखमा किरकोळ दिसल्या तरी आत मेंदूस इजा झाली आहे काय हा महत्त्वाचा प्रश्न असतो.

खालीलपैकी काहीही खाणाखुणा आढळल्यास ताबडतोब रुग्णालयात पाठवणे आवश्यक आहे.

  • तात्पुरती किंवा दीर्घकाळ  बेशुध्दी आली असल्यास
  • नाकातून, तोंडातून, कानातून रक्त आल्यास
  • शरीराचा कोठलाही भाग लुळा किंवा बधिर झाल्यास.
  • दोन्ही डोळयांच्या बाहुल्यांचा आकार असमान (लहान-मोठा) असल्यास.
  • कवटी अथवा मेंदूस इजा झाल्याचे दिसत असल्यास.

वरील खाणाखुणांसाठी निदान रुग्णालयात दाखल करून 24 तासांपर्यंत तरी लक्ष ठेवणे आवश्यक असते. मेंदुस सूज आली असल्यास त्यासाठी शिरेतून औषधे द्यावी लागतात. काही वेळ तातडीची शस्त्रक्रिया लागू शकते.

नातेवाईकांनी यासाठी रुग्णालयातून लवकर सोडण्याची घाई करू नये. स्कॅन व एम.आर.आय. तंत्रज्ञानाने आता या क्षेत्रात उत्तम निदान करता येते.

मेंदूत गळू होणे

मेंदूसुजेच्या काही प्रकारांत सूज विशिष्ट ठिकाणी येते. या जागी मेंदूत गळू किंवा बेंड तयार होते. हे गळू कोणत्याही जीवाणूंमुळे होऊ शकते व क्षयरोगातही होऊ शकते. या प्रकारात लक्षणे मर्यादित असतात. मेंदूच्या विशिष्ट भागात बिघाड झाल्याने शरीराचा संबंधित भाग बिघाड दाखवतो. यावरून तज्ज्ञांना गळू कोठे आहे त्याचे निदान करता येते. याच्या निदानासाठी स्कॅन करावा लागतो. उपचार म्हणजे रोगजंतूंविरुध्द औषधयोजना व आवश्यक वाटल्यास पू काढून घेण्यासाठी शस्त्रक्रिया.

मेंदूत गाठ होणे

शरीरात कोठेही साधी किंवा कर्करोगाची गाठ येऊ शकते. त्याचप्रमाणे मेंदूत किंवा चेतारज्जूत गाठ होऊ शकते. गाठीची जागा, वाढीचा वेग, प्रकार (साधी गाठ- कर्करोग) यांवर त्याचे परिणाम अवलंबून असतात. शरीरातील विशिष्ट भागात घडणा-या परिणामांवरून मेंदूतल्या गाठीच्या स्थानाचा अंदाज घेता येतो. ‘स्कॅन’ व एम.आर.आय. आणि पेट स्कॅन तपासणीद्वारा गाठीची नेमकी जागा व प्रकार शोधणे शक्य असते. निवडक रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करणे शक्य  असते. मेंदूवरील शस्त्रक्रिया नाजूक व गुंतागुंतीच्या असतात. पण योग्य वेळी उपचार झाल्यास रुग्ण वाचू शकतो.

वाणी (speech) विकारांविषयी माहिती

वाणी विकार हे मेंदू, मज्जासंस्था, किंवा तोंड–घसा यांच्या कार्यातील बिघाडामुळे होतात. त्यांची ओळख आणि वेळेवर निदान आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रमुख वाणी विकार पुढीलप्रमाणे आहेत:

  • बोलणे-समजणे यातील बिघाड अफेसिया (Aphasia) – मेंदूच्या डाव्या भागातील इजा (उदा. स्ट्रोक) झाल्यावर रुग्णाला बोलणे, समजणे, वाचणे किंवा लिहिणे कठीण जाते. रुग्ण शब्द विसरतो किंवा चुकीचे शब्द वापरतो.
  • डिसआर्थ्रिया (Dysarthria) – बोलण्यासाठी आवश्यक स्नायू कमकुवत किंवा असमन्वित झाल्याने उच्चार अस्पष्ट होतात. आवाज मंद, तुटक किंवा नाकातून येतो.
  • अप्रॅक्सिया ऑफ स्पीच (Apraxia) – मेंदू संदेश देतो पण तोंडाचे स्नायू योग्य हालचाल करू शकत नाहीत. रुग्णाला शब्द तयार करणे कठीण जाते, पण स्नायू शक्ती सामान्य असू शकते.
  • तोतरेपणा (Stuttering) – बोलताना अक्षरे/शब्दांची पुनरावृत्ती, अडखळणे किंवा लांबवणे दिसते. यामुळे संवादात अडथळा येतो.
  • डिस्फोनिया (Dysphonia) – आवाजाचा पट्टा, गुणवत्ता किंवा ताकद बदलते. आवाज बसणे, खर्जात जाणे ही लक्षणे दिसतात.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या बोलण्यातील बदल, समजण्याची क्षमता, आणि अचानक सुरुवात याकडे लक्ष द्यावे. तज्ञाचा सल्ला महत्वाचा. (स्पीच थेरपिस्ट/न्यूरोलॉजिस्ट कडे संदर्भ द्यावा.) वेळेवर उपचार केल्यास रुग्णाच्या संवाद क्षमतेत सुधारणा होऊ शकते.